श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 अन्वये आयोगासमोर दाखल केलेली आहे. वि.प.क्र. 1 ही बँक असून तक्रारकर्तीच्या मृतक पतीचे त्यांचेकडे खाते होते वि.प.क्र. 2 ही विमा कंपनी असून ती ग्राहकांना सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी निर्गमित करतात. वि.प.ने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम न दिल्याने तिने सदर तक्रार आयोगासमोर दाखल केली.
2. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री. राजकुमार मुरलीधर सावरकर यांचे वि.प.क्र. 1 कडे बचत खाते होते आणि त्यांनी वि.प.क्र. 2 यांच्याकडून ग्रुप हेल्थ इंशूरंस पॉलिसी क्र. 1080157 अन्वये दि.12.05.2017 ते 11.05.2022 पर्यंत रु.6,296/- विमा हप्ता देऊन काढली होती. विमा पॉलिसीप्रमाणे मृतकाचा पाच लाख रुपयांचा विमा आणि एक लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च वि.प. देय होते. तक्रारकर्तीच्या पतीचा दि.16.01.2018 रोजी अपघात होऊन दि.18.01.2018 रोजी मृत्यु झाला. विमा कालावधीत मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने सर्व दस्तऐवजासह विमा दावा वि.प.कडे सादर केला. परंतू पुढे वि.प.ने तिच्या विमा दाव्यासंबंधी तिला काहीही कळविले नसल्याने, तिने त्यांना माहितीचे अधिकारात दाव्याची माहिती विचारली असता त्यांनी दि.14.08.2019 रोजी तिचा विमा दावा मृतक नशेच्या अंमलात असल्याने खारिज केल्याची माहिती दिली. तक्रारकर्तीचे मते वि.प.ने तिला दाव्याबाबत तिची कुठलीही बाजू मांडू न देता खारिज केलेला आहे, म्हणून तिने आयोगासमोर सदर तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.6,00,000/- व्याजासह देण्यात यावी, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबबत भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर प्रकरणाची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 यांचेवर बजावण्यात आली असता वि.प.क्र. 1 ने लेखी उत्तर दाखल केले. वि.प.क्र. 1 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये त्यांच्या बँकींगचा व्यवसाय मान्य करुन तक्रारकर्तीचे पतीने वि.प.क्र. 2 कडून विमा पॉलिसी घेतल्याची बाब नाकारली आहे. तसेच वि.प.क्र. 1 हे विमा दावा देण्यास जबाबदार नसून त्यांचेविरुध्द काही कारण नसतांना तक्रारकर्तीने तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करण्यायोग असल्याचे कथन केले आहे. तसेच पुढे वि.प.क्र. 1 ने असे नमूद केले आहे की, वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीच्या मृतक पतीचा दावा वि.प.क्र. 2 ला विचार करण्यास सांगितले होते. परंतू तक्रारकर्तीचा मृतक पती हा नशेच्या अंमलात असल्याने विमा कंपनीने तो नाकारला. मृतक राजकुमार सावरकर याने वि.प.क्र. 1 कडून कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाच्या अनुषंगाने त्याचा विमा वि.प.क्र. 2 यांचेकडून काढला होता. राजकुमार सावरकर याचा मृत्यु झाल्याचे तक्रारकर्तीने कळविल्यावर वि.प.क्र. 2 ला त्यांनी विमा दावा निकाली काढण्याकरीता सांगितले असता त्यांनी चौकशी करुन विमा दावा हा मृतक अपघाताचे वेळेस नशेच्या अंमलाखाली असल्याने नाकारला. यामध्ये वि.प.क्र. 1 कुठलीही भुमीका नसल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी वि.प.क्र. 1 ने केलेली आहे.
4. सदर प्रकरण वि.प.क्र. 2 चे लेखी उत्तराकरीता असतांना त्यांचे अधिवक्त्याने सदर प्रकरणी तक्रारकर्ती व त्यांचेमध्ये समझोता होऊन रु.5,00,000/- देण्यात येत असल्याने संयुक्त पुरसिस आयोगासमोर दि.07.01.2020 रोजी दाखल केले. परंतू पुढे 30.12.2020 पर्यंत वि.प.क्र. 2 ने तडजोडीबाबत किंवा लेखी उत्तर दाखल करण्याबाबत कुठलीही पावले न उचलल्याने प्रकरण पुढे चालविण्यात आले व दि.11.01.2021 रोजी वि.प.क्र. 2 विरुध्द विना लेखी जवाब कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
5. सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकण्यात आला. आयोगाने सदर प्रकरणातील उभय पक्षांची कथने आणि दाखल दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे आणि त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती विरुध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय.
2. वि.प.क्र.1 च्या सेवेत त्रुटी आहे काय? नाही.
