आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष बँक ऑफ इंडिया, शाखा ठाणा, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे खालीलप्रमाणे दोन मुदती ठेवीत ठेव रक्कम ठेवली.
अ.क्र. | दिनांक | ठेव रक्कम | योजनेचा प्रकार |
1. | 16.04.2015 | रू.1,00,000/- | दाम दुप्पट योजना (DBD) |
2. | 16.04.2015 | रू.1,00,000/- | मासिक उत्पन्न योजना (MIC) |
वरील ठेवी (DBD) ठेवतांना तक्रारकर्त्याने बँकेत रू.1,00,000/- नगदी जगा केले होते आणि रू.1,00,000/- च्या (MIC) साठी रू.1,00,000/- त्याच्या विरूध्द पक्ष बँकेत असलेल्या बचत खात्यातून तबदील केले होते. त्याप्रमाणे विरूध्द पक्ष बँकेने तक्रारकर्त्यास खालीलप्रमाणे ठेव प्रमाणपत्र दिले होते.
अ.क्र. | खाते क्रमांक | मुदतपूर्ती दिनांक | मुदतपूर्तीची रक्कम |
1. | DBD खाते क्रमांक 922445110000747 | 16.04.2016 | रू.1,09,308/- |
2. | MIC खाते क्रमांक 922442710000053 | 16.04.2016 | द.सा.द.शे 9% व्याज परत मिळणारी रक्कम रू.1,00,000/- |
3. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास MIC खाते क्र. 922442710000053 वरील देय लाभ दिले असून त्याबाबत वाद नाही. परंतु DBD ठेवीची मुदतपूर्तीची रक्कम परत न करता संबंधित कर्मचा-याने सांगितले की, तक्रारकर्त्याचे DBD ठेव खाते बंद करून सदर रक्कम MIC खात्यात रूपांतर (Convert) करण्यांत आली आहे. प्रत्यक्षात तक्रारकर्त्याचे नांवाने अशी कोणतीही MIC देण्यंत आली नाही किंवा DBD मुदत पूर्तीची रक्कम रू.1,09,308/- देण्यांत आली नाही. तक्रारकर्त्याकडे विरूध्द पक्षाने दिलेली DBD मूळ पावती क्रमांक 922445110000747 आजही आहे.
4. तक्रारकर्त्याने दिनांक 23.05.2016 रोजी अधिवक्ता श्री. राजनकर यांचेमार्फत नोटीस पाठवून DBD ची मुदतपूर्ती रक्कम रू.1,09,308/- दिनांक 16.04.2016 पासून द. सा. द. शे. 9% व्याजासह देण्याची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही विरूध्द पक्षाने DBD ठेवीची रक्कम व्याजासह दिली नाही. सदरची बाब सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहेः-
1. DBD खाते क्रमांक 922445110000747 ची मुदतपूर्तीची रक्कम रू.1,09,308/- दिनांक 16.04.2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
2. शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू.10,000/- मिळावा.
5. तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने Fixed Deposit ची पावती, पोलीस स्टेशन, आमगांव येथे केलेला रिपोर्ट, अधिवक्त्यामार्फत विरूध्द पक्षाला पाठविलेली नोटीस, पोष्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
6. विरूध्द पक्ष बँकेने लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दिनांक 16.04.2015 रोजी विरूध्द पक्ष बँकेत प्रत्येकी रू.1,00,000/- च्या दोन ठेवी (DBD आणि MIC) ठेवल्याचे आणि DBD ठेवीसाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष बँकेत रोख रू.1,00,000/- भरणा केल्याचे नाकबूल केले आहे.
त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने DBD ठेव खात्यात रू.1,00,000/- भरणा करण्यासाठी त्याच्या बचत खाते क्रमांक 922410100000005 वरील धनादेश क्रमांक 3966 दिला होता व तक्रारकर्त्याने दिलेल्या अर्जाप्रमाणे सदर रकमेतून त्याचे रू.1,00,000/- चे DBD ठेव खाते क्रमांक 922445110000747 दिनांक 16.04.2015 रोजी उघडण्यांत आले आणि तक्रारकर्त्यास त्याबाबत मूळ DBD ठेव प्रमाणपत्र देण्यांत आले. रू.1,00,000/- चे MIC खाते उघडण्यासाठी तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून रक्कम तबदिल (Transfer) केल्याचे आणि दिनांक 16.04.2015 रोजी MIC निर्गमित केल्याचे विरूध्द पक्ष बँकेने नाकबूल केले आहे.
विरूध्द पक्षाचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याला दिनांक 16.04.2015 रोजी वरीलप्रमाणे DBD ठेव प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 20.04.2015 रोजी विरूध्द पक्ष बँक व्यवस्थापकाची भेट घेतली आणि DBD ठेव रद्द करून त्याऐवजी MIC ठेवीत रक्कम परावर्तित करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे दिनांक 20.04.2015 रोजी DBD रद्द करून त्याऐवजी तक्रारकर्त्याचे व्याजाचे नुकसान होऊ नये म्हणून दिनांक 16.04.2015 पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने रू.1,00,000/- ची तक्रारीत नमूद MIC निर्गमित करण्यांत आली. तक्रारकर्त्याने हेतूपुरस्सर सदर MIC ची प्रत मंचासमोर सादर केलेली नाही. तक्रारकर्त्याकडून प्राप्त नोटीसला विरूध्द पक्षाने अधिवक्ता श्री. परमार यांचेमार्फत दिनांक 24.06.2016 रोजी उत्तर देऊन वस्तुस्थितीचा खुलासा केला. परंतु तक्रारकर्त्याने त्यानंतरही सदरची खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती दंडात्मक खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
7. आपल्या कथनाच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्ष बँकेने रू.1,00,000/- च्या धनादेश क्रमांक 003966 ची प्रत, रू.1,00,000/- ची pay-in-slip, DBD खाते क्रमांक 922445110000747 चे रू.1,00,000/- चे Debit Voucher, रू.1,00,000/- चे क्रेडिट व्हाऊचर, बचत खात्याचा उतारा, MIC application form, तक्रारकर्त्याच्या नोटीसला दिलेले उत्तर, पोष्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
8. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | नाही. |
2. | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? | नाही. |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार खारीज. |
-// कारणमिमांसा //-
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याचे अधिवक्ता श्री. राजनकर यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष बॅकेत दिनांक 16.04.2015 रोजी रू.1,00,000/- नगदी जमा केले तसेच रू.1,00,000/- त्याच्या बचत खात्यातून तबदील करण्यांत आले आणि त्याबदल्यात त्याला प्रत्येकी रू.1,00,000/- च्या तक्रारीत नमूद केलेल्या DBD आणि MIC ठेव पावत्या विरूध्द पक्षाकडून देण्यांत आल्या. पैकी MIC ठेव पावती प्रमाणे व्याजाची आणि मुदतपूर्तीची रक्कम तक्रारकर्त्यास प्राप्त झाली असून DBD ठेवीची मुदतपूर्ती रक्कम रू.1,09,308/- विरूध्द पक्षाला मागणी करूनही देण्यांत आली नाही. DBD ची मूळ ठेव पावती तक्रारकर्त्याकडे आहे. (मंचासमोर निरीक्षणासाठी सादर केली होती). त्यामुळे सदर पावतीवर देय रक्कम MIC मध्ये तबदील केली असल्याचा विरूध्द पक्षाचा बचाव खोटा असून तक्रारकर्त्यास मुदतपूर्तीची रक्कम नाकारण्याची विरूध्द पक्षाची कृती ठेवीदार ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
याउलट विरूध्द पक्षाचे अधिवक्ता श्री. परमार यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्ता दिनांक 16.04.2015 रोजी विरूध्द पक्ष बँकेत आला आणि रू.1,00,000/- ची DBD ठेव ठेवण्यासाठी त्याच्या बचत खाते क्रमांक 922410100000005 मधून धनादेश क्रमांक 003966 अन्वये रू.1,00,000/- काढले आणि सदर रक्कम DBD खाते क्रमांक 922445110000747 मध्ये गुंतवणूक केली. तक्रारकर्त्याच्या वरील धनादेशाची प्रत तसेच DBD साठी पैसे जमा केल्याच्या जमा पावतीची प्रत विरूध्द पक्षाने दिनांक 11.11.2016 च्या यादीसोबत अनुक्रमे दस्त क्रमांक 1 व 2 वर दाखल केली आहे. सदर रकमेतून तक्रारकर्ता मोरेश्वर गिरीपुंजेच्या नांवाने DBD खाते क्रमांक 922445110000747 उघडण्यांत आले त्याची प्रत दस्त क्रमांक 3 वर आहे. सदर खात्यात दिनांक 16.04.2015 रोजी तक्रारकर्त्याच्या बचत खाते क्रमांक 922410100000005 मधून रू.1,00,000/- जमा केल्याची नोंद आहे. तक्रारकर्त्याच्या सदर बचत खाते क्रमांक 922410100000005 चा उतारा दस्त क्रमांक 7 वर आहे. त्यांत दिनांक 16.04.2015 रोजी धनादेश क्रमांक 003966 द्वारे रक्कम रू.1,00,000/- काढण्यांत येऊन ती DBD खाते क्रमांक 922445110000747 ला तदबील (Transfer) केल्याची नोंद आहे. यावरून दिनांक 16.04.2015 रोजी DBD ठेव खात्यात जमा करण्यासाठी रोख रू.1,00,000/- बँकेत जमा केल्याचे तक्रारीतील कथन खोटे असल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याला कोणताही पुष्टीकारक पुरावा नाही.
तक्रारकर्त्याने दिनांक 16.04.2015 रोजी धनादेशाद्वारे रू.1,00,000/- चा भरणा केल्यावर त्याला DBD ठेव प्रमाणपत्र देण्यांत आले ज्याची प्रत तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 1 वर दाखल केली आहे. त्यानुसार सदर ठेवीची मुदतपूर्ती दिनांक 16.04.2016 आणि द. सा. द. शे. 9% दराने मुदतपूर्तीची रक्कम रू.1,09,308/- तक्रारकर्त्यास मिळणार होती.
तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, दिनांक 16.04.2016 रोजी त्याने MIC साठी रू.1,00,000/- त्याच्या बचत खात्यातून तबदिल केले. परंतु याबाबत कोणताही पुरावा सादर केला नाही तसेच विरूध्द पक्षाद्वारा दाखल खाते उतारा दस्त क्रमांक 7 मध्ये कोणतीही नोंद नाही. यावरून तक्रारकर्त्याने बचत खात्यातून तबदिली (Transfer) द्वारे विरूध्द पक्ष बँकेत MIC साठी दिनांक 16.04.2016 रोजी रू.1,00,000/- जमा केल्याचे कथन निराधार आणि खोटे आहे.
दिनांक 16.04.2015 रोजी DBD ठेव खात्यात रू.1,00,000/- जमा केल्यानंतर तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात केवळ रू.3,462.35 शिल्लक होते. दिनांक 20.04.2015 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाची भेट घेऊन दिनांक 16.04.2015 ची DBD रद्द करून त्याऐवजी त्याच रकमेची MIC ठेव स्विकारण्याची विनंती केली. तक्रारकर्ता बँकेचा जुना ग्राहक असल्याने विरूध्द पक्ष बँकेने त्याची विनंती मान्य केली आणि DBD क्रमांक 922445110000747 रू.1,00,000/- बंद करून सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या उपरोक्त बचत खात्यास जमा करण्यांत आली आणि दिनांक 20.04.2015 रोजी सदर बचत खात्यातून रू.1,00,000/- MIC क्रमांक 9224472710000053 मध्ये तबदील करण्यांत आले. त्याबाबत व्हाऊचर दस्त क्रमांक 4 व 5 वर आहेत. मात्र तक्रारकर्त्याचे दिनांक 16.04.2015 ते 20.04.2015 पर्यंतचे व्याजाचे नुकसान होऊ नये म्हणून सदर MIC दिनांक 16.04.2015 पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने (Value Date) निर्गमित करण्यांत आली. सदर व्यवहाराच्या नोंदी MIC ठेव खाते दस्त क्रमांक 6 तसेच तक्रारकर्त्याच्या बचत खात्याचा उतारा दस्त क्रमांक 7 मध्ये आहेत.
तक्रारकर्त्याने दिनांक 16.04.2015 रोजी DBD साठी अर्ज दिला होता परंतु त्याऐवजी दिनांक 20.04.2015 रोजी दिनांक 16.04.2015 पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने MIC देण्यांत आल्यामुळे अर्जावर DBD ऐवजी MIC ठेव क्रमांकाची दुरूस्ती करण्यांत आली. सदर अर्जाची प्रत दस्त क्रमांक 8 वर असून त्यांत वरील बाब स्पष्टपणे नमूद आहे. तक्रारकर्त्यास वेळोवेळी MIC चे व्याज देण्यांत आले असून मुदतपूर्तीनंतर नव्या व्याज दराने MIC चे नुतनीकरण करण्यांत आल्याचे आणि त्यानंतरही तक्रारकर्त्यास मासिक व्याज नियमित देण्यांत येत असल्याचे खाते उता-यावरून स्पष्ट होते.
