न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प. कंपनीच्या कोडोली येथील शाखेमध्ये तक्रारदारांचा मुलगा प्रविण दिलीप व्हरकट/जाधव याने दि. 2/08/16 रोजी दोन पॉलिसी उतरविल्या होत्या. त्यापैकी पॉलिसी क्र. 949389809 चे कोष्टक 815 असून त्याची मुदत 25 वर्षापर्यंत आहे व त्याचा सहामाही हप्ता रु.3,441/- रु. असा होता व दुसरी पॉलिसी क्र. 949389810 असा असून विम्याचे कोष्टक 815 असे आहे. प्रत्येक पॉलिसीची रक्कम रु.1,50,000/- असून त्याची मुदत 26 वर्षांपर्यंत आहे व त्याचा सहामाही हप्ता रु. 3,294/- असा होता. वि.प. कंपनीच्या एजंटांनी तक्रारदारांचे मुलाला असे सांगितले होते की, मुदतीच्या अगोदर अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची दुप्पट रक्कम मिळते व नैसर्गिक मृत्यू आल्यास विमेदाराच्या वारसांना विमा उतरविलेली रक्कम मिळते व मुदतीपर्यंत विमेदाराचा मृत्यू न झाल्यास त्याला विम्याच्या रकमेच्या तिप्पट रक्कम मिळते. तक्रारदाराच्या मुलाने दोन्ही पॉलिसींचे नियमित हप्ते भरलेले आहेत. तक्रारदाराचा मुलगा दि. 09/01/2018 रोजी तक्रारदाराच्या गावातीलच गुंगा कृष्णा बाचणकर यांच्या विहीरीतून पाणी आणेणसाठी गेला असता त्याचा विहीरीत पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती वि.प. विमा कंपनीस तक्रारदारांनी कळविली. परंतु वि.प.कंपनीने नुकसान भरपाई देणेस टाळाटाळ केली आहे. तक्रारदाराच्या मुलाला दि. 2/8/2017 रोजी देय विमा हप्ता भरणेचे कळविले होते व त्यानंतर तक्रारदाराच्या मुलाने दि. 1/2/2018 रोजी धनादेशाने वि.प. कंपनीचा हप्ता भरलेला आहे. विमा कंपनीने विम्याची रक्कम न दिलेमुळे तक्रारदारांनी वकीलामार्फत दि. 30/7/2018 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविली. त्यावर वि.प. यांनी दि. 4/8/2018 रोजी नोटीसीस उत्तर देवून पॉलिसी बंद स्थितीत असलेचे कळविलेले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास विमा कंपनीकडून दोन्ही पॉलिसीची दामदुप्पट रक्कम रु. 6 लाख व सदर रकमेवर 18 टक्के दराने व्याज तसेच मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत दोन विमा पॉलिसी, विमा कंपनीचे सूचना पत्र, तक्रारदाराचा पोलिस स्टेशनमधील वर्दी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, मयताचा मृत्यू दाखला, तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेल्या नोटीसची प्रत, सदर नोटीसची पोहोचपावती, वि.प. चे नोटीस उत्तर, तक्रारदारांचे आधारकार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच कागदयादीसोबत वि.प. कंपनीचे पॉलिसी लॅप्स झालेबाबत दिलेली एकूण चार पत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द दि. 13/12/18 रोजी नो से चा आदेश पारीत झालेला होता. तथापि ता. 21/1/2019 रोजी नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.300/- ची कॉस्ट अदा करणेच्या अटीवर सदरचा नो से चा आदेश रद्द करण्यात आला व वि.प. यांचे म्हणणे दाखल करुन घेणेत आले. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील बहुतांशी कथने नाकारली आहेत. वि.प. यांचे कथनानुसार, पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार हप्त्याच्या तारखेपासून 30 दिवस भरण्याची मुदत असते. या मुदतीत हप्ता न भरल्यास पॉलिसी बंद पडते व पॉलिसीचे कोणतेही लाभ देय होत नाहीत. तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यू ही आत्महत्या आहे, की अपघात आहे याबाबत वि.प. हे साशंक आहेत. त्याबाबत ठोस पुरावे तक्रारदाराने वि.