श्री. प्रदीप पाटील, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 26/09/2014)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, वि.प.क्र. 1 व 2 हे वि.प.क्र. 3 व 4 निर्मित कारचे विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याला वि.प.क्र. 3 निर्मित वाहनाचे सर्वोत्तम मॉडेल विकत घ्यावयाचे असल्याने वि.प.क्र. 1 कडून Honda CITY 2009-1 हे वाहन विकत घेतले. 31.08.2010 रोजी परिवहन अधिकारी यांचेकडून पंजिबध्द करण्यात आली व तिला एम एच 31 सी एस 6062 असा क्रमांक देण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्त्याने 23.09.2009, 24.11.2009, 24.02.2010 रोजी देखभालीकरीता वि.प.क्र. 1 कडे नेले व वि.प.क्र. 1 यांनी योग्य ती सेवा तक्रारकर्त्याला दिली. दि.16.05.2010 रोजी तक्रारकर्ता सकाळी 5-00 वा. चे सुमारास जपानी गार्डन मार्गे वाहन चालवित होता. त्यावेळी समोरुन काही म्हशी येत असल्याचे तक्रारकर्त्याचे लक्षात आले. तक्रारकर्त्याला वाहनाचा ताबा नियंत्रित न करता आल्यामुळे त्याच्या गाडीची धडक म्हशीला बसली व कार उलटी झाली. तक्रारकर्त्याला क्षणभर काय झाले ते न समजल्याने त्याला फार मोठा मानसिक धक्का बसला व त्यानंतर त्याला लक्षात आले की, वाहनाची एसआरएस यंत्रणा नादुरुस्त झाली व त्यामुळे हवेच्या पीशव्या खुलल्या नाही. याचा परीणाम म्हणजे तक्रारकर्त्याच्या डोक्याला आंतरीक दुखापत झाली. तक्रारकर्त्याने त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला व त्यांनी तक्रारकर्त्याला डॉक्टरकडे नेले आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर घरी जाण्यास परवानगी दिली. तक्रारकर्त्याने त्याच दिवशी पोलिस स्टेशन सदर येथे तक्रार दाखल केली व पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला. काही वेळाने सदर कार वि.प.क्र. 1 यांचेकडे दुरुस्तीसाठी नेण्यात आली व तेव्हापासून आजतागायत त्यांचेकडे पडून आहे. सदरहू कारचा विमा वि.प.क्र. 6 यांचेकडे काढण्यात आलेला आहे. ही वि.प.क्र. 5 ची नागपूर येथील शाखा आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 5 व 6 यांना अपघाताची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्यांच्या प्रतिनीधीने वाहनाचे निरीक्षण केले आणि कारचे मोठया प्रमाणावर झाल्याचे मान्य केले. तक्रारकर्त्याला कारमध्ये अपघाताचे वेळेस हवेच्या पीशव्या न उघडल्यामुळे गाडीमध्ये निर्मितीमध्ये सदोषता आहे असे म्हणावयाचे आहे. म्हणजे गाडीला धडक बसल्यानंतर 15-20 सेकंदामध्ये हवेच्या पीशवीचा उपयोग घेण्याचा निर्णय घेतला जातो आणि 60 ते 80 सेकंदामध्ये चालक आणि प्रवासी या दोघांच्याही हवेच्या पीशव्या पूर्णपणे उघडल्या जातात. तक्रारकर्त्याच्या वाहनाला धडक बसल्यानंतर वाहनाच्या बंपरमध्ये बसविलेले सेंसर क्रियाशिल झाले नाही आणि त्यामुळे हवेच्या पीशव्या उघडल्या नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे कारमध्ये निर्मितीच्या वेळेस सदोषता असल्यामुळे तक्रारकर्त्याने त्यासंबंधी तक्रार वि.प.क्र. 1 ते 4 यांचेकडे केलेली आहे. वि.प.क्र. 3 यांनी 14.06.2010 रोजी तक्रारकर्त्याला उत्तर पाठविले आणि त्यामध्ये गाडीमध्ये लावण्यात आलेले सीट बेल्ट्स हा सुरक्षा यंत्रणेचा भाग असल्यामुळे आणि अपघाता दरम्यान त्यांची कुठेही मोडतोड किंवा नुकसान झालेले नसल्यामुळे तक्रारकर्त्याला कोणतीही इजा किंवा हानी होऊ शकली नाही. त्यांनी पत्रात हे स्पष्ट केले आहे की, धडक जोरदार असल्याशिवाय आणि ती गाडीच्या समोरुन बसल्याशिवाय हवेच्या पीशव्या उघडत नाही. त्यांच्या मते हवेच्या पीशव्या न उघडण्याबाबत कोणताही निर्मिती दोष नाही. त्यांमुळे वाहन दुरुस्त करणे हाच त्यावर उपाय आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याला गाडीच्या दुरुस्तीच्या संबंधी आवश्यक असलेले ईस्टीमेट/अंदाजपत्रक सादर करण्यास सांगण्यात आले. तक्रारकर्त्याच्या मते वि.प.क्र. 3 ने खोटी आश्वासने दिली व त्यामुळे तक्रारकर्त्याच्या जिवास धोका होऊ शकला असता. यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक त्रास झाला व त्याने मंचासमोर सदर तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीद्वारा तक्रारकर्त्याने वि.प.ने या वाहनाचे ऐवजी नविन मेकचे वाहन मिळावे, विवादित वाहनामध्ये चलित न होणा-या सुरक्षा प्रणालीमुळे सहन कराव्या लागलेल्या मानसिक यातनेबाबत नुकसान भरपाई मिळावी, वि.प.कडून रु.10,00,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने एकूण 8 दस्तऐवज तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.वर बजावण्यात आली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. वि.प.क्र. 1 व 2 आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याची तक्रार नाकारुन असे नमूद केले आहे की, 14.06.2010 च्या पत्राप्रमाणे व तज्ञांच्या अहवालाप्राणे Supplemental Restraint System (SRS) या यंत्रणेच्या सेंसरला मार किंवा आघात झाला नाही व तक्रारकर्त्याने सिट बेल्ट्स बांधले नव्हते कारण ते ढिले झालेले नव्हते. तक्रारकर्त्याने दिलेल्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकात असा एकही Supplemental Restraint System (SRS) शी संबंधित वाहनाचा भाग किंवा सेंसर नमूद केलेला नाही. आजही तक्रारकर्ता येऊन Supplemental Restraint System (SRS) ला कसलाही मार किंवा आघात झाला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहन वि.प.कडे 17.05.2010 पासून सोडलेले आहे व ते दुरुस्त करण्यास अद्यापही सांगितलेले नाही, त्यामुळे वाहन आहे त्या स्थितीत उभे आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहन 8 महिने वापरले असून त्या काळात त्याची वाहनाबाबत कुठलीही तक्रार नव्हती. तक्रारकर्त्याने वाहन पार्किंगची रक्कम वि.प.ला दिलेली नाही. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या पत्राला व चौकशीला नेहमीच उत्तरे देऊन समाधान केल्याने त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द चालविण्यायोग्य नाही व त्यामुळे ती खारीज करण्यात यावी.
3. वि.प.क्र. 3 व 4 यांनी प्राथमिक आक्षेपासह आपले लेखी उत्तर दाखल केले. त्यांच्या मते वाहनाचा ड्रायव्हर हा अतिशय जलद गतीने व बेशिस्तीने वाहन चालवित होता व त्याने सीट बेल्टचा उपयोग आवश्यक असतांनाही केला नव्हता. त्याचे बेशिस्तीने वाहन चालविण्यामुळे वाहनाचा अपघात झाला व वाहन क्षतिग्रस्त झाले.
