न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोटतुकडी व तहसिल करवीर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ई वॉर्ड, बागल चौक येथील सि.स.नं. 1063 क्षेत्र 1248.81 चौ.मी. यापैकी दक्षिण बाजूकडील क्षेत्र 51.66 चौ.मी. (556.00 चौ.फूट) ही मिळकत ही या तक्रारअर्जाचा विषय आहे. सदर मिळकतीच्या बदलीपोटी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या फ्लॅट मिळकतीचे वर्णन सदर मिळकतीतील नियोजित वक्रतुंड रेसिडेन्सीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र. एफ-1 क्षेत्र 400 चौ.फूट बिल्टअप असे आहे. सदर फ्लॅट मिळकत तक्रारदार यांना वि.प. यांनी सदर मिळकतीचे बदल्यात देण्याचे व सदर फ्लॅटचे स्पेसिफिकेशन जोडून त्याबाबत वि.प. व तक्रारदार यांचे दरम्यान संचकारपत्र दि. 18/05/2008 रोजी झाले. तसेच अदलाबदल डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट दि. 22/07/2008 रोजी होवून सदर दस्त नोंदण्यात आलेला आहे. सदर मिळकतीमध्ये नियोजित वक्रतुंड रेसिडेन्सीमधील वर नमूद फ्लॅट मिळकत ही या तक्रारअर्जाचा विषय आहे. सदर फ्लॅट मिळकत ही अपार्टमेंटच्या मंजूरी नकाशानंतर 18 महिन्यांच्या मुदतीमध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्रासह देणेचे ठरले होते. सदर फ्लॅटचा ताबा मुदतीत न दिलेस विलंबाच्या कालावधीकरिता दरमहा रु. 5,000/- प्रमाणे वि.प. यांनी तक्रारदाराला देणेचे आहे. वि.प. यांना बांधकाम परवाना दि. 1/4/2009 रोजी मिळालेला आहे. त्या दिनांकापासून 18 महिनेचे आत वि.प यांनी तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा देणे आवश्यक असताना वि.प. यांनी तक्रारदारांना अद्याप ताबा दिलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 25/6/2011 रोजी नोटीस पाठविली. तदनंतर नोव्हेंबर 2011 मध्ये वि.प. यांनी तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना मोबदल्यापोटी 400.00 चौ.फूट इतक्या क्षेत्राचा फ्लॅट देणेचे मान्य केले होते. परंतु प्रत्यक्षात वि.प. यांनी तक्रारदार यांना 315.70 चौ.फूट इतक्या क्षेत्राचा फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदारांना 84.30 चौ.फू. इतके कमी क्षेत्र दिले आहे. त्याची बाजारभावाने होणारी किंमत रु.4,21,500/- आहे. तसेच वि.प. यांनी सदर इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही तसेच डीड ऑफ डिक्लेरेशनही नोंदविलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून फ्लॅटचे कमी पडणा-या क्षेत्राची बाजारभावाने होणारी किंमत रक्कम रु.4,21,500/- मिळावी, तसेच वादमिळकतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेवून, डीड ऑफ डिक्लेरेशन नोंदवून सदर फ्लॅट मिळकतीचे डीड ऑफ अपार्टमेंट तक्रारदार यांना करुन द्यावे, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- वि.प. कडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विकसन करारपत्र, वटमुखत्यारपत्र, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांनी नोटीस न स्वीकारलेचा परत आलेला लखोटा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून नोंद खरेदीपत्र करुन मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोटतुकडी व तहसिल करवीर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ई वॉर्ड, बागल चौक येथील सि.स.नं. 1063 क्षेत्र 1248.81 चौ.मी. यापैकी दक्षिण बाजूकडील क्षेत्र 51.66 चौ.मी. (556.00 चौ.फूट) या मिळकतीवर बांधण्यात येणा-या नियोजित वक्रतुंड रेसिडेन्सीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र.एफ-1 क्षेत्र 400 चौ.फूट बिल्टअप ही फ्लॅट मिळकत तक्रारदार यांना वि.प. यांनी मूळ जागा मिळकतीचे बदल्यात देण्याबाबत वि.प. व तक्रारदार यांचे दरम्यान संचकारपत्र दि.18/05/2008 रोजी झाले. तसेच अदलाबदल डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट दि. 22/07/2008 रोजी होवून सदर दस्त नोंदण्यात आलेला आहे. सदर विकसन करारपत्राची प्रत याकामी तक्रारदार यांनी दाखल केली आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी आपले तक्रारअर्जात, वि.प. यांना बांधकाम परवाना दि. 1/4/2009 रोजी मिळालेला आहे. त्या दिनांकापासून 18 महिनेचे आत वि.प यांनी तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा देणे आवश्यक असताना वि.प. यांनी तक्रारदारांना ताबा दिलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 25/6/2011 रोजी नोटीस पाठविली. तदनंतर नोव्हेंबर 2011 मध्ये वि.प. यांनी तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना मोबदल्यापोटी 400.00 चौ.फूट इतक्या क्षेत्राचा फ्लॅट देणेचे मान्य केले होते. परंतु प्रत्यक्षात वि.प. यांनी तक्रारदार यांना 315.70 चौ.फूट इतक्या क्षेत्राचा फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदारांना 84.30 चौ.फू. इतके कमी क्षेत्र दिले आहे. त्याची बाजारभावाने होणारी किंमत रु.4,21,500/- आहे. तसेच वि.प. यांनी सदर इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही तसेच डीड ऑफ डिक्लेरेशनही नोंदविलेले नाही असे कथन केले आहे. तक्रारदार यांनी याकामी वि.प. यांना पाठविलेली दि.29/5/18 रोजीची नोटीस दाखल केली आहे. सदरची नोटीस वि.प. यांनी न स्वीकारलेने परत आलेला लखोटाही तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प.क्र.1 व 2 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते.
8. सदरकामी वाद मिळकतीची पाहणी करण्यासाठी कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करण्यात आली होती. सदर कोर्ट कमिशन अहवालाचे अवलोकन करता तक्रारदारांना देण्यात आलेल्या फ्लॅटचे एकूण बांधीव क्षेत्रफळ हे 327.99 चौ.फूट इतके असलेचे नमूद केले आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेल्या करारानुसार वि.प. यांनी तक्रारदार यांना 400 चौ.फू. इतक्या क्षेत्राचा फ्लॅट देणेचे ठरले होते. सदरची बाब विचारात घेता वि.प. यांनी तक्रारदारांना 72.01 चौ.फूट इतक्या कमी क्षेत्राचा फ्लॅट दिला आहे. तसेच वि.प. यांनी वादातील इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेवून व डीड ऑफ डिक्लेरेशनची नोंद करुन फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट तक्रारदाराचे लाभात करुन दिलेले नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. सबब, तक्रारदार हे वाद मिळकतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेवून व डीड ऑफ डिक्लेरेशनची नोंद करुन वादातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट करुन मिळणेस पात्र आहेत. तसेच वि.प. यांनी तक्रारदारांना फ्लॅटचे ठरले क्षेत्रापैकी 72.01 चौ.फूट क्षेत्र कमी दिल्यामुळे सदर क्षेत्राची आजच्या बाजारभावाने होणारी किंमत परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्कम वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वाद मिळकतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेवून व डीड ऑफ डिक्लेरेशनची नोंद करुन वादातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट नोंद करुन द्यावे.
3) वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना फ्लॅटचे ठरले क्षेत्रापैकी 72.01 चौ.फूट क्षेत्र कमी दिल्यामुळे सदर क्षेत्राची आजच्या बाजारभावाने होणारी किंमत परत करावी.
4) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.