जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 259/2016.
तक्रार दाखल दिनांक : 20/08/2016.
तक्रार आदेश दिनांक : 09/06/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 09 महिने 20 दिवस
हनुमंत पि. बाबू पौळ, वय 59 वर्षे, व्यवसाय : शेती व
व्यवसाय, रा. आळणी, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., लातूर
विभागीय कार्यालय, शाखाधिकारी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स
कंपनी लि., शिवाजी चौक, अॅक्सीस बँकेच्या शेजारी,
किंग्ज् कॉर्नर बिल्डींग, दुसरा मजला, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : एच्.एम्. उमरदंड
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : ए.ए. दानवे
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांच्या मालकीच्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा बोलेरो मॅक्सी पिक-अप वाहन क्र.एम.एच.25/पी.4655 चा विरुध्द पक्ष यांच्याकडे पॉलिसी क्र.2311003115P104610507 नुसार दि.1/7/2015 ते 3/6/2016 कालावधीकरिता विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्ता यांच्या वाहनाचे चालक संजय मारुती जाधव हे दि.3/12/2015 रोजी रात्री 8.00 वाजता वाहन घेऊन ढोकी येथून आळणी गावाकडे येत असताना समोरुन येणा-या वाहनाच्या प्रकाशझोतामुळे वाहनाचे ब्रेक दाबले असता वाहन घसरुन रस्त्याच्या कडेला असणा-या बाभळीच्या झाडावर आदळले. अपघातामध्ये वाहनाचे रु.2,10,000/- नुकसान झाले. घटनेबाबत वाहनचालक संजय मारुती जाधव यांनी पोलीस स्टेशन, ढोकी येथे फिर्याद दिली आणि घटनेबाबत स्टेशन डायरी क्र.336/2015 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दि.4/12/2015 रोजी घटनास्थळ पंचनामा केलेला आहे. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, पोलीस फिर्याद देत असताना वाहनचालक संजय मारुती जाधव ऐवजी संजय मारुती माळी अशा चुकीच्या नांवाची नोंद पोलिसांनी केली. तक्रारकर्ता यांच्या वाहनाचा सर्व्हेअरकडून सर्व्हे करण्यात आला आणि त्याचा अहवाल विरुध्द पक्ष यांना सादर केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा केला असता दि.13/7/2016 रोजीच्या पत्राद्वारे घटनास्थळ पंचनाम्यानुसार अपघातसमयी वाहन श्री.संजय मारुती माळी हे चालवत होते आणि त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना दाखल केला नाही आणि विमा दावा प्रपत्रावर दुस-या व्यक्तीचे चालक म्हणून (संजय मारुती जाधव) नांव लिहिल्यामुळे विमा दायित्व अमान्य करुन विमा दावा बंद केला. अशाप्रकारे उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.2,10,000/- नुकसान भरपाईसह मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील मजकूर व विधाने अमान्य केली आहेत. त्यांचा असा प्रतिवाद आहे की, तक्रारकर्ता यांनी संजय मारुती माळी यांना वाहन चालवण्याकरिता ताब्यात दिले आणि संजय मारुती माळी हे वाहन चालवत असताना संबंधीत वेळी व ठिकाणी अपघात घडलेला आहे. संजय मारुती जाधव नांवाची व्यक्ती अपघातसमयी वाहन चालवत नव्हती. संजय मारुती जाधव नांवाची व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीकडे वाहन चालविण्याचा परवाना असेल तर त्याचा या अपघात व प्रकरणाशी काहीही संबंध नाही. संजय मारुती माळी हे अपघातसमयी वाहन चालवत होते आणि त्यांनीच पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे. विरुध्द पक्ष यांचे पुढे असे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर नोंदणीकृत सर्व्हेअर व लॉस असेसर यांच्याकडून स्पॉट सर्व्हे अहवाल, तसेच फायनल सर्व्हे अहवाल व बील चेक अहवाल घेतले. त्यानुसार वाहन दुरुस्तीकरिता रु.64,000/- नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. विरुध्द पक्ष यांनी दि.13/7/2016 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर केलेला आहे. सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही आणि तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विरुध्द पक्ष यांनी विनंती केलेली आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विरुध्द पक्ष यांचे विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्ता यांच्या वाहनाचा विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा उतरवल्याबाबत, वाहनाचा अपघात झाल्याबाबत, विमा दावा दाखल केल्याबाबत व विमा दावा नामंजूर केल्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही. हे खरे आहे की, अपघातसमयी वाहन चालवणारे श्री. संजय मारुती माळी यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल न केल्यामुळे व विमा दावा प्रपत्रामध्ये संजय मारुती जाधव या दुस-या व्यक्तीचे चालक म्हणून नांव लिहिल्यामुळे तक्रारकर्ता यांचा विमा दावा बंद केलेला आहे.
5. वादविषयाचे अनुषंगाने उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अपघातसमयी वाहन चालविणारा चालकाच्या नांवाची नोंद व त्या व्यक्ती भिन्न असल्यामुळे विमा दावा नामंजूर केल्याचे निदर्शनास येते. असे दिसते की, तक्रारकर्ता यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर श्री. संजय मारुती माळी या व्यक्तीने फिर्याद दिलेली आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी दि.5/12/2015 रोजी विरुध्द पक्ष यांना दिलेल्या पत्रामध्ये अपघातग्रस्त वाहन संजय मारुती माळी हे चालवत होते, असा उल्लेख केलेला आहे. परंतु तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर संजय मारुती जाधव यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला आहे. आता प्रश्न केवळ हाच आहे की, संजय मारुती माळी व संजय मारुती जाधव अशी नांवे असणा-या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत की ती दोन नांवे असणारी एकच व्यक्ती आहे. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर संजय मारुती जाधव यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्या शपथपत्रामध्ये फिर्याद देतेवेळी संजय मारुती जाधव असे नांव सांगितले असता पोलिसांनी त्यांच्या आडनांवाच्या जागी जातीचा उल्लेख करुन संजय मारुती माळी असे नांवे लिहिल्याचे; तसेच संजय मारुती जाधव व संजय मारुती माळी ह्या नांवाची तेच एकमेव व्यक्ती असल्याचे नमूद केलेले आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी संजय मारुती जाधव (माळी) अशा नांवे तलाठी, सज्जा आळणी यांचे जातीचे प्रमाणपत्र दाखल केले असून त्यामध्ये संजय मारुती जाधव (माळी) जातीने हिंदू-माळी असल्याचे नमूद केलेले आहे. प्रस्तुत कागदपत्रांची दखल घेतली असता फिर्यादीमध्ये करण्यात आलेली संजय मारुती माळी यांची स्वाक्षरी व संजय मारुती जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रावरील स्वाक्षरीमध्ये साम्य आढळून येते.
6. संजय मारुती माळी व संजय मारुती जाधव ह्या दोन्ही व्यक्ती एकच असल्याबाबत तक्रारकर्ता यांनी आवश्यक पुरावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या प्रतिवादापृष्ठयर्थ कोणताही योग्य व उचित पुरावा दिलेला नाही. संजय मारुती माळी व संजय मारुती जाधव ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याबाबत व अपघातसमयी संजय मारुती जाधव यांच्याऐवजी संजय मारुती माळी नांवाची व्यक्ती वाहन चालवत असल्याचे सिध्द करण्यास विरुध्द पक्ष हे अयशस्वी ठरले आहेत. आमच्या मते संजय मारुती जाधव व संजय मारुती माळी ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत आणि अपघातसमयी ती व्यक्तीच वाहन चालवत होती. असे असताना विरुध्द पक्ष यांनी तांत्रिक बाबीवरुन तक्रारकर्ता यांचा विमा दावा अमान्य करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे व तक्रारकर्ता हे विमा रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे सिध्द होते.
7. तक्रारकर्ता यांचे वादकथनाप्रमाणे अपघातामध्ये त्यांचे वाहन क्षतीग्रस्त होऊन रु.2,10,000/- चे नुकसान झालेले आहे. विरुध्द पक्ष यांनी वाहनाचे नुकसानीचे मुल्यनिर्धारण करण्यासाठी सर्व्हेअर व लॉस असेसर व्ही.के. कुलकर्णी यांच्यामार्फत वाहनाचा सर्व्हे केलेला असून त्याप्रमाणे सर्व्हे अहवाल व बील चेक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे. त्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता वाहनाच्या दुरुस्तीकरिता केलेल्या खर्चाकरिता रु.64,000/- मुल्यनिर्धारण करुन त्याप्रमाणे नुकसान भरपाई निश्चित केली आहे. सर्व्हेअरचा प्रस्तुत अहवाल तक्रारकर्ता किंवा विरुध्द पक्ष यांनी अमान्य केला नाही किंवा त्या अहवालाचे उचित पुराव्याद्वारे खंडन केलेले नाही. सर्व्हेअर ही नुकसानीचे मुल्यनिर्धारण करणारी स्वतंत्र यंत्रणा असून त्यांच्या अहवालास योग्य आक्षेप दिसून येत नसेल तर नुकसान भरपाईचे त्यांनी केलेले मुल्यनिर्धारण ग्राह्य धरणे उचित व संयुक्तिक आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे रु.64,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत आणि विमा दावा अयोग्य कारणास्तव नामंजूर केल्यामुळे विमा दावा नामंजूर केल्याची तारीख 13/7/2016 पासून देय विमा रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार ठरतात. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विमा रक्कम रु.64,400/- अदा करावी. तसेच प्रस्तुत रकमेवर दि. 13/7/2016 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
ग्राहक तक्रार क्र.259/2016.
(3) उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(4) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क द्यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-