आदेश पारीत व्दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्य.
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये विरुद्धपक्षांकडून खरेदी केलेल्या अॅप्पल मोबाईलच्या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्याचे तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.
- तक्रारकर्त्याचे कथनानुसार तो वर नमुद पत्त्यावरील रहीवासी असुन सावजी स्पाईसेस् लि. या कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याने विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून Apple iPhone 6 Plus 16GB space gray Batch: SF2MNPEH9G5QQ,bearing IME#354440063655690, PART No.MGA82HN/A एकूण किम्मत रु.62,500/- ला दि.23.05.2015 रोजी खरेदी केला. विरुध्द पक्ष क्र.1 हे अॅप्पल आयफोनचे निर्माते असुन विरुध्द पक्ष क्र.2 हे त्यांचे नागपूर येथील अधिकृत विक्रेते व सेवा प्रतींनिधी आहेत. सदर आयफोनमध्ये एक वर्षांचे वारंटी कालावधीत घेतल्यापासुन वारंवार बिघाड होत होते. तक्रारकर्त्याने दि.14.12.2015 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 कडे मोबाईल हॅंन्डसेटसंबंधी विविध दोष (USB/dock, Camera, Speaker, Display, Airport/WiFi, Bluetooth, Battery, Adaptor, Touch screen, Find My iPhone – Not Working) सर्विस रीपोर्टमध्ये नमुद करुन दुरूस्ती/बदली करण्यासाठी सुपूर्त केला. सदर 1 वर्षाच्या मोबाईल वारंटी कालावधीत असुन देखील दि.17.12.2015 रोजी तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र.2 कडे गेला असता त्याला वारंटी नाकारून मोबाईलच्या दुरुस्तीकरता रु.25,160/- जमा करण्याकरीता सांगण्यात आले. विरुध्द पक्षास वारंवार विनंती करुन देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन मोबाईल हॅंन्डसेट दोषयुक्त असल्याचे, विरुध्द पक्षांचे सेवेत त्रुटी असल्याचे व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे घोषीत करण्याची मागणी केली. मोबाईल हॅंन्डसेट खरेदीपोटी दिलेले रु.62,500/- दि.23.05.2015 पासुन 18% व्याजासह परत करण्याची तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचे खर्चाबाबत रु.10,000/- ची मागणी केली आहे.
- मंचातर्फे विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आला असता विरुध्द पक्ष क्रं 1 ने प्राथमिक आक्षेप घेऊन तक्रार ही वाईट हेतुने व गुणवत्ताहीन असल्याने ती मंचासमोर चालविण्यायोग्य नसल्याचे निवेदन दिले. तसेच अॅप्पल हॅन्डसेटच्या वारंटी संबंधाने सविस्तर विवरण देत तक्रारकर्त्याचा मोबाईल हॅन्डसेट त्यांनी चुकीच्या पध्दतीने व निष्काळजीपणे हाताळल्यामुळे नादुरुस्त झाला होता. त्यामुळे बाह्य आघातामुळे (external damages) नादुरुस्त झालेला तक्रारकर्त्याचा मोबाइल हॅन्डसेट वारंटी शर्तींचे स्पष्ट उल्लंघन असल्याने मोफत दुरुस्तीस पात्र नसल्याचे निवेदन दिले. मोबाईल हॅन्डसेटच्या सद्द स्थितीकरीता तक्रारकर्ता जबाबदार असल्याचे निवेदन देऊन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची मागणी केली. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी वारंटी संबंधाने अटी व शर्ती तसेच तक्रारकर्त्याच्या मोबाईल हॅन्डसेटची परिस्थिति दर्शविणारे फोटोग्राफ दाखल केले.
