न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीचा भारत बेंझ या कंपनीचा क्र. एमएच-09-सीयूव-5006 या क्रमांकाचा ट्रक असून सदर ट्रक भाडेतून मिळणा-या उत्पन्नावर तक्रारदारांचा उदरनिर्वाह चालतो. सदरचे वाहनाचा विमा तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे उतरविला असून विमा पॉलिसी क्र. 15230431150300001407 असा आहे व कालावधी दि. 14/7/15 ते 13/7/16 असा आहे. दि.2/10/2015 रोजी सदर ट्रक गोव्याहून शिरोडा या मार्गाने जात असताना अचानक समोरुन येणा-या दुस-या आयशर कंपनीच्या क्र. जीए-05-टी 3272 या ट्रकने तक्रारदाराच्या ट्रकला धडक दिली व त्यामध्ये ट्रकचे नुकसान झाले. त्यावेळी संभाजी महादेव बावन्नावर हा अवजड वाहन चालविणेचा परवानाधारक अनुज्ञप्ती असणारा चालक तक्रारदार यांचा ट्रक चालवत होता. सदर अपघाताची माहिती वि.प. यांना दिलेनंतर वि.प. यांचे सर्व्हेअर यांनी अपघात ठिकाणी येवून अहवाल तयार केला व ट्रक घेवून जाणेस सांगितले. तदनंतर तक्रारदारांनी क्रेनच्या सहाय्याने सदरचा ट्रक ओढत शिरोडा पोलिस स्टेशन येथे आणला व तेथे तपासण्या पूर्ण झालेनंतर सदरचा ट्रक कोल्हापूर येथे भारत बेंझाच्या के.जी.पी. अॅटो या कार्यालयात दुरुस्तीसाठी आणला. सदर क्रेनचे भाडे रु.29,640/- इतके झाले. त्यानंतर सदरचा ट्रक विविध पार्ट्स बदलून दुरुस्त करुन त्याच्या मजूरीच्या व पार्टस खरेदीच्या बिलासह तक्रारदार यांना मिळाला. सदर दुरुस्तीपोटी झालेल्या खर्चाची रक्कम मिळणेसाठी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे विमाक्लेम सादर केला. परंतु वि.प. यांनी अपघात विषयाशी संबंध नसलेल्या काही गोष्टींचा खुलासा तक्रारदाराकडे दि. 16/6/2016 च्या पत्राने मागितला व खर्चाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सदरच्या पत्रास देखील तक्रारदाराने दि. 27/6/2016 रोजीचे पत्राने उत्तर दिले. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना ता. 19/8/2016 च्या रजि.पत्राने महत्वाच्या अटींचा भंग केला असलेचे कारण देवून क्लेम नाकारलेचे कळविले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम मंजूर न करुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून क्रेनच्या भाडेखर्चाची रक्कम रु.29,640/-, ट्रक दुरुस्तीचे खर्चाची रक्कम रु. 4,06,492/-, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रु.2,00,000/-, तक्रारदाराचे व्यवसायाचे झालेल्या नुकसानीपोटी रु.3,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.30,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे क्रेनची भाडेपावती, ट्रक दुरुस्त केलेचे बिल, क्लेम फॉर्म, वि.प. ने खुलासा मागितलेले पत्र, तक्रारदाराचे पत्र, तक्रारदाराने पाठविलेला खुलासा, वि.प.चे पत्रास तक्रारदाराने दिलेले उत्तर, वि.प. यांचे क्लेम नाकारलेचे पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट, बर्चील सर्व्हेअर याचा बिलचेक रिपोर्ट, हर्षल सर्व्हेअर यांचा रिइन्स्पेक्शन रिपोर्ट वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदाराचा क्लेम न्याय्य, कायदेशीर व सत्यावर आधारित नसल्याने तसेच पॉलिसी शर्तींच्या भंगामुळे नाकारण्यात आला.
iii) तक्रारदार हे स्वच्छ हातांनी मे.कोर्टात आलेले नाहीत. विमाकृत वाहनाचा अपघात झाला असलेचे कागदपत्रांवरुन दिसत असले तरी अपघातासंबंधाने तक्रारदाराने वि.प.कडे विश्वासार्ह, सत्य व अचूक माहिती दिलेली नाही. विमाकृत ट्रकमध्ये ड्रायव्हरशिवाय आणखी दोघे प्रवासी होते असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तक्रारदाराने जखमी प्रवाशांसंबंधी खरी माहिती दिली नाही. मालवाहतुकीच्या ट्रकमधून प्रवासी वाहतूक करुन तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटींचा भंग केला आहे.
