न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी कोल्ड स्टोरेज तसेच त्यांच्या व्यवसायाकरिता ठेवलेल्या मालाचा विमा संरक्षित व्हावा याकरिता वि.प. कंपनीचे विमा एजंट श्री ओंकार हिरेमठ यांचेशी संपर्क साधला असता वि.प. कंपनीचे मॅनेजर व श्री हिरेमठ यांनी तक्रारदाराचे कोल्ड स्टोरेजची त्यातील मालाची पाहणी करुन रक्कम रु. 24,000/- इतक्या प्रिमियममध्ये कोल्ड स्टोरेज, इमारत व त्यामधील स्टॉक कव्हर होईल असे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी एप्रिल 2019 मध्ये वि.प. यांचेकडे पॉलिसी उतरविली. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून दोन पॉलिसी घेतल्या असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -
अ.क्र. | पॉलिसी नं. | सम अॅश्युअर्ड किंमत रु. | पॉलिसीचा कालावधी |
1 | 15110311190100000024 | 65,52,000/- | 30/04/2019 ते 29/04/2020 |
2 | 15110311190100000025 | 40,00,000/- | 30/04/2019 ते 29/04/2020 |
सदर पॉलिसीच्या अटी व शर्ती वि.प. यांनी तक्रारदारास दिलेल्या नाहीत. ऑगस्ट 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होवून तक्रारदार यांचे व्यवसायाच्या सभोवताली पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाल्यामुळे निकामी होवून तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजमधील वीज पुरवठा खंडीत झाला. तदनंतर तक्रारदाराचे कोल्ड स्टोरेजमधील अॅटो जनरेटर देखील बंद झाला. त्यामुळे तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजमधील मेन पॅनेल, कोल्ड रुम कंट्रोल पॅनेल, स्टॅबिलायझर, कोल्ड स्टोरेजमध्ये असलेला स्टॉक, संपूर्ण सीसीटीव्ही कॅमे-याचे सर्कीट या वस्तूंचे नुकसान झाले. सदरची बाब वि.प. यांना कळविलेनंतर वि.प. यांनी कमल बियाणी असोसिएट्स यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. त्यांनी सदर नुकसानीचा अहवाल सादर केला असून त्याची प्रत तक्रारदाराला दिलेली नाही. तक्रारदारांनी विमा क्लेमपोटी पॉलिसी क्र. 1 अन्वये रक्कम रु. 91,982/- ची व पॉलिसी क्र. 2 अन्वये रक्कम रु.11,38,366/- ची मागणी वि.प. यांचेकडे केली होती. परंतु वि.प यांनी तक्रारदारांचा क्लेम, तक्रारदाराचे झालेले नुकसान हे विद्युत पुरवठा थांबलेने झाले असले कारणाने नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमपोटी पॉलिसी क्र. 1 अन्वये रक्कम रु.91,982/-, पॉलिसी क्र. 2 अन्वये रक्कम रु.11,38,366/- मिळावी, तसेच तक्रारदाराने कॅश क्रेडीट व टर्म लोन कर्जखाती भरलेली व्याजाची रक्कम रु.5,04,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 7 कडे अनुक्रमे क्लेम फॉर्म, क्लेम नामंजूरीचे पत्र, पॉलिसी प्रपर, टॅक्स इनव्हॉईस, विमा एजंट यांचे पत्र, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे पत्र, अधिकारपत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत दोन्ही पॉलिसींची प्रत, सर्व्हेअर श्री कमलकिशोर बियाणी यांचे शपथपत्र, दोन्ही पॉलिसीअन्वये करण्यात आलेल्या सर्व्हेंचे रिपोर्ट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, वि.प. कंपनीच्या असे निदर्शनास आले की, तक्रारदाराचे झालेले नुकसान हे वीज पुरवठयातील अचानक तसेच अनुषंगिक तपमानामधील बदलामुळे (due to sudden fluctuation of the power supply and change in temperature) झालेले आहे. वि.प. पॉलिसीतील Exclusion No. 6 & 7 नुसार तक्रारदाराचे सदरचे नुकसान हे संरक्षित (Risk was not covered) न झाल्यामुळे वि.प. कंपनी तक्रारदारास सदर नुकसान भरपाईची रक्कम देवू शकत नाही. त्यामुळे वि.प. कंपनीने तक्रारदाराचा क्लेम दि. 27/1/2020 चे पत्रानुसर संपूर्ण खुलासा देवून पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार नाकारलेला आहे. त्यामुळे वि.प.कडून तक्रारदारास सेवा देताना कोणतीही त्रुटी झालेली नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. कंपनी कडून पॉलिसी क्र. 15110311190100000024 व पॉलिसी क्र. 15110311190100000025 या दोन पॉलिसी घेतलेल्या आहेत. सदर पॉलिसींच्या प्रती वि.प. यांनी याकामी दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे झालेले नुकसान हे वीज पुरवठयातील अचानक तसेच अनुषंगिक तपमानामधील बदलामुळे (due to sudden fluctuation of the power supply and change in temperature) झालेले आहे. वि.प. पॉलिसीतील Exclusion No. 6 & 7 नुसार तक्रारदाराचे सदरचे नुकसान हे संरक्षित (Risk was not covered) न झाल्यामुळे वि.प. कंपनी तक्रारदारास सदर नुकसान भरपाईची रक्कम देवू शकत नाही असे कथन केले आहे. परंतु तक्रारदारांनी त्यांचे पुरावा शपथपत्रामध्ये व युक्तिवादामध्ये केलेली कथने विचारात घेता, ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजला वीज पुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर पुराच्या पाण्यामध्ये बुडाला. त्यामुळे सदर ट्रान्स्फॉर्मरमधून वाहणारा करंट रिव्हर्स बँक झालेने ट्रान्स्फॉर्मर निकामी होवून तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजमधील वीज पुरवठा खंडीत झाला. तक्रारदार यांनी त्यांचे कोल्ड स्टोरेजमध्ये अॅटो जनरेटर बसविला होता. सदरचा वीज पुरवठा खंडीत झालेनंतर सदर अॅटो जनरेटर एक दिवस चालू राहिला. परंतु सदर जनरेटरमधील डीझेल संपलेने तो बंद झाला. तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजच्या सभोवताली पूरस्थिती असलेने व सर्व डिझेल व पेट्रोल पंप बंद असलेने डिझेल मिळू शकले नाही. त्यामुळे वीज पुरवठयाअभावी तक्रारदार यांचे कोल्ड स्टोरेजमधील नमूद वस्तूंचे नुकसान झाले. तक्रारदाराने सदरची कथने ही शपथेवर केलेली आहेत. सदरची कथने विचारात घेता, तक्रारदाराचे कोल्ड स्टोरेजचे झालेल्या नुकसानीस ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुराची परिस्थिती कारणीभूत होती ही बाब नाकारता येणार नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारण्यासाठी दिलेले कारण हे पूर्णतः चुकीचे व वस्तुस्थितीशी विसंगत आहे. वि.प. यांनी नमूद केलेले कारण शाबीत करण्यासाठी वि.प. यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य विमाक्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. वि.प. यांनी याकामी खालील वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे.
2017(2)CLT – NCDRC
Aman Kapoor Vs. National Insurance Co.Ltd. & Ors.
परंतु तक्रारदाराचे कोल्ड स्टोरेजचे झालेले नुकसान हे महापुराच्या परिस्थितीमुळे झाले असल्याच्या निष्कर्षाप्रत हे आयोग आलेने सदरचा निवाडा याकामी लागू होत नाही असा या आयोगाचा निष्कर्ष आहे.
9. वि.प. यांनी याकामी सर्व्हेअर श्री कमलकिशोर बियाणी यांचे दोन सर्व्हे रिपोर्ट व शपथपत्र दाखल केले आहे. तसेच वि.प. यांनी खालील वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे.
III (2015) CPJ 75 (NC)
IFFCO-TOKIO General Insurance Co.Ltd. Vs. Beena Raghav
सदरचे सर्व्हे रिपोर्टमध्ये जर क्लेम द्यावा लागल्यास नुकसान भरपाईची रक्कम दोन्ही विमा पॉलिसीअंतर्गत अनुक्रमे रु. 8,16,716/- व रु. 1,44,500/- इतकी निश्चित केली आहे. सबब, सर्व्हेअर यांचे सर्व्हे रिपोर्ट, सर्व्हेअरचे शपथपत्र व वर नमूद वि.प
यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा यांचा विचार करता तक्रारदार हे दोन्ही विमा पॉलिसीअंतर्गत अनुक्रमे रु. 8,16,716/- व रु. 1,44,500/- इतकी रक्कम विमाक्लेमपोटी
वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर कामी तक्रारदाराने बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज काढले असलेने व त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदर आकारणी केली असलेने याकामी सदर क्लेम रकमेवर द.सा.द.शे. 9 व्याज तक्रारदाराला अदा करणे न्यायोचित वाटते. सबब सदरचे दोन्ही रकमांवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना दोन्ही विमा पॉलिसीअंतर्गत अनुक्रमे रु. 8,16,716/- व रु. 1,44,500/- विमाक्लेमपोटी अदा करावी व सदर दोन्ही रकमांवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.