- विरुध्द पक्ष क्र.2 ने लेखीउत्तर दाखल करुन विरुध्द पक्ष क्र.1 निर्मित मोबाईल हॅन्डसेटचे अधिकृत विक्रेता व सेवा प्रतींनिधी असल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याचा मोबाईल ‘टच स्क्रीन नॉट वर्किंग’ या तक्रारीच्या निवारणाकरीता दि 14.12.2015 रोजी जमा केल्याची बाबही मान्य केली. तक्रारकर्त्याच्या मोबाइलचे पूर्ण सूक्ष्म तपासणी करून विरुध्द पक्ष क्र.1 ला कळविण्यात आले व त्यांच्या निर्देशानुसार तक्रारकर्त्याचे मोबाईलमधील बिघाड हा त्याचे चुकीमुळे व बाह्य आघातामुळे असल्याने सदर दुरुस्ती वारंटीमध्ये करण्यायोग्य नसल्याचे त्याला कळविल्याचे व हॅन्डसेट दुरुस्तीकरीता अंदाजे खर्च रु.25,160/- लागणार असल्याचे निवेदन दिले. मोबाईल हॅन्डसेटच्या वारंटी संबंधाने निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उत्पादक म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 चे असल्याने वारंटी नाकारण्या संबंधीचा विरुध्द पक्ष क्र.2 चा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कुठलेही कारण नसतांना तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्र.2 ला विनाकारण त्रास दिलेला आहे. तक्रारकर्त्याचे सर्व आक्षेप निरर्थक असल्याचे नमुद करत प्रस्तुत तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
- तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल करुन तक्रारीतील निवेदनाचा पुर्नउच्चार केला, तसेच मोबाईल हॅन्डसेटमध्ये असलेले बिघाड हे वारंटी कालावधीत मोफत दुरुस्त करुन देण्यायोग्य असुन देखिल विरुध्द पक्षाने हॅन्डसेटची वारंटी नाकारणे हे चुकीचे असल्याचे निवेदन दिले. विवादीत मोबाईल हॅन्डसेट हा दोषयुक्त असल्याचे नमुद करीत तक्रारकर्त्याची मागणी मान्य करण्याची विनंती केली.
- प्रस्तुत प्रकरणात मोबाईल हॅन्डसेट मधील बिघाडासंबंधाने प्रत्यक्ष अहवाल मिळण्याकरीता तज्ञ कमिश्नर नेमणूकीची मागणी करण्यांत आली. परंतु उभयपक्षातर्फे तज्ञ नेमणुकीसंबंधी कुठलीही कारवाई करण्यांत न आल्याने प्रस्तुत तक्रार दाखल दस्तावेजांनुसार निकाली काढण्यात येत आहे.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेले निवेदन व दस्तावेज तसेच विरुध्द पक्षांचे लेखीउत्तराचे व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले, तसेच उभय पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- // निष्कर्ष // -
7. तक्रारकर्त्याने दाखल केलेला दस्त क्र.1 नुसार त्याने विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून Apple iPhone 6 Plus 16GB space gray Batch: SF2MNPEH9G5QQ, bearing IME#354440063655690, PART No.MGA82HN/A एकूण किम्मत रु.62,500/- ला दि.23.05.2015 रोजी खरेदी केल्याचे स्पष्ट होते. विवादीत मोबाईल हॅन्डसेट विरुध्द पक्ष क्र.2 नुसार दुरुस्तीकरीता दि.14.12.2015 रोजी दिल्याचे दस्त क्र.2 नुसार स्पष्ट होते. दस्त क्र.3 नुसार विरुध्द पक्ष क्र.2 ने दि.17.12.2015 रोजी विवादीत हॅन्डसेटचे दुरुस्तीकरीता रु.25,160/-ची मागणी केल्याचे दिसते, त्यामुळे उभय पक्षांत वरील वाद उद्भवल्याचे स्पष्ट होते. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्ता हा ‘ग्राहक’ व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ‘विक्रेते’ व ‘सेवा पुरवठादार’ असल्याचे स्पष्ट होते. विवादीत मोबाईल हॅन्डसेट दोषयुक्त असल्याचे व विरुध्द पक्षांच्या सेवेत त्रुटी असल्याचा तक्रारकर्त्याने आक्षेप घेतल्याने प्रस्तुत तक्रार ही मंचासमोर चालविण्यायोग्य असल्याचे व अधिकारक्षेत्रात मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. विवादील मोबाईल हॅन्डसेट हा दि.23.05.2015 पासुन 22.05.2016 पर्यंत 1 वर्षाच्या वारंटी कालावधीत होता याबद्दल वाद नाही. त्यामुळे दि.14.12.2015 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 कडे नादुरुस्त असलेला मोबाईल हॅन्डसेट वारंटी कालावधीत दुरुस्तीकरीता दिल्याचे स्पष्ट होते. उभयपक्षांचे निवेदन व दाखल दस्तऐवजानुसार खालील बाबी मंचाच्या निदर्शनास आल्या.
