जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 1469/2010 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 03/12/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-01/12/2015.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि,जळगांव
तर्फे श्री.श्रीपाद श्रीनिवास जोशी,
जैन व्हॅली, शिरसोली रोड,जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. दि.प्रोफेशनल कुरियर्स, अडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफीस,
पहीला मजला, युनीट नं.123 ते 128 सहार कार्गो इस्टेट,
तरुण भारत सोसायटी, अंधेरी (पू) मुंबई 99.
2. दि.प्रोफेशनल कुरियर्स, कॉर्पोरेट ऑफीस, तळमजला,
डायमंड हाऊस, न्यु लिंक रोड, ओशिवरा,
जोगेश्वरी (प.), मुंबई 02.
3. दि.प्रोफेशन कुरियर्स,
दुकान नंबर 260/261, तळमजला, नवीन भिकमचंद जैन मार्केट,
जळगांव 01. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.पंकज अच्युत अत्रे वकील.
सामनेवाला क्र. 1 व 2 तर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार ही कंपनी कायदयाप्रमाणे नोंदणीकृत कंपनी आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 हे प्रोफेशनल कुरियर्स चे नावाने कुरियरचा व्यवसाय करतात. सामनेवाला क्र. 3 हे सामनेवाला क्र. 1 व 2 चे कार्यालय आहे. तक्रारदार यांचा सामनेवाला यांचेशी नियमित व्यवहार आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेचा वापर करतात. तक्रारदाराने गॅस क्रोमॅटोग्राफ नावाची एकुण 2 मशिन्स नवी दिली येथील श्री.ग्यान बात्रा, मे न्युकॉन इंजिनअर्स यांचेकडे पाठवायची होती. सामनेवाला ही तक्रारदाराचे सामानाची नियमित ने-आण करणारी कंपनी असल्यामुळे तक्रारदाराने दोन मशिन्स नवी दिल्ली येथे पाठविण्यासाठी सामनेवाला क्र. 3 यांचेशी संपर्क साधला व सामनेवाला क्र. 3 यांच्या सांगण्यानुसार आवश्यक ती कारवाई करुन तक्रारदाराने दोन्ही मशिन्स नवी दिल्ला पाठविण्यासाठी दि.19/5/2009 रोजी सामनेवाला यांचे ताब्यात दिल्या. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना त्याबाबत पावत्या दिल्या. वाहतुकीच्या दरम्यान सामनेवाला यांचे हलगर्जीपणामुळे व सेवेतील त्रृटीमुळे पावती क्रमांक 303209945 नुसार पाठविलेले मशिन गहाळ झाले केवळ पावती क्र.303209944 नुसार पाठविलेले मशिन श्री.ग्यान बात्रा यांना मिळाले. याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेशी वेळेवेळी पत्र व्यवहार व ई-मेल केले आहेत व चौकशी केली आहे. सामनेवाला यांनी गहाळ झालेल्या मशिन बाबत कोणताही तपास केला नाही व ते मशीन शोधले नाही शेवटी ते मशिन सापडत नसल्याचे लेखी पत्र तक्रारदारास दि.16/7/2009 रोजी दिले. दि.17/7/2009 रोजी तक्रारदार तर्फे श्रीपाद जोशी यांनी सामनेवाला यांना पत्र पाठवुन सदरचे मशिन उपलब्ध न झाल्यामुळे कंपनीचे मोठया प्रमाणांवर नुकसान झाले आहे असे कळविले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि.14/8/2009 रोजी उत्तर देऊन कुरियरच्या पावतीवरील नियम क्र. 7 चा हवाला देऊन कुरियर कंपनीची जबाबदारी जास्तीत जास्त रु.100/- मात्र असल्याचे कळविले. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाला यांचे चुक असल्यामुळे त्यांनी दिलगीरी व्यक्त केली त्याचबरोबर नुकसान भरपाई रु.15,000/- एवढे देण्याची तयारी दर्शविली. तक्रारदाराने पाठविलेल्या मशिनची किंमत रु.10,00,000/- एवढी होती. ते मशिन उपलब्ध न झाल्यामुळे कंपनीचे काम वेळेवर होऊ शकले नाही त्यामुळे झालेल्या नुकसानीची मोजदाद करता येत नाही. सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे मशिन गहाळ झाल्यामुळे मशिनचे किंमतीएवढे व मशिन वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे कंपनीचे कामाचे झालेले नुकसान पैशात मोजता येत नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.30/7/2010 रोजी नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाला यांनी उत्तर दिले नाही. सबब तक्रारदारास सदर तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांचे हलगर्जीपणामुळे व सेवेतील कमतरतेमुळे गहाळ झालेल्या मशिनची किंमत रु.10,00,000/- तक्रारदारास अदा करावी. सदर मशिन वेळेवर न पोहोचल्याने तक्रारदाराचे व्यवसायावर विपरित परिणाम झाला त्यामुळे त्याचे नुकसानीपोटी रु.5,00,000/-, तक्रारदाराला झालेल्या त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.15,000/- देववावेत.
3. सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा सादर केला. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार या न्यायमंचात चालु शकत नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार ही कंपनी असुन वाद हा व्यापारी स्वरुपाचा आहे. त्या कारणास्तव तक्रार चालु शकत नाही. तसेच तक्रारदार यांनी नि.क्र.3 सोबत दाखल केलेल्या पावतीवरील अटी व शर्ती नुसार सदरील वाद हा मुंबई न्यायालयाचे अधिकार क्षेत्रात येतो त्या कारणास्तव सदरील तक्रार या न्यायमंचात चालु शकत नाही.
4. सामनेवाला यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराने एकुण दोन मशिन दिल्ली येथे श्री.ग्यान बात्रा यांचेकडे पाठवावयाच्या होत्या याबाबत सामनेवाला यांना माहिती नाही. सामनेवाला यांचे हलगर्जीपणामुळे मशिन गहाळ झाले ही बाब नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी कुरियरचे पावतीवरील नियम क्र.7 प्रमाणे कुरियर कंपनी जास्तीत जास्त रु.100/- पर्यंत नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे ही बाब तक्रारदारास कळविली होती. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कधीही रु.15,000/- नुकसान भरपाई देण्याची कबुली दिलेली नव्हती. सामनेवाला यांचे कथन की, ते कुरियरची एक नामवंत कंपनी असुन त्यांचे मार्फत बुक होणारे सामान वेळेवर देणारी कंपनी आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांचेमार्फत दि.19/5/2009 रोजी दोन आर्टीकल बुक केले होते त्याची पावती क्र.303209945 वजन 31 कि.ग्रॅम, पावती क्र.303209944 वजन 11.420 कि.ग्रॅम असे दाखविले होते. तक्रारदाराने पावती क्र. 303209945 वजन 31 कि.ग्रॅम चे मशिन गहाळ झालेबाबत सदरील तक्रार दाखल केला आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ज्या अटी व शर्ती अन्वये व्यवहार झाला आहे त्याचा उल्लेख पावतीवर केला आहे. तक्रारदार व सामनेवाला त्यास बंधनकारक आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे मशिन पाठविण्यासाठी बुक केले त्या वेळेस मशिनची किंमत रु.10,00,000/- असल्याबद्यल कोणेतेही बिल सोबत दिले नव्हते व नाही व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही दिलेले नाही तसेच तक्रारदाराने मशिनचा कोणताही विमा काढलेला नाही. मशिनची किंमत रु.10,00,000/- असल्याबाबत कोठेही नमुद केलेले नाही. तक्रारदाराने सदरील मशिनची किंमत रु.10,00,000/- असल्याबाबतचा कोणताही पुरावा या मंचासमोर सादर केलेला नाही तसेच एस.टी., सी एस टी, सेंट्रल एक्साईज किंवा ऑक्ट्रॉय चे कागदपत्रे की ज्या मशिनची किंमत रु.10,00,000/- आहे हे दर्शविते ते दाखल केलेले नाहीत. अटी व शर्ती नुसार सामनेवाला कंपनीची जबाबदारी ही जास्तीत जास्त रु.100/- पर्यंत आहे. सदरील तक्रार ही बनावट व खोटी असल्यामुळे ती रद्य होण्यास पात्र आहे. सदरील तक्रारीतील वाद हा ग्राहक वाद होऊ शकत नाही. तक्रारदाराने तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
5. तक्रारदाराने श्री.श्रीपाद श्रीनिवास जोशी यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत ठरावाची प्रत, अधिकार पत्र, मशिन पाठविल्याबाबतच्या पावत्या, मशिन गहाळ झाल्याबाबत तक्रारदाराने कंपनीला दिलेले पत्र, सामनेवाला यांनी पाठविलेले उत्तर, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, पावत्या हजर केलेल्या आहेत. सामनेवाला यांनी के एस अशोककुमार यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच सोबत अटी व शर्ती यांची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद हजर केला आहे त्याचे अवलोकन केले तसेच तक्रारदाराचे वकील श्री.पंकज अत्रे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्त यांचे अवलोकन केले. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी
ठेवलेली आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत केली आहे
काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? असल्यास किती ? होय,
आदेशात नमुद केलेप्रमाणे.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
6. तक्रारदार यांचे वकील श्री.अत्रे यांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजावर वेधले तसेच लेखी युक्तीवादावर वेधले व नमुद केले की, तक्रारदाराने सामनेवाला कुरियर सेवा देणा-या संस्थेमार्फत गॅस क्रोमॅटोग्राफ मशिन चे पार्सल पाठविले होते. सदरील पार्सल हे श्री.ग्यान बात्रा यांना न्यु दिल्ली येथे मिळणे क्रमप्राप्त होते. श्री.ग्यान बात्रा यांना एकच मशिन की जे पावती क्रमांक 303209944 अन्वये पाठविले होते ते मिळाले. दुसरे मशिन की जे पावती क्रमांक 303209945 नुसार पाठविले होते ते मशिन सामनेवाला यांचेकडुन गहाळ झाले. सदरील मशिन गहाळ झाल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांना त्याबाबत वेळोवेळी सांगीतले. सामनेवाला यांनी पत्र देऊन त्यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही फक्त रु.100/- आहे असे कळविले. तदनंतर दि.20/11/2009 रोजी सामनेवाला यांनी त्यांची चुक कबुल केली आहे व तक्रारदारास रक्कम रु.15,000/- देण्याची तयारी दर्शवली. तक्रारदाराने पाठविलेले मशिनची किंमत रु.10,00,000/- एवढी होती ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने सामनेवाला यांना नोटीस दिली. सामनेवाला यांनी नोटीस उत्तर दिले नाही सबब तक्रारदारास सदरील तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदाराचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील मशिनची किंमत रु.10,00,000/- होती. सदरील मशिन वेळेत न मिळाल्यामुळे तक्रारदाराचे रु.5,00,000/- चे नुकसान झाले. तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास झाला त्यामुळे रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
7. सामनेवाला यांचे वकील श्री.भंगाळे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने सदरील मशिनची किंमत रु.10,00,000/- असल्याबाबत या मंचासमोर कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराने पावती क्र.303209945 अन्वये जे मशिन पाठविले आहे त्याची किंमत तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे नमुद केलेली नाही. अगर सदर मशिनचा विमा काढलेला नाही. तक्रारदाराने पावतीमध्ये सदर मशिनचे वजन 31 किलोग्रॅम असे लिहीलेले आहे. तसेच तक्रारदाराने सदरील पावतीमध्ये सदरील मशिनची किंमत लिहीलेली नाही. अगर तिचे किंमतीबाबत सामनेवाला यांना सुचित केलेले नाही. एवढया मोठया किंमतीच्या वस्तु वाहून नेत असतांना जर त्याची किंमत सामनेवाला यांना माहिती झाली असती तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस तक्रारदारास जास्त भरावे लागले असते. तक्रारदार व सामनेवाला यांचे मध्ये जो करार झाला आहे त्या कराराच्या अनुषंगाने अट क्र. 7 प्रमाणे जर वस्तु गहाळ झाली अगर नुकसान झाले तर सामनेवाला यांनी रु.100/- नुकसान भरपाई द्यावी असे ठरलेले आहे. सामनेवाला यांची जबाबदारी रु.100/- पेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्याची नाही. तसेच सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने या मंचासमोर पार्सल मध्ये पाठविलेल्या मशिनची किंमत रु.10,00,000/- असल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही तसेच सदरील मशिनची किंमत वस्तु पाठवितांना सामनेवाला यांचेकडे घोषीत केलेली नाही तसेच तक्रारदाराने सदरील मशिनचा विमा काढलेला नाही. त्यामुळे सदरील मशिनची किंमत किती आहे ? याचा कोणताही बोध होत नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या अटी व शर्ती नुसार सामनेवाला हे तक्रारदारास फक्त रु.100/- देणे लागतात.
8. तक्रारदाराने दाखल केलेल्या संपुर्ण कागदपत्रांचे व पुराव्याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने सामनेवाला क्र. 3 शाखेमार्फत न्यू दिल्ली येथे श्री.ग्यान बात्रा यांना काही वस्तु पार्सलव्दारे पाठविलेल्या आहेत. पावती क्र.303209945 व 303209944 यांचे काळजीपुर्वक अवलोकन केले असता पार्सल मध्ये कोणत्या वस्तु पाठविल्या आहेत त्या मशिनची नांवे लिहीलेली नाहीत तसेच त्या वस्तुंची किंमत लिहीलेली नाही. त्यामध्ये फक्त 31 किलो वजन व दुस-या मशिनचे वजन 11.420 किलो एवढेच नमुद केलेले आहे. कोणते मशिन पाठविले याचे वर्णन नमुद केलेले नाही तसेच किंमत नमुद केलेली नाही. तसेच संपुर्ण पुराव्याचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने सदर मशिनची किंमत किती आहे याचा पुरावा देण्याबाबत संधी देऊनही तक्रारदाराने सदरील मशिनचे किंमती बाबत कोणताही पुरावा या मंचासमोर सादर केलेला नाही त्यामुळे तक्रारदार यांचे कथन की, सदरील पार्सलने पाठविलेल्या मशिनची किंमत रु.10,00,000/- आहे हे मान्य करता येणार नाही. उत्पादक एवढी मोठी रक्कम असलेली मशिन कुरियर मार्फत पाठवितांना सदरील बाब ही कुरियरचे लक्षात आणुन देईल तसेच जी वस्तु पाठविली जात आहे त्याची किंमतही कुरियरकडे नमुद करेल. सदरील वस्तुचे संरक्षण होण्यासाठी विमा काढेल. तक्रारदाराने अशा कोणत्याही बाबी केलेल्या नाहीत त्यामुळे संपुर्ण पुराव्याचे अवलोकन केले असता, तक्रारदार म्हणतात की, सदरील वस्तुची किंमत रु.10,00,000/- आहे हे मान्य करता येणार नाही तसेच या मंचासमोर तक्रारदाराचे तोंडी पुराव्याशिवाय कोणताही पुरावा नाही. सामनेवाला यांचे कथन की, सदरील तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात चालु शकत नाही परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या पुराव्याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने सामनेवाला क्र. 3 म्हणजेच सामनेवाला क्र. 1 व 2 ची शाखा यांचेमार्फत सदरील वस्तु पाठविलेल्या आहेत. सामनेवाला क्र. 1 व 2 यांची शाखा जळगांव येथे कार्यरत आहे. सबब सदरची तक्रार या मंचास चालविण्याचे अधिकार आहेत. तक्रारदाराचे पुराव्याचे अवलोकन केले असता, त्यांनी सामनेवाला यांचे मार्फत पावती क्रमांक 303209945 अन्वये जी वस्तु पाठविली होती ती वस्तु गहाळ झाली आहे ही बाब सामनेवाला यांनी मान्य केली आहे. सामनेवाला यांचे कथन की, कुरियर कंपनीचे अटी व शर्ती नुसार सामनेवाला हे फक्त रक्कम रु.100/- देण्यास जबाबदार आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले उत्तर लक्षात घेतले असता पावती क्रमांक 303209945 अन्वये जी वस्तु पाठविली आहे ती प्रवासादरम्यान गहाळ झालेली आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या कराराच्या अनुषंगाने सामनेवाला हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणे लागतात. या मंचाने अगोदरच नमुद केलेले आहे की, तक्रारदाराने त्या मशिनचे वजन 31 किलो एवढे लिहीलेले आहे. मशिनचे स्वरुपा विषयी व कोणते मशिन आहे ? त्याची किंमत काय आहे ? याबाबत काहीएक नमुद केलेले नाही अगर तसा पुरावा या मंचासमोर दिलेला नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये जो पत्र व्यवहार झाला आहे व सामनेवाला यांनी 20 नोव्हेंबर,2009 रोजी तक्रारदारास जे पत्र पाठविले आहे त्याचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदाराची वस्तु गहाळ झाल्याबाबत माफी मागीतलेली आहे. तसेच ते वस्तुचा शोध घेत आहेत असे कळविले आहे परंतु तक्रारदाराने केलेले पार्सल सापडले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास असे कळविले आहे की, एक स्पेशल केस म्हणुन ते नुकसान भरपाई रु.15,000/- देण्यास तयार आहेत. सामनेवाला यांनी कुरियर पावतीच्या अटी व शर्तीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने त्याचे पाठविलेल्या पार्सलचा विमा काढणे आवश्यक होते कारण सदरची वस्तु मौलव्यान होती. अट क्र.7 चा विचार केला असता जर वस्तु हरवली व गहाळ झाली तर सामनेवाला यांची जबाबदारी रु.100/- पेक्षा जास्त नाही असे नमुद केलेले आहे. सदरची बाब लक्षात घेतली असता, तक्रारदार हे सदरील अट व शर्त नुसार नुकसान भरपाईपोटी रु.100/- मिळण्यास पात्र आहेत परंतु सामनेवाला यांनी त्यांचे पत्र क्र.टीपीसी/एडीओ/सीकेएल/10626, दि.20 नोव्हेंबर,2009 रोजी तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रु.15,000/- देण्याची तयारी दर्शविली आहे. सबब या मंचाचे मत की, तक्रारदार हे नुकसान भरपाई रक्कम रु.15,000/- मिळण्यास पात्र आहेत तसेच तक्रारदाराने पाठविलेले मशिन दिल्ली येथे मुदतीत न मिळाल्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला त्याबाबत तक्रारदार हे रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत. यास्तव मुद्या क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी एकुण रक्कम रु.15,000/-(अक्षरी रु.पंधरा हजार मात्र ) या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत सदर मुदतीत रक्कम अदा न केल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपावेतो तक्रारदार हे द सा द शे 9 व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र राहतील..
3) सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) अदा करावेत.
4) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/12/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.