न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. ही बँकींग सेवा पुरविणारी संस्था असून त्यांनी दि. 18/1/2020 रोजी दैनिकामध्ये वाहन लिलावाची जाहीर सूचना प्रसिध्द केली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. बँकेच्या लिलावामध्ये भाग घेवून बजाज आर.ई. मॅक्झिमा सी एप्रिल 2017 हे कर्जदार श्री दादासाहेब खाशाबा साठे यांचे वाहन क्र. एम.एच. 50/एम-0072 लिलावात बोली लावून दि. 28/1/2020 रोजी रक्कम रु. 65,900/- इतक्या रकमेची निविदा सादर केली. सदरची निवीदा स्वीकारुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे वाहन विक्री केले. तक्रारदार यांनी सदरची रक्कम तातडीने वि.प. यांचेकडे भरली. तक्रारदारांनी रक्कम रु. 60,000/- चेकने व उर्वरीत रक्कम रु. 5,900/- ही रोखीने दि. 30/1/2020 रोजी वि.प. यांना अदा केली आहे. परंतु वि.प यांनी तक्रारदार यांचे नावे सदरचे वाहन वर्ग केलेले नाही. तसेच वाहनाचे आर.सी. बुक तसेच इतर संबंधीत कागदपत्रे तक्रारदार यांचे नावे वर्ग करणेची जबाबदारी वि.प. यांची असूनही वि.प. यांनी सदरची जबाबदारी पार पाडलेली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वाहन मालकी हक्कांसह तक्रारदाराचे ताब्यात मिळावे किंवा वि.प. यांना अदा केलेली रक्कम रु.65,900/- व त्यावर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 10 कडे अनुक्रमे दैनिकामधील जाहीर लिलाव सूचना, वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्र, वि.प. यांचे गाडीचा ताबा देणेबाबतचे पत्र, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, फॉर्म नं. 28, 29, 30, 35, तक्रारदार यांनी रोख अदा केलेल्या रकमेची पावती, चेकने अदा केलेल्या रकमेची पावती, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्या नोटीसची पावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुतकामी वि.प. यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून वाहनाचा मालकी हक्कांसह ताबा किंवा वाहनाचे खरेदीपोटी दिलेली रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. बँकेने जाहीर केलेल्या लिलावामध्ये भाग घेवून बजाज आर.ई. मॅक्झिमा सी एप्रिल 2017 हे कर्जदार श्री दादासाहेब खाशाबा साठे यांचे वाहन क्र. एम.एच. 50/एम-0072 लिलावात बोली लावून दि. 28/1/2020 रोजी रक्कम रु. 65,900/- इतक्या रकमेची निविदा सादर केली. सदरची निवीदा स्वीकारुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे वाहन विक्री केले. तक्रारदार यांनी सदरची रक्कम तातडीने वि.प. यांचेकडे भरली. तक्रारदारांनी रक्कम रु. 60,000/- चेकने व उर्वरीत रक्कम रु. 5,900/- ही रोखीने दि. 30/1/2020 रोजी वि.प. यांना अदा केली आहे. तक्रारदार यांनी सदरच्या रकमा अदा केलेबाबतच्या पावत्या याकामी हजर केल्या आहेत. वि.प. हे याकामी हजर झालेले नाहीत व त्यांनी तक्रारदारांनी दाखल केलेली सदरची कागदपत्रे नाकारलेली नाही. सबब, वि.प. यांना सदरची कागदपत्रे मान्य आहेत असा निष्कर्ष याकामी काढण्यात येतो. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये, तक्रारदार यांनी वि.प. बँकेने जाहीर केलेल्या लिलावामध्ये भाग घेवून बजाज आर.ई. मॅक्झिमा सी एप्रिल 2017 हे कर्जदार श्री दादासाहेब खाशाबा साठे यांचे वाहन क्र. एम.एच. 50/एम-0072 लिलावात बोली लावून दि. 28/1/2020 रोजी रक्कम रु. 65,900/- इतक्या रकमेची निविदा सादर केली. सदरची निवीदा स्वीकारुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे वाहन विक्री केले. तक्रारदारांनी रक्कम रु. 60,000/- चेकने व उर्वरीत रक्कम रु. 5,900/- ही रोखीने दि. 30/1/2020 रोजी वि.प. यांना अदा केली आहे. परंतु वि.प यांनी तक्रारदार यांचे नावे सदरचे वाहन वर्ग केलेले नाही. तसेच वाहनाचे आर.सी. बुक तसेच इतर संबंधीत कागदपत्रे तक्रारदार यांचे नावे वर्ग करणेची जबाबदारी वि.प. यांची असूनही वि.प. यांनी सदरची जबाबदारी पार पाडलेली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे, असे कथन केले आहे. तक्रारदार यांनी याकामी वि.प. बँकेने तक्रारदारांना विक्री केलेले वि.प. बँकेचे दि. 5/2/2020 चे पत्र दाखल केले आहे. तसेच वि.प. यांनी राजेंद्र साई रिकव्हरी एजन्सी कोल्हापूर यांना दि. 6/02/2020 चे पत्र देवून तक्रारदारांनी निविदा रक्कम वि.प. यांचेकडे भरली असलेने तक्रारदाराचे वाहन रिलीज करणेबाबत निर्देश दिल्याचे दिसून येते. सदरची कागदपत्रे पाहता, तक्रारदाराने वि.प. यांचेकडे निविदेप्रमाणे सर्व रक्कम भरल्याचे दिसून येते. परंतु तरीही वि.प. यांनी तक्रारदारांना वादातील वाहनाचा ताबा दिलेला नाही तसेच वाहनाचा मालकी हक्क वर्ग करुन दिलेला नाही ही बाब दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.
8. तक्रारदाराने तक्रारअर्जात कथन केलेल्या या सर्व बाबी वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेल्या नाहीत. वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी आयोगासमोर हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प. विरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सबब, तक्रारदाराने निविदा रक्कम रु. 65,900/- अदा करुनही वि.प. यांनी तक्रारदारास वादातील वाहनाचा ताबा मालकी हक्कांसह दिलेला नाही ही बाब तक्रारदारांनी याकामी शाबीत केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. सबब, वि.प. यांनी वादातील वाहनाचा ताबा मालकी हक्कांसह तक्रारदारास द्यावा या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जर वि.प. यांना वाहनाचा ताबा देणे शक्य नसेल तर वि.प. यांनी तक्रारदारांना त्यांचेकडून घेतलेली रक्कम रु. 65,900/- रक्कम अदा केलेल्या तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केल्याने मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) तक्रारदार यांनी वि.प. यांना वादातील वाहन बजाज आर.ई. मॅक्झिमा सी एप्रिल 2017 नोंदणी क्र. एम.एच. 50/एम-0072 या वाहनाचा ताबा मालकी हक्कांसह तक्रारदारास द्यावा.
अथवा
जर वि.प. यांना वाहनाचा ताबा देणे शक्य नसेल तर वि.प. यांनी तक्रारदारांना रक्कम रु.65,900/- अदा करावी व सदर रकमेवर सदरची रक्कम वि.प. यांना अदा केलेल्या तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणारे व्याज वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावे.
3) वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.