i) तक्रार दस्तावेज क्र.2 नुसार दि.14.12.2015 रोजीच्या सर्विस रीपोर्ट मध्ये मोबाईल हॅन्डसेट पुढील (Screen related & other Problem) दोष असल्याचे (USB/dock, Camera, Speaker, Display, Airport/WiFi, Bluetooth, Battery, Adaptor, Touch screen, Find My iPhone – Not Working) स्पष्ट होते. त्यामध्ये मशीन इनवर्ड डिटेल्स - मोबाईल हॅन्डसेटची स्थिति – ‘unit is in used condition & inwarded for micro inspection & component check. Found multiple dents, scratches on corners & edges, slightly bent material chipped out from bottom right corner’ व ‘ Touch screen not working. Need to chat & escalate and then update the Customer’ असे स्पष्टपणे नमूद दिसते. तसेच सदर सर्विस रीपोर्टवर कुठल्याही हरकती शिवाय तक्रारकर्त्याची स्वाक्षरी उपलब्ध दिसते.
ii) तक्रार दस्तावेज क्र.3 नुसार दि.17.12.2015 रोजीच्या डिलीवरी रीपोर्ट मध्ये मोबाईल हॅन्डसेट पुढील मुद्द्याबाबत (USB/dock, Camera, Speaker, Display, Airport/WiFi, Bluetooth, Battery, Adaptor, Touch screen, Find My iPhone – Working & Touch screen – Not Working) नमूद दिसते. सदर मोबाईल हॅन्डसेटची दुरुस्ती वारंटीमध्ये करण्यायोग्य नसल्याने व वारंटी नाकारल्याने हॅन्डसेट दुरुस्तीकरीता अंदाजे खर्च रु.25,160/- लागणार असल्याचे नमूद दिसते. तसेच तक्रारकर्त्याने खर्चास मान्यता न दिल्याने दुरूस्ती न करता मोबाईल हॅन्डसेट तक्रारकर्त्यास परत दिल्याचे स्पष्ट होते. डिलीवरी रीपोर्ट मध्ये ‘Estimate not approved Returned without repairs’ असे स्पष्टपणे नमूद दिसते. तसेच सदर डिलीवरी रीपोर्टवर सुद्धा कुठल्याही हरकती शिवाय तक्रारकर्त्याची स्वाक्षरी उपलब्ध दिसते.
iii) विरुध्द पक्ष क्रं 1 ने अॅप्पल हॅन्डसेटच्या वारंटी संबंधाने सविस्तर विवरण देत व अटी व शर्तींची प्रत (दस्तऐवज आर1) लेखी उत्तरासोबत दाखल केली. तसेच तक्रारकर्त्याच्या मोबाईल हॅन्डसेटची परिस्थिति दर्शविणारे फोटोग्राफ (दस्तऐवज आर 2) दाखल केले त्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचा मोबाईल हॅन्डसेट त्यांनी चुकीच्या पध्दतीने व निष्काळजीपणे हाताळल्यामुळे नादुरुस्त झाल्याचे दिसते. बाह्य आघातामुळे (external damages) नादुरुस्त झालेला तक्रारकर्त्याचा मोबाइल हॅन्डसेट वारंटी अटी व शर्तींचे स्पष्ट उल्लंघन असल्याने मोफत दुरुस्तीस पात्र नसल्याचे विरुध्द पक्ष क्रं 1 चे निवेदन सयुंक्तिक असल्याचे मंचाचे मत आहे.
iv) वरील वस्तुस्थीती नाकारण्याकरीता तक्रारकर्त्याने देखील प्रतिउत्तरात काहीही मान्य करण्यायोग्य निवेदन दिले नाही किंवा विरुध्द पक्षांचे निवेदन अन्य पुराव्याद्वारे खोडून काढले नाही उलट बाह्य आघातामुळे (external damages) मोबाईल हॅन्डसेटची परिस्थिति दर्शविणारे फोटोग्राफबद्दल मौन बाळगून अप्रत्यक्षरीत्या चूक मान्य केल्याचे दिसते. विवादीत मोबाईल हॅन्डसेट 1 वर्षाच्या वारंटी कालावधीत नादुरुस्त झाल्याच्या एकमेव मुद्द्यावर मोफत दुरुस्तीस/बदलीस पात्र असल्याचे निवेदन दिले.
त्यामुळे वरील संपूर्ण वस्तुस्थीतीचा विचार करता तक्रारकर्त्याबद्दल सहानुभूती असून देखील तक्रार मान्य करण्यायोग्य नसल्याचे व प्रस्तुत खारीज होण्यास पात्र असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यांत येते.
2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क देण्यांत यावी.
3. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
4. तक्रारकर्त्यास तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.