न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—तक्रारदार या तक्रारीत नमुद गावच्या रहिवाशी असून तक्रारदार यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तक्रारदार यांचे नांवे मौजे मजकूर गावी शेत जमीन आहे. सदर शेतीचा खाते क्र.618 असा असून तक्रारदार यांचे नांवे 7/12 आहे. तक्रारदार यांचा वि प कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविेलेला होता. सदर विमा पॉलीसीचा हप्ता शासनामार्फत वि प कंपनीस अदा केलेला आहे. तक्रारदार हे दि.30/07/2018 रोजी त्यांचे स्वत:चे गट नं.630 मधील शेतात ऊस पीकामध्ये काम करत ऊसाचे धांड त्यांचे डाव्या डोळयाला लागून दुखापत झालेली होती. त्यावेळी त्यांना औषधोपचाराकरिता कोल्हापूर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. पी.जी. पाटील यांचेकडे दाखल केलेले होते. तेथे त्यांचेवर औषधोपचार करुन, तसेच सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपचार झालेले असूनही तक्रारदाराचा डावा डोळा निकामी झाला होता व आहे. तक्रारदाराचा डावा डोळा निकामी झाला असलेबाबतचा दाखला डॉ.पी.जी.पाटील यांनी दि.06/03/2019 रोजी व तक्रारदाराचे डाव्या डोळयास अधुपणा आलेबद्दलचा सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर यांनी दि.23/10/2018 रोजी दाखला दिलेला आहे. तसेच सदर दुखापत झाले असलेबद्दलचा पंचनामा व दाखला गावकामगार पोलीस पाटील मौजे कसबा तारळे करंजफेण यांनी दिलेला आहे. तक्रारदार यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेसाठी योग्य त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी राधानगरी यांचेमार्फत दि.03/10/2019 रोजी दाखल करणेसाठी गेले असता, तालुका कृषि अधिकारी राधानगरी यांनी तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव मुदतीत नाही या कारणास्तव नकार दिला म्हणून तक्रारदार यांनी त्यांचा विमा प्रस्ताव वि प कंपनीकडे रजि. पोस्टाने पाठविलेला होता. सदरचा प्रस्ताव वि प कंपनीस दि.16/0/2019 रोजी मिळाला व वि प कंपनीने दि.14/01/2020 रोजीचे पत्राने तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव हा तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयामार्फत आलेला नाही त्यामुळे आम्ही दाव्याचा विचार करु शकत नाही या कारणावरुन नाकारला. तक्रारदाराचा विमा प्रस्ताव विलंबाचे कारणास्तव वि प कंपनीस नाकारता येणार नाही. तक्रारदार ही मौजे कसबा तारळे ता.राधानगरी या दूर्गम भागातील असून ते अशिक्षीत आहेत. वि प यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केला असलेने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प. कंपनीकडून तक्रारदारास त्यांचे डाव्या डोळयास अपघाताने व अनावधानाने ऊसाची पात लागून त्यांचे डाव्या डोळयास अधुपणा आलेने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमाक्लेमची रक्कम रु.1,00,000/- व सदर रक्कम द.सा.द.शे.15 % दराने व्याजासह मिळावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/-, व तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 20 कडे अनुक्रमे तालुका कृषि अधिकारी यांना दिलेले पत्र, विमा क्लेम फॉर्मसोबत दिलेल्या कागदपत्रांची यादी, क्लेम फॉर्म, जमीन खाते क्र.618 चा 8-अ उतारा, गट नं.630 चा 7/12 उतारा, जुनी डायरी उतारा, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, स्वयं घोषणापत्र अ व ब,डॉ. पी.जी.पाटील यांनी दिलेला दाखला, सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर यांनी अधुपणाचा दिलेला दाखला, गावकामगार पोलीस पाटील यांनी दिलेला दाखला, व घटनास्थळाचा पंचनामा, सरपंच ग्रामपंचायत कसबा तारळे ता.राधानगरी यांनी दिलेला दाखला, तक्रारदाराचे आधार कार्ड, बॅंक पासबुक, रेशनकार्ड, वि प कंपनीच्या पुणे कार्यालयास दिलेले पत्र, वि प कंपनीने विमा दावा नाकारलेचे पत्र, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, तसेच सदरचे म्हणणे हाच पुरावा व लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे. तसेच कागदयादीमध्ये महाराष्ट्र शासन निर्णय सन-2018-19 व त्रिपक्षीय करारनामा दाखल केला आहे.
वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. वि.प. यांचे म्हणणेप्रमाणे महाराष्ट्र शासनाव्दारे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सन-2017-2018 मध्ये जाहीर झाली होती. त्या अनुषंगाने शासन, इन्शुरन्स ब्रोकर व विमा कंपनी यांचे दरम्यान त्रिपक्षीय करार झाला त्या करारानुसार शासनाचे परिपत्रक प्रदर्शित झाले. सदर परिपत्रकाच्या अटी शर्तीनुसार शेतक-यास अपघात झाल्यास त्याचा दावा त्याने अथवा त्याच्या वारसदाराने संबंधीत कागदपत्रांसह तालुला कृषी अधिकारी यांचेकडे दाखल करावा व तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन शिफारशींसह जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे पाठवितात व जिल्हा कृषी अधिकारी इन्शुरन्स ब्रोकर यांचेकडे पाठवितात व ते विमा कंपनीकडे शिफारशीसह पाठवितात. त्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करुन घेऊन विमा कंपनी सदर विमा दाव्यावर योग्य तो निर्णय घेते. परंतु तक्रारदार यांचा विमा दावा जिल्हा कृषी अधिकारी यांनी नामंजूर केला आहे. त्यांच्या शिफारशींसह सदरचा विमा दावा वि प कंपनीकडे आलेलाच नाही त्यामुळे विमा कंपनीव्दारे तो मंजूर अथवा नामंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. क्र.1विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम व्याजासह व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न–
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांच्या मालकीची शेती असून ते शेती व्यवसाय करतात. सदर तक्रारदाराचे शेताचा खाते नं.618 असून तक्रारदाराचे नांवे 7/12 उतारा आहे. सदर खातेउतारा व 7/12 उतारा तक्रारदाराने याकामी दाखल केला आहे. यातील तक्रारदार हे शेतकरी असलेने त्यांचा विमा वि प कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीचा विमा हप्ता शासनामार्फत वि प कंपनीकडे अदा केलेला आहे. याबाबी वि प यांनी नाकारलेल्या नाहीत. सबब तक्रारदार व वि प हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे, कारण यातील तक्रारदार हे दि.30/07/2018 रोजी त्यांचे स्वत:चे शेतात ऊस पीकामध्ये काम करीत असताना अपघाताने व अनावधानाने तक्रारदार यांचे डाव्या डोळयास ऊसाचे धांड लागून दुखापत झाली होती. त्यावेळी तक्रारदार यांना कोल्हापूर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.पी.जी.पाटील यांचेकडे दाखल केले होते. तेथे तक्रारदार यांचेवर औषधोपचार करुनदेखील तक्रारदार यांचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झालेला होता व आहे. तदनंतर तक्रारदारचे डाव्या डोळयावर सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपचार झाले आहेत. परंतु तरीही तक्रारदाराचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला असून याबाबतचा दाखला डॉ.पी.जी.पाटील यांनी दि.06/03/2019 रोजी दिला आहे. तसेच तक्रारदाराचे डाव्या डोळयास पूर्ण अधुपणा आलेबाबतचा दाखला सी पी आर हॉस्पीटल कोल्हापूर यांनी दि.23/10/2018 रोजी दिलेला आहे.
याकामी तक्रारदाराचे डाव्या डोळयास अपघाताने व अनावधानाने ऊसाचे पिकात काम करताना ऊसाचे धांड लागून दुखापत झाली असलेबाबतचा गाव कामगार पोलीस पाटील यांचा पंचनामा व दाखला तसेच सरपंच ग्रामपंचायत, कसबा तारळे ता.राधानगरी जि.कोल्हापूर यांनी दाखला दिला असून सदर पंचनामा, व दाखला तक्रारदाराने याकामी दाखल केलेला आहे.
वरीलप्रमाणे तक्रारदाराचे डाव्या डोळयास अधुपणा आल्याने तक्रारदार यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि प विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी राधानगरी यांचेकडे विमा प्रस्ताव सादर केला होता. परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मुदतीत नाही म्हणून प्रस्तावास नकार दिला. म्हणून तक्रारदार यांनी सदरचा विमा प्रस्ताव वि प विमा कंपनीकडे रजि.पोस्टाने पाठवला. सदरचा विमा प्रस्ताव वि प विमा कंपनीस दि.16/10/2019 रोजी मिळाला असता वि प कंपनीने सदरचा तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत आला नाही त्यामुळे सदर दाव्याचा विचार करु शकत नाही या कारणास्तव विमा क्लेम नाकारला आहे.
तसेच तालुका कृषी अधिकारी राधानगरी यांनीही सदरचा विमा प्रस्ताव मुदतीत नाही म्हणून घेणेस नकार दिला. वास्तविक विमाधारकाने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळणेस योग्य तो कालावधी पूर्ण होणे आवश्यक असते त्याशिवाय अपंगत्वाचा दाखल मिळत नाही आणि सदर अपंगत्वाच्या दाखल्याशिवाय विमाधारक विमा प्रस्ताव दाखल करु शकत नाही. सदर बाबींचा विचार करता तक्रारदारास विमा प्रस्ताव दाखल करणेस झालेला उशिर माफ होणे योग्य व न्यायोचित होणार असून तक्रारदाचा विमा प्रस्ताव / विमा क्लेम तालुका कृषी अधिकारी यांनी स्विकारणे आवश्यक होते. तथापि, तसे झाले नाही. तक्रारदाराचा विमा प्रस्ताव स्विकारणेस नकार दिला. आणि त्यामुळे तक्रारदार यांनी वि प विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव रजि. पोस्टाने पाठविलेला आहे. आणि मे. वरिष्ठ न्यायालयांनी त्यांचे वेगवेगळया न्यायनिवाडयात उशिराचे कारण देऊन विमा क्लेम / विमा प्रस्ताव नाकारणे योग्य ठरणार नाही असा निर्वाळा दिला आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने दाखल केलेले गावकामगार पोलीस पाटील यांनी केलेला पंचनामा, तसेच सरपंच ग्रामपंचायत कसबा तारळे यांनी तक्रारदाराला अपघाताने व अनावधानाने डाव्या डोळयास ऊसाचे धांड लागून दुखापत झालेबाबत दिलेला दाखला व डॉ. पी.जी.पाटील यांनी तक्रारदाराचा डावा डोळा पूर्ण निकामी झालेबाबतचा दिलेला दाखला व सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर यांनी दिलेला तक्रारदाराचे अपंगत्वाचा दाखला यांचा काळजीपूर्वक विचार करता, याकामी तक्रारदार हे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि प विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र असतानाही वि प यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत आलेला नाही या कारणावरुन नाकारणे म्हणजेच वि प कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
सदर कामी वर नमुद तक्रारदार व वि प यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे अपंगत्वाचे दाखले, पंचनामा, सरपंच ग्रामपंचायत कसबा तारळे यांनी दिलेला दाखला, तक्रारदाराचे पुरावा शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद वगैरे बाबींचा ऊहापोह करता याकामी तक्रारदार हे वि प विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत. सदर विमा क्लेम रक्कमेवर विमा दावा नाकारलेपासून म्हणजे दि.14/01/2020 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि प विमा कंपनीकडून वसूल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना, विमाक्लेमची रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर विमा दावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.14/01/2020 पासून तक्रारदाराचे हाती संपूर्ण रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 % दराने व्याज अदा करावे.
3) वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये वि प विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.