तक्रारकर्ता वाहन 12 जानेवारी, 2007 पासून विनातक्रार चालवित आहे. त्यामुळे अपघाताचेवेळेस एअर बॅग्ज कार्यरत झाल्या नाहीत हे खरे नाही. तक्रारकर्त्याने वाहनाच्या अपघातानंतर दुरुस्तीचा खर्च टाळण्याकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे व वि.प.ला दोष देत आहे. तक्रारकर्ता एकीकडे वाहनामध्ये निर्मिती दोष असल्याचे म्हणतो तर दुसरीकडे नविन याच ब्रांडच्या वाहनाची मागणी करतो. तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील व नोटीसमधील म्हणण्यात घटनाक्रमामध्ये फरण जाणवतो. कधी तक्रारकर्ता आधी वाहन अनियंत्रीत होऊन उलटे झाले व म्हशीला धडक बसल्याचे नमूद करतो तर कधी म्हशीला धडक लागून वाहन अनियंत्रीत झाले व उलट झाल्याचे नमूद करतो. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारिज होण्यायोग्य आहे.
वि.प.निर्मित वाहन हे उच्च गुणवत्ताधारक आहे व तसे प्रमाणपत्र वि.प.ने दाखल केलेले आहे. प्रस्तुत वाहन Supplemental Restraint System (SRS) प्राप्त असल्याने समोर असणा-या चालकाच्या डोक्याला व छातीला समोरुन होणा-या धडकेमुळे इजा होऊ नये याकरीता आहे. ओनर्स मॅन्युअलमध्ये याबाबत समोरुन होणा-या धडकेच्या वेळेस एअर बॅग्ज कार्यरत होता न की त्या बाजूने किंवा हळूवार धडकेच्या वेळेस कार्यरत होत नाहीत. हीच बाब वि.प.क्र. 1 व 2 च्या प्रतिनीधीने दि.14.06.2010 च्या मेलद्वारे स्पष्ट केली.
निर्माता/वि.प.क्र.4 व आणि डिलर यांचेतील व्यवहार हा ‘प्रीसीपॉल टू प्रींसीपॉल’ या तत्वावर चालतो आणि प्रत्येक पक्ष हा त्यांच्या कृतीकरीता स्वतः जबाबदार असतो. सदर प्रकरणी अनेक विवादित प्रश्न असल्याने सदर वाद हा दिवाणी न्यायालयासमोर चालवावयास पाहिजे व मंचाने तसे तक्रारकर्त्याला निर्देश द्यावेत.
आपल्या गुणवत्तेवरील उत्तरामध्ये वि.प.क्र. 3 व 4 ने तक्रारकर्ता हा ग्रा.सं.अ.अंतर्गत त्यांचा ग्राहक नाही, त्यामुळे त्याला त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तसेच अपघातानंतर त्यांचे एरीया मॅनेजर, सर्विस श्री. कुणाल शाह हे यांनी वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर वाहनाचे सीट बेल्ट्स हे वापरात नव्हते असे त्यांना आढळून आले. Supplemental Restraint System (SRS) मध्ये एअर बॅग्ज हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याकरीता सीट बेल्ट वापरात आणणे ही प्राथमिक बाब आहे. तेव्हाच त्याचे कंट्रोल युनिट हे काम करते. परंतू सदर प्रकरणी वाहन चालकाने सीट बेल्टचा उपयोगच केला नव्हता.
वि.प.क्र. 3 व 4 चा प्रत्यक्ष अपघाताशी संबंध नाही, परंतू तरीही ते तक्रारकर्त्याच्या संमतीने आपल्या नागपूरयेथील डिलरशिपकडून दुरुस्त करण्यास तयार आहेत. सदर अपघातास म्हशीचा मालकही जबाबदार आहे व त्याला तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष केले नाही. तसेच वि.प.क्र. 3 व 4 विरुध्द वादाचे कारण सिध्द करणारा एकही कागदोपत्री पुरावा तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही. त्यामुळे सदर तक्रार ही प्राथमिक आक्षेपावर खारिज करण्यात यावी अशी प्रार्थना वि.प.क्र. 3 व 4 ने केलेली आहे.
आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात वि.प.क्र. 3 व 4 ने एस.आर.एस. यंत्रणा ही तज्ञांच्या अहवालाप्रमाणे व दि.14.06.2010 च्या पत्राप्रमाणे अद्यावत आहे व त्याच्या सेंसरला मार किंवा आघात झालेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने सीट बेल्टस् सुध्दा बांधलेले नव्हते व एस.आर.एस.चा संबंधीच्या कोणत्याही पार्टबद्दल नादुरुस्त असल्याबाबत उल्लेख नाही. ते जशेच्या तसेच होते, त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेली तक्रार ही खोटी आहे. तक्रारकर्ता आजही कार घेऊन त्याबाबतची खात्री करु शकतो. वि.प.कडे सदर वाहन आणले त्या स्थितीत आजही उभे आहे व तक्रारकर्त्याने ते दुरुस्त करण्यास सांगितले नाही. तक्रारकर्त्याने पार्किंगचे पैसेसुध्दा वि.प.ला दिलेले नाहीत. वि.प.च्या म्हणण्यानुसार सदर अपघात हा तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या चुकीकरीता वि.प. जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने एस.आर.एस. यंत्रणेत दोष आहे किंवा वाहनात निर्मिती दोष आहे याबाबत तज्ञांचा अहवाल तक्रारीसोबत जोडलेला नाही. तक्रारकर्ता आठ महिन्यांपासून सदर कार वापरीत होता. एकूण आपल्या लेखी उत्तरात वि.प.क्र. 3 व 4 ने तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार नाकारलेली आहे.
5. वि.प.क्र. 5 व 6 यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले व पुढे नमूद केले की, त्यांचेसंबंधी कोणतीही अनियमितता व सेवेतील त्रुटी घडलेली आहे यासंबंधी विवेचन केलेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. तसेच वि.प.क्र. 5 व 6 यांचेकडे त्यांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली किंवा नाही हे स्पष्ट केले नाही व त्यांना कधीही नोटीससुध्दा पाठविण्यात आलेली नव्हती. तक्रारकर्त्याला रीपेयर बील व प्री इंस्पेंक्शन रीपोर्टची मागणी करुनही त्यांनी कागदपत्रांची पूर्तता कधीच केली नाही, त्यामुळे त्यांचा दावा प्रलंबित आहे व प्रतिवादी 5 व 6 यांनी कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे त्यांचेविरुध्दचा दावा खारिज करण्यात यावा असे म्हटले आहे.
6. तक्रारकर्ता तसेच वि.प. यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यांनी सादर केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता, खालील मुद्दे विचारार्थ उपस्थित झाले.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा ग्राहक ठरतो काय ? होय.
2) वि.प.क्र. 1 ते 6 यांनी त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे काय ?
3) तक्रारकर्ता हा त्यांनी केलेल्या प्रार्थनेप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ?
-कारणमिमांसा-
7. सदर प्रकरणात दाखल कागदपत्रे व वि.प. आणि तक्रारकर्त्यांचे कथने यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.क्र. 1 ते 6 चा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ते 4 यांच्याकडून विवादित कार विकत घेतली आहे याबाबत उभय पक्षात वाद नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर प्रकरणी ग्राहक ठरतो. परंतू तक्रारकर्त्याचे वाहनाचा 16.05.2010 रोजी झालेला अपघातामुळे तक्रारकर्त्याची कार स्वतःभोवती गोल गोल फिरत उलटी झाली आणि क्षतिग्रस्त झाली. त्या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या सुरक्षा प्रणाली Supplemental Restraint System (SRS) बसविलेल्या हवेच्या पीशव्या उघडल्या नाहीत, त्यामुळे तक्रारकर्त्याला दुखापत झाली. म्हणजेच तक्रारकर्त्याने वाहन विकत घेतल्यानंतर 7 महिन्यानंतर सदर अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये हवेच्या पीशव्या उघडल्या नाहीत एवढाच आरोप सोडल्यास सदर वाहनामध्ये इतर कोणताही दोष आहे असे तक्रारकर्त्याने नमूद केलेले नाही. म्हणजे वाहन खरेदीपासून तर अपघात होईपर्यंत तक्रारकर्त्याने वाहनाचा पूर्ण उपयोग केलेला आहे व या काळामध्ये वाहनामध्ये कोणताही दोष असल्याचे त्याला आढळून आलेले नाही. तक्रारकर्त्याच्या अर्जावरुन सदर वाहनाची विश्वेशरैय्या राष्ट्रीय तकनिकी अनुसंधान यांचेकडून तज्ञ अहवाल मागविण्यात आला होता. 10 ऑगस्ट, 2012 तज्ञ समितीचा अहवाल मंचासमोर दाखल झाला. तज्ञ समितीने विवादित वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कारचा समोरील भागाचे नुकसान झाल्याचे तसेच रेडिएटरला धक्का लागल्याचे म्हटले आहे. स्टेयरींग व्हील व स्टेयरींग कॉलमला कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. सुरक्षा पट्टे (सीट बेल्ट्स) आहे त्याच स्थितीत आहेत. चेसिस मेंबर खुप जास्ती अपघातग्रस्त झालेले नाही आणि जीथे सेंसर लावले होते, ज्यामुळे हवेच्या पीशव्या उघडतात त्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. कारच्या मागिल भागाला नुकसान झालेले आहे आणि कारच्या काचा फुटलेल्या आहेत. गाडीच्या चालकाच्या बाजूच्या दारास नुकसान झालेले आहे. गाडीच्या उत्पादकाकडून पुरविण्यात आलेल्या साहित्यामध्ये असे म्हटले आहे की, हवेच्या पीशव्या फुगण्याकरीता किंवा उघडण्याकरीता गाडीच्या समोरुन मोठया प्रमाणावर आघात झाल्याशिवाय त्या उघडल्या जात नाहीत. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात येतो की, गाडीला समोरुन जबरदस्त धक्का न बसल्यामुळे हवेच्या पीशव्या उघडल्या नाहीत आणि चेसिस मेंबरस् ज्यावर हवेच्या पीशव्यांचे सेंसरस् लावलेले असतात, त्यांना कुठलेही नुकसान झालेले नाही. तसेच सुरक्षा पट्टेसुध्दा चांगल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे समोरुन जबरदस्त धक्का लागलेला नाही.
8. तक्रारीस दाखल केलेल्या लेखी उत्तरामध्ये वि.प.क्र. 1 ते 4 यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, वाहन विकत घेतल्यापासून अपघात होईपर्यंतच्या काळामध्ये वाहनात कुठल्याही प्रकारची तक्रार वा दोष असल्याचे कथन तक्रारकर्त्याने कधीही केले नाही. अपघातापर्यंत वाहनात कुठल्याही प्रकारचा निर्मिती दोष असल्याचेही तक्रारकर्त्याने या कालावधीत म्हटले नाही. तज्ञांच्या अहवालानुसार वाहनातील हवेच्या पीशव्या या या वाहनाला समोरच्या भागाने जबरदस्त आघात झाल्याशिवाय उघडत नाहीत. तसेच वाहनाच्या मॅन्युयलमध्येही ही बाब नमूद करण्यात आलेली आहे. तज्ञांच्या अहवालाला खोडून काढणारा कुठलाही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे की, सदर वाहनातील हवेच्या पीशव्या न उघडल्याने वाहनात निर्मिती दोष आहे हे मान्य करण्यायोग्य नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेले विविध न्यायनिवाडे सदर तक्रारीशी संबंधित नाही व त्यातील तथ्ये सदर प्रकरणास लागू पडत नाही.
9. तज्ञांच्या अहवालानुसार तक्रारकर्त्याच्या वाहनात निर्मिती दोष नाही हे सिध्द झाले असले तरीही तक्रारकर्ता त्यांचे अपघातग्रस्त वाहन विमा कंपनीच्या नियमानुसार व प्रचलित पध्दतीनुसार दुरुस्त करुन, दुरुस्ती खर्चाची प्रतिपूर्ती विमा कंपनीकडून करु शकतो आणि असे करण्यास तक्रारकर्ता मुक्त आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येत असून, तक्रारकर्ता आपले वाहन दुरुस्त करुन, दुरुस्ती खर्चाची प्रतिपूर्ती विमा कंपनीकडून योग्य विमा दावा दाखल करुन घेण्यास मुक्त आहे.