न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. जाबदार क्र.1 ही कंपनी असून कोल्हापूर येथे तिची एक शाखा असून जाबदार क्र.2 हे या शाखेचे मुख्य व्यवस्थापक आहेत. सदर जाबदार हे ग्राहकाकडून हप्त्याने पैसे घेवून गृहनिर्माण करुन ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचे काम करतात व जाबदार यांनी केलेल्या जाहीरातीस अनुसरुन तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे संपर्क साधला असता जाबदार क्र.2 यांनी त्यांना घरांची माहिती देवून पैसे गुंतवणेस भाग पाडले व त्यानुसारच तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.5,50,000/- अदा केले असून जाबदार यांनी तक्रारदार यांना कोल्हापूर जिल्हयामधील त्यांचे कोल्हापूर प्रोजेक्टमध्ये घर उपलब्ध करुन द्यावयाचे होते मात्र ठरलेली संपूर्ण रक्कम अदा करुनही घर देणेस टाळाटाळ करु लागलेने तक्रारदारास तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
जाबदार क्र.1 कंपनीची कोल्हापूर येथे शाखा असून जाबदार क्र.2 हे सदर शाखेचे व्यवस्थापक आहेत व जाबदार क्र.1 चे वतीने ते कोल्हापूर येथील संपूर्ण कामकाज पाहतात. जाबदार यांचे जाहिरातीस अनुसरुन तक्रारदारांनी जाबदारांशी संपर्क साधला असता जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांना घरांची माहिती दिली व त्या अंतर्गत पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तक्रारदारांनी तीन वर्षाचे मुदतीमध्ये रक्कम देण्याची होती व त्यानुसार जाबदार यांनी तक्रारदार यांना त्यांचे हौसिंग प्रोजेक्टमध्ये प्रथम हप्त्यापासून तीन वर्षाचे कालावधीमध्ये घर उपलब्ध करुन द्यावयाचे होते. त्यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदार यांचेकडे एकूण रक्कम रु.5,50,000/- अदा केली. ठरलेली संपूर्ण रक्कम अदा करुनही जाबदार हे तक्रारदारास घर देणेस टाळाटाळ करु लागले. तक्रारदार हे वयोवृध्द असून त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेली सर्व पुंजी जाबदार यांना दिलेली आहे. तक्रारदारांनी वारंवार मागणी केलेनंतर जाबदार क्र.2 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.5,50,000/- या रकमेचा चेक दिला. परंतु तो न वटता परत आला. अशा प्रकारे जाबदार क्र.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. याबाबत तक्रारदारांनी दि.11/7/16 रोजी जाबदार यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सबब, जाबदार कडून येणे असलेली गुंतवणूक रक्कम रु. 5,50,000/- मिळावी, सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्केप्रमाणे व्याज दि. 26/10/10 पासून मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत जाबदारांचे बिझनेस कार्ड, तक्रारदार यांचे बचत खात्याचे पासबुक, खातेउतारा, जाबदार क्र.2 यांनी दिलेला चेक व तो वटता परत आलेचा बँकेचा मेमो, तक्रारदारांनी जाबदारांना दिलेली नोटीस व त्याची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 यांना नोटीस लागू होवूनही जाबदार क्र.1 हे मंचात हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नसलेने त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेचे दिसून येते. जाबदार क्र.2 यांनी याकामी हजर होवून आपले म्हणणे दाखल केले. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदारांची तक्रार चुकीची असून ती या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. तक्रारदार हे जाबदारांना आर्थिक मदत करणारे नातेवाईक आहेत. तक्रारदार क्र.2 या जाबदार क्र.2 यांना मावस बहिणीप्रमाणे नात्याने असलेने प्रस्तुत जाबदार व तक्रारदार यांचे घरोब्याचे संबंध आहेत. जाबदारांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी तक्रारदाराकडून हातउसने रकमेची मागणी केली होती. सदरचे रकमेचे वसुलीकरीता तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व जाबदार क्र.1 यांचेमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. तरी देखील रक्कम वसुल करणेकरिता जाबदार क्र.1 कंपनीस सदर कामी विनाकारण पक्षकार केले आहे. जाबदार क्र.2 हे कोणतेही घर विक्री करणेचा व्यवसाय करीत नाहीत. तक्रारदारांनी जाबदारांना कोणत्याही घर मिळकतीचे खरेदीकरिता रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे नाते प्रस्थापित होत नाही. जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांना हातउसने रकमेपैकी बरीचशी रक्कम परत केली आहे. जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांना दि. 31/10/14 रोजीचा चेक दिला होता. सदरचे चेकची मुदत संपलेनंतर पुन्हा जाबदारांनी तक्रारदारास नव्याने चेक दिला. परंतु तक्रारदारांनी पहिला चेक वटणेस देवून तक्रारदाराचा विश्वासघात केल्याचे समजल्यानंतर जाबदारांनी दुस-या चेकचे पेमेंट थांबविण्याची सूचना बँकेला दिली. रक्कम रु.5,50,000/- पैकी जाबदार क्र.2 यांनी रक्कम रु.2,46,250/- तक्रारदार यांचे खातेवर पैसे भरुन परत केली आहे. याशिवाय जाबदार यांनी तक्रारदारांना वेळोवेळी रु.1,19,750/- रोख दिलेली आहे. त्याबाबतचा उतारा याकामी जोडलेला आहे. सबब, तक्रार रु.15 लाखांचे नुकसान भरपाईसह नामंजूर करावी अशी मागणी जाबदार क्र.2 यांनी केली आहे.
5. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे म्हणण्याचे पुष्ठयर्थ शपथपत्र, कागदयादीसोबत जाबदारांनी तक्रारदारास दिलेल्या रकमांचा तपशील व बँकेच्या चलनाच्या झेरॉक्सप्रती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच जाबदार क्र.2 यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय, अंशतः. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जासोबत काही कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये जाबदार यांचे बिझनेस कार्ड दाखल केले आहे व सदरचे कार्डवर वेलफेअर ग्रुप ऑफ कंपनीज, बिल्डींग्ज, इस्टेट्स, फार्मस, रिसॉर्टस्, हॉटेल्स, हॉलिडेज, पब्लीकेशन्स, क्रिएशन्स, एज्युकेशनल इन्स्टिटयुशन्स अशी नोंद असलेचे दिसून येते. तसेच Harvest today for a golden future, coin by coin marks व Fortune, welfare for your welfare असेही नमूद आहे. सबब, हाही एक जाहिरातीचाच भाग असलेची बाब मंचाचे निदर्शनास येते. तसेच त्यावर ब्रँच मॅनेजर अनंतकुमार चरणकर यांचेही नांव नमूद आहे व यावर विसंबूनच तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे सदरचा व्यवहार केलेची बाब मंचास नाकारता येत नाही व तसे तक्रारदार क्र.1 व 2 यांनी अनुक्रमे बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्रचे सेव्हिंग्ज खात्याचे स्टेटमेंटही तक्रारदाराने दाखल केले आहे. त्यावरुन सदर कंपनीचे ब्रँच मॅनेजर अनंतकुमार चरणकर यांचे नावे झालेली बँक व्यवहाराची माहिती स्वयंस्पष्टच आहे. जाबदार यांनी आपले म्हणण्यात कथन केलेप्रमाणे तक्रारदार यांचेशी हातउसने व्यवहार झाला असलेचा पुरावाही मंचासमोर दाखल नाही. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये व्यवहार झाला असलेने तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली जाबदार यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4 एकत्रित
8. तक्रारदाराने जाबदार क्र.1 कंपनीचे ब्रँच मॅनेजर अनंतकुमार चरणकर यांस दि. 20/10/2010 रोजी रक्कम रु. 50,000/- तसेच दि. 9/9/2011 व दि. 11/10/2011 रोजी अनुक्रमे रक्कम रु.50,000/- व रक्कम रु.1,00,000/- दिलेची बाब बँक ऑफ इंडियाचे खातेउता-यावरुन दिसून येते. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे खातेवरुन म्हणजेच तक्रारदार क्र.2 यांचे खातेवरुन दि. 6/3/2012 रोजी रक्कम रु.1,00,000/-, दि. 29/9/12 रोजी रक्कम रु.12,000/- व दि. 20/12/2012 रोजी रक्कम रु.20,000/- असे एकूण रु. 5,50,000/- दिलेची बाब या मंचाचे निदर्शनास येते. तसेच जाबदार क्र.2 यांनी दि. 31/10/14 रोजीचा रु.5,50,000/- चा तक्रारदार क्र.1 यांचे नावचा चेकही दिलेचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. जर सदरचा तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये अर्जात नमूद घरखरेदीचा व्यवहार ठरला नसता तर जाबदार यांनी निश्चितच तक्रारदार कथन करतात, तितक्याच रकमेचा चेक दिला नसता. जी रक्कम तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केली आहे व तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांवरुनही वर नमूद बँकेचे जाबदार यांचेशी झालेला पैसे देणेचा व्यवहार (Bank transaction) यावरुनही ही बाब स्पष्ट होते व सदरचा गुंतवणूकीच्या रकमा चेकनेच स्वीकारल्या असल्याने वेगळया पावत्या देण्याची आवश्यकता नाही व प्रोजेक्ट सुरु होताना रजिस्टर्ड अॅग्रीमेंट करुन दिले जाईल अशी जाबदार यांनी खात्री दिलेनेच सदरचे व्यवहार तक्रारदार यांनी जाबदार यांचेशी केलेची बाबही तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जात नमूद केली आहे. सबब, रजि. अॅग्रीमेंट नाही, याचा गैरफायदा घेवून जाबदार यांनी तक्रारदाराचा सदरचे घराचे संदर्भात गुंतवणूक केलेचा व्यवहार झाले नसलेचा घेतलेला बचाव हे मंच फेटाळून लावत आहे व तक्रारदार यांनी सदरचे पैशाची वारंवार मागणी करुनही जाबदार यांनी ती न देता उडवाउडवीची उत्तरे देणे ही बाब निश्चितच जाबदार यांचे सेवेतील त्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, सदरचे पैसे देणेची सर्वस्वी जबाबदारी जाबदार यांचीच आहे. तक्रारदाराने सदरचे जाबदार यांचेशी केलेला व्यवहार हा मंचाचेच अधिकारक्षेत्रात आहे. सबब, जाबदार यांनी घेतलेला अधिकारक्षेत्र नसलेचा मुद्दा हे मंच फेटाळून लावत आहे.
9. जाबदार यांनी याकामी परिशिष्ट क मध्ये तक्रारदार यांचे नांवे पैसे भरलेच्या पावत्या दाखल केल्या आहेत. ते नक्की जाबदार यांनीच भरलेले पैसे आहेत का तसेच तक्रारअर्जात नमूद व्यवहारासाठीच भरले आहेत का ही बाब मंचासमोर स्पष्ट होत नाही. सबब, तक्रारदाराने पुराव्यानिशी दाखल केलेली रक्कम रु. 5,50,000/- ही रक्कम जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना देणेचे आदेश जाबदार क्र.1 व 2 यांना करणेत यतात. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार यांनी केलेली व्याजाची मागणी या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने सदरची रक्कम द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत देणेचे आदेश जाबदार यांना करणेत येतात. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु. 3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांनी त्यांना दिलेली रक्कम रु.5,50,000/- तक्रारदारास परत करणेचे आदेश करणेत येतात.
3. सदरचे तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करणेचे आदेश जाबदार क्र.1 व 2 यांना करणेत येतात.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी देणेचे आदेश करणेत येतात.
5. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
6. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार क्र.1 व 2 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
8. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.