न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती मयत सागर नामदेव रेपे हे शेतकरी होते व त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेली आहे. सदर पॉलिसीचा क्र. 163500/47/2017/65 असा असून कालावधी दि. 1 डिेसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा होता. सदर पॉलिसीच्या कालावधीतच दि. 29/9/2017 रोजी दु. 3.15 वा. चे सुमारास तक्रारदाराचे पती हे गोठयात शेडमध्ये इलेक्ट्रीक कडबा कुट्टी मशीनवर जनावरांना कडबा कुटत असताना त्यांना वीजेचा जोदार शॉक बसून ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे आणले असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याबाबत पोलिसांनी प्रेताचा इंक्वेस्ट पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात शवपरिक्षा करुन Probable cause is cardio respiratory arrest due to electric shock/electroculation असे मृत्यूचे कारण नमूद करुन अहवाल दिलेला आहे. तदनंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदाराने कृषी कार्यालयामार्फत वि.प. यांचेकडे क्लेम दाखल केला असता वि.प. यांनी दि.5/3/2018 रोजीच्या पत्राद्वारे मयत व्यक्तीच्या नावावर दि. 30/11/2016 पूर्वीचा फेरफारउतारा 6-ड व 7/12 नाही असे अत्यंत चुकीचे तांत्रिक कारण देवून तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. वास्तविक तक्रारदाराचे पती हे शेतकरी होते व ते वाडवडिलार्जित शेतीसोबतच स्वतःच्या मालकीची शेतजमीन देखील कसत होते. सदर मयत सागर नामदेव रेपे यांनी दि. 13/6/16 रोजीच स्वतःच्या नावे रजि.दस्त नं. 1640/2016 द्वारे शेतजमीन खरेदी केली आहे व सदर खरेदीपत्राची प्रत तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीस दिली आहे. फक्त सदर मयत सागर नामदेव रेपे यांचे नावाची नोंद फेरफार व 7/12 ला जरी विलंबाने झालेली असली तरी ती अवैध ठरत नाही. वि.प. यांनी क्लेम नाकारण्याकरिता नमूद केलेले कारणाविषयीची कोणतीही अट संबंधीत योजनते नमूद केलेली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे क्लेम नामंजूरीचे पत्र, वर्दी जबाब, इंक्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, फेरफार उतारा, गाव नमुना 8अ व 7/12 उतारा, वारसा प्रकरणाची नोंदवही 6क उतारा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदाराचा क्लेम वि.प. यांनी योग्य कारणास्तव नाकारलेला आहे. क्लेमच्या तपासानुसार मयत कै.सागर नामदेव रेपे यांचे नावांवर दि. 30/11/16 रोजीचा फेरफारउतारा 6ड व 7/12 नाहीत. तथाकथित अपघाताचे वेळी मयताचे नावे शेतजमीन होती याबाबत कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांचे पती हे शेतकरी नव्हते, म्हणून वि.प. कंपनीची कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती मयत सागर नामदेव रेपे हे शेतकरी होते व त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेली आहे. सदर पॉलिसीचा क्र. 163500/47/2017/65 असा असून कालावधी दि.1 डिेसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा होता. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये स्पष्टपणे मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, क्लेमच्या तपासानुसार मयत कै.सागर नामदेव रेपे यांचे नावांवर दि. 30/11/16 रोजीचा फेरफार उतारा 6ड व 7/12 नाहीत. तथाकथित अपघाताचे वेळी मयताचे नावे शेतजमीन होती याबाबत कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांचे पती हे शेतकरी नव्हते, म्हणून वि.प. कंपनीची कोणतीही जबाबदारी येत नाही असे कथन केले आहे. परंतु सदर कथनाचे पुष्ठयर्थ वि.प. यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. वि.प. यांनी केलेल्या तपासाची कोणतीही कागदपत्रे याकामी दाखल केलेली नाही. वि.प. यांनी यासंदर्भात केलेली कथने ही कोणत्याही पुराव्याशिवाय केलेली मोघम कथने आहेत. याउलट तक्रारदार यांनी याकामी फेरफार उतारा, गाव नमुना नं. 8-अ व 7/12 उतारा दाखल केला आहे. सदरचे कागदपत्रांमध्ये तक्रारदार यांचे पतीचे नांव स्पष्टपणे नमूद आहे. नमुना 9 यावर तक्रारदारांनी खरेदी दस्त क्र. 1647 दि. 1/09/2016 प्रमाणे शेतजमीन खरेदी केल्याची नोंद स्पष्टपणे दिसून येत आहे. सदरची बाब विचारात घेता, तक्रारदाराचे पती हे शेतकरी असल्याची बाब स्पष्टपणे शाबीत होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचे पती हे शेतकरी नव्हते हा घेतलेला आक्षेप अत्यंत चुकीचा व तांत्रिक असल्याचे दिसून येते. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.