तक्रारदारातर्फे वकील ः- श्री. पी.सी.तिवारी
विरूध्द पक्षातर्फे वकील ः- श्री. इंद्रकुमार होतचंदानी
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 15/11/2018 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्ष विमा कंपनीने विम्याचा दावा फेटाळला म्हणून ही तक्रार या मंचात दाखल केलेले आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात असे आहे की, तक्रारकर्ता श्री. कैलाश सिताराम अग्रवाल हे स्वतःच्या उदरर्निवाहासाठी मे. एस.एस. इंडस्ट्रीज नावाने राईस मिल चालवितात. त्यांनी विरूध्द पक्षाकडून प्लॉन्ट आणि मशिनरीसाठी रक्कम रू. 20,00,000/-, बिल्डींगसाठी रक्कम रू. 02,20,000/-,व स्टॉक करीता रक्कम रू. 30,50,000/-,ची विमा दि. 11/09/2014 रोजी प्रिमीयम रक्कम रू. 12,170/-,भरून घेतली होती. विरूध्द पक्ष यांनी विम्यासाठी स्टॅंडर्ड फायर अॅण्ड स्पेशल पॅरील्स पॉलीसी क्र. 181301/11/2015/597 विमाचा कालावधी रात्री 00.00 On 23/05/2014 ते मध्यरात्री दि. 22/05/2015 साठी कव्हर नोट तक्रारकर्त्याला पाठविले होते.
3. तक्रारकर्त्याची राईसमिल काकोडी स्थित जाग्यावरती दि. 17/02/2015 रोजी मध्यरात्रीला आग लागली होती. तक्रारकर्त्याने तात्काळ अग्नीशमक कार्यालय गोंदिया येथे लगेच संपर्क साधून आग लागण्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे त्यांनी विरूध्द पक्षांना त्यांच्या मागण्यानूसार वेळोवेळी कागदपत्रे संपूर्ण जळालेल्या स्टॉकची यादी व त्याचप्रमाणे आकडेवार नूकसानाची रक्कम रू. 5,32,500 – 2,43,900 = 2,88,600/-,चा नूकसानाची रक्कम दर्शविलेली पत्र दिलेले आहे. तसेच, हातानी लिहीलेले स्टॉक स्टेटमेंट, घटनास्थळ पंचनामा, अग्निशमक अधिकारी यांना पाठविलेले पत्र, स्टॉक मुल्यांकन दि. 07/08/2015, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस व इतर कागदपत्रे सादर केली आहेत. विरूध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याने पाठविलेले कायदेशीर नोटीस मिळूनही आजपर्यंत त्यांनी कोणतेही प्रतीउत्तर दिले नाही व आजपर्यंत विम्याची रक्कम दिली नाही. तसेच, तक्रारकर्त्यावरती आर्थिक ओझा आल्यामूळे त्यांनी या मंचात न्याय मिळण्याकरीता हि तक्रार दाखल केली आहे.
4. विरूध्द पक्षावर बजावण्यात आलेल्या नोटीसची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यांनी त्यांची लेखीकैफियत या मंचात सादर करून, विमा व विम्याचा कालावधी मान्य केली आहे. तसेच, तक्रारकर्ता में. एस.एस.इंडस्ट्रीजचा मालक आहे हेही मान्य करतात व बाकीचे तक्रारकर्त्याचे कथन त्यांना मान्य नाही. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या विशेष कथनामध्ये असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्यानी दाखल केलेली तक्रार या मंचापुढे चालु शकत नाही. पुढे या अपघाताचा नुकसान आखण्याकरीता श्री. महेंद्र सिंग व्होरा स्वतंत्र सर्व्हेअर व लॉस असेसर यांची नेमणुक केली होती. परंतू तक्रारकर्त्याने या सर्व्हेअरला काही कागदपत्रे पुरविले नाही. म्हणून शेवटी दि. 18/06/2015 रोजी त्यांनी त्यांच्या अंतिम अहवालामध्ये रक्कम रू. 92,150/-,इतका नुकसान झाला असेल असा अहवाल दिला. त्यांनी तक्रारकर्त्याने स्टॉकची यादी/डिटेल्स पुरविलेला नाही. तसेच, में. राणी सती मिल्सची दुस-या पॉलीसीनूसार स्टॉकचे डिटेल्स दिले नाही असे नमूद केले आहे.
5. विरूध्द पक्ष यांनी शेवटी दि. 04/09/2015 रोजी तक्रारकर्त्याला शेवटचे पत्र पाठवून तक्रारकर्त्याने स्टॉक डिटेल्स रक्कम रू. 30,50,000/-, पॉलीसी दरम्यानच्या काळात ऑडिटेट रिपोर्ट पाठविण्यासाठी सांगीतले होते. आणि तसे कागदपत्र सर्व्हेअरला योग्य नूकसानीबद्दल अहवाल देण्यासाठी पुरविण्यास सांगीतले होते. याव्यतिरीक्त पुन्हा दि. 26/02/2016 विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला परत कागदपत्र पुरविण्याकरीता सांगीतले तरी देखील तक्रारकर्त्याने कोणताही दस्ताऐवज सादर केला नसल्याने त्यांचा विमा दावा दि. 28/03/2016 रोजी बंद करण्यात आला. अशाप्रकारे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला पुरेशी संधी दिली होती. तरी देखील त्यांनी नुकसान भरपाईसाठी योग्य ते कागदपत्रे पुरविले नाही. म्हणून यामध्ये विरूध्द पक्षांची कोणतीही चुकी नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत जोडलेले कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद तसेच त्यानंतर युक्तीवादाच्या दरम्यान अतिरीक्त कागदपत्रे दाखल करण्याच्या अर्जासोबत या मंचात सादर केली आहे. तसेच विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेली लेखीकैफियत, स्वतंत्र अर्ज देऊन दि. 20/07/2015 दि. 04/09/2015, दि. 26/02/2016 व सर्व्हेअरचा अंतिम अहवाल दि. 18/06/2015 या मंचात दाखल केला आहे. तसेच, पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद या मंचाचे अवलोकनसाठी दाखल केलेले आहे.
