::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/10/2016 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा कोळंबी, जि. वाशिम येथील रहिवाशी आहे. तक्रारकर्त्याकडे क्रुझर जीप असून त्याचा नोंदणी क्र. एम.एच. 37-जी-1738 असा आहे. सदर वाहनाचा अपघात विमा विरुध्द पक्षाकडे उतरविलेला आहे. दिनांक 06/02/2014 रोजी तक्रारकर्ता व त्याच्या कुटूंबातील व्यक्ती हे तक्रारकर्त्याच्या सासुबाईची प्रकृती बरोबर नसल्या कारणाने दिग्रस येथे जात होते. त्यावेळी तक्रारकर्त्याच्या गाडीवर मोहमंद शेकुर हा चालक होता व त्याच्याकडे वैध परवाना होता. परंतु सदरहु गाडीने दिग्रस येथे जातांना जोगलदरी गावा नजिक समोरुन येणा-या हिरो होंडा मोटर सायकल क्र. एम.एच. 29-एक्स-5788 ने तक्रारकर्त्याच्या गाडीला धडक मारली व त्यामध्ये मोटर सायकल चालक प्रविण तारासींग जाधव हा मय्यत झाला तर त्याचा सहकारी आकाश जाधव जखमी झाला. सदर अपघातामुळे तक्रारकर्त्याचे वाहन रोडच्या बाजूला जाऊन पलटले व गाडीचे बरेचशे नुकसान झाले.
सदरहू अपघाताची फिर्याद मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे दिली. त्यावरुन गाडी चालक भगवतवाले यांच्या विरुध्द अपराध क्र. 29/2014 कलम 279,337,338,304 (अ) भा.दं.वि. व 184 एम.व्ही. अॅक्ट प्रमाणे नोंदविला.
सदरहू अपघातामध्ये तक्रारकर्त्याचे गाडीचे जवळपास रुपये 1,70,000/- एवढे नुकसान झाले. त्याबाबतचा दावा आवश्यक कागदपत्रांसह विरुध्द पक्षाकडे दाखल करण्यांत आला. परंतु सदरहू दावाअर्ज विरुध्द पक्षाने अपघाताच्या वेळी सदरहू वाहन प्रवाशी वाहतूक करीत होते, या कारणाने नामंजूर केला व तसे पत्र दिनांक 23/03/2015 रोजी तक्रारकर्त्यास मिळाले. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली, व विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास वाहनाची नुकसान भरपाई रुपये 1,70,000/-, मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 25,000/-, असे एकूण रुपये 1,95,000/- व्याजासह देणेबाबत आदेश पारित व्हावा, तक्रारीचा खर्च रुपये 4,000/- मिळावा तसेच ईष्ट व न्याय दाद तक्रारकर्त्याच्या हितावह देण्यात यावी, अशी प्रार्थना केली. सदर तक्रारीसोबत निशाणी-4 प्रमाणे एकंदर 9 दस्त पुरावा म्हणून दाखल केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब - विरुध्द पक्षाने निशाणी 11 प्रमाणे त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल करुन तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याचे क्रुझर जीप वाहन क्र. एम.एच. 37-जी-1738 हे विरुध्द पक्षाकडे खाजगी वाहन म्हणून विमाकृत होते. परंतु घटनेच्या वेळी सदरहू वाहन प्रवाशी वाहतुकीकरिता तक्रारकर्ता वापरीत होता. ज्यावेळी सदरहू अपघात घडला, त्यावेळी तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये महेंद्र मोतीराम कापसे, संजय रमेश पोहेकर, दशरथ भिका चव्हाण, प्रमिला शंकर टाले, गोपाल शालीग्राम अवताडे, आकाश अनंता इंगोले हे सर्व प्रवासी म्हणून प्रवास करीत होते व त्या सर्वांनी पोलीसांना दिलेल्या बयाणामध्ये ही बाब स्पष्टपणे नमुद केली आहे. सदरहू प्रवाशांच्या बयाणावरुन हे लक्षात येते की, सर्व प्रवाशी हे वेगवेगळया ठिकाणी उतरणारे होते. तक्रारकर्त्याने सासुबाईला भेटण्यासाठी कुटूंबातील व्यक्तींसोबत दिग्रसला सदर वाहनाने जात असल्याचे सांगितले, परंतु ही बाब पोलीस कागदपत्रात कोठेही नमूद नाही तसेच या व्यक्तींपैकी एकाचेही नांव चार्जशिटमध्ये नमुद नाही. परंतु प्रवाशांची नांवे चार्जशिटमध्ये नमुद आहेत. तक्रारकर्त्याच्या घरच्या व्यक्तींचे बयाण सुध्दा नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला असल्यामुळे विमा कंपनी तक्रारकर्त्याच्या नुकसान भरपाईस जबाबदार नाही. अपघातानंतर विरुध्द पक्ष यांच्या सर्व्हेअरने केलेल्या सर्व्हे रिपोर्टवरुन गाडीचे नुकसान हे फक्त रुपये 70,000/- एवढेच झालेले आहे. तेवढी नुकसान भरपाई तक्रारकर्त्याला मिळू शकली असती, परंतु तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला, त्यामुळे तक्रारकर्त्याला सदरहू नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकली नाही. तक्रारकर्त्याने पॉलिसीचा भंग केल्यामुळे त्याचा अपघात दावा नियमाप्रमाणे दिनांक 23/03/2015 व 17/04/2015 चे पत्रान्वये नामंजूर करण्यात आला. तक्रारकर्त्याच्या दाव्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षाविरुध्द खोटा, चुकीचा दावा दाखल केला व त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा खर्चासह खारीज करण्यांत यावा.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा पुरावा व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला.
उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते यांचे वाहन क्रुझर जीप असून क्र. एम.एच. 37-जी-1738 चा विमा विरुध्द पक्षाकडे काढला होता. पॉलिसी कालावधीबद्दल वाद नाही. सदर वाहनाचा पॉलिसी कालावधीत अपघात झाला होता, ही बाब उभय पक्षाला मान्य आहे. तसेच तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईचा विमा दावा विरुध्द पक्षाकडे दाखल केला असता विरुध्द पक्षाने दिनांक 23/03/2015 च्या पत्रानुसार तक्रारकर्त्याचा विमा दावा, असे कारण देवून फेटाळला की, अपघाताच्या वेळेस तक्रारकर्त्याच्या या वाहनात प्रवाशी वाहतूक होत होती परंतु तक्रारकर्त्याने हे वाहन खाजगी वाहन म्हणून विमाकृत केले होते. त्यामुळे पॉलिसीच्या अटी, शर्तीचा भंग झाला आहे.
अशाप्रकारे उभय पक्षात वाद नसलेल्या बाबींवरुन, तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
विरुध्द पक्षाचा विमा दावा नाकारणा-या पत्रातील मजकूरानुसार, दाखल दस्त मंचाने तपासले असता, असे दिसते की, उभय पक्षाने तक्रारकर्त्याच्या सदर वाहनाची विमा पॉलिसी रेकॉर्डवर दाखल केली नाही, त्यामुळे या वाहनाचा विमा खाजगी वाहन म्हणून विमाकृत होता हे विरुध्द पक्षाचे कथन सिध्द होत नाही. तसेच विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याच्या वाहनात नमुद प्रवाशी प्रवास करत होते परंतु त्यांचे बयाण रेकॉर्डवर दाखल नाही. याउलट तक्रारकर्ते यांनी या वाहनाच्या अपघाताबद्दल आरोपपत्र, पहीली खबर, घटनास्थळ पंचनामा, पुरावे Pw 1 to Pw 6 इ. दस्त दाखल केले त्यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याचे हे वाहन व एक मोटर सायकल अपघातात अंतर्भूत असून, तक्रारकर्त्याच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे व त्या प्रकरणात विरुध्द पक्ष जे प्रवाशी म्हणतात त्यापैकी काहीजणांचे पुरावे मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, मंगरुळपीर यांचे न्यायालयात झाले आहे. परंतु या साक्षीदारांच्या पुराव्यात देखील असे आले नाही की, ते तक्रारकर्त्याच्या विमाकृत अपघातग्रस्त वाहनातून अपघाताच्या वेळेस भाडे देवून प्रवास करत होते, त्यामुळे विरुध्द पक्षाने स्वतःचा बचाव सिध्द केला नाही.
सदर वाहन दुरुस्तीचे बिल तक्रारकर्त्याने दाखल केले आहे. तक्रारर्त्याचे असे म्हणणे आहे की, वाहनाचे जवळपास रुपये 1,70,000/- एवढे नुकसान झाले. विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, सदर वाहनाचा विरुध्द पक्षाच्या सर्वेअरने सर्वे केला. संपूर्ण कपात वजा जाता रुपये 70,000/- एवढी नुकसान भरपाई देय आहे, परंतु विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे ही रक्कम देता येणार नाही. विरुध्द पक्षाने सर्वेअरचा रिपोर्ट व प्रतिज्ञालेख रेकॉर्डवर दाखल केला नाही. फक्त बिल चेक मेमो दाखल केला, परंतु त्यावरुन स्पष्ट बोध होत नाही, कारण सर्वे रिपोर्ट दाखल नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या बिलानुसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना सदर वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रुपये 1,70,000/- विमा रक्कम दयावी तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- व सदर प्रकरणाचा खर्च रुपये 2,000/- दयावा, असे आदेश विरुध्द पक्षाला देणे न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रुपये 1,70,000/-(रुपये एक लाख सत्तर हजार फक्त) विमा रक्कम दयावी.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त ) तसेच प्रकरणाचा खर्च रुपये 2,000/- ( रुपये दोन हजार फक्त ) दयावा.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
( श्री.ए.सी.उकळकर ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri