न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे शेतजमीनीचे खाते क्र. 16 असा आहे. तक्रारदारा यांचे मुलाचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमायोजना या योजनेअंतर्गत वि.प. कंपनीकडे विमाउतरविला होता. तक्रारदार यांचा मुलगा विकास बाबासाहेब पाटील हा चांग सुर्याचा माळ, बोरबेट येथील खणीत ता. 10/09/2019 रोजी त्यांचे मोरजाई स्पोर्टस या मंडळाचे गणेशमूर्तीचे विसर्जनाकरिता गेला असता अपघाताने पाण्यात बुडून मयत झाला आहे. सदर अपघाताीच नोंद गगनबावडा पोलिस स्टेशनला झाले असून मयताचे प्रेताचे शवविच्छेदन ग्रामीणरुग्णालय गगनबावडा यांचेकडे झालेले असून ग्रामीण रुग्णालय यांनी तक्रारदार यांचा मुलगा पाण्यात बुडून मयत झालेचा दाखला दिलेला आहे. तदनंतर तक्रारदार यांनी दि.03/03/2020 रोजी तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा यांचे माध्यमातून विमा प्रस्ताव दाखल केलाअसता सदरचा प्रस्ताव हा तक्रारदार यांचे मुलाचे नावे शेतजमीन नाही या कारणाने नाकारला आहे. यासंदर्भातील शासन नि र्णयाचा विचार करता तक्रारदारांचा मुलगा हा सदर योजनेनुसार विमा रक्कम मिळणेस पात्र होता व आहे. अशा प्रकारे चुकीच्या कारणास्तव विमादावा नाकारुन वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेम पोटी रक्कम रु. 2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 20 कडे अनुक्रमे विमाक्लेम फॉर्म, 8अ उतारा, 7/12 उतारा, डायरी उतारा, घोषणापत्र, मयताचे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यू दाखला, वर्दी जबाब, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, तक्रारदार यांचे बँक पासबुक, रेशनकार्ड, आधारकार्ड, जिल्हा अधिक्षक, व तालुका कृषी अधिकारी यांची पत्रे तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेबाबत शासन निर्णय वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदार यांचा विमादावा हा तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा कृषी अधिकारी, गगनबावडा यांचेकडे दाखल केला. तथापि सदरचा प्रस्ताव हा दोन्ही अधिका-यांनी नाकारलेचे दिसून येते. तक्रारदाराचे मुलाचे अपघाती मृत्यूबाबत कोणताही प्रस्ताव वि.प. कंपनीकडे आजतागायत दाखल नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार ही मुदतपूर्व व कोणत्याही कारणाशिवाय दाखल केली आहे.
iv) सदरची तक्रार ही सर्व वारसांतर्फे दाखल केलेली नाही. सबब, या तक्रारीस नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाध येतो.
v) तक्रारदाराचे मुलाचे नांवे शेतजमीन नाही या योग्य त्या कारणास्तव तक्रारदाराचा विमादावा नाकारलेला आहे. सदरचा प्रस्ताव हा वि.प. कंपनीकडे दाखल नसलेने तो नाकारणेचा प्रश्नच उद्भवत नाही. तकारदारांनी तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा कृषी अधिकारी, गगनबावडा यांना याकामी पक्षकार केलेले नाही. विमा प्रस्ताव वि.प. कंपनीकडे दाखलच नसलेने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार हे बोरबेट, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्यांचे नांवे स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तसेच शेतजमीन असून शेतजमीनीचा खाते नं.16 असून तक्रारादाराचे नांवे 7/12 उतारा आहे. तक्रारदाराचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. तक्रारदाराचे मुलाचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि.प. विमा कंपनीकडे विमा उतरविला होता व आहे. सदर विमा पॉलिसीचा हप्ता वि.प. कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला होता व आहे. तसेच शासन निर्णय क्र. 2018/प्र.क्र./193/11अे ता. 31/8/2019 रोजीचे सदर शासन निर्णयानुसार तक्रारदाराचा मुलगा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेस पात्र होता व आहे. सदर शासन निर्णय तक्रारदाराने याकामी दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार यांचा मुलगा विकास बाबासाहेब पाटील हा चांग सुर्याचा माळ, बोरबेट येथील खणीत दि. 10/09/2019 रोजी त्यांचे मोरजाई स्पोर्टस या मंडळाचे गणेशमूर्तींचे विसर्जनाकरिता गेला असता अपघाताने व अनावधानाने खणीतील पाण्याचा अंदाज न आलेने पाण्यात बुडून मयत झाला होता व आहे. सदर अपघाताची नोंद गगनबावडा पोलिस स्टेशन यांचेकडे झाली आहे तसेच मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा यांचेकडे झाले असून ग्रामीण रुग्णालय यांनी तक्रारदाराचा मुलगा विकास बाबासाहेब पाटील हा पाण्यात बुडून मयत झालेबाबत दाखला दिलेला आहे.
8. वरील नमूद प्रमाणे तक्रारदाराचा मुलगा विकास बाबासाहेब पाटील अपघाताने पाण्यात बुडून मयत झालेमुळे तक्रारदार यांनी दि. 03/03/2020 रोजी तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा यांचे माध्यमातून विमा प्रस्ताव दाखल केला असता तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा व जिल्हा कृषी अधिकारी, गगनबावडा यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव तक्रारदाराचा मुलगा विकास बाबासाहेब पाटील यांचे नांवावर शेतजमीन नाही या कारणाने प्रस्ताव तक्रारदाराला परत पाठविला/परत करणेत आला. सदरचे तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी तक्रारदाराला दिले पत्र याकामी तक्रारदाराने दाखल केले आहे. परंतु शासन निर्णय क्र. 2018/प्र.क्र./193/11अे ता. 31/8/2019 या शासन निर्णयाचा विचार/ऊहापोह केलेस सदर शासन निर्णयामध्ये अपघातग्रस्त शेतक-यांस/त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेने शेतक-यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई, वडील, शेतक-याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे असे स्पष्टपणे वरील शासन निर्णयात नमूद केलेले आहे.
9. सबब, याकामी तक्रारदाराचे नावांवर शेती आहे, त्याचा 7/12 उतारा व खातेउतारा तक्रारदाराने दाखल केला आहे. परंतु तक्रारदारचा मुलगा विकास बाबासाहेब पाटील हा अपघाताने पाण्यात बुडून मयत झालेला आहे व सदर मुलाच्या नावावर शेती नाही किंवा 7/12 उतारा, खातेउतारा नाही, म्हणून तक्रारदाराचा विमा क्लेम तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी तक्रारदाराला परत देणे ही नक्कीच सेवेतील त्रुटी आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब, सदर मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
10. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तालुका कृषी अधिकारी गगनबावडा व जिल्हा कृषी अधिकारी, गगनबावडा यांनी तक्रारदाराचे मयत मुलाचे नांवे शेतजमीन (7/12 उतारा व खातेउतारा) नाही म्हणून तक्रारदाराचा विमाक्लेम परत केला आहे. वास्तविक सदर नमूद शासन निर्णय असताना विमा क्लेम परत करणे ही बाब चुकीची आहे. सबब, याकामी तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
11. वि.प. विमा कंपनीने तक्रारदा यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) अदा करावी तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.