तक्रारकर्त्याचे विद्वान वकील श्री. पी.सी.तिवारी तसेच विरूध्द पक्षाचे विद्वान वकील श्री. इंद्रकुमार होटचंदानी यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. यावरून निःष्कर्षासाठी आमचे निःष्कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-
:-निःष्कर्ष-:
7. तक्रारकर्त्याने या मंचात दाखल केलेल्या दस्ताऐवजावरून हे सिध्द होते की, त्यांच्या राईसमिल मध्ये दि.17/02/2015 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती व विरूध्द पक्ष यांनी IRDA – ( Protection of policy Holder’s Interests 2002 ) चा नियम क्र. 9 प्रमाणे स्वतंत्र सर्व्हेअरची नेमणुक करून, त्यांचा अंतिम सर्व्हे अहवाल दि. 18/06/2015 रोजी आल्यानंतर तक्रारकर्त्याला दि. 20/07/2015, दि. 04/09/2015, व दि. 26/02/2016 असे तिन संधी देण्यात आली होती. तरी देखील तक्रारकर्त्याने कोणतेही प्रतिउत्तर किंवा दस्ताऐवज सादर केलेले नाही. विरूध्द पक्षांनी या मंचात दाखल केलेली लेखीकैफियतीचे विशेष कथन परिच्छेद क्र. (ड) मध्ये वरील नमूद असलेले तिन पत्र पाठविल्याचे कथन केले असून, तक्रारकर्त्याने त्यानंतर दाखल केलेल्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये त्या कथनाचा खंडन केला नाही. म्हणून हि बाब सिध्द होते की, तक्रारकर्त्याला विरूध्द पक्षांकडून पुरेशी संधी देण्यात आली होती.
8. विरूध्द पक्ष यांनी दि. 18/06/2015 रोजी त्यांच्या सर्व्हेअरनी पाठविलेले अंतिम सर्व्हे अहवाल यामध्ये दोन गोष्टी आहेत- 1) त्यांनी अर्धा विम्याचा दावा मान्य केला आहे. 2) तक्रारकर्त्याने काही कागदपत्रे पुरविलेले नाही त्याबाबतचा विमा दावा पुराव्याच्या अभावी नाकारले आहे. विरूध्द पक्ष यांनी जे कागदपत्रे पाठविले ते वरील नमूद दुस-या गोष्टींबाबत आहे. तक्रारकर्त्याने युक्तीवादाच्या वेळेस सादर केलेले फोटाग्राफ्सवरून हे तर सिध्द होते की, तक्रारकर्त्याच्या राईसमिल मध्ये आग लागलेली असून मोठा नुकसान झालेला आहे. परंतू, रितसर तपास करून, किती नुकसान झाला व किती नुकसान भरपाई पॉलीसीप्रमाणे देणे योग्य आहे याकरीता IRDA च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे स्वतंत्र सर्व्हेअर/तज्ञ नेमणुक करून योग्य ती नुकसान भरपाई देणे शक्य होईल. याचा आकलन करण्याचा अधिकार त्यांना दिले आहेत. या प्रकरणात विरूध्द पक्ष यांनी नेमलेले स्वतंत्र सर्व्हेअर यांनी आपल्या अंतिम अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने विम्याच्या अटी व शर्तीचा भंग केला नाही. परंतू, काही कागदपत्रे पुरविलेले नाही आणि त्याच्या अभावी तक्रारकर्त्याचा विमा दावा अंशतः मान्य केले. याकरीता विरूध्द पक्षांकडे कोणताही ठोस पुरावा नाही. जेणेकरून त्यांनी तक्रारकर्त्याचा पूर्ण विमा फेटाळला आहे.
विरूध्द पक्ष यांनी स्वतंत्र सर्व्हेअरद्वारा पाठविलेले अंतिम सर्व्हे अहवालाप्रमाणे कमीत कमी तक्रारकर्त्याला विम्याच्या दाव्याप्रमाणे देण्यायोग्य एकुण रक्कम रू.92,150/-,अहवाल मिळाल्यानंतर 30 दिवसात देणे कायदेशीर बंधन असून सुध्दा फक्त वारंवार पत्र पाठवून तक्रारकर्त्याला विम्याची संपूर्ण रक्कम न देऊन, ग्रा.सं.कायदा कलम 2 (g) व ( r) प्रमाणे सेवा देण्यास कमतरता व अनुचित व्यापारी प्रथा अवलंबिली आहे. या कारणाने विरूध्द पक्ष यांनी ग्रा.सं.कायदयाप्रमाणे तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केला हे सिध्द होते.
9. विरूध्द पक्ष यांनी विमा दाव्याची रक्कम रू. 92,150/-, अंशतः न देऊन, तक्रारकर्त्याला मानसिक त्रास व आर्थिक नुकसान केला असून, तक्रारकर्त्याला या मंचापुढे तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. म्हणून तक्रारकर्त्याला रक्कम रू.92,150/-,दि.18/06/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 25,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला विम्याची रक्कम रू. 92,150/-,दि.18/06/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह दयावे.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 25,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास वरील नमूद (2) व (3) प्रमाणे रकमेवर द.सा.द.शे 12 टक्के व्याज अदा करावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पाठविण्यात यावी.
6. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे