आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याचा विमा दावा विरूध्द पक्षाने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता श्री. बालचंद पारधी यांच्या मालकीचे कोडेलोहारा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे मुन्ना कृषि केंद्र नावाचे दुकान आहे. सदर कृषि केंद्रात तक्रारकर्ता रासायनिक खताची विक्री करतो. त्यासाठी तक्रारकर्त्याने वैनगंगा क्षेत्रिय ग्रामीण बँक, शाखा मुरमाडी यांचेकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाद्वारे खरेदी केलेल्या रासायनिक खताच्या नुकसानीस संरक्षण मिळावे म्हणून तक्रारकर्त्याच्या दुकानातील रू. 5,65,000/- च्या रासायनिक खताच्या साठ्याचा विमा तक्रारकर्त्याच्या वतीने वैनगंगा क्षेत्रिय ग्रामीण बँकेने दिनांक 31/05/2013 ते 30/05/2014 या कालावधीसाठी काढला होता आणि सदर विम्याची प्रव्याजी रू. 1726/- चा भरणा तक्रारकर्त्याच्या वतीने विरूध्द पक्ष युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडे केला होता. विरूध्द पक्षाने त्याबाबत स्टॅन्डर्ड फायर ऍन्ड स्पेशल पेरिल्स पॉलीसी क्रमांक 230903/11/13/11/00000513 निर्गमित केली आहे.
3. तक्रारकर्त्याने दिनांक 17/03/2013 रोजी DPA रासायनिक खताच्या 320 बॅग किंमत रू. 4,00,000/- आणि दिनांक 27/03/2013 रोजी ग्रोमोर रासायनिक खताच्या 340 बॅग किंमत रू. 2,15,666/- खरेदी केल्या. याशिवाय इतर खत देखील खरेदी केले आणि वरील सर्व खताचा साठा आपले मुन्ना कृषि केंद्र, कोडेलोहारा येथे साठवून ठेवले. त्यापैकी काही मालाची विक्री केली होती.
4. दिनांक 01/08/2013 रोजी कोडेलोहारा येथे चक्रीवादळासह अतिवृष्टी झाली. चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे तक्रारकर्त्याच्या कृषि केंद्राचे दरवाजे/खिडक्या तुटल्याने अतिवृष्टीचे पाणी तक्रारकर्त्याच्या रासायनिक खताचा साठा असलेल्या कृषि केंद्रात घुसले आणि त्यामुळे दुकानात साठवून ठेवलेला माल पाण्यामुळे ओला होऊन खराब झाला. त्यावेळी तक्रारकर्त्याच्या दुकानात खालीलप्रमाणे खताचा साठा साठविलेला होता.
रासायनिक खताच्या 616 बॅग – ज्यात
1) सुपर फॉस्फेट - 270 बॅग (प्रति बॅग 50 किलो भार)
2) युरिया - 200 बॅग
3) डीपीए - 100 बॅग
4) ग्रोमोर - 46 बॅग
पैकी डीपीए च्या 60 बॅग आणि ग्रोमोरच्या 20 बॅग अशा एकूण 80 बॅग खराब झाल्याने रू. 93,200 चे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने सदर नुकसानीची माहिती ताबडतोब वैनगंगा क्षेत्रिय ग्रामीण बँक, मुरमाडी व विरूध्द पक्ष विमा कंपनीला दिली. त्यावरून विरूध्द पक्षाचे सर्व्हेअर महेन्द्रसिंग दिनांक 14/08/2013 रोजी घटनास्थळी आले आणि नुकसानीची पाहणी करून अहवाल विरूध्द पक्षाला सादर केला.
5. तक्रारकर्त्याने चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान रू. 93,200/- मिळावे म्हणून विरूध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला. परंतु पावसाच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पॉलीसीअंतर्गत येत नाही असे कारण देऊन दिनांक 08/12/2014 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला. सदरची बाब सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. तक्रारकर्त्याच्या रू.5,65,000/- च्या खत साठ्यापैकी आंशिक रासायनिक खताचे झालेले नुकसान रू. 93,200/- देण्याबाबत विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.50,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 10,000/- देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षांकडे काढलेली विमा पॉलीसी, विरूध्द पक्षाचे रेफरन्स पत्र, रासायनिक खत खरेदी केलेले बिल, सर्व्हेअर रिपोर्ट, विमा कंपनीकडे केलेली तक्रार, नुकसान झालेल्या मालाचा तपशील रिपोर्ट, कृषि केंद्रात ठेवलेल्या साठ्याचा तपशील, कृषि केंद्राचा नकाशा, दृष्टिबंध स्टॉक विवरण आणि सरपंचाचे प्रमाणपत्र इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष विमा कंपनीने लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने बँकेकडून रासायनिक खत साठ्यासाठी कर्ज घेतले व बँकेकडून तक्रारकर्त्याच्या वतीने रू. 5,60,000/- ची फायर ऍन्ड स्पेशल पेरिल पॉलीसी विरूध्द पक्षाकडून काढण्यात आल्याचे विरूध्द पक्षाने मान्य केले आहे. तक्रारकर्त्याच्या वतीने बँकेने परस्पर पॉलीसी काढली असल्याने तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये पॉलीसीबाबत कोणताही सरळ करार नसल्याने (Privity of contract) तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे विरूध्द पक्षाने म्हटले आहे. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष विमा काढला त्या बँकेला तक्रारीत जोडले नसल्याने Non joinder of necessary parties च्या तत्वाने तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने त्याचे दुकानात रासायनिक खताचा साठा ठेवला होता हे दर्शविण्यासाठी स्टॉक स्टेटमेंट दाखल न करता स्वतःचे बनावट स्टेटमेंट सादर केले असून ते विरूध्द पक्षाला नाकबूल आहे. तक्रारकर्त्याने जेथे खताचा साठा ठेवला होता ती जागा शासकीय निकषाप्रमाणे रासायनिक खताचा साठा ठेवण्यासाठी प्रमाणित व सुरक्षित जागा नव्हती. जर जिथे साठा ठेवला जातो तिथे खाली फ्लोअरिंग नसेल आणि त्या जागेला हवा येण्यासाठी खिडक्या असतील तर रासायनिक खताचे गुणधर्म नष्ट होऊन खताची युक्तता नष्ट होते. तक्रारकर्त्याने वादळाने दारे-खिडक्या तुटून नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यावरून सदर नुकसानीस तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरूध्द पक्षाने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेअरची नियुक्ती केली होती. सर्व्हेअरने अहवाल सादर केल्यावर सदर नुकसानीची भरपाई पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे देय नसल्याने तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करण्यात आला. तक्रारकर्त्याने दाखल केलेली विमा पॉलीसी, विमा दावा नामंजुरीचे पत्र व सर्व्हेअरने तक्रारकर्त्यास दिलेले पत्र (दस्त क्रमांक 1, 2 व 5) मान्य असल्याचे व अन्य दस्तावेज नाकबूल असल्याचे म्हटले आहे. तक्रारीस कारण घडले नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे.
आपल्या विशेष जबाबत विरूध्द पक्षाने म्हटले आहे की, सदर तक्रारीत विरूध्द पक्षाने सांगितलेल्या बाबी सद करण्यासाठी सविस्तर पुरावा, सरतपासणी, उलटतपासणीची आवश्यकता असल्याने तक्रारीचा निर्णय लघुप्रक्रियेने (Summary Procedure) चालणा-या ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या अंतर्गत तक्रारीत करणे शक्य नाही. सदर स्वरूपाच्या तक्रारीचा निर्णय केवळ दिवाणी न्यायालयात होऊ शकत असल्याने मंचाला सदर तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा नाही. तसेच विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
विरूध्द पक्षाने नियुक्त केलेले सर्व्हेअर महेन्द्रसिंग यांच्या अहवालात नमूद आहे की, छतातून पावसाचे पाणी गळल्यामुळे खत साठ्याचे झालेले नुकसान पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे देय नाही. सदरची बाब पॉलीसीच्या Exclusion Clause मध्ये येत असल्याने सदर नुकसानभरपाई देण्यास विमा कंपनी कायदेशीररित्या जबाबदार नाही. म्हणून तक्रारकत्याचा विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता ठरत नाही. म्हणून विरूध्द पक्षाने तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
8. विरूध्द पक्षाने त्यांच्या लेखी जबाबाच्या पृष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याच्या कृषि केंद्राचे फोटो आणि सर्व्हेअर अहवाल दाखल केला आहे.
9. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रार Non-joinder of necessary parties च्या तत्वाने बाधित आहे काय? | नाही |
2. | मंचाला सदर तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा आहे काय? | होय |
3. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
4. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
5. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे की, त्याने वैनगंगा कृषि ग्रामीण बँक, शाखा मुरमाडी कडून खत खरेदीसाठी कर्ज घेतल्याने बँकेने सदर कर्जासाठी सुरक्षा म्हणून विरूध्द पक्षाकडून परस्पर विमा पॉलीसी काढली आणि त्याची प्रव्याजी तक्रारकर्त्याच्या खात्यास नावे टाकून वसूल केली. तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 1 वर पॉलीसीची झेरॉक्स प्रत लावली आहे त्यांत "इन्शुअर्ड वैनगंगा कृषि ग्रामीण बँक, मुरमाडी खाते मे. मुन्ना कृषि केंद्र प्रोप्रा. मिस्टर बी. पारधी" असे नमूद आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे पॉलीसी काढली नसून ती बँकेने काढली असल्याने तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये Privity of contract नाही. सदरची पॉलीसी बँकेने आपल्या कर्जाच्या सुरक्षेसाठी काढली असल्याने बँक सदर तक्रारीत Necessary Party आहे. तक्रारकर्त्याने बँकेला सदर तक्रारीत पक्ष म्हणून जोडले नसल्याने सदरची तक्रार Non-joinder of necessary parties च्या तत्वाने खारीज होण्यास पात्र आहे.
याउलट तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, बँकेने दिलेल्या कर्जासाठी सुरक्षा म्हणून तक्रारकर्त्याकडून विमा प्रव्याजी वसूल करून सदरची पॉलीसी काढली असून त्याद्वारे तक्रारकर्त्याच्या मुन्ना कृषि केंद्रातील खत साठा विमाकृत केला आहे, बँकेचे कर्ज विमाकृत केलेले नाही. बँक केवळ फायनान्सर असून बँकेविरूध्द सदर तक्रारीत कोणतीही मागणी केली नसल्याने सदर तक्रारीच्या कारवाईसाठी बँक Necessary party नाही.
विमा पॉलीसीतील नोंदीप्रमाणे विमा पॉलीसीद्वारे तक्रारकर्त्याच्या खताचा साठा व त्याच्या व्यवसायासंबंधी अन्य वस्तूंचा विमा काढण्यात आला होता व त्याबाबत प्रव्याजी बँकेने तक्रारकर्त्याच्या वतीने विमा कंपनीकडे भरणा केली होती. म्हणजे तक्रारकर्ता हाच सदर विमा पॉलीसीचा लाभार्थी आहे. सदर तक्रारीत बँकेविरूध्द तक्रारकर्त्याने कोणतीही मागणी केलेली नसल्याने बँक सदर तक्रारीस Necessary party नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
13. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- विरूध्द पक्षाचा दुसरा कायदेशीर आक्षेप असा की, सदरचे प्रकरण गुंतागुंतीचे असून त्यांत उभय पक्षांची सरतपासणी, उलटतपासणी व दस्तावेजांवर आधारित पुरावा तपासून पाहणे आवश्यक असल्याने सदर बाबी समरी प्रक्रियेने चालणा-या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कार्यप्रणालीद्वारे करता येणे शक्य नसल्याने सदरची तक्रार केवळ दिवाणी प्रक्रियेद्वारे सविस्तर कारवाईद्वारे दिवाणी न्यायालयाद्वारेच निकाली निघू शकते. म्हणून मंचाला सदर तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा नाही.
सदरची तक्रार ही विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा वाजवी विमा दावा नाकारून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याबाबत नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या खत साठ्याचा विमा विरूध्द पक्षाकडे काढला असल्याचे विरूध्द पक्षाने मान्य केले असल्याने विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारण्याची कृती पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून आहे किंवा नाही एवढ्याच मुद्दयावर मंचाला निर्णय द्यावयाचा असल्याने त्यासाठी सरतपासणी व उलटतपासणी नोंदविण्याची किंवा दस्तावेज पुरविण्याच्या कायद्याप्रमाणे साक्षीदारांची साक्ष घेऊन सिध्द करण्याची आवश्यकता नाही. म्हणून सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या तरतुदीप्रमाणे संक्षिप्त प्रक्रियेद्वारे (Summary Procedure) चालवून निर्णय देण्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला अधिकार कक्षा आहे. वरील कारणामुळे मुद्दा क्रमांक 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
14. मुद्दा क्रमांक 3, 4 व 5 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्यातर्फे रू. 1726/- विरूध्द पक्षाकडे भरणा करून वैनगंगा कृषि ग्रामीण बँक, शाखा मुरमाडी यांनी तक्रारकर्त्याच्या मुन्ना कृषि केंद्रातील रू. 5,65,000/- किंमतीचा खतसाठा तक्रारीत नमूद स्टॅन्डर्ड फॉयर ऍन्ड स्पेशल पेरिल्स पॉलीसीद्वारे विमाकृत केला होता हे उभय पक्षांना मान्य आहे.
दिनांक 01/08/2013 रोजीच्या चक्रीवादळ व पावसामुळे तक्रारकर्त्याच्या दुकानाची दारे खिडक्या तुटून दुकानात पाणी घुसल्याने विमाकृत 80 बॅग खतसाठ्याचे रू. 93,200/- चे नुकसान झाले. परंतु त्यातून सॉल्व्हेजची किंमत रू. 45,000/- वजा करून नुकसानीचे निव्वळ मूल्यांकन सर्व्हेअरने फायनल सर्व्हे अहवालात रू. 48,000/- दर्शविले आहे. मात्र यातून पुन्हा रू. 10,000/- Excess म्हणून कां दाखविले याचे स्पष्टीकरण अहवालात नाही. पॉलीसीच्या कोण्त्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्याचे सर्व्हेअरने अहवालात नमूद केले आहे. दिनांक 03/09/2013 च्या सदर अहवालाची प्रत विरूध्द पक्षाने दिनांक 17/10/2016 रोजी दाखल केली आहे. मात्र “Loss/Damage occurred due to rain water pouring from Top which is not covered under the policy” असे कारण देऊन Claim is not payable असा अभिप्राय दिला आहे. सदर सर्व्हे रिपोर्टच्या आधारे विरूध्द पक्षाने दिनांक 08/12/2014 च्या पत्रान्वये (तक्रारकर्त्याचा दस्त क्रमांक 2) खालील कारणाने विमा दावा नामंजूर केल्याचे नमूद केले आहे.
“As per survey report, damage occurred due to rain water pouring from top which is not covered within scope of the policy, Hence the claim file is closed as no claim, which please be noted”.
या पत्रात देखील पॉलीसीच्या कोणत्या अटी व शर्तीचा भंग झाल्याने विमा दावा नामंजूर करण्यांत आला हे नमूद न करता मोघम कारण दिले आहे.
तक्रारकर्त्याने तक्रारीत शपथपत्रावर नमूद केले आहे की, दिनांक 01/08/2013 रोजी आलेल्या चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे तक्रारकर्त्याच्या दुकानाची दारे व खिडक्या तुटून त्यातून दुकानात पाणी घुसले व त्यामुळे खतसाठा ओला होऊन खराब झाल्याने रू. 93,200/- चे नुकसान झाले. विरूध्द पक्षाने स्वतः चक्रीवादळ व पावसामुळे तक्रारकर्त्याच्या दुकानात पाणी घुसून झालेल्या नुकसानीचे 3 फोटो दाखल केले आहेत. फोटो क्रमांक 1 चे अवलोकन केले असता असे दिसते की, दुकानाला सिमेंट जाळीचे साधारणतः 1 फुट × 1 फुट चे दोन व्हेंटिलेटर होते. साधारण पावसात अशा सिमेंट जाळीच्या व्हेंटिलेटर मधून पावसाचे पाणी दुकानात शिरण्याची मुळीच शक्यता नाही. तक्रारकर्त्याच्या दुकानास कौलारू छप्पर आहे. ते तुटलेले असल्याचे सर्व्हेअरचे म्हणणे नाही. कौलारू छप्पर असलेल्या दुकान/गोदामातील साठ्याचा विमा काढता येत नाही असे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही. ज्या ठिकाणी ठेवलेल्या साठ्याचा विमा काढावयाचा त्या दुकान/गोदामाचे विमा पॉलीसी निर्गमित करण्याआधीच विरूध्द पक्षाने निरीक्षण करणे आवश्यक होते. परंतु तसे विरूध्द पक्षाने केले नाही. जर सर्वसाधारण स्वरूपाचा पाऊस असता तर कौलारू छप्परातून पाणी गळती होऊन तक्रारकर्त्याचा खतसाठा खराब झाला नसता. वादळ व अतिवृष्टीमुळे झरोक्यातून पावसाचे पाणी आल्याने माळ्यावरील लाकडी साहित्य, भिंती आणि दुकानातील खतसाठा ओला झाला. सदरची बाब सर्वसामान्य परिस्थितीत अपेक्षित नसल्याने त्यास तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असे म्हणता येणार नाही. फोटो क्रमांक 3 मध्ये दर्शविलेल्या खिडकीला (ग्रिलच्या) पूर्णपणे बंद करण्यासाठी व्यवस्था आहे आणि फोटोमध्ये ती कोणत्याही तुटफूटीशिवाय कायम असल्याचे दिसत आहे. सर्व्हेअरने दिनांक 14/08/2013 रोजी भेट दिली तेव्हा दुकानात प्रकाश येण्यासाठी सदर खिडकी उघडण्यात आल्याचे दिसून येते. चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे सदर खिडकी बंद असतांना देखील पाणी आंत घुसून तक्रारकर्त्याचा खतसाठा खराब झाला असल्याने सदरची बाब विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग ठरणारी नाही. पॉलीसीच्या क्लॉजमध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहेः-
“If after payment of the premium the property insured described in the said Schedule or any part of such Property be destroyed or damaged by any of the perils specified hereunder during the period of insurance named in the said schedule or of any subsequent period in respect of which the insured shall have paid and the company shall have accepted the premium required for the renewal of the policy, the Company shall pay to the insured the value of the Property at the time of the happening of its destruction or the amount of such damage or at its option reinstate or replace such property or any part thereof”.
VI. Storm, Cyclone, Typhoon, Tem past, Hurricane, Tornado, Flood and Inundation: Loss destruction or damage directly caused by Storm, Cyclone, Typhoon, Tem past, Hurricane, Tornado, Flood or Inundation excluding those resulting from earthquake, Volcanic eruption or other convulsions of nature (Wherever earthquake cover is given as an “add on cover” the words “excluding those resulting from earthquake volcanic eruption or other convulsions of nature” shall stand deleted.
वरील तरतुदीप्रमाणे पूर आणि जलप्रलय (अतिवृष्टी) यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल विमा कंपनी विमा दावा देण्यास जबाबदार ठरते.
असे असतांना वादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्ष विमा कंपनीची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे तक्रारकर्त्याचे रू. 93,200/- चे नुकसान झाले असतांना सॉल्व्हेजची किंमत रू. 45,000/- कमी करून सर्व्हेअरने नुकसानीचे मूल्यांकन रू. 48,200/- केले आहे. यांतून पुन्हा Less Excess म्हणून रू. 10,000/- कपात अहवालामध्ये दर्शविली असली तरी त्यास कोणताही आधार दर्शविलेला नाही. म्हणून तक्रारकर्ता किमान नुकसानभरपाई रू. 48,200/- दिनांक 08/12/2014 रोजी विरूध्द पक्षाने विमा दावा नामंजूर केल्याच्या दिनांकापासून रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 5,000/- आणि तक्रारखर्च रू. 5,000/- मिळण्यास देखील तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 3, 4 व 5 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 खाली दाखल करण्यात आलेली तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या खतसाठ्याबाबत नुकसानभरपाई रू. 48,200/- तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 08/12/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 5,000/- आणि तक्रार खर्च रू. 5,000/- द्यावा.
4. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.