जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 336/2016.
तक्रार दाखल दिनांक : 28/11/2016.
तक्रार आदेश दिनांक : 08/06/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 06 महिने 11 दिवस
हनुमंत रामहरी चोबे, प्रोप्रा. ज्योतिर्लिंग कृषि केंद्र,
शिरसाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) यशराज अॅग्रो प्रोडक्ट अॅन्ड रिसर्च सेंटर,
वरडे, सिरीयल नं.204, ता. कराड,
जि. सातारा – 415 109 (एम.एस.)
(2) श्री अॅग्रो कार्पोरेशन, सागर घोरपडे,
मॅनेजिंग डायरेक्टर/प्रोप्रा., फ्लॅट नं.7, दुर्वांकूर सोसायटी,
मयूर कॉलनी, कोथरुड, पुणे – 411 038. (एम.एस.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : एस.जी. गायकवाड
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेतर्फे विधिज्ञ : बी.ए. सावंत
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, ते स्वंयरोजगारांतर्गत परंडा व बार्शी येथे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ नांवे व्यवसाय करतात. तसेच त्यांनी मौजे शिरसाव, ता. परंडा येथे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ सुरु केलेले आहे. दि.12/7/2016 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांचे SHREE MONO हे कापूस पिकावर फवारणी करण्याचे 120 लिटर औषध खरेदी केले आहे. त्या औषधाच्या खरेदीकरिता विरुध्द पक्ष क्र.2 यांना रु.10,000/- धनादेश व रु.15,000/- रोख स्वरुपात अदा केले. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, SHREE MONO हे किटकनाशक कापूस पिकावर रोग पडू नये आणि पडलेला रोग नष्ट होण्यासाठी फवारणी करण्यात येते. परंतु वादकथित औषध कापूस पिकावर फवारले असता कापूस झाड व त्यावरील फुले जळून जाणे, पीक आकडणे, झाडाची वाढ थांबणे, फुल गळती होणे इ. नुकसान झाले. तक्रारकर्ता यांच्याकडून अनेक शेतक-यांनी SHREE MONO औषध घेतले आणि 100 ते 125 एकर क्षेत्रामध्ये त्याची फवारणी करण्यात आल्यामुळे पिकाचे नुकसान झाले. शेतक-यांची पिके पूर्ववत होण्याकरिता तक्रारकर्ता यांनी शेतक-यांना इतर औषधे दिल्यामुळे रु.2,50,000/- खर्च झाला. विरुध्द पक्ष यांनी शेतक-यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, शेतक-यांनी त्यांच्याकडून निम्मी रक्कम अदा करुन उधारीवर औषधांची खरेदी केलेली होती. त्याशिवाय इतरही औषधे शेतक-यांनी खरेदी केलेली असून रु.3,50,000/- रक्कम शेतक-यांकडून येणे आहे. परंतु SHREE MONO औषध सदोष असल्यामुळे नुकसान झाल्याचे कारण देऊन शेतकरी तक्रारकर्ता यांच्या इतर औषधाच्या उधारीची रक्कम देण्यास नकार देत आहेत. विरुध्द पक्ष यांच्या सदोष SHREE MONO औषधामुळे तक्रारकर्ता यांचे व्यवसायावर परिणाम झालेला आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता प्रतिसाद देण्यात आला नाही. अशाप्रकारे तक्रारकर्ता यांनी उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने औषधाचा खर्च रु.2,50,000/-, उधारी येणे रु.3,50,000/-, व्यवसायिक नुकसान रु.12,00,000/- व मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- अशी एकूण रु.19,00,000/- नुकसान भरपाईची मागणी विरुध्द पक्ष यांच्याकडून केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून त्यांनी तक्रारीतील वादकथने अमान्य केली आहेत. त्यांच्या प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यामध्ये करारनामा झाला असून तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या वतीने सबडिलर म्हणून नियुक्त केलेले आहेत. सबडिलर म्हणजे कंपनीच्या वतीने सर्व जबाबदारी तक्रारकर्ता यांचेवर आलेली आहे. दि.15/9/2016 रोजी कृषि विभागाचे जिल्हास्तरीय भरारी पथक व कृषि अधिकारी, पंचायत समिती, परंडा यांनी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके इ. परवान्याबाबत तक्रारकर्ता यांचे दुकान व गोडावूनची तपासणी केली असता अनेक उणिवा आढळून आल्या. त्याबाबत प्राप्त अहवालानंतर कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी सुनावणी घेतली. सुनावणीनंतर तक्रारकर्ता यांनी कंपनीविरुध्द काही शेतकरी उभे करुन खोटी माहिती कंपनीकडे कळवली. परंतु त्या परिसरातील शेतक-यांशी संपर्क साधला असता त्यांची तक्रार नव्हती. काही दुष्काळी परिस्थितीमुळे कमी पाण्यावर शेतकरीवर्गाने कापूस पीक घेतले होते. कापूस पिकावर किटकनाशकाची फवारणी केली असता किड नियंत्रणात येते आणि पाणी अपुरे उपलब्ध असल्यास पीक कोमेजते. त्याबाबत आवश्यक सूचना तक्रारकर्ता यांनी शेतक-यांना दिलेल्या नव्हत्या. सुकलेले कापूस पीक हे पाण्याशिवाय किटकनाशकाने टवटवीत होणार नाही, याची तक्रारकर्ता यांना जाणीव होती. त्यांच्या किटकनाशकाबद्दल तक्रारकर्ता यांचे कृषि केंद्राव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातून एकही तक्रार आलेली नाही. तक्रारकर्ता यांनी योग्य न्यायाधिकार कक्षेत तक्रार दाखल केलेली नाही. दि.15/9/2016 रोजी कृषि अधिकारी, परंडा यांनी SHREE MONO औषधाचा नमुना तपासणीसाठी पाठवला होतो आणि प्राप्त अहवालानुसार ते योग्य व प्रमाणानुसार आहे. त्यामुळे SHREE MONO औषध सदोष आहे, असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्ता यांनी इतर किटकनाशकांची विक्री केल्याचे नमूद केल्यामुळे त्या किटकनाशकांचा परिणाम पिकावर झालेला असावा. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केलेली आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विरुध्द पक्ष यांचे विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये तक्रारकर्ता हे
'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता यांच्या वादकथनाप्रमाणे स्वंयरोजगारांतर्गत ते परंडा व बार्शी येथे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ नांवे व्यवसाय करतात आणि त्यांनी मौजे शिरसाव, ता. परंडा येथे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ सुरु केलेले आहे. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी दि.12/7/2016 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडून SHREE MONO हे वादकथित औषध खरेदी केले असून त्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही. हे खरे आहे की, तक्रारकर्ता यांनी वादकथित SHREE MONO औषधे शेतक-यांना विक्री करण्यासाठी खरेदी केलेले होते. आमच्या मते, मुख्य वादविषयाकडे जाण्यापूर्वी तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे ‘ग्राहक’ आहेत काय ? या कायदेशीर मुद्याचा प्रथमत: विचार होणे न्यायोचित व संयुक्तिक आहे.
5. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) मध्ये 'ग्राहक' शब्दाची व्याख्या खालीलप्रमाणे नमूद आहे.
(d) "Consumer" means any person who—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
6. उपरोक्त व्याख्येनुसार पुनर्विक्रीकरिता किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ वस्तू खरेदी करणा-या व्यक्तीचा 'ग्राहक' या व्याख्येत समावेश होऊ शकत नाही. निर्विवादपणे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित SHREE MONO औषधाची खरेदी करुन त्याची विक्री शेतक-यांना केलेली आहे. तसेच तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे अधिकृत विक्रेते असल्याबाबत करारपत्र दिसून येते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांनी वादकथित SHREE MONO औषध हे त्यांच्या स्वत:च्या वापरासाठी खरेदी न करता केवळ विक्री प्रयोजनार्थ खरेदी केलेले होते, हे स्पष्ट होते. ‘ग्राहक’ संज्ञेनुसार नमूद परंतुक पाहता जी व्यक्ती अशी वस्तू पुनर्विक्रीसाठी किंवा कोणत्याही वाणिज्यिक प्रयोजनार्थ मिळवेल, तया व्यक्तीचा ‘ग्राहक’ संज्ञेमध्ये समावेश होत नाही.
7. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी स्वंयरोजगारांतर्गत व्यवसाय सुरु केल्याचे आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलेले आहे. परंतु तक्रारकर्ता हे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ नांवे परंडा, बार्शी व शिरसाव अशा वेगवेगळ्या स्वतंत्र ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. उपरीनिर्दीष्ठ संज्ञेनुसार पोटकलम 1 च्या प्रयोजनासाठी ‘वाणिज्यिक प्रयोजन’ यामध्ये व्यक्तीने खरेदी केलेल्या व स्वंयरोजगारान्वये स्वत:ची उपजीविका मिळवण्याच्याच केवळ प्रयोजनासाठी वापरलेल्या वस्तुचा अंतर्भाव होत नाही. परंतु तक्रारकर्ता यांचे अनेक ठिकाणी असणारे व्यवसाय विचारात घेता ते व्यवसाय त्यांच्या उपजीविकेचे साधन किंवा स्वंयरोजगाराचे माध्यमातून केल्याचे निर्देशीत होत नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी एखाद्या शासकीय योजनेंतर्गत किंवा वित्तसहाय्य घेऊन ते व्यवसाय सुरु केल्याचे त्यांचे कथन नाही आणि त्याप्रमाणे उचित कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली नाहीत. अशा परिस्थितीत परंडा, बार्शी व शिरसाव या ठिकाणी तक्रारकर्ता यांचे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ नांवे असणारे स्वतंत्र व्यवसाय हे त्यांच्या स्वंयरोजगाराचे साधन आहेत, असे ग्राह्य धरता येणार नाही. आमच्या मते तक्रारकर्ता हे ‘ज्योतिर्लिंग कृषि केंद्र’ द्वारे करीत असलेले व्यवसाय हे केवळ वाणिज्यिक प्रयोजनार्थ आहेत.
8. ‘ग्राहक’ संज्ञेच्या व्याप्तीबाबत ऊहापोह करताना असे निदर्शनास येते की, संज्ञेमध्ये ‘पुनर्विक्री’ व ‘वाणिज्यिक प्रयोजन’ असा स्वतंत्र व भिन्न संकल्पना आहेत. ‘पुनर्विक्री’ व ‘वाणिज्यिक व्यवसाय’ हे दोन स्वतंत्र घटक असून ते एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संलग्न नाहीत. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केलेले SHREE MONO औषध हे पुनर्विक्रीसाठी व वाणिज्यिक प्रयोजनार्थ खरेदी केल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येऊ शकत नाहीत. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक नसल्यामुळे तक्रारीतील इतर प्रश्नांना स्पर्श न करता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्ता यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-