न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे— तक्रारदार या तक्रारीत नमुद गावच्या रहिवाशी असून तक्रारदार हिचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करत होते. तक्रारदार यांचे पतीचे नावे शेतजमीन असून त्याचा खाते नंबर 10075 असा आहे. तक्रारदार यांचे पतीचे नांवे मजकूर गावी गट नं.154 ही आहे. तक्रारदार यांचे पतीचा वि प कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. त्याचा विमा पॉलीसी नं.163500/47/2017/65 असा होता. सदर पॉलीसीचा हप्ता वि प कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला आहे. दि.03/07/2018 रोजी तक्रारदार यांचे पती कै.अशोक दत्तात्रय पाटील हे त्याचे मळयावरील शेतात तणनाशक फवारणी करीता गेले होते. तणनाशक फवारणी करत असताना यातील तक्रारदार यांचे पतीना अपघाताने व अनावधानाने सदर औषधाचा फवारा नाका तोंडात गेलेने त्यांना अस्वस्थ वाटू लागलेने त्यांना औषधोपचाराकरिता प्रथमत: ग्रामीण रुगणालय राधानगरी येथे दाखल केले व तदनंतर सी.पी.आर. हॉस्पिटल,कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार चालू असताना दि.15/07/2018 रोजी मयत झाले. सदर घटनेची नोंद सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर यांचेमार्फत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांचेकडे झालेली असून सदरची वर्दी झेरो नंबरने राधानगरी पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग झालेली होती. त्यावेळी सदर घटनेचा तपास राधानगरी पोलीसांनी केलेला आहे. तक्रारदार यांनी विमा प्रस्तावासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन वि प कंपनीकडे दि.27/08/2018 रोजी तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे माध्यमातून विमा क्लेम रक्कमेची मागणी केली होती. परंतु वि प कंपनीने अगर तालुका कृषी अधिकारी यांनी आजअखेर काहीही कळविलेले नाही. तक्रारदार ही पडळी ता.राधानगरी या दूर्गम भागातील असून ती अल्पशिक्षीत व विधवा स्त्री असलेने तिला कायदयाचे योग्य ते पूर्ण ज्ञान नाही. सबब वि प यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केला असलेने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प. कंपनीकडून तक्रारदाराचे पतीचे अपघाती मृत्यूपश्चात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमाक्लेमची रक्कम रु.2,00,000/- व सदर रक्कमेवर द.सा.द.शे.15% दराने व्याजसह मिळावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/-, व तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रु.5,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 19 कडे अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, विमा क्लेम फॉर्म भाग-1, जमीन खाते क्र.10075 चा 8-अ उतारा, जमीन गट नं.154 चा 7/12 उतारा, घोषणापत्र अ व ब, तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दाखला, सीपीआर हॉस्पिटलचा एमएलसी नं.8714118, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांचे पत्र, सीपीआर हॉस्पीटल यांनी दिलेला वर्दी शिक्का, मरणोत्तर पंचनामा, मयताचे पीएमकरिता पोलीसांनी दिलेले पत्र, पी एम रिपोर्ट, सीपीआर हॉस्पिटलचा मृत्यू दाखला, घटनास्थळाचा पंचनामा, घटनास्थळी औषध जप्त केलेचा पंचनामा, तक्रारदाराचे पतीचे पॅनकार्ड, तक्रारदाराचे बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, तसेच सदरचे म्हणणे हाच पुरावा व लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे. तसेच कागदयादीमध्ये महाराष्ट्र शासन निर्णय सन-2018-19 व त्रिपक्षीय करारनामा दाखल केला आहे.
वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. वि.प. यांचे म्हणणेप्रमाणे महाराष्ट्र शासनाव्दारे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सन-2017-2018 मध्ये जाहीर झाली होती. त्या अनुषंगाने शासन, इन्शुरन्स ब्रोकर व विमा कंपनी यांचे दरम्यान त्रिपक्षीय करार झाला त्या करारानुसार शासनाचे परिपत्रक प्रदर्शित झाले. सदर परिपत्रकाच्या अटी शर्तीनुसार शेतक-यास अपघात झाल्यास तयाचा दावा त्याने अथवा त्याच्या वारसदाराने संबंधीत कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल करावा व तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन शिफारशींसह जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे पाठवितात व जिल्हा कृषी अधिकारी इन्शुरन्स ब्रोकर यांचेकडे पाठवितात व ते विमा कंपनीकडे शिफारशीसह पाठवितात. त्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करुन घेऊन विमा कंपनी सदर विमा दाव्यावर योग्य तो निर्णय घेते. परंतु तक्रारदार यांचा विमा दावा जिल्हा कृषी अधिकारी यांच्या शिफारशींसह सदरचा विमा दावा वि प कंपनीकडे आलेलाच नाही त्यामुळे विमा कंपनीव्दारे तो मंजूर अथवा नामंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. क्र.1विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम व्याजासह व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज हा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाती विमा योजनेची रक्कम मिळणेसाठी दाखल केला आहे. यातील तक्रारदाराचे पती अशोक दत्तात्रय पाटील हे मयत होण्यापूर्वी शेती हाच व्यवसाय करत होते. तक्रारदाराचे पतीचे नांवे 7/12, 8-अ, तसेच जुनी डायरी (6ड) तसेच 6 क वारसा डायरी हे कागद तक्रारदार यांनी याकामी तक्रारअर्जासोबत दाखल केलेले आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराचे पती हे शेतकरी होते ही बाब स्पष्ट होते. तक्रारदाराचे पतीचा वि प विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीचा विमा हप्ता शासनामार्फत वि प विमा कंपनीकडे अदा केलेला आहे. तसेच