iv) अपघातानंतर तक्रारदारतर्फे चालकाने वि.प. च्या संमतीशिवाय कोर्टात गुन्हा कबूल करुन दंड भरला आहे. तक्रारदाराची सदरची कृती ही विमा पॉलिसीच्या अटींचा भंग करणारी आहे. पॉलिसीच्या शर्तीनुसार कंपनीच्या लेखी संमतीशिवाय तक्रारदार यांनी विमाकृत वाहनाचा अपघात व त्यामुळे उद्भवलेले फौजदारी स्वरुपाचे गुन्हे अथवा नुकसान भरपाई इ. बाबत कोणतीही कबूली देणेची नाही अथवा कोणतेही दायित्व स्वीकारणेचे नाही.
v) वि.प. यांनी तक्रारदाराकडे दि. 16/6/2016 च्या पत्राने क्लेम संबंधात दाखल केले कागदपत्रांतील विसंगती निदर्शनास आणून वस्तुस्थितीदर्शक खुलासा मागितला होता. त्यावर तक्रारदाराने दिलेला खुलासा दिशाभूल करणारा व चुकीची माहिती देणारा होता. सबब, तक्रारदाराचा क्लेम पॉलिसी भंगामुळे कायद्यानुसार देय नसल्याने नामंजूर केला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 4 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी त्यांचे मालकीचा भारत बेंझ या कंपनीचा क्र. एमएच-09-सीयूव-5006 या क्रमांकाच्या ट्रकचा विमा वि.प. यांचेकडे उतरविला असून विमा पॉलिसी क्र. 15230431150300001407 असा आहे व कालावधी दि. 14/7/15 ते 13/7/16 असा आहे. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सदरची बाब विचारात घेता तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, विमाकृत वाहनाचा अपघात झाला असलेचे कागदपत्रांवरुन दिसत असले तरी अपघातासंबंधाने तक्रारदाराने वि.प.कडे विश्वासार्ह, सत्य व अचूक माहिती दिलेली नाही. विमाकृत ट्रकमध्ये ड्रायव्हरशिवाय आणखी दोघे प्रवासी होते असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तक्रारदाराने जखमी प्रवाशांसंबंधी खरी माहिती दिली नाही. मालवाहतुकीच्या ट्रकमधून प्रवासी वाहतूक करुन तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटींचा भंग केला आहे. अपघातानंतर तक्रारदारतर्फे चालकाने वि.प. च्या संमतीशिवाय कोर्टात गुन्हा कबूल करुन दंड भरला आहे. तक्रारदाराची सदरची कृती ही विमा पॉलिसीच्या अटींचा भंग करणारी आहे. वि.प. यांनी तक्रारदाराकडे दि. 16/6/2016 च्या पत्राने क्लेम संबंधात दाखल केले कागदपत्रांतील विसंगती निदर्शनास आणून वस्तुस्थितीदर्शक खुलासा मागितला होता. त्यावर तक्रारदाराने दिलेला खुलासा दिशाभूल करणारा व चुकीची माहिती देणारा होता. सबब, तक्रारदाराचा क्लेम पॉलिसी भंगामुळे कायद्यानुसार देय नसल्याने नामंजूर केला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे. परंतु दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता वि.प. यांनी सदरची कथने शाबीत करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. अपघातग्रस्त वाहनातून इतर दोन प्रवासी प्रवास करीत होते हे शाबीत करण्यासाठी वि.प. यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला आहे असे कथन वि.प. यांनी केले आहे. परंतु सदरचे कथन शाबीत करण्यासाठी वि.प. यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही योग्य व संयुक्तिक कारणाशिवाय वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे ही बाब याकामी स्पष्टपणे शाबीत होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे हे स्पष्ट होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वि.प. यांनी याकामी अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट, बिलचेक रिपोर्ट व रिइन्स्पेक्शन रिपोर्ट दाखल केला आहे. सदर बर्चील सर्व्हेअर यांचे बिल चेक रिपोर्टचे अवलोकन करता त्यामध्ये वि.प. यांचे निव्वळ दायित्व हे रु. 3,67,399/- इतके दर्शविले आहे. सबब, सदर बिल चेक रिपोर्टचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून रक्कम रु. 3,67,399/- इतकी रक्कम विमाक्लेमपोटी मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 3,67,399/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.