न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचा शेती हा व्यवसाय असून शेती हेच एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. तक्रारदार यांचे शेत मिळकतीस बाळकु सगणु चांभार अशी नोंद आहे. तक्रारदार यांचे जाधव हे देखील आडनाव आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांचे इतर कागदपत्रांस बाळकु सगणु जाधव अशी नोंद आहे. बाळकु सगणु चांभार व बाळकु सगणु जाधव या दोन व्यक्ती नसून त्या एकच व्यक्ती आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी कै.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू केली आहे. तक्रारदार हे शेतकरी असल्याने ते वि.प. कंपनीचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे त्यांचे शेतामध्ये दि. 26/04/2018 रोजी झाडे तोडताना फांदी लागून त्यांचे डाव्या डोळयास गंभीर दुखापत झाली होती. त्याकरिता त्यांनी कोल्हापूर येथील नेत्रतज्ञ डॉ.पी.जी.पाटील यांचेकडे उपचार घेतले. परंतु तरी देखील त्यांचे डाव्या डोळयास अंधत्व आले आहे. तसे सर्टिफिकेट डॉ पाटील यांनी दि.14/11/2019 रोजी तक्रारदार यांना दिलेले आहे. त्यांना भविष्यात सुध्दा डाव्या डोळयाने दिसणार नाही असे सांगितले आहे. याबाबतचा पंचनामा गावकामगार तलाठी, तळये खुर्द यांनी केला आहे तसेच त्याबाबतचा दाखलाही त्यांनी दिला आहे. तक्रारदार हे याबाबत तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा यांचेकडे विमा प्रस्ताव सादर करणेसाठी गेले असता त्यांनी सदरचा प्रस्ताव मुदतीत नाही असे सांगून स्वीकारला नाही. तदनंतर तक्रारदार यांनी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, कोल्हापूर व विमा कंपनी यांचेकडे विमा प्रस्ताव दिला होता. परंतु विमा कंपनीने दि. 14/1/2020 रोजीचे पत्राने सदरचा प्रस्ताव कृषी अधिकारी यांचेमार्फत आलेला नाही असे सांगून विमा रक्कम देणेस नकार दिला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 1,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 17 कडे अनुक्रमे तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेला अर्ज, क्लेम फॉर्म भाग-1, तक्रारदारांचा 7/12 व 8अ उतारा, फेरफार उतारा, तक्रारदारांचे घोषणापत्र अ व ब, तक्रारदारांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, डॉक्टरांचे सर्टिफिकेट, सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर यांचे सर्टिफिकेट, पंचनामा, पोलिस पाटील यांचा दाखला, तक्रारदारांचे नावाबाबतचे शपथपत्र, वि.प. यांनी दिलेले पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत पॉलिसीची प्रत अॅग्रीमेंटसह, वि.प. यांनी तक्रारदारांना पाठविलेले पत्र तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारअर्ज प्रिमॅच्युअर असलेने चालणेस पात्र नाही.
iii) कै.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांनी विहीत नमुन्यात अर्ज भरुन कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर करायचा असतो. नंतर ब्रोकर कंपनीने विमा प्रस्तावाची तपासणी करुन विमा प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करुन घेवून परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करणेचा असतो. परंतु तक्रारदार यांनी याप्रमाणे कार्यवाही न करता वि.प. कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. म्हणून वि.प. कंपनीने सदरचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत न आल्यामुळे तक्रारदाराच्या दाव्याचा विचार करु शकत नाही या कारणास्तव परत पाठविला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव योग्य कारणाकरिता परत केला आहे. यामध्ये वि.प यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iv) तक्रारदारांचा तक्राअर्ज मुदतीत नाही, सबब तो कायद्याने चालणेस पात्र नाही.
v) सी.पी.आर. हॉस्पीटलचे सर्टिफिकेटवरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांचा डोळा पूर्णपणे निकामी झालेला नाही. परंतु तक्रारदाराच्या डोळयाला 40 टक्के अपंगत्व आहे. विमा पॉलिसीचे अॅग्रीमेंट I(E) प्रमाणे Loss of one limb or one eye असलेस तक्रारदार हे पॉलिसीप्रमाणे 50 टक्के रक्कम मिळणेस पात्र होतात. सदरकामी तक्रारदार यांचा डोळा निकामी झालेला नाही. सबब, तक्रारदार हे कोणतीही विमा रक्कम मिळणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचा शेती हा व्यवसाय आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांची नावे बाळकु सगणु चांभार व बाळकु सगणु जाधव अशी दोन नावे आहेत. परंतु सदरच्या व्यक्ती या दोन व्यक्ती नसून ती एकच व्यक्ती आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी लागू केलेल्या कै.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांचा विमा उतरविला असून सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. वि.प. यांनी याकामी सदर पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, कै.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांनी विहीत नमुन्यात अर्ज भरुन कृषी अधिकारी यांचे कार्यालयामार्फत वि.प. विमा कंपनीकडे सादर केलेला नाही म्हणून तो प्रस्ताव तक्रारदारांना परत केलेला आहे. तसेच सी.पी.आर. हॉस्पीटलचे सर्टिफिकेटवरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांचा डोळा पूर्णपणे निकामी झालेला नाही. तक्रारदाराच्या डोळयाला 40 टक्के अपंगत्व आहे. त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र नाहीत असे वि.प. यांचे कथन आहे. तक्रारदारांनी याकामी डॉ पी.जी.पाटील यांचा तपासणी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामध्ये तक्रारदाराचे डाव्या डोळयास अंधत्व आल्याचे नमूद आहे. तसेच तक्रारदारांनी सी.पी.आर. हॉस्पीटलचे सर्टिफिकेट दाखल केले आहे. यामध्ये तक्रारदाराचे डोळयास 40 टक्के अपंगत्व/अंधत्व आल्याचे नमूद आहे. विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार डोळा पूर्णपणे निकामी झालेस 50 टक्के विमा रक्कम म्हणजेच रु.1,00,000/- मिळण्यास विमाधारक पात्र ठरतो. सदरची बाब विचारात घेता, वि.प. विमा कंपनीने पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदाराचा संपूर्ण विमाक्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे विमाक्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.