निकालपत्र
(पारीत दिनांक 02 सप्टेंबर, 2010)
व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
1. विरुध्दपक्ष यांचेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करुनही त्यांच्या तर्फे जास्त रक्कमेची वसुली नोटीस पाठविण्यात आल्यामुळे तक्रारकर्ता यांनी सदर ग्राहक तक्रार दाखल
केली असून मागणी केली आहे की, त्यांना रुपये 33,872/- ही विरुध्दपक्ष यांना जास्त देण्यात आलेली रक्कम 18% व्याजासह परत मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी विरुध्दपक्ष यांचेकडून रुपये 10,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- मिळावेत.
2. विरुध्दपक्ष त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम परत केली नाही व तक्रारकर्ता यांच्यावर अजुनही कर्ज बाकी आहे.
कारणे व निष्कर्ष
3. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व तक्रारकर्ता यांनी केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्दपक्ष यांचेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची एकूण रक्कम ही रुपये 22,855/- आहे तर विरुध्दपक्ष म्हणतात की, एकूण कर्ज हे रुपये 34,881/- सन 1996 ते 1998 या काळात घेतल्या गेले आहे.
4. तक्रारकर्ता यांनी लेखी युकतीवाद निशानी क्रमांक 15 मध्ये असे विधान केले आहे की, विरुध्दपक्ष यांनी लेखा हा बरोबर लिहिलेला नाही व त्यात जास्त कर्ज रक्कम दाखविण्यात आली आहे. तक्रारकर्ता यांचे नांवावर रुपये 2763/- या रक्क्मेची दिनांक 15/09/1997, रुपये 1351/- या रक्क्मेची दिनांक 22/09/1997 व रुपये 4995/- या रक्कमेची दिनांक 29/08/1998 रोजी नोंद दाखविण्यात आली आहे, मात्र तक्रारकर्ता यांनी या दिवशी विरुध्दपक्ष यांच्याकडून काहीही घेतलेले नाही. विरुध्दपक्ष यांच्या लेख्यामधिल नोंदी या खोटया व बनावटी आहे.
5. इंडियन फिटोचिम विरुध्द एस.के. बॅनर्जी या III (2004) सी.पी.जे. 227 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय उत्तरांचल राज्य आयोगाने असा निर्णय दिला आहे की, ग्राहक न्याय मंचाना फसवणूक व त्या व्दारे झालेले आर्थीक नुकसान याबाबत निर्णय देण्याचा अधिकार नाही कारण त्यामध्ये दिवाणी न्यायालयाव्दारा सखोल चौकशीची गरज असते.
6. तक्रारकर्ता हे रुपये 33,872/- ही रक्कम विरुध्दपक्ष यांना जास्त देण्यात आली आहे असे म्हणतात तर विरुध्दपक्ष म्हणतात की, दिनांक 15/09/2009 ला तक्रारकर्ता यांना पीक कर्ज म्हणून रुपये 19,200/- चे वाटप केले आहे.
7. सदर ग्राहक तक्रारीत तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेवर खोटया व बनावटी नोंदी लेख्यामध्ये केल्याचा आरोप केला आहे व त्यामुळे सदर प्रकरणात निर्णयाप्रत येण्यासाठी विस्तृत पुराव्याची गरज आहे जे की, ग्राहक मंचाच्या संक्षिप्त कार्यपध्दतीव्दारे शक्य नाही.
असे तथ्य व परीस्थिती असतांना खालिल आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे. मात्र त्यांना तसा सल्ला मिळाल्यास त्यांनी दिवाणी न्यायालयात अथवा योग्य त्या प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येत आहे.