निकालपत्र (दि.28.01.2016) द्वारा:- मा.अध्यक्ष – श्री.शरद डी.मडके.
1. वि.प. यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली.
2. प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प.यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प. तर्फे वकीलांचा तोंडी/लेखी अंतिम युक्तीवाद ऐकला. प्रस्तुतचे प्रकरणात गुणदोषावर खालीलप्रमाणे निकाल पारीत करणेत येतो.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
3. तक्रारदार हे कोल्हापूर शहराचे रहिवाशी आहेत. त्यांची विजया बँक शाखा, दुर्गा कॉम्प्लेक्स, राजाराम रोड, कोल्हापूर म्हणजेच वि.प.क्र.1 यांचे बँकेत बचत खाते आहे. सदर बचत खातेचा नं.501001011000360 असा असून त्यांचेकडून वि.प.क्र.1 यांचे ए.टी.एम.कार्ड क्र.4696445010000063 असा आहे. वि.प.नं.1 ही शेडयूल्ड बँक असून तक्रारदार हे सदर बँकेचे ग्राहक आहेत. वि.प.क्र.2 ही राष्ट्रीयकृत बँक असून तिचे ए.टी.एम.सेंटर पार्वती टॉकीजजवळ आहे. सदर ट्रेझरी शाखेमध्येही ए.टी.एम.सेंटर आहे. तक्रारदारांनी दि.02.01.2013 रोजी सकाळी 7.39 वाजणेचे दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया एच.पी.सी.एल.पेट्रोल पंप कोल्हापूर पार्वती टॉकीज या ए.टी.एम.सेंटरमधून रु.3,000/- काढले होते. तसेच दुसरे दिवशी म्हणजेच दि.03.01.2013 रोजी रु.2,000/- स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखा कोल्हापूर या ए.टी.एम.सेंटरमधून काढलेले आहेत. त्यावेळी तक्रारदारांना ए.टी.एम.ची स्लीप मिळालेनंतर त्यांचे खातेवरील रक्कम रु.10,000/- कमी झालेचे निदर्शनास आले. त्याचदिवशी म्हणजे दि.03.01.2013 रोजी तक्रारदारांनी विजया बँकेमध्ये जावून पासबुक भरुन घेतले नंतर पासबुक मध्येही रक्क्म रु.10,000/- कमी झालेचे दिसून आले. त्यानंतर तक्रारदारांनी बँकेतील कर्मचारी योगिता मॅडम व बँक मॅनेजर यांचेशी त्याबद्दल विचारण केली असता, शाखाधिकारी यांनी दसरा चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत चौकशीसाठी गेलेनंतर त्यांनी शाहूपूरी येथील ट्रेझरी शाखेत जाणेस सांगितले. ट्रेझरी शाखा येथे आवळे मॅडम यांना भेटून तक्रारदारांनी सविस्तर माहिती दिली. तसेच त्यानंतर वेळोवेळी तक्रारदारांनी वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे लेखी अर्ज देऊन चौकशी करुन देखील आजतागायत तक्रारदारांना रक्कम परत मिळालेली नाही. तक्रारदारांनी ग्राहक खाते रिपोर्ट मागविला असता, त्यामध्ये दि.02.01.2013 रोजी तक्रारदारांनी रक्कम रु.3,000/- काढलेबाबत नमुद आहे. तसेच त्याच तारखेस काही सेकंदात रक्कम रु.10,000/- वजा झालेचे तक्रारदारांना समजून आले. तथापि तक्रारदारांनी अशाप्रकारे रक्कम काढलेली नसताना देखील सदरची रक्कम तक्रारदारांचे खातेतून वजा झालेली आहे. त्यामुळे सदरची चूक ही वि.प.क्र.1 व 2 यांचे दरम्यान झालेली आहे. त्यामध्ये यातील तक्रारदारांचा कोणताही दोष नसताना त्यांना नाहक त्रास झालेला आहे. तसेच आजतागायत वेळोवेळी मागणी करुनदेखील वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांची रक्कम परत केलेली नाही अगर त्यांचे तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. अशाप्रकारे वि.प.क्र.2 बँकेचे ए.टी.एम.सेंटरमधून तक्रारदारांना रक्कम रु.10,000/- चे आर्थिक नुकसान झालेले आहे. सदरची बाब वि.प.क्र.1 व 2 यांचे वारंवार निदर्शनास आणून देखील त्यावर कोणतीही कारवाई न करुन तक्रारदार यांचेवरील अन्याय दूर केलेला नाही. तसेच तक्रारदारांना त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारदारांनी सदरची तक्रार मंचात दाखल केली. वि.प.यांचेकडून तक्रारदारांची वि.प.बँकेचे ए.टी.एम.मधून कमी झालेली रक्कम रु.10,000/- व तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु.40,000/- व सदर अर्जाची वकील फी, टायपिंग, झेरॉक्स, कोर्ट खर्च, इत्यादी रक्कम रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.55,000/- व सदर रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत द.सा.द.शे.18टक्के प्रमाणे व्याजाची आकारणी होऊन त्याप्रमाणे रक्कम वसुल होऊन मिळावी अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली असून ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. दि.29.01.2013 रोजी वि.प.क्र.1 बँकेचे ए.टी.एम.कार्ड तक्रार विभागाने बँकेस तक्रारीबाबत कळविलेले ई-मेल, दि.04.01.2013 रोजी तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे दिलेला तक्रार अर्ज, दि.26.02.2013 रोजी तक्रारदारांनी वि.प.क्र.2 यांचेकडे दिलेला तक्रार अर्ज, दि.12.01.2013 रोजी दै.सकाळ वृत्तपत्र तसेच दि.06.05.2014 रोजीचे तक्रारदारांचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. वि.प.क्र.1 विजया बँक यांनी आपले लेखी म्हणणे दि.25.6.2013 रोजी दाखल करुन सदर तक्रार अर्ज कायदयाने चालू शकत नाही असे म्हटले. प्रस्तुत तक्रार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम.संबंधी असल्याने वि.प.क्र.1 यांचा कसलाही संबंध येत नाही. वि.प.यांनी सेवेमध्ये कोणतेही त्रुटी केली नाही. वि.प.क्र.1 यांना तक्रार अर्ज आल्याबरोबर ग्राहक निवारण केंद्रात पाठवली व तक्रारदार यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
6. वि.प.क्र.2 स्टेट बॅंकेतर्फे दि.02.12.2013 रोजी म्हणणे दाखल केले. वि.प. यांच्या म्हणणेच्या संक्षिप्त सारांश खालीलप्रमाणे आहे. तक्रार अर्ज खोटा, अयोग्य व बँकेस लुबाडण्याच्या व लबाडीच्या उद्देशाने दाखल केला आहे. ए.टी.एम.चे तंत्रज्ञान अतयंत अद्ययावत असून कोणत्याही ति-हाईत इसमांस अन्य व्यक्तीच्या खात्यावरील रक्कम ए.टी.एम. कार्ड ताब्यात असल्याशिवाय व पिन नं.माहीत असल्याशिवाय व्यवहार करता येणे अशक्य आहे. दर 24 तासांनंतर ए.टी.एम.मशीनमध्ये भरलेली रक्कम व व्यवहाराचा हिशोब नियमीत घेतला जातो.
7. तक्रारदारांनी एका मशीनमधून दि.01.02.2013 रोजी सकाळी 7.39 मिनीटांनी रक्कम रु.3,000/- काढले. त्याच सेंटरमधील दुस-या मशीनमधून 7वा.41 मिनीटांनी रक्कम रु.10,000/- काढले. सदर दोन्हीं व्यवहाराचा सफल व्यवहार असा संगणकीय प्रणालीमध्ये आपोआप साठविणेत आला आहे.
8. प्रस्तुत प्रकरणी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | वि.प.क्र.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | नाही |
2 | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
9. दोन्हीं बाजूंचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांनी दाखल केलेले कागदपत्रे व वि.प.यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सूक्ष्म अवलोकन केले. वि.प.क्र.2 यांनी दि.02.12.2013 रोजी दाखल केलेल्या वि.प.क्र.2 च्या ए.टी.एम.मशीनच्या दि.01.02.2013 रोजीची संगणकीय प्रत रिस्पॉन्स कोडची यादी पाहता असे दिसून येते की, तक्रारदारांच्या ए.टी.एम.कार्डच्या आधारे दि.01.02.2013 रोजी सात वाजून अडतीस मिनीटांनी रक्कम रु.500/- व लगेच त्याच ए.टी.एम.केंद्रावरुन सात वाजून एकेचाळीस मिनीटांनी रक्कम रु.10,000/- काढले. दोन्हीं रक्कमा काढल्याचे दिसून येते. वि.प.यांचे अॅड.एन.एम.शिराळकर, युक्तीवाद केला की, ग्राहकास ए.टी.एम.मशीन मार्फत त्याने ए.टी.एम.कार्ड मशिनमध्ये व्यवस्थित स्वॅप केलेनंतरच व्यवहार करणेची संधी मिळते. सदर ए.टी.एम.मधून दि.01.02.2013 रोजी दोनवेळा एकाच ए.टी.एम.सेंटरमधून दोन वेगवेगळया मशिनमधून पैसे काढल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते.
10. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जात सदर घटना झाली त्यावेळचे C.C.T.V.(सी.सी.टी.व्ही.) फुटेज तपासणीचा अर्ज दिला नाही व त्यावेळी दुस-या कोणत्या व्यक्तीने लबाडीने पैसे काढले असा संयुक्तिक पुरावा दाखल केला नाही. तथापि वि.प.यांनी आपल्या युक्तीवाद सादर करताना म्हटले आहे की, तक्रारदार यांचे तक्रारीवरुन बँकेच्या अधिका-यांनी संबंधीत वेळेचे सी.सी.टी.व्ही.चित्रण तक्रारदाराच्या समक्ष तपासून पाहिलेले आहे व त्या चित्रणामध्ये संबंधीत तारखेस व वेळेस तक्रारदार हे दोन्हीं मशीनचा वापर करीत असल्याचे दिसून आलेले आहे. मंचाचे मते, ए.टी.एम.कार्ड हे तक्रारदाराच्याजवळ असते आणि व्यवहार कार्डाशिवाय होऊ शकत नसल्याने सदर बाब तक्रारदारांनी पुराव्यात नाकारली नाही. अॅड.शिराळकर यांनी आपल्या युक्तीवादामध्ये वि.प.बँकेने कोणतीही चुक केली नसल्याचे म्हटले आहे. ते स्पष्टीकरण मंचाचे मते संयुक्तिक आहे.
11. मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चासंबंधी कोणतेही आदेश नाहीत.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य देण्यात याव्यात.