दिनांक 20.04.2015 रोजी तक्रारकर्त्याच्या विनंतीवरून DBD ठेव MIC ठेवीत रूपांतरित करण्यांत आली परंतु अनावधानाने तक्रारकर्त्याकडील DBD ताब्यात घेण्याचे राहून गेले. तक्रारकर्त्याने रद्द करून घेतलेली DBD परत न करता स्वतःसोबत घेऊन गेला आणि प्रत्यक्षात रद्द झालेल्या DBD प्रमाणपत्रावरून DBD ची रक्कम मागण्यास आला असता त्यासंबंधाने बँकेतील नोंदीची तपासणी करून सदर DBD ची रक्कम दिनांक 20.04.2015 रोजी तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा करून त्याऐवजी MIC ठेव प्रमाणपत्र देण्यांत आल्याचे त्यांस सांगण्यात आले आणि तसे मूळ प्रमाणपत्रावर लिहून देण्यांत आले. मात्र अनावधानाने तारीख लिहितांना दिनांक 20.04.2015 ऐवजी 20.04.2016 अशी लिहिण्यांत आली.
विरूध्द पक्ष बँक ही राष्ट्रीयीकृत बँक असून तिच्या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी संगणकांत ठेवण्यांत येतात. सदर नोंदी ख-या असल्याबाबतचे प्रमाणपत्र बँकेच्या शाखा प्रबंधकाने दिले असल्याने सदर नोंदी कायद्याने पुरावा म्हणून ग्राह्य आहेत. वरील नोंदीवरून दिनांक 16.04.2015 रोजी तक्रारकर्त्याने खात्यातून तबदिलीद्वारे रू.1,00,000/- चा भरणा करून MIC ठेव आणि रोखीद्वारे रू.1,00,000/- चा भरणा करून DBD ठेव ठेवल्याचे कथन खोटे सिध्द होते. दिनांक 16.04.2015 रोजी तक्रारकर्त्याने धनादेशाद्वारे केवळ रू.1,00,000/- चा भरणा करून DBD ठेव ठेवली आणि तीच ठेव दिनांक 20.04.2015 रोजी रद्द करून त्याबदल्यात दिनांक 16.04.2015 पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने रू.1,00,000/- ची MIC ठेव ठेवली व ती विरूध्द पक्षाने स्विकारून सदर ठेवीबाबत तक्रारकर्त्यास देय लाभ दिलेले आहेत. त्यामुळे रद्द झालेल्या DBD ठेवीबाबत तक्रारकर्त्याची खोटी व बेकायदेशीर मागणी विरूध्द पक्षाने नाकारण्याची कृती पूर्णतः कायदेशीर असून त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही.
वरीलप्रमाणे उभय पक्षाच्या अधिवक्त्यांच्या युक्तिवादाचा विचार करता तक्रारकर्त्याने त्याच्या खात्यातील रू.1,00,000/- तबदिल करून दिनांक 16.04.2015 रोजी MIC ठेवीत गुंतविल्याचा कोणताही पुरावा नाही. याउलट तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश, DBD साठीचा अर्ज, त्याच्या बचत खात्याचा उतारा आणि MIC खाते क्रमांक 922442710000053 चा उतारा यावरून स्पष्ट होते की, दिनांक 20.04.2015 रोजी तक्रारकर्त्याची दिनांक 16.04.2015 ची रू.1,00,000/- ची DBD ठेव रद्द करून दिनांक 16.04.2015 पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने वरील क्रमांकाची MIC ठेव पावती निर्गमित करण्यांत आली. केवळ तक्रारकर्त्याकडून रद्द झालेल्या DBD ठेवीची पावती विरूध्द पक्षाने ताब्यात घेतली नाही याचा गैरफायदा घेऊन तक्रारकर्त्याने सदर ठेव पावतीची रक्कम मागणी केली असल्याने सदरची बेकायदेशीर मागणी पूर्ण केली नाही म्हणून विरूध्द पक्ष बँकेकडून ग्राहक सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाल्याचे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाने सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याचे सिध्द होत नसल्याने तक्रारकर्ता मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अंतिम आदेश –
1. ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 अंतर्गत दाखल करण्यांत आलेली तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.