द्वारा- श्री.ना.द.कदम मा.सदस्य.
1. सामनेवाले 1 ही इलेक्ट्रॉनिक तसेच अन्य घरगुतिवापराची वस्तु विक्रेते आहेत. सामनेवाले 2 हे सामनेवाले 1 या संस्थेचे डायरेक्टर आहेत. सामनेवाले यांनी वातानुकुलीत यंत्रावर वर्तमानपत्राद्वारे जाहीर केलेला डिस्काऊंट तक्रारदारांना देण्यास नकार दिल्याने प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले यांनी मुंबई मिरर या दैनिक वर्तमानपत्रामध्ये दि. 22/04/2011 रोजी जाहीरात देवुन कोणतेही वातानुकुलीत यंत्र खरेदी केल्यास सरसकट रु. 7000/- सूट (डिस्काऊंट) देण्याचे जाहीर केले होते. सदर जाहिरातीवर विश्वास ठेवुन तक्रारदार यांनी असलेल्या परिसरातील सामनेवाले यांचे शोरुममध्ये एअर कंडशिन यंत्र घेण्यासाठी त्यांच्या मित्रासह गेले. सदर जाहीरात दाखवुन, अे.सी.विकत घेण्यास ते तयार झाले व जाहीरातीप्रमाणे अे.सी.खरेदीवर रु. 7,000/- ची सूट देण्याची मागणी केली. तथापी, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सूट देण्यास नकार देवून असे कथन केले की, अशा प्रकारची कोणतीही ऑफर असल्याचे त्यांना माहीत नाही. या शिवाय, तक्रारदारांशी त्यांनी वाईट वर्तन केल्याने, तक्रारदारांनी सदर जाहीरात व सामनेवाले 1 यांची वर्तणुक, सामनेवाले 2 यांना कळविली यानंतर दि. 14/05/2011 रोजी, सामनेवाले 1 यांचेकडुन फोन आला व कर्मचा-याच्या वर्तनाबद्दल त्यांनी क्षमा मागून तक्रारदारांना चांगल्या रक्कमेची सूट देवु केली, यानुसार, तक्रारदारांनी कोणताही एसी विकत घेतल्यास रु. 500/- इतकी सूट देवू केली, तथापी, रु 7,000/- ऐवजी केवळ रु. 500/- ची सूट देवू केल्याने तक्रारदाराने सामनेवाले यांची ऑफर नाकारली. यानंतर, तक्रारदारांनी सामनेवाले यांना नाटिस दिली तथापी, सामनेवाले हे, जाहीरातीप्रमाणे रु. 7,000/- सूट देण्याबाबत योग्यतो प्रतिसाद, न दिल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन, सामनेवाले यांच्या अनुचित व्यावहाराबद्दल रु. 5 लाख नुकसान भरपार्इ मिळावी अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाने यांनी लेखी कैफियत दाखल करुन प्रामुख्याने असे नमुद केले की, तक्रारदारांनी कोणतीही वस्तु खरेदी केली नसल्याने व खरेदी विक्रीचा व्यवहार झाला नसल्याने तक्रारदार ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाहीत. शिवाय, सामनेवाले यांनी जाहीर केलेली ऑफर ही काही शर्ती व अटी सापेक्ष होती, शिवाय ती विशिष्ठ शहरापुर्तीच लागू होती. त्यामध्ये, सामनेवाले यांच्या उल्हासनगर शोरुमचा समावेश नव्हता. सामनेवाले यानी असेही कथन केले आहे की, तक्रारदारांनी नमुद केलेली जाहीरात ही सामनेवाले यांनी दिलेली नसल्याने त्यामधील बाबी सामनेवाले यांना लागू होत नाहीत. सामनेवाले यांनी उपरोक्त कथनाशिवाय लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवादाचे वेळी प्रामुख्याने असे नमुद केले की, तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नसल्याने, अन्य बाबींचा विचार करण्याची गरज नाही.
4. तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला. उभय पक्षांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे व वाद प्रतिवादाचे वाचन मंचाने केले. तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ही ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद व सामनेवाले यांनी केलेला प्रतिवाद यांची चिकित्सा करण्यापुर्ती सामनेवाले यांनी उपस्थित केलेला तक्रारदार हे ग्राहक नसल्याचा मुद्दा सर्व प्रथम विचारात घेणे आवश्यक आहे, असे मंचाचे मत आहे.
