तक्रार दाखल ता.10/07/2014
तक्रार निकाल ता.21/12/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे कावणे, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. वि.प.क्र.1 ही विमा कंपनी आहे व वि.प.क्र.2 दूध व्यावसायिक संस्था आहे. तक्रारदाराने स्वत:च्या व कुटूंबाच्या उपजिवीकेसाठी वि.प.क्र.2 संस्थेकडून कर्जाऊ रक्कम घेऊन एच.एफ.संकरीत गाय रक्कम रु.40,000/- ला खरेदी केली होती. सदर गायीचा विमा वि.प.क्र.2 यांचेमार्फत वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे दि.12.10.2012 ते दि.11.10.2013 असा होता व पॉलीसीचा क्र.160500/47/12/01/00000470 असा होता. वर नमुद केलेप्रमाणे तक्रारदाराचे गायीची विमा पॉलीसी सुरु असतानाच तक्रारदाराची दुभती गाय तापाने आजारी पडली. तिला तक्रारदाराने योग्य ते औषधोपचार केले. परंतु सदरची गाय दि.16.12.2012 रोजी निमोनिया या आजाराने मयत झाली. सदर गायीचे रितसर पोस्ट मार्टम करुन तिला दफन केले. तक्रारदाराने सर्व कागदपत्रांसोबत गायीचा विमा क्लेम वि.प.विमा कंपनीकडे सादर केला. परंतु वि.प.विमा कंपनीने दि.30.03.2013 रोजी तक्रारदाराचे मयत गायीचे व विमाकृत गायीचे वर्णनामध्ये फरक असलेचे कारण देऊन तक्रारदाराचे गायीचा विमा क्लेम नामंजूर केला. सदर तक्रारदारची विमाकृत गायच मयत होऊनसुध्दा वि.प.ने चुकीचे कारण देऊन विमा क्लेम नाकारला व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 विमा कंपनीकडून संकरित एच.एफ.गायीची किंमत रक्कम रु.40,000/-, दूधाचे झाले नुकसानीची रक्कम रु.27,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.7,500/- अशी एकूण रक्कम रु.99,500/- वि.प.क्र.1 विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, निशाणी-3 चे कागद यादीसोबत अ.क्र.1 ते 4 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे गायीची विमा पॉलीसी प्रत, वि.प.कडील कॅटल इन्शुरन्स पॉलीसी, तक्रारदाराचे गायीचे तीन फोटो, वि.प.विमा कंपनीचे विमा क्लेम नकारलेचे पत्र, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे या कामी तक्रारदाराने दाखल केले आहेत.
5. प्रस्तुत कामी वि.प.यांनी म्हणणे/कैफियत, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, पुराव्याचे शपथपत्र, वगैरे कागदपत्रे वि.प.ने या कामी दाखल केली आहेत.
6. वि.प.ने त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व मजकूर फेटाळलेला आहे. वि.प.ने तक्रादाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
अ तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबुल नाही.
ब वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. सबब, तक्रारदाराला कोणतीही रक्कम देणेस वि.प.हे जबाबदार नाहीत.
क तक्रारदाराने वि.प.क्र.2 कडून रक्कम रु.40,000/- कर्ज घेतलेचे मान्य व कबुल नाही.
ड तक्रारदाराने त्याचे गायीचा विमा वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलीसी नंबर व कालावधी तक्रार अर्जात नमुद केलेप्रमाणे आहे ही बाब मान्य व कबुल आहे. परंतु प्रस्तुत विमा पॉलीसीतील अटी व शर्थीनुसारच सदर वि.प.ची जबाबदारी आहे.
इ तक्रारदाराचे गायीचा मृत्युनंतर तक्रारदाराने वि.प.कडे विमा क्लेम सादर केलेनंतर वि.प.विमा कंपनीने इन्व्हेस्टीगेटर श्री.काकडे यांचेकडे इन्व्हेस्टीगेशनचे काम दिले. सदर इन्व्हेस्टीगेटर यांनी इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट या कामी दाखल केला आहे. त्यामध्ये असे नमुद आहे की, तक्रारदाराने कोपार्ड बाजारातून गाय खरेदी केलेली नाही तर एका व्यक्तीकडून गाय खरेदी केली आहे. प्रस्तुत गाय ही दि.30.10.2012 रोजी आजाराने मयत झाली आहे. तर विमा पॉलीसीचा कालावधी दि.12.10.2012 पासून चालू झाला होता, म्हणजेच गायीचा मृत्यु हा विमा पॉलीसी घेतलेनंतरच एक महिन्याच्या आतच झाला असलेने पॉलीसी अटी व शर्थीनुसार जर जनावर हे पॉलीसी उतरविलेनंतर एक महिन्याच्या आत मयत झाले तर विमा क्लेम देणे लागत नाही. त्यामुळे तक्रारदाराने कागदपत्रे खोटी व चुकीचे दाखविलेली आहेत. तसेच तक्रारदाराची मयत गाय व विमाकृत गाय यांचे वर्णन हे वेगवेगळे व भिन्न स्वरुपाचे आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराचा विमा क्लेम देणेस वि.प.विमा कंपनी जबाबदार नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशा स्वरुपाचे म्हणणे वि.प.यांनी या कामी दिले आहे.
7. वर नमुद दाखल सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार गायीचा विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
8. मुद्दा क्र.1 ते 4:- वर मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने त्याचे गायीचा विमा वि.प.विमा कंपनीकडे उतरविला होता व तो गाय मयत झाली त्या तारखेस चालू होता ही बाब वि.प.यांनी मान्य व कबुल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे.
9. तसेच तक्रारदारची प्रस्तुत विमाकृत गाय ही दि.20.12.2012 रोजी तापाने आजारी होती व तिच्यावर तक्रारदाराने औषधोपचार केले तरीही दि.16.12.2012 रोजी प्रस्तुत तक्रारदारची गाय मयत झाली आहे ही बाब तक्रारदाराने शपथेवर अॅफीडेव्हीट देऊन सिध्द केली आहे. प्रस्तुत गाय मयत झालेनंतर तक्रारदाराने रितसर पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट करुन गायीची विल्हेवाट लावलेचे तसेच प्रस्तुत गाय ही दि.26.12.2012 रोजी मयत झालेबाबत श्रीकृष्ण सहकारी दूध संस्था, कावणे चे सचिव श्री.कृष्णात ढगे यांनी इन्व्हेस्टीगेटर काकडे यांना दिले माहितीमध्ये स्पष्टपणे नमुद आहे की, तक्रारदाराची गाय दि.26.12.2012 रोजी मयत झाली व गायीचे पंचनामा व पोस्ट मार्टेम डॉ.सौ.भूतकर मॅडम यांनी केला व सदर गायीची विल्हेवाट लावली वगैरे नमुद सचिव यांनी दिले माहिती इन्व्हेस्टीगेटरने त्यांचे रिपोर्टमध्ये नमुद केली आहे. यावरुन म्हणजेच श्री.कृष्ण सहकारी दूध संस्थेचे सचिवांनी इन्व्हेस्टीगेटरला अशी माहिती दिलेचे सदर अहवालावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदाराची म्हैसे दि.26.12.2012 रोजी मयत झालेचे सिध्द होते. वि.प.ने इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट दाखल केला आहे पण त्यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही व इन्व्हेस्टीगेटरला जी सपोर्टींग माहिती दिली आहे, त्या लोकांचे शपथपत्र या कामी दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदाराची गाय ही दि.26.12.2012 रोजी मयत झालेची श्री.कृष्ण सहकारी दूधसंस्था, कावणेचे सचिव श्री.कृष्णात ढगे यांनी दिलेची माहिती ही योग्य आहे असे स्पष्ट होते. सबब, तक्रारदाराला प्रस्तुत गायीचा विमा क्लेम वि.प.कडून मिळणे आवश्यक असतानाही वि.प.ने विनाकारण प्रस्तुत तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळला आहे व तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे हे स्पष्ट होते. सदर कामी, आम्हीं मे.वरिष्ठ न्यायालयाचे पुढील न्यायनिवाडा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
2011(3) CPR 107 -
New India Assurance Co. Ltd. …Appellant
Versus
Chanda Sunil Sawant …Respondent
Head Note: Consumer Protection Act, 1986 – Sec.2(1)(g) – Deficiency in Service – Repudiation of insurance claim – on ground that complainant did not file any evidence to prove that deceased died by accident and no FIR, Police Panchnama or hospital certificate has been filed - Death Certificate issued by the local authority available on record – shows death due to accident – such death concerned by the Insurance Policy – Interference with the order passed by the forum declined.
Important Point: Where death certificate issued by the local authority has been filed showing death on account of accident; insurance claim cannot be repudiated for want of FIR or Police Panchnama or hospital certificate.
सबब, वरील सर्व कागदपत्रे, लेखी-तोंडी युक्तीवाद व मे.वरिष्ठ न्यायालयाने वरील न्यायनिवाडयात दिलेले निर्देश या सर्वांच ऊहापोह करता, सदर तक्रारदार हे वि.प.विमा कंपनीकडून विमा क्लेम रक्कम रु.40,000/- (अक्षरी रक्कम रुपये चाळीस हजार मात्र) तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार मात्र) वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराला गायीचे विम्यापोटी रक्कम रु.40,000/- (अक्षरी रक्कम रुपये चाळीस हजार मात्र) अदा करावेत.
3 तक्रारदाराला वि.प.क्र.1 ने मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावेत.
4 वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.क्र.1 यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.