3. वि.प.क्र.2 च्या सेवेत त्रुटी आहे काय? होय.
4. तक्रारकर्ती कुठली दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
6. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पॉलिसीवरुन व वि.प.क्र. 1 ने लेखी युक्तीवादामध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीच्या मृतक पतीने वि.प.क्र.1 कडून उदरनिर्वाहाकरीता वाहन कर्ज घेऊन दि.11.05.2017 रोजी घेतले होते आणि सदर कर्जाच्या सुरक्षिततेकरीता कर्जदार मृतक राजकुमार सावरकर याचा विमा वि.प.क्र. 2 कडे दि.12.05.2017 ला काढण्यात आला होता. मृतक राजकुमार सावरकर यांची पत्नी म्हणून तक्रारकर्ती ही वि.प.क्र. 1 व 2 ची लाभार्थी म्हणून ग्राहक ठरते. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
7. मुद्दा क्र. 2 – वि.प.क्र. 1 ने दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यावर वि.प.क्र. 2 ला त्याची माहिती देऊन विमा दावा मंजूरीस्तव पाठविल्याचे दिसून येते. तसेच त्याची कर्जाची रक्कम ही थकीत असल्याने व कर्जखाते NPA/निष्क्रीय कर्ज खाते झाल्याने वि.प.क्र. 2 ला विमा दावा मंजूर केल्यानंतर रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याचे संदर्भाने सुध्दा पत्र पाठविल्याचे दिसून येते. या सर्व कृतीवरुन वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीस सेवा देण्यास दिरंगाई केल्याचे दिसून येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविण्यात येतात.
8. मुद्दा क्र. 3 – वि.प.क्र. 2 ने वि.प.क्र.1 ने विमा दावा मंजूरीकरीता पाठविल्यावर वि.प.क्र. 2 ने सदर विमा दावा हा मृतक राजकुमार सावरकर हा मृत्युसमयी अंमली पदार्थ सेवन केलेला असल्याने (REJECT INFLUENCE OF DRUGS, ALCOHOLS OR OTHER INTOXICATIONS OR HALLUCINOGENS) त्याचा विमा दावा नाकारण्यात आला. वि.प.क्र. 2 आयोगासमोर त्यांचे अधिवक्त्यामार्फत हजर झाले, परंतू त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर, लेखी युक्तीवाद, त्यांनी विमा दावा चौकशी संदर्भात गोळा केलेला पुरावा व नशेच्या अंमलात असल्याबाबतचा पुरावा आयोगासमोर सादर केला नाही. तक्रारकर्तीला ही बाब माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविल्यानंतर समजलेली आहे. आयोगाने राजकुमार सावरकर ह्याचा अपघात झाल्यावर मृत्यु झाला, त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालाचे सूक्ष्मपणे अवलोकन केले असता मृत्युचे कारण हे पोटावर आघात होऊन रक्त संसर्ग झाल्याने “Septicemia in a admitted case of Blunt trauma abdomen.” नमूद केले आहे आणि त्यावर फोरेंसिक औषधी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांचे डॉक्टरांची स्वाक्षरी आणि शिक्का आहे. त्यामुळे वि.प.ने ज्या कारणास्तव तक्रारकर्तीच्या मृतक पतीचा विमा दावा नाकारला ते कारण दिसून येत नाही. वि.प.ची सदर कृती ही ग्राहकास सेवा देण्यात त्रुटी ठेवणारी आहे आणि म्हणून तक्रारकर्तीच्या मृतक पतीच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे. वि.प.ने अनुचित कारण देऊन तक्रारकर्तीच्या मृतक पतीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्याचे स्पष्ट होत असल्याने मुद्दा क्र. 3 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
9. सदर तक्रार ही आयोगासमोर न्यायप्रविष्ट असतांना वि.प.क्र. 2 विमा कंपनीतर्फे त्यांचे अधि. सचिन जैस्वाल हजर झाले आणि त्यांनी दि.07.01.2020 रोजी संयुक्त पुरसिस तक्रारकर्ती आणि वि.प.क्र. 2 चे अधिवक्ता स्वाक्षरीसह सादर करुन उभय पक्षात समझोता होऊन 30 दिवसाचे आत रु.5,00,000/- रक्कम देण्याचे मान्य केले. परंतू पुढे बराच कालावधी उलटून गेल्यावरही वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम दिली नाही, म्हणून प्रकरण पुढे चालविण्यात आले. वि.प.क्र. 2 चे सदर वर्तन हे सेवेतील त्रुटि व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब असल्याचे दिसून येते. वि.प.क्र. 1 चा मात्र विमा दावा निकाली काढण्यास विलंब लागला याबाबत कुठलीही त्रूटी आढळून न आल्याने त्यांचेविरुध्दची तक्रार ही खारीज करण्यात येते.