याकामी वि प विमा कंपनीने तक्रारदाराचे पती शेतकरी होते किंवा नाही याबाबत तसेच विमा पॉलीसीबाबत वाद उत्पन केलेला नाही. सबब तक्रारदाराचे पती शेतकरी होते व वि प विमा कंपनीकडे शासनाने तक्रारदाराचे पतीचा विमा उतरविला होता ही बाब स्पष्ट व सिध्द होते. तसेच तक्रारदाराचे पतीचे मृत्यूनंतर तक्रारदार या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस असलेने तक्रारदार व वि प हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब स्पष्ट व सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारचे पती कै. अशोक दत्तात्रय पाटील हे दि.03/07/2018 रोजी त्यांचे शेतामध्ये तणनाशक फवारणी करीता गेले होते व तणनाशक फवारणी करत असताना तक्रारदाराचे पतीचे नाका-तोंडात अपघाताने व अनावधानाने सदर तणनाशकाचा फवारा गेलेने तक्रारदाराचे पतीस अस्वस्थ वाटू लागलेने त्यास प्रथमत: ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे दाखल केले तेथे प्रथम उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे दाखल केले. सी.पी.आर.हॉस्पीटल,कोल्हापूर येथे तक्रारदाराचे पतीवर उपचार सुरु असताना दि.15/07/2018 रोजी तक्रारदाराचे पती मयत झाले. सदर घटनेची नोंद सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर यांचेमार्फत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांचेकडे झाली असून सदरची वर्दी राधानगरी पोलीस स्टेशनला वर्ग झाली होती व सदर घटनेचा तपास राधानगरी पोलीसांनी केलेला आहे. याकामी तक्रारदाराने दाखल केले तक्रार अर्जासोबतचे कागदयादीसोबत दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता अपघातासंबंधीत पोलीस पेपर्स पंचनामे, इन्क्वेस्ट पंचनामा व इतर पोलीस पेपर्स तसेच तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद वगैरेचे अवलोकन करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाताने तणनाशक औषधाची फवारणी करताना सदर तणनाशकाचा फवारा त्यांचे नाका-तोंडात गेलेने झालेचे स्पष्ट होते.
याकामी तक्रारदाराने तिचे पतीचा मृत्यू झालेनंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि प विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी सर्वर कागदपत्रांसह विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी,राधानगरी यांचेकडे तीन प्रतीत पाठविला होता. सदरची बाब तक्रारदाराने कागदयादीसोबत दाखल केले. अ.क्र.1 चे तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांना दिलेले पत्रावरील तालुका कृषी अधिकारी यांना तीन प्रती मिळालेबाबत शेरा मारुन सही केली. दि.27/08/2018 अशी तारीख नमुद केली आहे. यावरुन तक्रारदाराने तिचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी,राधानगरी यसांचेकडू तीन प्रतीत पाठविला होता ही बाब सिध्द होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल / प्राप्त होईल त्या दिनांकास तो विमा कंपनीस प्राप्त झाला असे समजणेत येईल असे सदर योजनेच्या माहितीपत्रकात नमुद केले आहे.
वरील बाबींचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा विमा प्रस्ताव तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी राधानगरी यांचेकडे दि.27/08/2018 रोजी तीन प्रतीत सादर केला होता ही बाब स्पष्ट व सिध्द होते. त्यामुळे वि प विमा कंपनीस सदरचा विमा प्रस्ताव दि.27/08/2018 रोजी प्राप्त झाला असे गृहीत धरणे न्यायोचित होईल. याकामी वि प यांचे म्हणणेनुसार तक्रारदार यांनी त्यांचा विमा प्रस्ताव वि प विमा कंपनीकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पाठविला नाही. त्यामुळे योग्य त्या चॅनलव्दारे पाठवला नाही असे कथन केले आहे. मात्र याकामी तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांवरुन तक्रारदाराने विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी राधानगरी यांचेकडे तीन प्रतीत पाठविला होता व त्या तीन प्रती तालुका कृषी अधिकारी राधानगरी यांना मिळालेबाबत त्यांची सही / पोहोच कव्हरींग लेटरवर आहे. त्यामुळे तक्रारदाराने योग्य चॅनेलव्दारेचे वि प विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव पाठवलेचे स्पष्टपणे शाबीत होते. याकामी वि प विमा कंपनीने केलेली कथने सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
सबब तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा ऊहापोह करता याकामी वि प विमा कंपनीने सदर तक्रारदाराचे विमा प्रस्तावाबाबत तक्रारदार यांना काहीही कळविले नाही त्यामुळे तक्रारदार यांना वि प ने सदोष सेवा पुरविली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
वर नमुद केले तक्रारदार व वि प यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रे, तक्रारदाराचे पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, उभयतांचा तोंडी युक्तीवाद व विस्तृत विवेचन यांचा साकल्याने ऊहापोह करता याकामी तक्रारदार हे वि प विमा कंपनीकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारदाराचे पतीच्या अपघाती मृत्यूबाबत विमा क्लेमची रक्कम रु.2,00,000/- वि प विमा कंपनीकडून वसूल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर विमा क्लेम रक्कमेवर तक्रार अर्ज दाखल केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि प विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना, विमाक्लेमची रक्कम रु.2,00,000/- अदा करावी व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.31/12/2020 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 % दराने व्याज अदा करावे.
3) वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये वि प विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.