प. कडे दाखल केलेले नाहीत. तक्रारअर्जातील नमूद पॉलिसी या प्रविण दिलीप जाधव या नावाने काढलेल्या आहेत. त्या प्रविण दिलीप व्हरकट या नावाने नाहीत. प्रस्तुतचा अर्ज हा सर्व वारसांनी दाखल करणे गरजेचे होते पण तसे केलेले नाही. पॉलिसीधारकाने दि. 2/8/2016 रोजीचा पहिला हप्ता भरलेनंतर पुढील हप्ता वेळेत न भरलेने वि.प. कंपनीने पॉलिसीधारकास विमा हप्ता भरणेबाबत दि. 5/12/17 रोजी पोस्टाद्वारे कळविले होते. सदरचे पत्र विमाधारकास त्याचे मृत्यूपूर्वी मिळाले होते. प्रविण याचे दि. 09/01/18 रोजीचे अपघातापूर्वी म्हणजे दि. 16/1117 रोजी माहे 08/2017 चा हप्ता धनादेशाने भरणा केला होता ही बाब जरी खरी असली तरी तो धनादेश न वटलेने हप्ता रक्कम भरणाच झाली नाही. म्हणजे ऑगस्ट 2017 पासून पॉलिसी हप्ते भरलेले नव्हते, त्यामुळे सदरची पॉलिसी बंद पडली होती. या कारणास्तव तक्रारदार यांना पॉलिसी रक्कम देय केलेली नाही. तसेच पॉलिसीधारक हे विहीरीत दि. 09/01/18 रोजी सायंकाळी पडले आहेत तथापि त्या सायंकाळपासून दुसरे दिवशीचे सकाळपर्यंत त्यांचा कोणीही शोध घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणूनच वि.प. यांनी पॉलिसीधारकाचे मृत्यूबाबत शंका घेतली आहे. सबब, वि.प. विमा कंपनीने कोणतीही त्रुटी न दिल्याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत रिटर्न स्लीप मेमो, इंटीमेशन ऑफ डिस्ऑनर्ड चेक, चेक डिस्ऑनर अॅडव्हाईस, पॉलिसी स्टेटस रिपोर्ट, पॉलिसी प्रिमियम हिस्टरी तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे पॉलिसीची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 हे भारतीय जीवन विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक आहेत व वि.प.क्र.2 हे कोडोली वारणानगर शाखेचे शाखाधिकारी आहेत. वि.प. यांचे कोडोली शाखेमध्ये तक्रारदाराचा मुलगा प्रविण दिलीप व्हरकट जाधव रा. भाडळपैकी व्हरकटवाडी यांनी वि.प. विमा कंपनीकडे एजंटामार्फत ता. 2/8/16 रोजी दोन पॉलिसी उतरविलेल्या होत्या. त्यापैकी पॉलिसी क्र. 949389809 चे कोष्टक 815 असून त्याची मुदत 25 वर्षापर्यंत आहे व त्याचा सहामाही हप्ता रु.3,441/- असा होता व दुसरा पॉलिसीचा क्र. 949389810 असा आहे व विमा कोष्टक 815 रोजी स्वतःच्या जीवनावर विमा उतरविलेला होता. प्रत्येक पॉलिसीची रक्कम रु.1,50,000/- असून त्याची मुदत 26 वर्षे आहे. त्याचा सहामाही हप्ता रु. 3,294/- असा होता व पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सबब, तक्रारदारांनी सदरची पॉलिसी वि.प. यांचेकडे उतरविलेली आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्द क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क.1 मधील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे वि.प.यांचे ग्राहक आहेत. वि.प यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा मुलगा ता. 9/1/18 रोजी गावातील गुंगा कृष्णा बाचणकर यांचे विहीरीतून पाणी आणणेसाठी गेला असता त्याचा विहीरीत पडून अपघाती मृत्यू झाला. त्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट केला आहे. तक्रारदारांचे मुलास ता. 2/8/2017 रोजीचा देय विमा हप्ता भरणेचे कळविलेले होते. त्यानंतर ता. 1/2/2018 रोजी त्याप्रमाणे धनादेशाने सदरचा हप्ता भरला. पॉलिसीचे मुदतीत अपघाती मृत्यू झाला असताना देखील वि.प. यांनी ता. 4/8/2018 रोजी पॉलिसी बंद स्थितीत असलेचे कळवून व विम्याची रक्कम नाकारुन तक्रारदारांना देय रक्कम देणेस टाळाटाळ केली. सबब, वि.प. यांनी सदरची विमा क्लेम रक्कम तक्रारदार यांना आजतागायत अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांचे मुलाने वि.प. विमा कंपनी यांचेकडे उतरविलेल्या पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे.
8. वि.प.क्र.1 व 2 यांचे म्हणणेचे अवलोकन करता पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार हप्त्याच्या तारखेपासून 30 दिवस भरण्याची मुदत (Grace period) असते. मुदतीत हप्ता न भरलेस पॉलिसी बंद पडते. तक्रारदारांचे मुलाचा ता. 9/1/2018 रोजी विहीरीत पडून अपघाती मृत्यू झाला. तथापि सदरचा अपघात हा घातपात, आत्महत्या आहे याबाबत वि.प. साशंक होते. पॉलिसीधारक ता. 09/01/2018 रोजी सायंकाळी पडला तथापि ता. 09/01/2018 रोजी अथवा त्या सायंकाळपासून दुसरे दिवशी सकाळपर्यंत कुणीही शोध घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणूनच सदरचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या आहे हे पुराव्यानिशी सिध्द करणे आवश्यक आहे. वि.प. यांचे सदरचे म्हणणेनुसार दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता आयोगाने तक्रारदार यांचा पोलिस स्टेशनमधील वर्दी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा, तसेच मयताचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट तसेच अॅडव्हान्स सर्टिफिकेट यांचे अवलोकन करता Cause of death – death due to asphysia due to drowning नमूद आहे. तसेच पोलिस व पंच यांचे मरणाबाबत मत – विहीरीत पाणी आणणेसाठी गेला असता त्याचा तोल जावून विहीरीचे पाण्याचे पात्रात पडून बुडाल्याचे प्रेत आज ता.09/01/18 रोजी मिळून आलेचे नमूद आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन पॉलिसीधारकाचा मृत्यू पाण्यात बुडून अपघाती झालेची बाब सिध्द होते. सदर कामी पॉलिसीधारकाने आत्महत्या केली अथवा घातपात झालेचे अनुषंगाने कोणताही पोलिस अहवाल नाही अथवा पॉलिसीधारकाचा घातपात अथवा आत्महत्या केलेचे अनुषंगाने कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदविलेची कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सबब, केवळ सायंकाळपासून दुसरे दिवशी सकाळपर्यंत विमाधारकाचा शोध कोणीही घेतला नाही या कारणास्तव विमाधारकाचा मृत्यू हा घातपात अथवा आत्महत्या असलेची शक्यता असलेची वि.प. यांची कथने पुराव्याअभावी असलेने सदरची कथने आयोग विचारात घेत नाही.
