निकाल (घोषित दि. 29.10.2010 व्दारा श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) पाणी शुध्दीकरणाचे यंत्र दोषयुक्त असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिने गैरअर्जदार युरेका फॉरबस लि. यांनी उत्पादीत केलेली अक्वागार्ड बुस्टर हे पाणी शुध्द् करण्याचे यंत्र खरेदी केले होते. सदर यंत्र वापरण्यास सुरुवात केल्यानंतर यंत्रामधून कर्कश आवाज येत असल्याचे दिसून आले तसेच यंत्रामधून योग्य प्रमाणात पाणी शुध्द् होत नव्हते. म्हणून तिने गैरअर्जदाराकडे अनेकवेळा लेखी तक्रार दिली. परंतू मोफत सेवा देण्याचे वचन गैरअर्जदाराने पाळले नाही. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने उत्पादीत केलेले अक्वागार्ड यंत्र निकृष्ट व दोषयुक्त असल्याचे घोषीत करुन यंत्राची किंमत रुपये 9,190/- मानसिक त्रासापोटी रुपये 2,000/- व शारिरीक त्रासापोटी रुपये 2,810/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- गैरअर्जदाराकडून देण्यात यावेत. गैरअर्जदार युरेका फॉरबस यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांनी सर्वप्रथम असा मुद्दा उपस्थित केला आहे की, त्यांचे कार्यालय औरंगाबाद येथे असल्यामुळे ही तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, तक्रारदाराने त्यांच्याकडून पाणी शुध्द् करण्याचे यंत्र खरेदी केले होते. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने यंत्रामधील बिघाडाबाबत ज्योवेळी माहिती दिली त्यावेळी यंत्रामधून येणारा आवाज दुरुस्त करुन देण्यात आला होता. तसेच दिनांक 13.04.2010 रोजी देखील तिचे यंत्र विनामुल्य दुरुस्त करुन देण्यात आले होते. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेल्या यंत्रामधे कोणताही दोष नसून तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तिला कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदाराने तक्रारदाराला विक्री केलेल्या अक्वागार्ड बुस्टर या पाणी शुध्द् करण्याच्या यंत्रामधे उत्पादकीय दोष असल्याचे तक्रारदार सिध्द् करु शकते का ? नाही 2.गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 – तक्रारदाराच्या वतीने अड. एस.एस.तवरावाला यांनी युक्तीवाद केला. आणि गैरअर्जदार युरेका फॉरबस यांच्या वतीने अड. बी.के.खांडेकर आणि एस.व्ही.चक्कर यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराच्या अक्वागार्ड बुस्टर या यंत्रामधून आवाज येत होता ही बाब गैरअर्जदाराने मान्य केलेली आहे. गैरअर्जदाराने तक्रारदाराकडील यंत्रामधून येणारा आवाज दुरुस्त केल्याचे निवेदन केलेले आहे. परंतू यंत्रामधून येणारा आवाज उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द् करण्यास तक्रारदार असमर्थ ठरलेली आहे. यंत्रामधे उत्पादकीय दोष आहे किंवा नाही ही बाब यंत्राची तज्ञाकडून तपासणी केल्याशिवाय सिध्द् होऊ शकत नाही. त्यामुळे यंत्राची तज्ञामार्फत तपासणी करुन घेण्यासाठी अक्वागार्ड बुस्टर यंत्र मंचासमोर सादर करण्याची सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. परंतू तक्रारदाराने वादग्रस्त यंत्र मंचासमोर सादर केले नाही. त्यामुळे यंत्राची तज्ञाकडून तपासणी करुन घेणे शक्य झालेले नसून यंत्रामधील दोष हा उत्पादकीय असल्याचे सिध्द् झालेले नाही. तक्रारदाराच्या अक्वागार्ड बुस्टर यंत्रामधील दोष किंवा त्यामधून कर्कश आवाज येण्याचा बिघाड हे मूलभूत किंवा उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द् झालेले नाही. तक्रारदाराने दिनांक 19.10.2009 रोजी सदर यंत्र खरेदी केल्यानंतर दोन महिन्यानंतर त्यामधे बिघाड झालेला होता ही बाब तक्रारदाराने दिनांक 07.01.2010 रोजी गैरअर्जदाराला पत्र नि. 9/3 द्वारे कळविली होती. तसेच दिनांक 15.03.2010 रोजी यंत्रामधून पाणी गळत असल्याचे पत्र नि. 9/5 द्वारे कळविले होते. तक्रारदाराने यंत्रामधील बिघाडाबाबत पत्राद्वारे सुचना दिल्यानंतर गैरअर्जदाराकडील तंत्रज्ञाने दिनांक 09.01.2010 आणि दिनांक 13.04.2010 रोजी तिच्या यंत्राची मोफत दुरुस्ती केली होती व आवश्यक सुटे भाग बदलले होते. ही बाब गैरअर्जदाराने दाखल केलेले डेली अक्टीविटी रिपोर्ट नि. 18/1 आणि नि. 18/2 वरुन दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याचे देखील सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |