न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी त्यांचे व्यवसायासाठी एम.एच.09-डीएम-4347 ही नवीन गाडी घेतली. सदर वाहनाचा विमा त्यांनी वि.प. विमा कंपनीकडे उतरविला असून पॉलिसी क्र. 1628813116पी102865187 अशी आहे व कालावधी दि. 04/06/16 ते 03/06/17 असा आहे. दि. 23/9/2016 रोजी सदर वाहनास अपघात झाला. त्यामध्ये वाहनाचे पूर्ण नुकसान झाले. अपघातावेळी तक्रारदाराने नातेवाईकांना भाडयाने नेलेले नव्हते. त्यांनी कधीही प्रवासी वाहतूक केली नाही अथवा कोणाकडूनही कोणत्याही स्वरुपात मोबदला घेतला नाही. अपघातानंतर तक्रारदाराने सदरचे वाहन शोरुमध्ये सोडले असता विमा कंपनीने सदरचे वाहन टोटल लॉस म्हणून जाहीर केले. युनिक अॅटोमोबाईल शोरुमने सदर वाहनाचे रु.8,68,957/- इतक्या रकमेचे दुरुस्ती इस्टीमेट काढले. दरम्यानच्या काळात सांगली येथे एम.ए.सी. नं. 249/96 असा दावा दाखल झाला. त्यामध्ये विमा कंपनीचे वकील यांनी, तक्रारदाराचा जबाब हवा आहे असे सांगून तक्रारदाराकडून विमा कंपनीस पोषक ठरेल असा जबाब लिहून घेतला. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम दि.21/4/2017 रोजी लेखी पत्र पाठवून नाकारला आहे. अपघातावेळी सदर वाहनातून प्रवास करणा-या प्रवाशांकडून प्रवासापोटी रक्कम जमा करुन सदरचे वाहन चालविल्याने वि.प. यांनी तक्रारदारांचा विमादावा नाकारला आहे. सबब चुकीच्या कारणास्तव विमादावा नाकारुन वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. वि.प. यांचेकडून विम्याची रक्कम रु. 8,61,071/-, टोइंग चार्जेसची रक्कम रु.4,500/-, पार्कींग चार्जेसपोटी रु.47,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत वर्दी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, विमा पॉलिसी, तक्रारदार यांचा जबाब, युनिक अॅटोमोबाईल यांचे पत्र, वाहनाचे दुरुस्तीचे इस्टिमेट, टोईंग चार्जेसची रक्कम, क्लेम नामंजूरीचे पत्र, वाहनाचे आर.सी.बुक, ड्रायव्हींग लायसेन्स इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच सांगली येथील कोर्टातील एम.ए.सी. नं. 249/16, 175/16, 176/16, 177/16, 178/16 मधील निकालाची प्रत दाखल केली आहे. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र, कागदयादीसोबत सर्व्हे रिपोर्टची प्रत, तक्रारदार यांचा जबाब, श्रेणीक चौगुले यांचा जबाब व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदार यांचा विमादावा प्राप्त झालेनंतर वि.प. यांनी अॅड आशिष करंदीकर यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्ती केली. त्यांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, तक्रारदारांचे वाहन हे अपघातावेळी भाडयाने वापरले होते. तक्रारदाराने त्यांचे वाहन हे खाजगी वाहन म्हणून नोंद केले आहे. परंतु सदर वाहन हे भाडयाने देवून तक्रारदाराने विमा पॉलिसीचे अटी व शर्तींचा भंग केला आहे. म्हणून तक्रारदारांचा विमा दावा वि.प. यांनी नाकारला आहे.
iv) वरील कथनास बाधा न येता वि.प. यांचे असे कथन आहे की, अपघातानंतर तक्रारदारांचे वाहनाचा सर्व्हे करण्यात आला. सदर सर्व्हे रिपोर्टनुसार वि.प. यांचे दायित्व हे रु. 5,36,071/- इतके होते. वि.प. यांनी योग्य त्या कारणासाठीच तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार हे वादातील वाहन तवेरा क्र.एम.एच.09-डी.एम.4347 चे मालक असून त्यांनी सदरचे वाहन कौटुंबिक वापरासाठी घेतले होते. तसेच नमूद वाहनाचा विमा तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीने उतरविला होता. त्याची मुदत दि. 13/08/2009 ते दि. 22/07/2010 अशी आहे. त्याचा विमा हप्ता तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे भरलेला आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण दि. 20/03/2016 रोजी तक्रारदार हे तिर्थक्षेत्रांना भेटी देवून नातेवाईक व पाहुण्यांना घेवून तासगांव मार्गे सांगलीकडे येत असताना विटा-तासगांव रोडवर गाडी ओव्हरटेक करत असताना अचानक कोल्हा/कुत्रा आडवा आल्याने त्यास वाचविणेसाठी गाडी उजव्या बाजूस घेतली असता रस्त्याच्या उंच, सखल भागामुळे तक्रारदाराचे नमूद वाहन उजव्या बाजूस कलंडले. सदर झाले अपघातात तक्रारदार हे जखमी झाले होते. तक्रारदाराचे वैध ड्रायव्हींग लायसेन्स असून ते स्वतः ड्रायव्हींग करत होते तसेच सदर अपघातात तवेरा वाहनाचे पूर्ण नुकसान झाले. तक्रारदार जखमी झालेने त्यांना सिव्हील हॉस्पीटल येथे अॅडमिट केले होते. तक्रारदाराने अपघाताची घटना अपघातानंतर वि.प. कंपनीस कळविली असता वि.प. यांनी अपघातग्रस्त तवेरा वाहन एम.आय.डी.सी. शिरोली येथे शोरुममध्ये सोडणेस सांगितले. विमा कंपनीने सदर वाहन टोटल लॉस म्हणून जाहीर केले. सदर युनिक अॅटोमोबाईल शोरुमने नमूद वाहनाचे असेसमेंट केले व रक्कम रु. 8,68,957/- दुरुस्ती इस्टीमेट काढले. तक्ररदाराने वि.प. विमा कंपनीकड सर्व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर केला असता वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराचे नमूद वाहन हे प्रायव्हेट/खाजगी भाडे तत्वावर प्रवाशांकडून भाडे आकारुन प्रवासासाठी वापरले. त्यामुळे तक्रारदाराने विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला आहे असे कारण देवून तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारलेबाबत वि.प. ने तक्रारदाराला कळविले. परंतु याकामी सदर अपघातातील मयत मंगल उपाध्ये हिच्या वारसांनी सांगली येथील मोटार अपघात विमा दावा न्यायालय येथे क्लेम नं 249/2016 दाखल केला होता. तसेच या अपघातातील इतर जखमी स्त्रीयांनीही सांगली येथील मोटार अपघात न्यायाधिकरण यांचेसमोर क्लेम दाखल केला होता. सदर सर्व क्लेम हे गुणदोषांवर चालून त्याचा निकाल झाला आहे व वि.प. विमा कंपनीस जबाबदार धरलेले आहे. त्यामध्ये विमा पॉलिसीचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट व सिध्द झाले आहे. सदरचे एम.ए.सी. नं. 175/17, 176/17, 177/17, 178/17 या कामातील निकालपत्रे तक्रारदाराने दि.4/11/2019 चे कागदयादीसोबत याकामी दाखल केली आहेत व सदरचे सर्व क्लेम मंजूर झालेले आहेत हे स्पष्ट होते.
8. वरील सर्व विमा क्लेमच्या कामांमध्ये तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला ही बाब सिध्द झाली नाही तसेच सांगली येथील मोटार अपघात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वि.प. विमा कंपनीने आदेशीत रकमा जमा केल्या नाहीत. तसेच वर नमूद आदेशाविरुध्द अपिलही दाखल केलेले नाही असे स्पष्ट हेाते.
9. याकामी तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराने सदरचे वाहन हे प्रवासी वाहतुकीकरिता प्रवाशांकडून भाडे आकारुन वापरले म्हणून विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला आहे असे कारण देवून नाकारला आहे. परंतु इन्व्हेस्टीगेटर आशिष करंदीकर यांचे इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टवरुन सदरचा विमाक्लेम नाकारला आहे हे स्पष्ट होते. परंतु याकामी वि.प. ने नमूद करंदीकर इन्व्हेस्टीगेटर यांचे शपथपत्र/अॅफिडेव्हीट दाखल केलेले नाही. तसेच प्रवाशांपैकी कुणाचेही अॅफिडेव्हीट सदर वाहन हे भाडे आकारुन प्रवासासाठी वापरलेबाबत याकामी वि.प. ने दाखल केलेले नाही. थोडक्यात वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारणेसाठी दिलेले कारण म्हणजेच विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला ही बाब शाबीत करणेसाठी कोणताही सबळ व ठोस पुरावा याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने वादातील वाहन तवेरा हे प्रवाशांकडून भाडे घेवून प्रवासी वाहतुक करणेसाठी वापरले हाते व त्यामुळे विमा पॉलिसी अटी व शर्तींचा भंग तक्रारदाराने केला आहे ही बाब शाबीत करणेत वि.प. हे अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे वि.प. ने सदरचे कारण देवून तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला ही तक्रारदाराला दिलेली सेवेतील त्रुटी/कमतरता आहे हे स्पष्ट व सिध्द होते. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
10. याकामी मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण याकामी वि.प. यांनी कबाडे सर्व्हेअर यांचेमार्फत अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे केलेला होता. तो सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे. प्रस्तुत सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन करता तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाची आय.डी.व्ही. (विमा पॉलिसीप्रमाणे) रक्कम रु. 8,61,071/- आहे. सदर वाहन हे अपघातानंतर विक्री केलेस अंदाजे विक्री किंमत रक्कम रु.3,25,000/- धरली आहे. म्हणजेच आय.डी.व्ही. रु. 8,61,071/- मधून विक्रीची अंदाजीत किंमत रु. 3,25,000/- वजा केली असता रक्कम रु.5,36,071/- एवढा अपघातग्रस्त वाहनाचा टोटल लॉस झाला आहे असे सर्व्हे रिपोर्टवरुन स्पष्ट होते. तसेच रक्कम रु.2,000/- एक्सेस म्हणून अथवा सॅल्वेज व्हॅल्यू म्हणून सदर रकमेतून वजा जाता रक्कम रु. 5,34,071/- एवढस विमा क्लेम तक्रारदार हे वि.प. कंपनीकडून मिळणेस पात्र आहेत हे स्पष्ट होते. तसेच सदर विमा क्लेम रकमेवर विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 5,34,071/- अदा करावेत. तसेच सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.