द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत // निकालपत्र // (1) प्रस्तूत प्रकरणातील सदोष मोबाईल हॅण्डसेट बदलून मिळावा यासाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकिकत अशी की, (2) तक्रारदार श्री. भूषण भंडारे यांनी जाबदार क्र. 2 सोनी एरिक्झन (ज्यांचा उल्लेख यापुढे “कंपनी” असा केला जाईल) यांनी उत्पादित केलेला मोबाईल हॅण्डसेट दि.5/8/2010 रोजी रक्कम रु.17,900/- मात्र ला विकत घेतला होता. हा हॅण्डसेट विकत घेतल्यानंतर या हॅण्डसेटचा इअर स्पीकर व टचस्क्रीनमध्ये दोष उत्पन्न झाला तसेच हा फोन वारंवार हँग होऊ लागला. हा फोन तक्रारदारांनी जाबदार क्र. 3 न्यू तिरुपती सेल्यूलर्स (ज्यांचा उल्लेख यापुढे “सर्व्हीस सेंटर” असा केला जाईल) यांचेकडून वॉरंटीच्या दरम्यान वारंवार दुरुस्त करुन घेतला. या दरम्यान सर्व्हीस सेंटरने तक्रारदारांच्या हॅण्डसेटची बॅटरी तसेच नविन सॉफटवेअर सुध्दा त्यामध्ये टाकले होते. त्यानंतर सुध्दा हँडसेटमध्ये दोष उत्पन्न झाल्याने तक्रारदारांनी हा हॅण्डसेट परत सर्व्हीस सेंटरकडे दुरुस्तीसाठी दिला. हा हॅण्डसेट अशाप्रकारे दुरुस्तीसाठी दिल्यानंतर मोबाईल अद्यापही सर्व्हीस सेंटरच्या ताब्यात आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. आपण घेतलेला हॅण्डसेट विकत घेतल्यापासून सातत्याने नादुरुस्त असल्यामुळे हा हॅण्डसेट आपल्याला बदलून नविन वॉरंटीसह दयावा अन्यथा आपली रक्कम व्याजासह परत करावी यासाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. (3) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 2 व 3 यांचेवरती नोटीस बजावणी होऊनसुध्दा ते मंचापुढे गैरहजर राहिल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर करण्यात आला. तर जाबदार क्र.1 यांना तक्रारदारांनी मंचाच्या आदेशान्वये वगळले आहे. यानंतर तक्रारदारांचा स्वत:चा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले. (4) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी दि.05/08/2010 रोजी हा मोबाईल विकत घेतल्यानंतर लगेच ऑक्टोबरमध्ये त्यांना तो दुरुस्तीसाठी द्यावा लागला होता ही बाब सिध्द होते. यानंतर परत नोव्हेंबरमध्ये तक्रारदारांनी हा मोबाईल सर्व्हीस सेंटरकडे दुरुस्तीसाठी दिल्याचे आढळून येते. हा मोबाईल अद्यापही सर्व्हीस सेंटरच्या ताब्यात असल्यामुळे आपल्याला हा मोबाईल बदलून मिळावा अथवा आपल्याला मोबाईलची किंमत व्याजासह मिळावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी साधारण रु.18,000/- रकमेचा घेतलेला मोबाईल अत्यंत कमी कालावधीमध्ये बिघडलेला आहे. हा मोबाईल दुरुस्त करुन घेण्यासाठी सर्व्हीस सेंटरकडे दिल्यानंतरसुध्दा परत दोष उद्भवला ही बाब दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. हा हॅण्डसेट सर्व्हीस सेंटरच्या ताब्यात असल्यामुळे हा हॅण्डसेट सदोष नाही हे पुराव्यासहित सिध्द करण्याची जबाबदारी सर्व्हीस सेंटरची होती. मात्र सर्व्हीस सेंटरवरती नोटीस बजावल्याची पाहोच पावती निशाणी 7 अन्वये दाखल असूनसुध्दा ते याकामी हजर झालेले नाहीत. अर्थात अशा परिस्थितीत तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे त्यांना नविन हॅण्डसेट नविन वॉरंटीसह देण्याचे आदेश करणे मंचासाठी क्रमप्राप्त ठरते. सबब त्याप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. तक्रारदारांनी उत्पादक कंपनी व सर्व्हीस सेंटरला या कामी पक्षकार म्हणून सामील केलेले असून सर्व्हीस सेंटरच्या ताब्यामध्ये सद्य: परिस्थितीमध्ये मोबाईल आहे याचा विचार करता, अंतिम आदेश दोन्ही जाबदारांविरुध्द करण्यात येत आहे. तसेच सदोष हॅण्डसेटमुळे तक्रारदारांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसानभरपाई तसेच सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून एकत्रितपणे रु.5,000/- मंजूर करणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्याप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तूत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. // आदेश // (1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. (2) यातील जाबदार क्र. 2 कंपनी व जाबदार क्र.3 सर्व्हीस सेंटर यांनी वादग्रस्त हॅण्डसेटच्या ऐवजी त्याच मॉडेलचा नविन हॅण्डसेट वॉरंटीसह तक्रारदारांना निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावा अन्यथा विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी त्यांना तक्रारदारांना रु.100/- नुकसानभरपाई म्हणून द्यावे लागतील. (3) यातील जाबदार क्र. 2 कंपनी व जाबदार क्र.3 सर्व्हीस सेंटर यांनी शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसानभरपाई व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून एकत्रित रु.5,000/- मात्र तक्रारदारांना निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत अदा करावेत. (4) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार क्र. 2 व 3 यांनी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. (5) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक –04/08/2011
| | [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |