न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. यांची we4You या नावाने कडकनाथ काळे चिकन खरेदी विक्री या नावाची कंपनी असून कंपनीचा नोंदणी क्र. 101546231803 असा आहे. तक्रारदार हे कुक्कुटपालनचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी वि.प. कडून दि. 21/5/2018 रोजी पावती क्र.007 ने रक्कम रु.35,000/- इतक्या किंमतीचे 70/- प्रतिपक्षी प्रमाणे 500 पक्षी खरेदी केले आहेत. तक्रारदार यांनी वि.प. कडून खरेदी केलेल्या पक्षांची प्लॅनप्रमाणे देखभाल योग्य व चांगल्या प्रकारे होत असलेची खात्री केली व प्रतिपक्षी रक्कम रु. 300/- प्रमाणे खरेदी करणेसाठी रितसर स्टँपवर तक्रारदार व वि.प. यांचेदरम्यान दि. 22/6/2018 रोजी नियम व अटी ठरलेल्या आहेत. ता. 22/6/2018 रोजीचे स्टँपवरील ठरलेले अटी व नियमाप्रमाणे तयार झालेले पक्षी प्रत्येकी रु.300/- या दराने ऑक्टोबर 2018 मध्ये वि.प. यांनी खरेदी केले व तक्रारदार यांना पक्षी खरेदी मोबदला म्हणून 50 टक्के रक्कम रु. 54,625/- चेकने अदा करणेचे अभिवचन वि.प. यांनी तक्रारदार यांना दिले. त्यानुसार दि. 22/10/2018 रोजी वि.प.क्र.1 यांनी स्वतःचे अॅक्सीस बँक लि. कोल्हापूर येथील खाते क्र. 912010004310247 वरील चेक क्र. 094913 तक्रारदार यांना दिला व चेक नक्की वटेल अशी खात्री वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना दिली आहे. तक्रारदार यांनी सदरचा चेक आपले खातेवर वसुलीसाठी जमा केला असता सदरचे चेकवरील वि.प.क्र.1 चे सहीमध्ये फरक असल्याने ड्रॉवर्स सिग्नीचर डिफर्स या शिर्षकाखाली चेक डिसऑनर होवून परत आला. याबाबतची कल्पना तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांना दिली असता त्यांनी डिसेंबर महिन्याच्या तिस-या आठवडयात चेक भरणेस सांगितले. म्हणून तक्रारदाराने सदरचा चेक पुन्हा दि. 15/12/2018 रोजी आपले खातेवर वसुलीसाठी जमा केला असता सदरचा चेक ड्रॉवर्स सिग्नीचर डिफर्स या शिर्षकाखाली परत आला. अशा प्रकारे न वटणारा चेक देवून वि.प.क्र.1 ने तक्रारदाराची फसवणूक केली आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमधील करारपत्राप्रमाणे नोव्हेंबर 2018 मध्ये वि.प. यांनी तयार झालेले पक्षी प्रत्येक रक्कम रु. 300/- या दराने तक्रारदाराकडून खरेदी केले व तक्रारार यांना पक्षी खरेदी मोबदला म्हणून 50 टक्के रक्कम रु. 54,625/- चेकने अदा करणेचे अभिवचन वि.प. यांनी तक्रारदारांना दिले व त्यानुसार त्यांनी वीरशैव को-ऑप. बँकेचा चेक क्र. 025638 दि. 5/11/18 तक्रारदार यांना दिला. सदरचा चेक तक्रारदार यांनी आपल्या खात्यावर भरला असता वि.प. च्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसलेने तो न वटता परत आला आहे. याबाबतची कल्पना तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांना दिली असता त्यांनी डिसेंबर महिन्याच्या तिस-या आठवडयात चेक भरणेस सांगितले. म्हणून तक्रारदाराने सदरचा चेक पुन्हा दि. 15/12/2018 रोजी आपले खातेवर वसुलीसाठी जमा केला असता सदरचा चेक वि.प.च्या खात्यात शिल्लक रक्कम नाही या शिर्षकाखाली परत आला. अशा प्रकारे न वटणारा चेक देवून वि.प.क्र.1 ने तक्रारदाराची फसवणूक केली आहे. म्हणून तक्रारदारांनी दि. 10/1/19 रोजी वि.प. यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली असता वि.प.क्र.1 यांनी नोटीस स्वीकारली. परंतु सदर नोटीसला त्यांनी उत्तरही दिलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून चेक क्र. 094913 दि. 22/10/2018 चे चेकची रक्कम रु.54,625/-, चेक क्र. 025638 दि. 5/11/2018 चे चेकची रक्कम रु. 54,625/- परत मिळावी, प्रवासखर्चापोटी रु. 5,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/-, नोटीसखर्च रु. 3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 12 कडे अनुक्रमे दि. 22/6/18 चे स्टँपवरील अटी, पावती क्र. 007, चेक क्र. 094913 व मेमो, चेक क्र. 025638 व मेमो, तक्रारदारांनी वि.प यांना दिलेली नोटीस, नोटीसची पोहोच पावती व परत आलेला लिफाफा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र, साक्षीदार श्री दिलीप बजरंग देवणे यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांनी स्वहस्ताक्षरात दि. 27/9/21 रोजी लिहून दिलेल्या स्टँपपेपरची प्रत दाखल केली आहे.
4. वि.प. क्र.1 ते 4 हे याकामी वकीलामार्फत हजर झाले. परंतु त्यांनी विहीत मुदतीत आपले म्हणणे/कैफियत दाखल केली नाही. सबब, त्यांचे विरुध्द म्हणणे नाही (No Say) असा आदेश करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून चेकची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. कडून दि. 21/5/2018 रोजी पावती क्र.007 ने रक्कम रु.35,000/- इतक्या किंमतीचे 70/- प्रतिपक्षी प्रमाणे 500 पक्षी खरेदी केले आहेत. तक्रारदार यांनी वि.प. कडून खरेदी केलेल्या पक्षांची प्लॅनप्रमाणे देखभाल योग्य व चांगल्या प्रकारे होत असलेची खात्री केली व प्रतिपक्षी रक्कम रु. 300/- प्रमाणे खरेदी करणेसाठी रितसर स्टँपवर तक्रारदार व वि.प. यांचेदरम्यान दि. 22/6/2018 रोजी नियम व अटी ठरलेल्या आहेत. सदर करारपत्राची प्रत तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहे. वि.प.क्र.1 ते 4 यांनी तक्रारदाराचे सदरचे कथन तसेच करारपत्र याकामी म्हणणे दाखल करुन नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात, ता. 22/6/2018 रोजीचे स्टँपवरील तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ठरलेले अटी व नियमाप्रमाणे तयार झालेले पक्षी प्रत्येकी रु.300/- या दराने ऑक्टोबर 2018 मध्ये वि.प. यांनी खरेदी केले व तक्रारदार यांना पक्षी खरेदी मोबदला म्हणून 50 टक्के रक्कम रु. 54,625/- चेकने अदा करणेचे अभिवचन वि.प. यांनी तक्रारदार यांना दिले. त्यानुसार दि. 22/10/2018 रोजी वि.प.क्र.1 यांनी स्वतःचे अॅक्सीस बँक लि. कोल्हापूर येथील खाते क्र. 912010004310247 वरील चेक क्र. 094913 तक्रारदार यांना दिला, तक्रारदार यांनी सदरचा चेक आपले खातेवर वसुलीसाठी जमा केला असता सदरचे चेकवरील वि.प.क्र.1 चे सहीमध्ये फरक असल्याने ड्रॉवर्स सिग्नीचर डिफर्स या शिर्षकाखाली चेक डिसऑनर होवून परत आला. तदनंतर तक्रारदार व वि.प. यांचेमधील करारपत्राप्रमाणे नोव्हेंबर 2018 मध्ये वि.प. यांनी तयार झालेले पक्षी प्रत्येक रक्कम रु. 300/- या दराने तक्रारदाराकडून खरेदी केले व तक्रारदार यांना पक्षी खरेदी मोबदला म्हणून 50 टक्के रक्कम रु. 54,625/- चेकने अदा करणेचे अभिवचन वि.प. यांनी तक्रारदारांना दिले व त्यानुसार त्यांनी वीरशैव को-ऑप. बँकेचा चेक क्र. 025638 दि. 5/11/18 तक्रारदार यांना दिला. सदरचा चेक तक्रारदार यांनी आपल्या खात्यावर भरला असता वि.प. च्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसलेने तो न वटता परत आला आहे. अशा प्रकारे न वटणारे दोन चेक देवून वि.प.क्र.1 ने तक्रारदाराची फसवणूक केली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने दि. 22/6/18 चे स्टँपवरील अटी, पावती क्र. 007, चेक क्र. 094913 व मेमो, चेक क्र. 025638 व मेमो, तक्रारदारांनी वि.प यांना दिलेली नोटीस, नोटीसची पोहोच पावती व परत आलेला लिफाफा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व साक्षीदार श्री दिलीप बजरंग देवणे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांनी स्वहस्ताक्षरात दि. 27/9/21 रोजी लिहून दिलेल्या स्टँपपेपरची प्रत दाखल केली आहे. सदरच्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना करारात ठरलेप्रमाणे पक्षी खरेदी करुन रक्कम प्रत्येकी रक्कम रु. 54,625/- चे दोन चेक दिले. परंतु सदरचे चेक वटलेचे दिसून येत नाही. सबब, तक्रारदारास सदरची रक्कम मिळालेली नाही ही बाब दाखल कागदपत्रांवरुन शाबीत होते. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी म्हणणे व पुरावा दाखल करुन नाकारलेली नाहीत. वि.प.क्र.1 ते 4 हे याकामी वकीलामार्फत हजर होवूनही त्यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केलेले नाही. म्हणून, वि.प.क्र.1 ते 4 यांचेविरुध्द नि.1 वर नो से आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना पक्षी खरेदीपोटीची रक्कम अदा न करुन सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. तक्रारदार यांनी याकामी दोन चेकचे रकमेपोटी रक्कम रु.1,09,250/- ची मागणी केली आहे. परंतु तक्रारदारांनी दाखल केलेल्या वि.प.क्र.1 चे हस्ताक्षरातील दि.27/9/2021 चे स्टँपपेपरचे अवलोकन करता वि.प.क्र.1 यांनी रक्कम रु.20,000/- तक्रारदार यांना अदा केली आहे व उर्वरीत रक्कम रु.89,250/- ही वि.प. हे अद्यापही तक्रारदारांना देय लागत आहेत ही बाब दिसून येते. सबब, तक्रारदार हे सदरची रक्कम रु.89,250/- वि.प. क्र.1 ते 4 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.क्र.1 ते 4 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु. 89,250/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प.क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 ते 4 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.