तक्रारकर्ता तर्फे वकील ः- श्रीमती.एम.आर रहागंडाले .
विरूध्द पक्षातर्फे वकील ः- श्री. एस.बी.डहारे.
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः-, श्री. सु. रा.आजने, सदस्य -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 01/02/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याचा तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता वरील नमूद पत्यावर राहत असून त्याची सोनेगांव येथे 2.67 हेक्टर आर शेतजमिन आहे. विरूध्द पक्षकार श्री. योगराज धनलाल पारधी यांनी योगाराज हर्बल प्रा.लि. ची स्थापना करून त्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाने फळबाग तयार करणे, रोपटे पुरविणे, लागवड करून घेणे, वेळोवेळी भेट देणे, रोपकिडीसाठी औषधोपचाराचा सल्ला व विक्रीची स्वतः खरेदी अशी हमी देऊन, प्रकल्प अहवाल बनवून देणे, बँकेकडून कर्जाची हमी व त्या कर्जावर 25 टक्याची सबसिडी हे सदरहू विरूध्द पक्षकारांकडुन केले जाते. विरूध्द पक्षकार श्री. योगराज धनलाल पारधी यांनी जानेवरी 2014 ला तक्रारकर्त्याला भेट देऊन वरील सर्व गोष्टी आमची फर्म करून देईल अशी माहिती देऊन, आपल्या जाळयात फसविले. विरूध्द पक्षकारांनी आश्वासन दिले होते की, मोठे साहेब श्री. नितीन सर मार्फत रू. 25,00,000/-,चे कर्ज व त्यावर 25 टक्के सबसिडी अंदाजे रू. 6,00,000/-,देण्यात येईल व त्यासाठी तक्रारकर्त्याकडून प्रकल्प अहवाल व अन्य खर्च असे रू. 25,000/-,विरूध्द पक्षकार श्री. योगराज धनलाल पारधी यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्र. 30054631600 मध्ये दि. 07/03/2014 ला जमा करून घेतले. सदरचे कर्ज हे 15 ते 20 दिवसात बँकेकडून मिळवून गॅरंटी/हमी विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याला दिली होती व त्यानूसार तक्रारकर्त्याला 3, 4 बँकेच्या शाखेमध्ये नेले असतांना सदर पपईच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर कर्ज देण्याची बँकेनी मनाई केली. विरूध्द पक्षकाराने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तक्रारकर्त्याने आपले भात पिकाचे (2.67 हेक्टर आर) साडे सहा एकर शेतजमिनीचे सफाटी करून शेणखत, ठिबंक सिंचन, मोटार, पॉईप, तारेची कुंपन, इ. शेतात तयार केली व सदर जमिन हि लागवडीकरीता माहे में - 2014 मध्ये तयार केली.
3. सदर जमिनीवर पपईची पिक लावण्याकरीता विरूध्द पक्षकाराने प्रति झाड रू. 13/-,प्रमाणे देण्याचे कबुल केले होते. परंतू नंतर प्रति झाड रू. 15/-,प्रमाणे पैसे घेतले. यानंतर अॅडव्हान्स म्हणून दि.15/02/2014 ला योगराज हर्बल प्रा.लि (अॅक्सिस बँक) मध्ये रू. 40,000/-,तक्रारकर्त्याने जमा/ट्रॉन्सपर केले व उरलेले रू. 50,000/-,प्लॅन्ट (रोप) आल्यावर दि. 05/07/2014 ला विरूध्द पक्षकाराचे खात्यात योगराज हर्बल प्रा.लि (अॅक्सिस बँक) ला जमा/ट्रॉन्सपर तक्रारकर्त्याने केले. विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याकडून एवढी रक्कम घेतली तसेच अन्य शुल्क घेऊन करारपत्र लिहून देण्याची कबुली केली होती. परंतू तक्रारकर्त्याने जेव्हा कराराची मागणी केली तेव्हा विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याच्या शेतात येणे बंद केले. यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षकाराशी फोन वरून संपर्क साधला असता, विरूध्द पक्षकाराने मला टॉयफाईड झाला आहे व दुस-या वेळी पत्नीचा अपघात झाला आहे नंतर येऊ असे सांगीतले. विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याचे शेतात येणे बंद केल्यामूळे पपईचे झाडाची वाढ चांगली झाली नाही व कृषी विभागाकडून तंत्रज्ञान न मिळाल्याने सर्व पपईची झाडे पूर्ण फळ न देता, मरण पावली. त्यामूळे तक्रारकर्त्याला रू. 8,00,000/-,चा नुकसान सहन करावा लागला आहे. विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे व कराराप्रमाणे करार पूर्ण केला नाही. विरूध्द पक्षकाराचे कार्य हि सेवेतील कमतरता आहे. विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याकडून पैसे घेऊन सुध्दा करारपूर्ती केली नाही व तक्रारकर्त्यासोबत धोकाघडी केलेली आहे. ज्यामुळे तक्रारकर्त्याला रू. 8,00,000/-,चे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. सदर विरूध्द पक्षाच्या कृत्यामूळे तक्रारकर्त्याला अतिशय मानसिक त्रास झाला असून विरूध्द पक्षकाराला तक्रारीप्रमाणे तक्रारकर्त्याला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसुर केल्याने सदरचा अर्ज विद्यमान न्यायमंचामध्ये नुकसानाची भरपाई रक्कम रू. 8,00,000/-,देण्याकरीता तसेच झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.50,000/-,व प्रकरणाचा खर्च रू.30,000/-,असे एकुण रू. 8,80,000/ ,मिळण्याकरीता दाखल करीत आहे. तक्रारीचे कारण प्रथम दि. 15/02/2014 ला घडले. जेव्हा विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून स्वतःच्या बॅक खात्यात पैसे जमा करून घेतले. परंतू तक्रारीचे कारण दि. 07/03/2014 व 05/07/2014 ला घडले. जेव्हा विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याकडून स्वतःचे बँक खात्यात पैसे जमा करून घेतले व त्यानंतर संपर्क साधला असता, वारंवार टाळाटाळ व बनवाबनवीचे कारण उद्दभवत असून तक्रार मुदतीत आहे. तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहेः-
1) तक्रारकर्त्याचा अर्ज मंजूर व्हावा व (विमा टंकलेखन चुक) नुकसान भरपाई रक्कम रू. 8,00,000/-व त्यावर 18 टक्के व्याज दि. 15/02/2014 पासून देण्याचे आदेश व्हावेत.
2) विरूध्द पक्षकारानी तक्रारकर्त्याला दाव्याची रक्कम न दिल्याने, झालेल्या मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रू. 50,000/-,देण्याचे आदेश व्हावे व सदर तक्रारीच्या खर्चापोटी रू.30,000/-,इतकी रक्कम तक्रारकर्त्याला देण्याचे आदेश व्हावेत.
4. विरूध्द पक्षकाराच्या कथनानूसार विरूध्द पक्षकार हा योगराज हर्बल प्रा.लि. हि कंपनी चालवितो व तो या कंपनीचा डॉयरेक्टर आहे व हि कंपनी एन.सी.ए मार्फत रजिष्ट्रर करण्यात आलेली आहे. विरूध्द पक्षकार या कंपनीमार्फत आधुनिक तंत्रज्ञानाने फळबाग तयार करणे, रोपटे पुरविणे, लागवड करून घेणे, वेळोवेळी भेट देणे, रोपकिडीसाठी औषधोपचाराचा विक्रीचा सल्ला देणे हि कामे केली जातात. यासाठी योग्य तो खर्च कंपनीच्या ग्राहकांकडून सर्व्हिस चार्जैस म्हणून वसुल करण्यात येतात.
5. माहे ऑक्टोंबर – 2013 पासून तक्रारकर्ता हे वारंवार फोनद्वारे संपर्क करीता होते व तक्रारकर्त्याने जानेवारी- 2014 ला विरूध्द पक्षकारांच्या कार्यालयात भेट दिली व आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाबाबत सर्व माहिती प्राप्त केली. तक्रारकर्त्याला आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करावयाची असल्याने व त्याला पपईचे प्रोजेक्ट जास्त फायदेशीर वाटल्याने तक्रारकर्त्याने आपल्या शेतीचे सपाटीकरण करण्यासाठी व लागवडीसाठी विरूध्द पक्षकार यांच्या कंपनीतील नियुक्त श्री. निलेश गौतम याला संपूर्ण देखरेखीसाठी नियुक्त केले व त्याला रू.12,000/-,प्रतिमाह सर्व्हिस चॉर्ज देण्याचे तक्रारकर्त्याने ठरविले होते. श्री. निलेश गौतम यांच्या देखरेखीखाली तक्रारकर्ता यांच्या जमिनीचे सपाटीकारण व सुपिक बनविण्यात आले. श्री. निलेश गौतम याने जवळ-जवळ 9 महिने तक्रारकर्ता यांच्या शेतात सर्व्हिस दिली आहे.
6. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या देखरेखीखाली आपल्या शेतीचे चांगल्याने मशागत केल्यानंतर व बँकेतून कर्ज मंजूर झाल्याने तक्रारकर्ता याने विरूध्द पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली व एकुण 12,600 रोपटे लागवडीकरीता लागतील अशी माहिती दिली. तक्रारकर्ता व विरूध्द पक्षकार यांची आपसात संपूर्ण बोलणी झाल्यानंतर असे निःश्चित करण्यात आले की, प्रति रोपटे रू. 13/-,व रू. 2/-,मजूरी व वाहन खर्च असे एकुण रू. 15/-,दराने तक्रारकर्त्याच्या शेतात विरूध्द पक्षकार आणून देणार होते. तक्रारकर्त्याच्या मागणीनूसार विरूध्द पक्षकार यांनी एकुण 12,600 रोपटे आणून दिले होते व त्याची एकुण किंमत रू. 1,89,000/-, यापोटी तक्रारकर्त्याने दि. 15/02/2014 ला रू. 40,000/-,व दि. 07/03/2014 ला रू. 25,000/-, अॅडव्हान्स दिले होते व दि. 05/07/2014 ला रू. 50,000/-, रोपटे तक्रारकर्त्याच्या शेतात आणून दिल्यानंतर दिले होते. तक्रारकर्त्याने असे आश्वासन दिले होते की, उर्वरीत रक्कम रू. 74,000/-,थोडया दिवसात विरूध्द पक्षकार यांच्या कार्यालयात सोडून देईल. परंतू तक्रारकर्त्याने आजपावेतो फक्त रू. 1,15,000/-,दिलेले आहेत.
7. तक्रारकर्त्याच्या शेतात चांगली लागवड येण्यासाठी विरूध्द पक्षकार व त्यांच्या संपूर्ण टिमने खुप मेहनत घेतली व वारंवार योग्य तंत्रज्ञान पुरविण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या शेतात भरघोस उत्पन्न आले होते. जेव्हा पपईचे भरघोस उत्पन्न निघाले होते तेव्हा विरूध्द पक्षकार यांनी रू. 74,000/-,ची मागणी केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षकार किंवा कंपनीच्या कुणाही व्यक्तीला शेतात येण्यास मज्जाव केला. उर्वरीत रक्कम रू. 74,000/-, तक्रारकर्त्याकडून घेणे बाकी आहेत. वारंवार मागणी करून सुध्दा तक्रारकर्ता याने विरूध्द पक्षकाराला रक्कम दिली नाही व सदर खोटी तक्रार केली आहे. तसेच कंपनीकडून पाठविण्यात आलेल्या श्री. निलेश गौतम याला सुध्दातक्रारकर्ता याने 9 महिने केलेल्या सर्व्हिस चॉर्ज म्हणून दरमहा रू. 12,000/-, एकुण रू. 1,08,000/-, आजपावेतो दिले नाही. तक्रारकर्त्याने ठरविल्याप्रमाणे पपईचे पिक आल्यानंतर विरूध्द पक्षकाराला विकणार असे ठरविण्यात आले होते त्याप्रमाणे विरूध्द पक्षकार यांनी श्री. गोविंद ठाकूर व तिर्थराज बघेले यांना माल घेण्यासाठी पाठविले होते. परंतू तक्रारकर्ता याने विरूध्द पक्षकार याला माल विकण्यास मनाई केली व शिवीगाळ करून हाकलून लावले. परंतू पपईचे पिक आल्यानंतर तक्रारकर्ता याने संपूर्ण पिक परस्पर विकुन टाकले आहे. तसेच पपईच्या पिकासाठी विरूध्द पक्षकारने जी मेहनत घेतली त्याचे श्रेय कृषी अधिकारी श्री. खंडाईत व पोटदुखे व इतर लोकांना दिले व त्यांच्यासोबत पेपरमध्ये जाहिरात सुध्दा प्रसिध्द केली होती. अशाप्रकारे तक्रारकर्ता याने विरूध्द पक्षकार यांचे खुप आर्थिक नुकसान केलेले आहे.
8. विरूध्द पक्ष सांगु इच्छितो की, जर तक्रारकर्त्याला पपईच्या शेतीचे संपूर्ण नायनाट झाले असते तर नक्कीच तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असती व त्यासंदर्भात पंचनामा केला असता. परंतू असा कोणताही पुरावा अभिलेखावर तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही. तसेच तक्रारकर्ता सांगतो की, त्याला बँकेकडून कर्ज मिळाले नाही यावर विरूध्द पक्षकार सांगु इच्छितो की, तक्रारकर्त्याने अभिलेखावर 7/12 जोडलेला आहे त्यामध्ये तक्रारकर्त्याने सन- 2014 मध्ये कर्ज घेतल्याचे नमूद आहे.
9. विरूध्द पक्षकार असे कथन करत आहे की, तक्रारकर्ता मान्य करतो की, विरूध्द पक्षकार याने पपईच्या रोपटयाचा पुरवठा केलेला आहे यासंदर्भात विरूध्द पक्षांनी बिल अभिलेखावर सादर केलेले आहे. यावरून हे सिध्द होते की, विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याच्या मागणीनूसार 12,600 रोपटे तक्रारकर्त्याच्या शेतात पोहचवून दिले व त्याची एकुण किंमत रू. 1,89,000/-,झाली होती. विरूध्द पक्षकाराने तक्राकर्त्याला कधीही प्रकल्प अहवाल किंवा बँकेकडून कर्ज मिळवून देण्याची बोलणी केलेली नाही व ते कंपनीचे काम नाही व यावर विरूध्द पक्षकाराचे असे कथन आहे की, तक्रारकर्त्याने अभिलेखावर प्रोजेक्ट रिपोर्ट जोडलेला आहे व संबधीत रिपोर्ट श्री. मिश्रा यांनी तयार केलेला आहे. प्रोजेक्ट कंस्लटंसी म्हणुन विरूध्द पक्षकार यांचे नाव आहे. म्हणजे जे आरोप तक्रारकर्त्याने लावले आहे ते संपूर्ण खोटे व बनावटी आहेत. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षावर सदरची खोटी व बनावट तक्रार मा. मंचासमोर दाखल केली आहे. सद्दपरिस्थिती पाहता, तक्रारकर्त्याचा अर्ज खारीज करण्यात यावा.
10. तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस तक्रारकर्त्याचे वकील श्रीमती. एम.आर रहांगडाले तसेच विरूध्द पक्षातर्फे वकील श्री. ए.बी.डहारे यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
11. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्याचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्षांनी लेखीजबाब, पुराव्याचे शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद सादर केला आहे. मा. मंचानी त्यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | नाही. |
3 | अंतीम आदेश | तक्रार खारीज करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
12. तक्रारकर्ता यांची शेती सोनेगांव येथे असून तक्रारकर्त्यानी आपल्या शेतात पपईची शेती करण्याच्या उद्देशाने विरूध्द पक्षाचे प्रतिनीधी समक्ष शेताचे सपाटीकरण, शेणखत, टिंबक सिंचन, मोटार पाईप, तारेचे कुंपन इत्यादी शेतात तयार करून माहे – 2014 मध्ये शेत लागवडीसाठी तयार केले. तक्रारकर्त्याला विरूध्द पक्षांकडून एकुण 12,600 पपई रोपांचा रू. 13/-,प्रति नगाप्रमाणे पुरवठा करण्यात आला व रू. 2/-,प्रति नगाप्रमाणे असे एकुण वाहतुक भाडे लावले. असे एकुण रू. 1,89,000/-,चे बिल, ऑर्डर क्र. 201151 दि. 05/07/2014 विरूध्द पक्षाने अभिलेखावर मंचामध्ये दि. 29/10/2018 ला
सादर केले आहे. त्यावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे. एकुण रू. 1,89,000/-,पैकी रू. 1,15,000/-,तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाचे खात्यामध्ये अनु.क्र. रू.40,000/-,दि. 15/02/2014, रू.25,000/-,दि.07/03/2014 व रू. 50,000/-,दि. 05/07/2014 ला जमा केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ‘ग्राहक’ आहे. तक्रारकर्त्याने कंपनीच्या मार्गदर्शनाखाली शेतात पपईची लागवड केली असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे व विरूध्द पक्षाने योग्य तंत्रज्ञान न पुरविल्याने तकारकर्त्याचे शेतात पपई पिकाचे नुकसान झाले असे म्हटले आहे. परंतू तक्रारकर्त्याने त्याबाबत महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिका-याकडे तक्रार केली नाही व त्यासंदर्भात कृषी अधिका-याकडून पंचनामा करून घेतला नाही व तसा पुरावा अभिलेखावर सादर करण्यास अपयशी ठरला आहे. करिता आम्ही मुद्दा क्र 1 चा निःष्कर्ष होकारार्थी व मुद्दा क्र 2 चा निःष्कर्ष नकारार्थी नोंदवित आहोत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
4. अतिरिक्त संच असल्यास तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.
npk/-