तक्रारदार : वकील श्री. राजनकर हजर.
सामनेवाले : गैरहजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
1. तक्रारकर्त्याच्या वडिलांची मौजा–महारीटोला ता. आमगांव जि. गोदिया येथे गट नं 172, 0.40 हे.आर शेतजमिन आहे व तक्रारकर्ता वरील शेतजमिनीवर धानपिक घेतो. तक्रारकर्त्यानी वरील नमूद शेती जमिनीवर धान पेरणी करण्याच्या उद्देशाने दि. 14/06/2015 रोजी विरूध्द पक्ष क्र 2 कडून, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी उत्पादित केलेले ‘जयश्रीराम’ जातीचे धानाचे 10 किलो बियाणे रू. 540/-,मध्ये विकत घेतले. सदर खरेदी केलेल्या धान बियाणाचा लॉट नं. YGK-14-51278 असा आहे. सदर खरेदी बियाणे हे यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. हिगंणघाट यांनी उत्पादित केले असून त्यावर खालील प्रमाणे उदघोषणा (Declaration) करण्यात आली आहे. Produce Packed marketed by yashoda Hybrid seeds Pvt Ltd. Regd. Office 248 Near Laxi Talkies Higanghat 442301
Variety Jai Shri Ram Date of Test Packed on Valied Up To
Gold 12/04/2015 12/04/2015 11/17
Net Weight Lot No Max. Retail Price
10 Kg. YGK -14-51278 ` Rs 840/- (Inclusive Of All Tax)
Class Of Seed TRUTHFULL
Germination (Min) 80%
Genetic Purity (Min) 98%
वरील नमूद उदघोषणा असलेल्या बियाणे खरेदीबाबत विरूध्द पक्ष क्र 2 यांनी तक्रारकर्त्याच्या नावे दिलेले बिल तक्रारीमध्ये दस्ताऐवज क्र 1 म्हणून जोडलेले आहे. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी वरील प्रमाणे धान बियाणाची उगवण 80% तसेच जेनेरीक व फिजीकल प्युरीटी 98% असल्याचे Truthful Label वर उदघोषीत केले आहे. त्याची प्रत तक्रारीमध्ये दस्ताऐवज क्र 5 म्हणून जोडलेली आहे. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी बियाणाच्या गुणवत्तेबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने वरील प्रमाणे बियाणे खरेदी करून त्याची योग्य प्रकारे पेरणी जून 2015 मध्ये केली. तक्रारकर्त्यानी माहे ऑक्टोंबर 2015 मध्ये धान पिकाची पाहणी केली असता, धान पिकामध्ये काटेरी खबरा (लांबा-तुंबा) 50% वर आढळून आले. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी नि:कृष्ट दर्जाचे धान बियाणे दिल्याबाबत तक्रारकर्त्याच्या लक्षात आले. कारण पिकामध्ये काटेरी खबरा (लांबा-तुंबा) आढळून आला.
2. तक्रारकर्त्याने त्यानंतर त्वरीत तालुका कृषी अधिकारी आमगांव व कृषी अधिकारी पंचायत समिती आमगांव यांना विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी पुरविलेल्या नि:कृष्ट बियाणाबाबत दि 30/10/2015 ला पत्राद्वारे लेखी तक्रार केली. तक्रारकर्त्याने दिलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने कृषी अधिकारी आमगांव, कृषी अधिकारी पंचायत समिती आमगांव व इतर यांनी तक्रारकर्त्याच्या शेतातील धानपिकाची पाहणी दि. 03/11/2015 ला केली व दि. 03/11/2015 रोजी विरूध्द पक्ष क्र 1 च्या प्रतिनीधी समक्ष पंचनामा तयार करण्यात आला. तक्रारीमध्ये दस्ताऐवज क्र 4 जोडला आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, कृषी अधिकारी व इतर लोकांनी केलेल्या तपासणीत धानाचे थोंबे ग्रासीत, लांबायुक्त व भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. ज्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब पंचनाम्यात नमूद केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत वरील प्रमाणे दस्ताऐवज सादर केली आहेत. तक्रारकत्याने खालीलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
(अ) विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी निःकृष्ट बियाणे देऊन सेवेत त्रृटी केली आहे असे घोषीत करण्यात यावे.
(ब) तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत रू. 50,000/-, व्याज 12 टक्के प्रमाणे विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात यावे.
(क) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबाबत रू. 25,000/-,तसेच खर्चाबाबत रू. 10,000/-,देण्याचे आदेश विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना देण्यात यावे.
3. विरूध्द पक्षकाराने सादर केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, सदर प्रकरणात विरूध्द पक्ष क्र 1 हि रजिष्टर नोंदणीकृत हायब्रिड सिड्स प्रा.लि. कंपनी असून, विरूध्द पक्ष क्र 2 हा विरूध्द पक्ष क्र 1 चा वितरक आहे. विरूध्द पक्षाने त्यांच्या लेखी उत्तरात कथन केले की, तक्रारकर्त्याने कधीही विरूध्द पक्ष क्र 2 कडून दि. 14/06/2015 रोजी 10 किलो ‘जयश्रीराम’ धान बियाणे खरेदी केलेले नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याची कुठेही शेतजमिन नाही. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी असेही म्हटले की, तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात दाखल केलेल्या जमिनीच्या 7/12 उता-याप्रमाणे मौजा-महारीटोला, त.साक्र 3 ता. आमगांव येथे एकुण 3 इसमाच्या नावाने गट नं- 172, आराजी 0.40 हे. आर जमिन आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीमध्ये उल्लेख केले आहे की, तक्रारकर्त्याच्या वडिलांची मौजा- महारीटोला, गट नं. 172, आराजी 0.40 हे. आर जमिन आहे. सदर तक्रारीमध्ये तक्रारकर्त्याने खोटे कथन करून, आमच्या विरूध्द खोटी तक्रार मा. न्यायालयात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची कुठेही जमिन नसल्यामूळे तो आमचा ‘ग्राहक’ नाही. विरूध्द पक्षकार क्र 1 व 2 यांनी लेखी जबाबात कथन केलें आहे की, सदरची मौजा- महारीटोला, त.साक्र 3 ता. आमगांव जि. गोंदिया नामे- गजानन जागो बावणथडे, इश्वरदास जागो बावणथडे, श्रीमती. आनंदाबाई सदाशिव यांच्या संयुक्तनावाने गट नं- 172, आराजी 0.40 हे. आर जमिन आहे. वरीलप्रमाणे असलेल्या जमिनीचा कर्ता पुरूष हा श्री. गजानन बावणथडे आहे. सदर जमिनीमध्ये तक्रारकर्त्याच्या वडिलांचा हिस्सा एक तृतियांश एवढा आहे. इतर खातेदारांनी सदर जमिनीची मशागत करण्याकरीता तक्रारकर्त्याला अधिकार दिलेले नाही किंवा कोणतेही मुख्यत्यारपत्र किंवा अथवा संमतीपत्र दिलेले नाही.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने सादर केलेल्या दस्ताऐवजावरून त्याने 10 किलो वजनाचे एक बॅग खरेदी केल्याचे दिसून येत आहे. शासनाने व कंपनीने निर्धारीत केलेली मात्रा हि एकरी बियाणे मात्रा 20 किलो एकर प्रतीची आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने संपूर्ण जमिनीमध्ये धान पेरल्याची खोटी कहाणी रचलेली आहे. यावरून असे स्पष्ट होते व दिसून येते की, तक्रारकर्त्याने कधीही संपूर्ण 0.40 हे. आर शेतजमिनीमध्ये पिक लावलेले नाही. तक्रारकर्त्याने आपल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे ‘जयश्रीराम’ पिकाची जात हि बारीक जात आहे आणि सदर जातीच्या बियामध्ये लांबी (खबरा) असूच शकत नाही. तक्रारकर्त्याने आपल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे ‘खबरा’ हा धानवर्णिय तन आहे. तक्रारकर्त्याने आपल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या शेतामध्ये धानामध्ये ‘खबरा’ उगवला, लांबीर/खबरा धान हे धानातील गवतवर्णीय तन आहे. त्यामुळे त्याच्या शेतामधील धान्यामध्ये भेसळ झाल्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही.
4. तक्रारकर्त्यांच्या वकीलांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले आहे त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशत मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
6. तक्रारकर्त्याच्या वडिलाची मौजा-महारीटोला ता. आमगांव. जि. गोंदिया येथे गट नं. -172, 0.40 हे. आर शेतजमिन आहे. सदर मौजा- महारीटोला येथील जमिन वडिलोपार्जीत असून श्री. गजानन नागो बावनथडे, श्री. ईश्वरदास नागो व श्रीमती. आनंदाबाई सदाशिव मेश्राम महारीटोला हे त्या शेतीचे वारसदार आहेत. सदर शेतीचे वारसदारापैकी तक्रारकर्त्याचे काका श्री. गजानन वल्द नागो बावणथडे यांनी प्रतिज्ञेवर मंचात हलपनामा सादर केला असून, त्यानूसार वडिलोपार्जीत जमिनीचे मौखीक बटवारे झाले असून गट नं. 172, एरीया 0.40 हेक्टर आर ची जमिन श्री. ईश्वरदासच्या हिस्यात आली आहे. तक्रारकर्ता मागील अनेक वर्षापासून त्यावर पिक घेत आहे व ती त्याच्या कब्जात व जोत्यात आहे.
7. तक्रारकर्त्याने दि. 14/06/2015 रोजी विरूध्द पक्ष क्र 2 यांचेकडून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी उत्पादित केलेले ‘जयश्रीराम’ जातीचे धानाचे 10 किलो बियाणे दि. 14/06/2015 रोजी रू 540/-,मध्ये विकत घेतले आहे. सदर बियाणाचा लॉट नं. YGK-14-51278 असा आहे. विरूध्द पक्षकार क्र 1 व 2 यांनी वरील धान बियाणाची उगवण क्षमता 80% तसेच Genetic Purity (Min) 98% असल्याचे आश्वासीत केले होते. त्याबाबतचे TRUTHFULL लेबल धान बियाणाच्या बॅगवर देण्यात आले होते. तक्रारकर्त्यानी बियाणाच्या गुणवत्तेबाबत दिलेल्या आश्वासनामूळे धान पेरणी करण्याच्या उदेशाने बियाणे खरेदी करून त्याची योग्य प्रकारे पेरणी जून 2015 मध्ये केली. तक्रारकर्त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये धान पिकाची पाहणी केली असता, धान पिकामध्ये काटेरी खबरा (लांबा-तुंबा) 50% च्या वर असल्याचे आढळून आले. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी नि:कृष्ट दर्जाचे बियाणे दिल्याने धान पिकामध्ये काटेरी खबरा (लांबा-तुंबा) आढळून आल्याने तक्रारकर्त्याने दि. 30/10/2015 ला पत्राद्वारे तालुका कृषी अधिकारी आमगांव व कृषी अधिकारी पंचायत समिती आमगांव यांच्याकडे लेखी तक्रार केली. तक्रारकर्त्याने केलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी आमगांव व कृषी अधिकारी पंचायत समिती आमगांव व इतर प्रतिनीधी यांनी तक्रारकर्त्याच्या शेतातील धान पिकाची पाहणी दि. 03/11/2015 ला विरूध्द पक्ष 1 च्या प्रतिनीधी समक्ष केली व उपस्थितांच्या समक्ष पंचनामा तयार करण्यात आला व स्वाक्षरी घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी आमगांव यांनी सदर शेतजमिनीच्या 1 मिटर x 1 मिटर क्षेत्राची तपासणी केली असता 96 धानाची थोंबे आढळून आली. त्यापैकी 62 थोंबे ग्रासीत लांबायुक्त भेसळ आढळले. असे त्यांच्या पंचानाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे 12 क्विंटल उत्पादन कमी येईल त्याची अंदाजीत किंमत रू. 24,000/- एवढी येत असल्याचे नमूद केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांचे सिव्हील अपील नं. 7543/2004 एम. मधुसुदन रेड्डी व इतर. विरूध्द नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. या प्रकरणात दिलेल्या न्यायनिर्णयानूसार बियाणाच्या गुणवत्तेबाबत तपासणी करून घेण्याबाबतची जबाबदारी ही विरूध्द पक्षाची आहे. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास निःकृष्ट दर्जाचे बियाने दिल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चा निःकर्ष होकारार्थी नोंदवित आहोत.
8. तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडून नि:कृष्ट दर्जाचे बियाणे दिल्याने तक्रारकर्त्याचे आर्थिक नूकसान झाल्यामूळे व त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याला मंचाकडे तक्रार करण्यास भाग पाडले. तरी मंच खालीलप्रामाणे खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास त्याला झालेल्या नुकसान भरपाईबदल व शेतजमिन मशागतीच्या एकूण खर्चाबदल रू. 27,000/-,(सत्ताविस हजार) अदा करावे .
3. तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रासाबाबत विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी रू. 10,000/-,(दहा हजार) व तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,(पाच हजार) दयावा.
4. वरील आदेश क्र 2 व 3 ची पूर्तता आदेश मिळाल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावी. अन्यथा आदेशाची पूर्तता होईस्तो 9 टक्के दराने व्याजासह अदा करावे.
5. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.