10. सदर तक्रार आयोगासमोर आदेशासाठी प्रलंबित असताना दि.26.09.2022 रोजी वि.प.क्र. 2 विमा कंपनीतर्फे त्यांचे नवीन अधि. रेणुका नालमवार हजर झाल्या व त्यांनी वकीलपत्र दाखल केले. तसेच दि.12.10.2022 रोजी त्यांनी पुरसिस दाखल करून उभय पक्षांत सन 2019 मध्ये समझोता झाल्याचे पुरसिस दाखल केले. त्यानुसार वि.प.क्र. 2 दावा रक्कम प्रदान करणार असल्याचे नमूद करताना तक्रारकर्त्याकडे असलेली दि.31.05.2022 रोजीची कर्जाची थकबाकी रु.2,70,536.92/- ही विमा दाव्याच्या देय रकमेतून वि.प.क्र.1 ला देणे आवश्यक आहे. त्याबाबत वि.प.क्र.1 कडून आजपर्यंत असलेल्या देय कर्जाची गणना (Computation) करून घेतल्यानंतर कर्ज खात्यात रक्कम दिल्यानंतर उर्वरित रक्कम तक्रारकर्तीस देणार असल्याचे निवेदन दिले. तसेच वि.प.क्र. 2 चे नाव बदलून ‘रेलिगेअर हेल्थ इंशुरंस कंपनी लिमिटेड’ ऐवजी ‘केअर हेल्थ इन्शुरेंस लिमिटेड’ झाल्याबद्दलचे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी देण्यात आलेले आदेश वि.प.क्र. 2 केअर हेल्थ इन्शुरेंस लिमिटेड वर बंधनकारक राहतील.
11. मुद्दा क्र. 4 – तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र.6 वरुन तक्रारकर्तीचा पती हा अपघात झाल्याचे दि.16.10.2017 ते 18.01.2018 या कालावधीत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर यांचेकडे भरती होता. तसेच अपघाती मृत्यु झाल्याने रु.5,00,000/- विमित रक्कम मिळण्यास तक्रारकर्ती लाभार्थी आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात हा विमा पॉलिसीच्या अवधीमध्ये झालेला असल्याने तक्रारकर्ती उपरोक्त दोन्ही रकमा व्याजासह मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे. वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 2 ला लिहिलेल्या पत्रामध्ये मृतक राजकुमार याने त्यांचेकडून वाहन कर्ज घेतल्याने त्यांचे मृत्युपरांत विम्याची मिळणारी रक्कम ही कर्ज खात्यात वळती करण्याचे अनुषंगाने त्यांना कळविण्याबाबत म्हटले आहे. यावरुन वाहन कर्जाची रक्कम थकीत असल्याचे दिसून येते. विमा पॉलिसीवरसुध्दा कर्ज घेणा-याचे जिवितास काही झाले तर विविध कलमांतर्गत लाभ नमूद केले आहे. आयोगाचे मते वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीचा विमा दावा मान्य करुन विमा पॉलिसी अंतर्गत एकूण रक्कम रु.5,00,000/- ही तक्रार नोंदणी दि.05.09.2019 पासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मंजूर करुन, वि.प.क्र. 1 ला त्यांची कर्ज थकीत असलेली रक्कम वळती करुन, उर्वरित रक्कम तक्रारकर्तीला द्यावी. तसेच तक्रारकर्तीला इतक्या विलंबानंतर वि.प.क्र. 2 ने विमा दावा देण्याची तयारी दि.07.01.2020 रोजीच्या पुरसिसनुसार दर्शविली. परंतू प्रत्यक्षात मात्र कुठलीही रक्कम न दिल्याने तक्रारकर्तीला जो मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला त्याची नुकसान भरपाई मिळण्यास ती पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे. वि.प.क्र. 2 च्या सेवेतील त्रुटीमुळे व अनुचित वर्तनाने तिला आयोगासमोर येऊन दाद मागावी लागली, म्हणून तक्रारकर्ती तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त कारणमिमांसेवरुन, उभय पक्षांची कथने आणि दाखल दस्तऐवज यावरुन आयोग सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 2 (केअर हेल्थ इन्शुरेंस लिमिटेड) ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्तीला रु.5,00,000/- ही रक्कम तक्रार नोंदणी दि.05.09.2019 पासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मंजूर करुन, येणा-या रकमेतून वि.प.क्र. 1 ला त्यांची कर्ज थकीत असलेली रक्कम समायोजित करुन, उर्वरित रक्कम तक्रारकर्तीला द्यावी. त्याबाबतचा सर्व तपशील तक्रारकर्तीस द्यावा.
2. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीला शारिरीक आणि मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईबाबत रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.20,000/- द्यावे.
3. सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.क्र. 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 60 दिवसात करावी.
4. वि.प.क्र. 1 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
5. आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.