ब) सामनेवाले यांनी लेखी कैफियत, लेखी युक्तिवादामध्ये तसेच तोंडी युक्तिवादाचे वेळी सामनेवाले यांचे विद्वान वकीलांनी असे नमुद केले की, तक्रारदारांनी एसी विकत घेतला नसल्याने आणि सामनेवाले यांचेशी त्यांचा कोणताही खरेदी-विक्री व्यवहार झाला नसल्याने व तक्रारदारांनी वस्तुचे मुल्य दिले नसल्याने तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाही. सामनेवाले यांच्या सदरील आक्षेपाच्या अनुषंगाने ‘ग्राहक’ या संज्ञेची ग्रा.सं.का. कलम 2(1)(ड) मधील व्याखेचा विचार करणे आवश्यक आहे. कलम 2(1)(ड) मधील ग्राहक या संज्ञेची व्याख्या, खालीलप्रमाणे नमुद केलेली आहे.
Consumer means any person (1) who buys any goods for consideration, which has been paid or promised or partly paid or partly promised or under any system of deferred payment and includes-
उपरोक्त ग्रा.सं.कायद्याचे कलम 2(1)(ड) मध्ये नमुद केलेली व्याख्या विचारात घेतल्यास, एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तु प्रतिफळ देवून किंवा देण्याचे वचन देवून विकत घेतली असल्यासच अशी व्यक्ती ग्राहक या संज्ञेत येते. म्हणजेच ग्रा.सं.कायद्या अंतर्गत दाद मागणा-या व्यक्तीने एखादी वस्तु विकत घेण्याचा व्यवहार पुर्ण केला असला पाहिजे व या व्यवहारामध्ये किंवा विकत घेतलेल्या वस्तुमध्ये काही त्रृटी आढळुन आल्यास तो या कायद्याअंतर्गत ग्राहक मंचाकडे दाद मागण्यास ‘ग्राहक’ म्हणुन पात्र ठरतो.
या संदर्भात, Morgan Stanley Mutual Fund V/s. Kartick Das (1994 4 SCC 225 या प्रकरणामध्ये संभाव्य खरेदीदार (Prospective buyer) हा ग्राहक या संज्ञेत येतो का ? याबाबतचे दीर्घ विवेचन मा. सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. या संदर्भात न्याय निर्णयाच्या परिच्छेदामध्ये ‘ग्राहक’ या संज्ञेमध्ये कोण येऊ शक्तो याबद्दल खालील न्यायिक तत्व नमुद केले आहे.
There is no purchase of goods for consideration, nor, he could again be called the hirer of services of the company for consideration. In order to satisfy the requirement of above definition of a consumer, it is clear that there must be a transaction of buying goods for consideration under section 2(1)(d)(i) of the said Act.
क) मा. सर्वोच्चय न्यायालयाचे उपरोक्त न्यायिक तत्व विचारात घेतल्यास जी व्यक्ति वस्तु विकत घेण्याचा व्यवहार प्रतिफळ देवुन / प्रतिफळ देण्याचे वचन देवून, करते, अशी व्यक्तिच ग्राहक या संज्ञेमध्ये येते. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार, वातानुकुलीत यंत्रे विकत घेण्यासाठी सामनेवाले यांचेकडे गेले. तथापी, सामनेवाले यांनी जाहीर केलेला डिस्काऊंट तक्रारदारांना देण्यास नाकारल्याने सामनेवाले यांच्याशी अे.सी विकत घेण्याचा पुर्ण व्यवहार केला नसुन केवळ खरेदी बाबतची बोलणी केली. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात, अे.सी विकत घेण्याचा व्यवहार तक्रारदारानी सामनेवाले यांचेशी केला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी प्रतिफळ देण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. सबब, ग्रा.सं.का. कलम 2(1)(d)(i) मधील तरतुदीनुसार वस्तु खरेदी व्यवहार झाला नसल्याने, तक्रारदार ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. त्यामुळे, प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार व सामनेवाले यांनी उपस्थित केलेल्या अन्य बाबींचा विचार करणे, निरर्थक होईल असे मंचास वाटते.
5. उपरोक्त चर्चेनुरूप व निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्र. 211/2012 खारीज करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.