9. ता.16/12/17 रोजी वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांचे मुलाला सूचनापत्र पाठविले आहे. सदर सूचनापत्रामध्ये भरलेला शेवटचा हप्ता दि. 02/07/17 व हप्ता देय तारीख 02/08/17 नमूद आहे. तसेच हप्त्याची रक्कम रु. 3,294/- नमूद आहे. सबब, सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांचे वि.प. यांचेकडे 02/02/17 अखेरचा दोन्ही पॉलिसीचा हप्ता रक्कम रु. 3,294/- भरणा केलेला असून वि.प. यांनी दि. 02/08/17 रोजीचे अखेर पुढील हप्ता देणेचे कळविलेले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदारांचे मुलाला ता. 2/08/2017 रोजी देय विमा हप्ता भरणेचे कळविलेले होते. त्याप्रमाणे तक्रारदारांचे मुलाने धनादेशाने वि.प. विमा कंपनीकडे हप्ता भरलेला आहे असे कथन केले आहे तथापि वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये पॉलिसीधारकाने ता. 2/08/2017 रोजीचा विमा हप्ता ता. 8/11/2017 चे धनादेशाने भरला होता, तो न वटता ता. 16/11/2017 रोजी बँकेतून परत आला. त्यामुळे ता. 28/11/2017 रोजी स्पीड पोस्टाने तक्रारदारांचे मुलास परत पाठवला. सदरचा 2/08/2017 रोजीचा हप्ता जमा न झालेने पॉलिसी बंद अवस्थेत आहे. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी अ.क्र.1 ते 9 ला रिटर्न स्लीप मेमो दि. 14/11/17, इंटीमेशन ऑफ डिस्ऑनर्ड चेक दि. 16/11/17, चेक डिस्ऑनर अॅडव्हाईस दि.17/11/17, पॉलिसी स्टेटस रिपोर्ट दि. 17/11/18, पॉलिसी प्रिमियम हिस्टरी दि. 17/11/18, पॉलिसी स्टेटस रिपोर्ट दि. 17/11/18, पॉलिसी प्रिमियम हिस्टरी दि. 17/11/18, पोस्ट ऑफिस डिस्पॅच यादी दि. 28/11/2017 इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता Payment of premium due for the below listed policies has been returned to unpaid by our banker for drawer signature differ as per bank memo attached नमूद आहे. तसेच सदरचा अहवाल ता. 28/11/2017 रोजी स्पीड पोस्टाने तक्रारदाराचे मुलास परत पाठविला, याबाबतचे dispatched पत्राची यादी वि.प. यांनी दाखल केलेली आहे. तथापि सदरचे कागदपत्रांवरुन विमाधारकाने वि.प. कंपनीकडे धनादेश पाठविलेला होता, केवळ सहीमध्ये फरक असलेने (तांत्रिक कारणाने) सदरचा चेक वटलेला नव्हता. सदरचा धनादेश बँकेतून परत आल्यामुळे वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना कळविलेले नाही असे तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रात कथन केले आहे. तसेच सदरची बाब वि.प. यांनी तक्रारदारांना कळविलेचे अनुषंगाने dispatched यादी दाखल केलेली आहे. तथापि सदरचे यादीवरुन तक्रारदारांना चेक न वटल्याची बाब कळलेची (intimation) झालेची बाब सिध्द होत नाही. तक्रारदारांचे मुलाचा मृत्यू ता. 9/1/2018 रोजी झालेला आहे. तक्रारदार यांनी ता. 17/09/21 रोजी आयोगात दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, ता. 09/04/2018 रोजी पॉलिसी नं. 949389809 व पॉलिसी नं. 949389810, ता. 15/02/19 रोजी पॉलिसी नं. 949389809 व पॉलिसी नं. 949389810 लॅप्स (Lapsed) झालेचे कळविलेले आहे. सबब. वि.प. यांनी तक्रारदारांचा धनादेश वटला नाही. त्यानंतर पॉलिसी रद्द झालेचे तक्रारदारांचे मुलाचा मृत्यू झालेनंतर ता. 09/04/2018 व ता.15/02/2019 रोजी कळविलेचे दिसून येते. सदरचे मुद्याचे अनुषंगाने आयोग पुढील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
- 2019 AAC 1389 (KAR)(2020) IACJ 610
Motor Vehicles Act, S.147 – Insurance Act (4 of 1938) S 64VB – Liability of Insurance – Dishonor of cheque towards policy premium – Cancellation of policy – Communication of cancellation of policy for dishonor of cheque should be effective and complete before date of accident – Insurer though served notice through certificate of posting on basis of stamped address but it was not having acknowledgment and was not received by insurer to know actual date of service of notice – Service of notice in effective and complete manner cannot be presumed – Postal Department unable to track and give result of delivery of registered post matter as six months old. In absence of documents to show service of notice cancellation of policy before accident, insurer held liable to pay compensation.
