::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 5.11.2015)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदाराचे गैरअर्जदाराचे शाखेत बचत खाते क्र.11267843286 असून या खात्याला गैरअर्जदाराने डेबीट कार्ड सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. याअनुषंगाने अर्जदार हा गैरअर्जदाराचा खातेदार ग्राहक आहे. अर्जदाराने दि.8.5.2014 रोजी सकाळी 7-30 चे सुमारास गैरअर्जदारचे शाखेत एटीएम मशीन क्र.1 मधून अर्जदाराचे डेबीट कार्ड टाकून बचत खात्यातून रुपये 10,000/- काढण्याकरीता कमांड दिली. त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे अर्जदाराने मशीनला व्यवहाराची स्लीप सुध्दा मागीतली. परंतु, त्यावेळी अर्जदारास सदर मशीनमधून रुपये 10,000/- मिळाले नाही व फक्त स्लीप बाहेर आली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.8.5.2014 रोजी लेखी तक्रार दिली व त्यासोबत मशीनमधून निघालेली पावती मुळ प्रत व अर्जदाराने नंतर सकाळी 10-45 चे सुमारास मशीनमधून काढलेले स्टेटमेंट मुळ प्रतीत गैरअर्जदाराचे मागणीनुसार गैरअर्जदाराला दिले. गैरअर्जदाराने 3 दिवसात अर्जदाराचे खात्यात रुपये 10,000/- जमा होवून जातील असे अर्जदारास सांगीतले. दि.27.5.2014 पावेतो अर्जदाराची सदर रक्कम अर्जदारास परत न मिळाल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पुन्हा दि.27.5.2014 रोजी लेखी तक्रार दिली. गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारीचे निवारण करण्यास टाळाटाळ केली. अर्जदाराने वारंवार मागणी करुन सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचे खात्यात सदर रक्कम रुपये 10,000/- जमा केली नाही. अर्जदाराने दि.11.6.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून रुपये 10,000/- रकमेची मागणी केली. अर्जदाराचे खात्यातूनअर्जदाराला रक्कम न मिळता रक्कम कमी करण्यातआली व तक्रार केल्यानंतर सुध्दा कमी केलेली रक्कम खात्यावर अद्यावत करण्यात आली नाही. गैरअर्जदाराने अवलंबीलेली अनुचित व्यापार पध्दती असून अर्जदारास देण्यात अर्जदारास देण्यात आलेली न्युनतापूर्ण सेवा आहे. यामुळे अर्जदारास नाईलाजास्तव विद्यमान न्यायालयात दाद मागावी लागत आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे खाता क्र.11267843286 मधून वळती केलेले रुपये 10,000/- त्याच तारखेला म्हणजे दि.8.5.2014 रोजी जमा करण्याचे आदेश पारीत करण्यात यावा. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास दि.8.5.2014 पासून रक्कम अर्जदाराचे खात्यात वळती करुन खाते अद्यावत करेपावेतो दररोज रुपये 100/- प्रमाणे देण्याचा आदेश रिझर्व बॅंकेचे नियमानुसार गैरअर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा. अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.10 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द तक्रारीत नमूद केलेले बहुतांश कथन खोटे असल्याने नाकबूल केले. गैरअर्जदाराने त्यांचे लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार याने दि.8.5.2014 रोजी सकाळी 7-35 वा.गैरअर्जदाराच्या एटीएम मधून टीएक्सएन 1533 अन्वये रुपये 10,000/- साठी कमांड दिली व त्याला एटीएम मशीन मधून रुपये 10,000/- प्राप्त झाले ईजेलॉग मध्ये रिसपॉन्स कोड 000 दाखवीत असल्यामुळे सदर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवीत आहे व त्यामुळे गैरअर्जदार हे खाञीने सांगू शकतात की, अर्जदाराला सदर रक्कम प्राप्त झाली आहे. परंतु, अर्जदाराने त्याला रक्कम प्राप्त झाली नाही अशी तक्रार दिल्यामुळे गैरअर्जदाराने त्याची शहानिशा केली व तशी तक्रार गैरअर्जदाराने दि.4.6.2014 रोजी मेलव्दारे सीएमएस (कमलेंट मॅनेजमेंट सिस्टम) स्विचसेंटर मुंबई कडे पाठविली व त्यांनी सुध्दा अर्जदाराने केलेले ट्रॅन्झॅक्शन सक्सेसफूल झाल्याचे कळविले व त्यामुळे अर्जदाराचे हे म्हणणे की त्याला रक्कम मिळाली नाही हे पुर्णपणे खोटे आहे. याशिवाय गैरअर्जदाराने अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेत एटीएममध्ये जास्तीची रोख रक्कम आहे किंवा नाही याचीही चौकशी केली असता त्यांचा एटीएम मध्ये रुपये 10,000/- ची जास्तीची रोख रक्कम आढळून आली नाही. कारण जर अर्जदाराला रक्कम मिळाली नसतील तर शेवटी गैरअर्जदाराने एटीएम मध्ये पैसे टाकतांना त्यांना सदर रुपये 10,000/- जास्तीची रक्कम आढळली असती. याशिवाय गैरअर्जदाराने दि.17.6.2014 रोजी Lipi Data System Ltd. कडून सीसीटीवी कॅमेराच्या DVD Images सुध्दा काढण्यात आल्या वते अर्जदाराला पेनड्राईव मध्ये दिलेले सुध्दा आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
4. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, अर्जदाराचे दस्ताऐवज, शपथपञ, अर्जदार व गैरअर्जदाराने पुरसीस दाखल केली. तसेच दोन्ही पक्षाचे तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? : होय
3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराचे गैरअर्जदाराचे शाखेत बचत खाते क्र.11267843286 असून या खात्याला गैरअर्जदाराने डेबीट कार्ड सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. याअनुषंगाने अर्जदार हा गैरअर्जदाराचा खातेदार ग्राहक आहे, ही बाब दोन्ही पक्षाना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने दि.8.5.2014 रोजी सकाळी 7-30 चे सुमारास गैरअर्जदारचे शाखेत एटीएम मशीन क्र.1 मधून अर्जदाराचे डेबीट कार्ड टाकून बचत खात्यातून रुपये 10,000/- काढण्याकरीता कमांड दिली. त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे अर्जदाराने मशीनला व्यवहाराची स्लीप सुध्दा मागीतली. परंतु, त्यावेळी अर्जदारास सदर मशीनमधून रुपये 10,000/- मिळाले नाही व फक्त स्लीप बाहेर आली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.8.5.2014 रोजी लेखी तक्रार दिली ही बाब अर्जदाराने नि.क्र.4 वर दाखल अ-1 ते अ-6 वरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने त्यांचे लेखीबयानात नि.क्र.10 वर बचाव पक्षात केलेले कथन व नि.क्र.9 वर दाखल ईजे लॉग रिपोर्ट व रिपोर्ट ऑफ लिपी डाटा सिस्टम ला सिध्द करण्याकरीता गैरअर्जदाराने कोणत्याही साक्षीदाराचा शपथपञ पुरावा दाखल केलेला नाही. फक्त गैरअर्जदाराने नि.क्र.14 वर त्यांचे जबाब शपथपञ म्हणून गृहीत करावे अशी पुरसीस दाखल केली. मंचाच्या मताप्रमाणे पुरसीस हे साक्षी पुरावा किंवा शपथपञ असे ग्राह्रय धरता येत नाही. याउलट, अर्जदाराने नि.क्र.11 वर त्यांचे शपथपञ दाखल करुन तक्रारीत मांडलेले कथन शपथपञाव्दारा सिध्द केलेले आहे. गैरअर्जदाराचे एटीएम मशीनमधून अर्जदाराचे खात्यातून रुपये 10,000/- कपात करण्यात आले व काढतावेळी अर्जदाराला मिळाले नाही, हे सिध्द झाले आहे, म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराला न्युनतम् सेवा दर्शविलेली आहे हे सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन अर्जदार खालील अंतिम आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराचे अर्जदाराचे खात्यातून दि.8.5.2014 रोजी वळती केलेली रुपये 10,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदाराचे खात्यात जमा करावे.
3) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
4) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 5/11/2015