निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाले क्र.1 –विजय सेल्स हे इलेक्ट्रॉनिक व इतर घरगुती वस्तुंचे किरकोळ विक्रेते आहेत. तक्रारदाराने दि.15.07.2009 रोजी सामनेवाले यांचे लॅपटॉप मॉडेल क्र.PP41L-INPUT 19-5V-3.3/4.62 हे रु.37,990/- ला सामनेवाले क्र.1 यांचेकडून विकत घेतले. त्या लॅपटॉपचा हमी कालावधी एक वर्षाचा होता. तक्रारदाराचे म्हणणे की, एप्रिल, 2010 मध्ये त्या लॅपटॉपमध्ये इंटरनेटची समस्यां सुरु झाली. इंटरनेट सुरु होत नव्हता, म्हणून त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचेशी संपर्क साधला. त्यांनी त्यांना सामनेवाले क्र.2 शी संपर्क करण्यास सांगितले. परंतु त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाची परिक्षा असल्यामुळे ते लॅपटॉपमधील समस्यांकडे लक्ष देऊ शकले नाही. त्यांच्या मुलाची परिक्षा संपल्यानंतर जवळपास जून, 2010 मध्ये त्यांचा मुलगा सामनेवाले क्र.2 च्या कार्यालयात गेला व लॅपटॉपमधील खालील समस्यांबद्दल त्यांना सांगितले. A Internet Connectivity problem; B Non-working of blue-tooth; C Non-working of Wi-Fi software; D Disturbance with LCD Monitor; E Coloured horizontal lines moving in upward directions on screen thereby making typing difficult. 2 सामनेवाले क्र.2 चे मॅनेजर यांनी लॅपटॉपची पाहणी केली व सांगितले की, लॅपटॉपचा “LAN-PORT”, Physically Damage झाला आहे, त्यामुळे इंटरनेटची समस्यां झाली आहे. ती समस्यां “Repairs under Warranty” यात येत नाही असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले सदरची समस्या लॅपटॉपचा मदरबोर्ड बदलल्यानंतरच दूर होईल व त्यासाठी रु.17,000/- खर्च येईल परंतु विनंती करुनही त्यांनी तसे लेखी दिले नाही. तक्रारदाराच्या मुलाने वारंवार विनंती केल्यामुळे सामनेवाले क्र.2 चे प्रतिनिधी लॅपटॉपच्या इतर समस्यां दूर करण्यास तयार झाले. म्हणून तक्रारदाराच्या मुलाने तो लॅपटॉप त्यांचेकडे दिला. सामनेवाले क्र.2 यांनी इंटरनेटची समस्यां सोडून लॅपटॉपच्या इतर समस्यां दूर केल्या. 3 तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांनी सामनेवाले क्र.2 यांना “फिजीकल डॅमेज” म्हणजे काय व त्याची कारणं कोणती याबद्दल स्पष्टीकरण विचारले. परंतु सामनेवाले क्र.2 यांनी त्याबद्दल काहीही सांगितले नाही. तक्रारदाराचे म्हणणे की, लॅपटॉप हा नामांकित कंपनीचा असल्यामुळे एक वर्षाच्या आत वरील समस्यां उदभवण्याचे कारण नव्हते. ते उदभवले याचाच अर्थ की, लॅपटॉपची पूर्ण Assembly सदोष होती. 4 तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांच्या लॅपटॉपमधील इंटरनेट सुरु होत नव्हते म्हणून त्यांना वायरलेस इंटरनेट सुविधेवर खर्च करावा लागला. त्यांना बरीच असुविधा झाली व मानसिक त्रास झाला, त्यांनी दि.16.07.2010 रोजी सामनेवाले क्र.1 यांना नोटीस पाठवून लॅपटॉप बदलून देण्यास सांगितले. तसेच पुन्हा दि.06.09.2010 रोजीही पत्र पाठविले. परंतु सामनेवाले यांनी लॅपटॉप बदलून दिला नाही, ही त्यांची सेवेत न्युनता आहे म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची खालीलप्रमाणे मागणी आहे. अ सामनेवाले यांनी लॅपटॉपची किंमत रु.37,990/- व्याजासहीत परत करावी व या तक्रारीचा खर्च रु.10,000/- द्यावा. 5 सामनेवाले क्र.1 यांनी कैफियत दाखल करुन तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, ग्राहकाने एखादा निर्मिती दोष त्यांच्या नजरेस आणून दिला तर ते ती वस्तु तो दोष दूर करण्यासाठी निर्मात्याकडे पाठवितात. त्याचं कामं फक्त त्यांच्या शोरुममध्ये पाठविलेल्या वस्तुंची विक्री करणे व त्यांचे Installation करुन देणे. तक्रारदाराचा लॅपटॉप हा हमी कालावधीत होता. व तक्रारदाराला त्याची जाणीव होती. 6 सामनेवाले क्र.2 व 3 यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, त्यांनी तक्रारदाराला एक वेळ सेवा देण्याची व आवश्यक भाग बदलून देण्याची तयारी दाखविली होती परंतु तक्रारदाराने ती घेण्याचे नाकारले. तक्रारदाराने ज्यावेळी सामनेवाले क्र.2 यांचेशी संपर्क साधला, त्यावेळी लॅपटॉप घेऊन अकरा महिन्यांच्यावर कालावधी लोटला होता. त्यांनी लॅपटॉप घेऊन जाऊन लॅपटॉपचे LCD display, Bluetooth and Wi-Fi Software हे प्रॉब्लेम दूर केले होते. 7 त्यांनी तक्रारदाराला सांगितले होते की, लॅपटॉपचा Lan-Port, Physically Damage झाला आहे. तो निर्मिती दोष नाही. त्यांच्या लॅपटॉपला Complete Care किंवा Accidental Damage Protection नाही, त्यामुळे Accidental Damages हमीमध्ये बसत नाही. तक्रारदाराला Complete Care Warranty घेण्याचे सुचविले होते, ज्यामध्ये मदरबोर्ड बदलवून देता येतो. परंतु तक्रारदाराने ती हमी घेतली नाही. म्हणून लॅपटॉपचा मदरबोर्ड बदलून दिला नाही व इंटरनेटची समस्यां दूर करता आली नाही. लॅपटॉपचा लॅनपोर्ट अचानक खराब होऊ शकतो. म्हणून तक्रारदाराला लॅपटॉप काळजीपूर्वक हाताळायला सांगितला होता व Complete Care Warranty देऊ केली होती. तक्रारदाराचा लॅपटॉप एप्रिल, 2010 पर्यंत चांगला चालत होता. लॅनपोर्ट काही अचानक घटनेमुळे खराब झाल्यामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम सुरु झाला व त्यासाठी मदरबोर्ड बदलणे आवश्यक आहे परंतु हमीमध्ये ते बसत नाही म्हणून त्यांनी नकार दिला, त्यांची सेवेत न्युनता नाही. सदरची तक्रार रद्द करण्यात यावी. 8 आम्हीं तक्रारदार यांचा, सामनेवाले क्र.1 चे प्रतिनिधी-श्री.कमलेश भारवानी व सामनेवाले क्र.2 व 3 चे वकील-श्री.राजाराम देशमुख यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 9 तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 कडून दि.15.07.2009 रोजी डेल लॅपटॉप मॉडेल क्र.PP41L-INPUT 19-5V-3.3/4.62 हे रु.37,990/-ला विकत घेतला व त्याची हमी एक वर्षाची होती हे सामनेवाले यांनी नाकारलेले नाही. तक्रारदाराने लॅपटॉप विकत घेतल्याबद्दलचा इनव्हाईस दाखल केला आहे. विकत घेतल्यापासून लॅपटॉप व्यवस्थीत चालत होता. मात्र, एप्रिल, 2010 मध्ये इंटरनेटबाबत समस्यां सुरु झाली. इंटरनेट सुरु होत नव्हते हे सुध्दा सामनेवाले यांनी नाकारले नाही. तक्रारदाराच्या मुलाची परिक्षा असल्यामुळे जून, 2010 पर्यंत तो सामनेवाले क्र.1 यांनी सांगितल्याप्रमाणे सामनेवाले क्र.2 शी संपर्क करु शकला नाही. जून, 2010 मध्ये तक्रारदाराचा मुलगा सामनेवाले क्र.2 च्या कार्यालयात गेला व त्याने खालील समस्यांबाबत त्यांना सांगितले. A Internet Connectivity problem; B Non-working of blue-tooth; C Non-working of Wi-Fi software; D Disturbance with LCD Monitor; E Coloured horizontal lines moving in upward directions on screen thereby making typing difficult. वरील समस्यांपैकी इंटरनेटची समस्या सोडून सामनेवाले यांनी इतर समस्यां दूर केल्या हे उभय पक्षकारांना मान्य आहे. 10 सामनेवाले यांचे म्हणणे आहे की, इंटरनेटची समस्यां लॅपटॉपच्या लॅनपोर्टमध्ये फिजीकल डॅमेज झाल्यामुळे उदभवली आहे व त्यासाठी मदरबोर्ड बदलविणे आवश्यक आहे. तक्रारदाराने तक्रारीबरोबर SDAR REPORT दि.22.06.2010 चा दाखल केला आहे. त्यात “Lan Port is Physically Damaged” असे नमूद आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांनी सामनेवाले क्र.2 यांना “Physically Damaged” म्हणजे काय व ते कशामुळे होते, त्यांच्या लॅपटॉपचे लॅनपोर्ट कशामुळे डॅमेज झाले याबद्दल विचारणा केली होती. परंतु त्यांनी काहीही सांगितले नाही. तोंडी युक्तीवादाच्या वेळी सामनेवाले यांचे वकील व सामनेवाले क्र.1 चे प्रतिनिधी यांना फिजीकली डॅमेजची कारणं काय असू शकतात असे विचारले होते परंतु याबद्दल त्यांनी काही सांगितले नाही. 11 तक्रारदाराच्या लॅपटॉपची इंटरनेटची सुविधा सुरु होत नाही हे सामनेवाले यांनाही मान्य आहे. लॅपटॉपच्या लॅनपोर्टला नुकसान झाले असल्यामुळे (फिजीकली डॅमेज्ड्) हा प्रॉब्लेम उदभवला आहे व त्यासाठी मदरबोर्ड बदलण्याची आवश्यकता आहे याबद्दल सामनेवाले यांनी त्यांच्या टेक्निशिअनचे शपथपत्रं दाखल केले नाही. लॅपटॉप हा एप्रिल, 2010 मध्ये हमी कालावधीत होता हे सामनेवाले यांना मान्य आहे, त्यामुळे जरी हे मान्य केले की, लॅनपोर्ट खराब झाल्यामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम उदभवला आहे तरी मदरबोर्ड बदलून देणे हे लॅपटॉपच्या हमीमध्ये बसत नाही हा बचाव सिध्द करण्याची जबाबदारी सामनेवाले यांची होती. परंतु त्यासाठी सामनेवाले यांनी काहीही कागदपत्रं दाखल केलेली नाहीत. सामनेवाले यांनी त्यांचा बचाव लेखी कागदपत्रांसह सिध्द केलेले नसल्यामुळे मान्य करता येत नाही. लॅपटॉप हा त्यावेळी हमी कालावधीत असल्यामुळे इंटरनेटची समस्यांही दूर करण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.2 व 3 यांची होती कारण सामनेवाले क्र.3 हे लॅपटॉपचे निर्माते व सामनेवाले क्र.2 हे त्यांचे सेवा देणारे अधिकृत सेंटर आहे, ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला लॅपटॉपची विक्री केली आहे, लॅपटॉपची हमी सामनेवाले क्र.3 यांनी दिलेली आहे, सामनेवाले क्र.1 यांनी नाही. म्हणून सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला सामनेवाले क्र.2 यांचेशी संपर्क करायला सांगितले होते व त्यानुसार, सामनेवाले क्र.2 यांनी इंटरनेटची समस्यां वगळता लॅपटॉपच्या इतर समस्यां दूर केल्या. मंचाचे मते, सामनेवाले क्र.1 ची सेवेत न्यूनता नाही. तक्रारदाराने लॅपटॉपबदलून मागितला आहे, त्यांचे म्हणणे की, लॅपटॉपमध्ये निर्मिती दोष आहे मंच याला सहमत नाही, तक्रारदाराने त्याबद्दल तज्ञांचे मत दाखल केले नाही. लॅपटॉपमध्ये निर्मिती दोष असता तर एप्रिल 2010 वर्षे म्हणजे जवळ जवळ नऊ महिने तो व्यवस्थित चालला नसता. निर्मिती दोष सिध्द न झाल्यामुळे लॅपटॉप बदलून देण्याचा किंवा त्याची किंमत परत देण्याचा प्रश्न येत नाही. परंतु तो हमी कालावधीत असल्यामुळे सामनेवाले क्र.2 व 3 यांनी त्याच्या इंटरनेट बाबतीतील समस्यां दूर करून द्यावी असा आदेश करणे न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी वाजवी नुकसानभरपाई व या तक्रारीचा खर्च सामनेवाले यांनी द्यावा असा आदेश देणे योग्य वाटतो. सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.78/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले क्र.2 व 3 यांनी तक्रारदाराच्या लॅपटॉपमधील इंटरनेट सुरु करुन द्यावे. (3) सामनेवाले क्र.2 व 3 यांनी संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या तक्रारदाराला रु.5,000/- मानसिक त्रासाच्या नुकसानभरपाई पोटी द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा. (4) सदरची सामनेवाले क्र.1 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येते. (5) सामनेवाले क्र.2 व 3 यांनी सदरच्या आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत या आदेशाची पूर्तता करावी अन्यथा विलंबापोटी तक्रारदाराला दररोज रु.50/- दंडात्मक रक्कम म्हणून देण्यास ते जबाबदार राहतील. (6) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| | [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |