न्यायनिर्णय
(न्यायनिर्णयाचा दिनांक आज दि. 30 ऑक्टोबर, 2018)
न्यायनिर्णय द्वारा- मा.अध्यक्ष श्री. रा.गो. वानखडे.
1. तक्रारीतील हकीकत खालील प्रमाणे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या एम.आय.एस. योजनेमध्ये 6 वर्षांसाठी एकूण रु.4.5 लाख रुपये ता.12.06.2009 रोजी जमा केले होते. त्या योजनेप्रमाणे ती मुदत ता.12.06.2015 पर्यंत होती. या रकमेसाठी ब्रोकरेज म्हणून 1 टक्का रक्कम रु.4,500/- ब्रोकर यांना दिली होती. या रकमेवर (रु.4.5 लाख) 5 टक्के रकमेचा बोनस ता.12.06.2015 रोजी अस्तित्वात असलेल्या नियमाप्रमाणे रु.22,500/- मिळणार होता. परंतु काही कारणास्तव मुदतीपुर्वीच ता.21.11.2014 रोजी या योजनेमध्ये भरलेल्या रकमेचे खाते बंद करावयाचे ठरले, व त्याप्रमाणे फॉर्म भरुन देण्यात आले. ता.01.12.2014 रोजी त्या संबंधीचा धनादेश तक्रारदारास मिळाला. सामनेवाले यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. कारण सामनेवाले यांनी बोनसची रक्कम दिलेली नव्हती. त्या योजनेतील नियमांप्रमाणे जरी मुदतीपुर्वी खाते बंद केले असेल तर मिळणा-या बोनस पासुन तक्रारदारास वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
3. सामनेवाले यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रार ही मुदतबाहय असल्याने खारीज करावी असे म्हटले आहे. तक्रारदार यांनी वर नमुद केलेल्या योजनेमध्ये पैसे जमा केल्याचे व त्याची मुदत पुर्ण झाल्यावर बोनस मिळण्यासंबंधीचा मजकूर मान्य केला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की. त्या योजनेची मुदत पुर्ण झाल्यावर ठरावीक रकमेचाच बोनस मिळेल याची शासवती नसते. कारण वेळोवेळी बदलणा-या नियमांमध्ये देणा-या रकमेवर फरक पडू शकतो. तक्रारदार यांनी मुदतीपुर्वीच रक्कम उचलल्यामुळे मुदत पुर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम त्यांस मिळणार नाही. सामनेवाले यांच्या विभागाने नियमाप्रमाणे मिळणारी रक्कम काढून तक्रारदारास धनादेशाव्दारे दिलेली आहे. त्यामुळे तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे.
4. तक्रारदार तसेच सामनेवाले यांचे वकील श्री.एच.डी.राठोड यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तसेच अभिलेखातील कागदपत्रांचे सखोल वाचन केले.
5. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे ठराविक रक्कम ठराविक कालावधी करीता एका योजनेमध्ये जमा केली होती. ज्या योजनेमध्ये मुदतीच्या वेळेस बोनस मिळणार होता. पोस्ट ऑफीस (मासिक उत्पन्न) 1987 चे नियम योजनेस लागु होते. योजनेमध्ये जमा केलेली रक्कम मुदतपुर्ण झाल्यानंतर घेण्याऐवजी मुदतीपुर्वीच ही रक्कम तक्रारदार यांनी उचलली. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार मुदतीपुर्वीच जर रक्कम उचलली तर त्यांस त्या योजनेमध्ये बोनस मिळणार नाही असे नमुद न केल्यामुळे ठराविक कालावधी करीता जी रक्कम सामनेवाले यांच्याकडे जमा होती त्या प्रमाणात रकमेचा बोनस तक्रारदारास मिळावयास पहिजे. परंतु नियमांचे वाचन केले असता, तक्रारदार यांच्या युक्तीवादास कोणताही अर्थ उरत नाही. त्या योजनेमध्ये पुर्ण कालावधी करीताच जर रक्कम जमा असेल, आणि मुदत संपल्यानंतरच ती रक्कम तक्रारदारास मिळत असेल तरच नियमाप्रमाणे बोनस घेण्याचा अधिकार तक्रारदारास राहिला असता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फायदा जो तक्रारदार यांनी नमुद केला तो तक्रारदारास मिळू शकत नाही. तसेच या प्रकरणात सामनेवाले यांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होत नाही.
6. वरील कारणास्तव तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यात यावी असे मंचाचे मत आहे. सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
- आ दे श -
(1) तक्रारदार यांची तक्रार क्रमांक-91/2017 खारीज करण्यात येते.
(2) तक्रारदार व सामनेवाले यांनी आपला आपला खर्च सोसावा.
(3) अंतिम न्यायनिर्णयाची प्रत तक्रारदार व सामनेवाले यांना ग्राहक संरक्षण नियम, 2005 मधील नियम 18 (6) मधील तरतुदीनुसार शेवटच्या पृष्ठावर सदर नोंदीसह साधारण टपालाने पाठविण्यात यावी.
(4) अंतिम न्यायनिर्णयाची साक्षांकित सत्यप्रत उभय पक्षकारांना त्यांचे अर्जान्वये ग्राहक संरक्षण नियम, 2005 मधील नियम 21 मधील तरतुदीनुसार देण्यात यावा.
(5) सदस्य संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
दिनांकः 30 ऑक्टोबर, 2018.
ठिकाणः वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.
जरवा/