सबब, वरील मा. उच्च न्यायालयांचे दंडकाचा विचार करता, जोपर्यंत पॉलिसी रद्द करुन विमाधारकाला कळविले जात नाही, तोपर्यंत होणा-या नुकसानीस विमा कंपनी जबाबदार आहे.
AIR 2012 SUPREME COURT 2817
Liability of insurer – policy issued on receipt of cheque towards payment of premium – Cheque dishonored – Liability of insurer as yet subsists till cancellation of policy – Accident occurring before cancellation of policy – Insurer liable to pay.
सदरचे न्यायनिवाडयातील तत्वाचा विचार करता, अपघात हा विमा पॉलिसी रद्द होणेपूर्वीचा असेल तर वि.प. विमा कंपनी नुकसान भरपाई देणेचे टाळू शकत नाही.
10. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार यांनी प्रविण दिलीप जाधव या नावाने पॉलिसी काढलेल्या आहेत. प्रविण दिलीप व्हरकट या नावाने नाहीत. तसेच अर्ज हा सर्व वारसांनी दाखल करणे आवश्यक होते असे म्हणणेमध्ये कथन केले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी मयत पॉलिसी धारकाचा मृत्यू दाखला हजर केलेला आहे तसेच पॉलिसी धारकाचे आडनाव बदललेबाबतचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दाखल केलेले आहे. सबब, सदर परिपत्रकावरुन दोन्ही नांवे एकाच व्यक्तीची आहेत हे सिध्द होते. तसेच मयत प्रविण दिलीप जाधव यांचे ता. 25/5/2017 रोजीचे घटस्फोटाबाबतचे अॅफिडेव्हीट दाखल असून सोडपत्र दाखल केलेले आहे.
11. सबब, वरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांचे मुलाचा मृत्यू हा विहीरीत पाण्यामध्ये बुडून अपघाती झालेला आहे. सदरची बाब कागदपत्राने सिध्द झालेली आहे. विमाधारकाने पॉलिसीतील अटी व शर्तींप्रमाणे हप्ते भरलेले आहेत. त्यानंतर तांत्रिक कारणास्तव चेक अनादर झालेबाबत पॉलिसी रद्द केलेबाबत विमाधारकाला वि.प. कंपनीने विलंबाने कळविलेले आहे. त्याकारणाने होणा-या नुकसानीस वि.प. कंपनी जबाबदार आहे. या सर्व बाबींचा विचार करता, वि.प. विमा कंपनीने पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता चुकीच्या कारणास्तव क्लेम नाकारुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
12. उपरोक्त मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदारांचे दोन्ही पॉलिसी वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सदरचे प्रत्येक पॉलिसीची रक्कम रु.1,50,000/- असून त्याची मुदत 26 वर्षापर्यंत होती. मुदतीच्या अगोदर अपघाती मृत्यू झाल्यास विमा दुप्पट रक्कम मिळते. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. त्याअनुषंगाने तक्रारदारांची सदरची पॉलिसी प्रत आयोगात दाखल केलेली आहे. तसेच पॉलिसी धारकाचे ता. 25/5/2017 रोजीचे घटस्फोटाचे अॅफिडेव्हीट व सोडपत्र आयोगात दाखल केले आहे. सदरचे मयत पॉलिसीधारकाचे अॅफिडेव्हीट व सोडपत्र वि.प. यांनी नाकारलेले नाही. सबब, सदरचे पॉलिसीचा लाभ मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. विमा कंपनी यांचेकडून पॉलिसी नं. 949389809 व पॉलिसी नं. 949389810 या दोन्ही पॉलिसी अंतर्गत दामदुप्पट रक्कम रु. 6,00,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 16/10/2018 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
13. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना पॉलिसी नं. 949389809 व पॉलिसी नं. 949389810 या दोन्ही पॉलिसी अंतर्गत दामदुप्पट रक्कम रु.6,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 16/10/18 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|