न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांच्या आई मयत कै.मंगल बाबूराव घोलप यांचे वि.प. बँकेत पेन्शन/सेव्हिंग्ज खाते होते. तक्रारदार यांचे आईंनी वि.प. बँकेत दि. 10/10/1998 रोजी पेन्शन अकाऊंट उघडले होते. त्याचा नंबर 092212100012391 असा आहे. दि.27/1/2019 रोजी तक्रारदार यांच्या आई मयत कै.मंगल बाबूराव घोलप या चावरे येथे निघाल्या असताना बिरदेव मंदिरासमोर भादोले गावचे हद्दीत येणा-या मोटारीने त्यांना धडक दिल्यामुळे अपघात झाला. त्यांचेवर उपचार सुरु असताना दि. 27/01/2019 रोजी त्या मयत झाल्या. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. बँकेकडे क्लेमबाबत चौकशी केली असता सदर खातेवर वारस नोंद नाही, तुम्ही आधी वारस नोंद करुन घ्या असे सांगण्यात आले. तक्रारदार यांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रांची पूर्तता करुन खातेवर वारस नोंद करुन घेतली असता व क्लेमबाबत चौकशी केली असता वि.प. यांचे अधिका-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार हे मयत कै.मंगल बाबूराव घोलप यांचे सरळ व कायदेशीर एकमेव वारस असल्याने त्यांना क्लेम मागणेचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु वि.प. यांनी केवळ खातेस नोंद नाही या कारणास्तव क्लेम अमान्य करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे तसेच सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 5,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 4 कडे अनुक्रमे तक्रारदारांचे आईचे खाते असलेबाबत पासबुक, तक्रारदार एकमेव वारस असलेबाबत प्रतिज्ञापत्र, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, तक्रारदार यांची आई अपघातात मयत झालेबाबत एफ.आय.आर. वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट दाखल केले आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदार हे वि.प. बँकेचे ग्राहक नाहीत. वि.प. बँकेने तक्रारदार किंवा त्यांचे पूर्वहक्कदार यांना सेवा देणबाबत कोणताही करार मान्यता दिलेली नाही. तक्रारदार यांच्या आई मयत कै.मंगल बाबूराव घोलप मयत झालेबाबत आवश्यक ती कायदेशीर माहिती कागदपत्रांसह वि.प. बँकेस देण्यात आलेली नाही.
iv) तक्रारदार यांनी त्यांची आई मयत झालेनंतर कायद्यातील तरतुदीप्रमाणे व ग्रुप विमा योजनेतील अटी व शर्तीप्रमाणे नॉमिनेशन व वारसा बाबींची आवश्यक त्या कागदपत्रांसह पूर्तता केलेली नाही. विमा योजनेतील अटी व शर्तीप्रमाणे वारसा निश्चित झालेशिवाय विमा क्लेम संबंधीत कंपनीस पाठविता येणार नाही. तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्रे व बाबींची पूर्तता केलेली नाही. तक्रारदाराने विमा कंपनीस पक्षकार केलेले नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे आईंनी वि.प. बँकेत दि. 10/10/1998 रोजी पेन्शन अकाऊंट उघडले होते. त्याचा नंबर 092212100012391 असा आहे. सदर खात्याचे पासबुक तक्रारदारांनी याकामी दाखल केले आहे. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. तक्रारदार हे मयत कै.मंगल बाबूराव घोलप यांचे सरळ वारस असलेबाबत तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदार हे लाभाधारक या नात्याने वि.प. यांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदार यांनी त्यांची आई मयत झालेनंतर कायद्यातील तरतुदीप्रमाणे व ग्रुप विमा योजनेतील अटी व शर्तीप्रमाणे नॉमिनेशन व वारसा बाबींची आवश्यक त्या कागदपत्रांसह पूर्तता केलेली नाही असे कथन केले आहे. तथापि तक्रारदारांनी तक्रारदार हेच त्यांचे आईचे एकमेव वारस असलेबाबत कार्यकारी दंडाधिकारी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र याकामी दाखल केले आहे. तक्रारदाराचे आईस तक्रारदाराशिवाय अन्य कोणी वारस आहेत असे वि.प. यांचे कथन नाही अथवा तसा कोणताही पुरावा वि.प. यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी केलेल्या वर नमूद प्रतिज्ञापत्रास छेद देणारा अन्य कोणताही पुरावा वि.प. बँकेने याकामी दाखल केलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे त्यांची आई कै.मंगल बाबूराव घोलप यांचे एकमेव सरळ व कायदेशीर वारस आहेत ही बाब शाबीत झाली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदार हे वारस या नात्याने त्यांचे आईच्या मृत्यूपश्चात देय असलेली विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास न्याययोग्य विमाक्लेम देण्यास टाळाटाळ करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे वि.प. बँकेच्या ग्रुप विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. बँक यांनी तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प.बँक यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.