1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्ताचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने एकूण 3 धनादेश क्र. 784580, 784581 व 784582 इब्राहीम नगिना यांना मालाकरीता दिले होते. परंतु त्यांनी माल पुरविला नाही म्हणून तक्रारकर्त्याने वरील नमुद धनादेश दि.08.02.2014 रोजी ई-मेलव्दारे विरुध्द पक्षांना थांबविण्याकरीता विनंती केली. त्या अनुषंगाने दि.13 व 26.02.2014 रोजी धनादेश क्र.784580 आणि 784581 हे न वटता परत केले. परंतु दि.03.03.2014 रोजी धनादेश क्र.784582 रु. 26,339/- चा वटवण्यांत आला व त्यामुळे तक्रारकर्त्याचे रु.26,339/- चे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना वादातील धनादेश थांबवून सुध्दा त्याची रक्कम खात्यातून कपात करुन अदा करण्यांत आली ही बाब विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यवहार प्रथा असल्यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यांत आलेली आहे. 2. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्याचा आदेश पारित करण्यांत आला. विरुध्द पक्षांना नोटीस प्राप्त होऊन प्रकरणात हजर झाले व निशाणी क्र.14 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. विरुध्द पक्षांनी आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याचा सदर व्यवहार हा वाणिज्य स्वरुपाचा असल्याने सदर तक्रारीत निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही. विरुध्द पक्षांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने तिस-या पक्षाला मोहम्मद इब्राहीम हूसेन नगिना यांना दिलेल्या धनादेशाचा व्यवहार संबंधीत बँकेचा नसल्यामुळे व योग्य पक्ष प्रकरणात जोडला नसल्यामुळे सदर प्रकरण खारिज होण्यांस पात्र आहे. विरुध्द पक्षांनी पुढे असे कथन केले आहे की, बँकींगच्या व्यवहारात धनादेश थांबवण्याकरीता विनंती ई-मेल व्दारे स्विकृत केली जात नाही. त्याकरीता खाते धारकास लिखीत विनंती करून त्यावर खातेदाराची स्वाक्षरी असली पाहीजे. सदर विनंती विरुध्द पक्षास तक्रारकर्त्याकडून मिळालेली नाही. विरुध्द पक्ष बँक ही राष्ट्रीय बँक असल्यामुळे प्रत्येक दिवशी 100 ते 1000 ई-मेल येत असल्याने त्यावर निर्देश घेता येत नाही. तक्रारकर्त्याने दि.13 व 26.02.2014 रोजी दोन धनादेश तक्रारकर्त्याचे खात्यात अपूर्ण रक्कम असल्याने आणि स्टॉप पेमेंटचे निर्देश असल्याने परत करण्यांत आले होते. विरुध्द पक्षाने पुढे असे कथन केले आहे की, त्यांचे बँकेस कोणतेही लिखीत स्वरुपात निर्देश धनादेशाबाबत मिळालेले नव्हते म्हणून विरुध्द पक्षांनी कोणतीही सेवेत त्रुटी किंवा कमतरता दर्शविलेले नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले सर्व आरोप खोटे असुन ते त्यांना नाकबुल आहे म्हणून सदरची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी विनंती केलेली आहे. 3. तक्रारकर्त्यातर्फे दाखल तक्रार, दस्तावेज, विरुध्द पक्षातर्फे दाखल केलेले लेखीउत्तर तसेच उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकण्यांत आला असता मंचासमक्ष खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहेत काय ? होय.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनतम सेवा दर्शविली
आहे काय ? होय. - अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- // कारणमिमांसा // - 4. मुद्दा क्र. 1 बाबतः- तक्रारकर्त्याचे खाते विरुध्द पक्षांचे बँकेत आहे व त्या बँकेचे 3 धनादेश तक्रारकर्त्याने मोहम्मद इब्राहीम हूसेन नगिना यांना जारी केले होते, ही बाब उभय पक्षांना मान्य असुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ‘ग्राहक’ आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत आले आहे. 6. मुद्दा क्र. 2 बाबतः- विरुध्द पक्षाने दि.08.02.2014 रोजी सुमारे 5.17 वाजता वादातील धनादेश थांबविण्याकरता ई-मेलव्दारे सुचना दिली होती, ही बा तक्रारकर्त्याने निशाणी क्र.2 वर पान क्र.14 वर दाखल ई-मेलच्या प्रतीवरुन सिध्द होते. तसेच दि.03.03.2014 रोजी तक्रारकर्त्याने जारी केलेले धनादेश क्र. 784582 रक्कम रु.26,339/- तक्रारकर्त्याचे खात्यातून वटविण्यांत आली व तेवढी रक्कम खात्यातून वजा करण्यांत आली ही बाब पान क्र.14-अ वर दाखल खात्याचे तपशिलावरुन सिध्द होते. विरुध्द पक्षांनी आपल्या जबाबात असे मान्य केले आहे की, त्यांचे बँकेत प्रत्येक दिवशी 100 ते 1000 ई-मेल मिळतात आणि त्यात दिलेल्या निर्देशांची स्विकारणा केल्या जात नाही. धनादेश थांबवण्याकरीता लिखीत स्वरुपात खातेदाराचे निर्देश असले पाहीजे, ही बाब सिध्द करण्याकरीता विरुध्द पक्षांनी कोणताही पुरावा किंवा राष्ट्रीय बँकेचे नियम प्रकरणात प्रस्तुत केलेले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांनी वादातील धनादेश न वटवण्याकरीता ई-मेलव्दारे निर्देश देऊन त्याची पुर्तता विरुध्द पक्षांना केली नाही, ही बाब विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतम सेवा दिली आहे असे सिध्द होते. म्हणून विरुध्द पक्षांनी आपल्या बचावास्तव मांडलेले कथन ग्राह्य धरता येत नाही. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत आलेले आहे. 7. मुद्दा क्र.3 बाबतः- मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनावरुन खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येत आहे.. - // अंतिम आदेश // - 1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार विरुध्द पक्षांविरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रु.26,339/- दि.03.03.2014 पासुन प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.8% व्याजासह परत करावी. 3. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,500/- अदा करावे. 4. विरुध्द पक्षांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी. 5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी. 6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. |