आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. एच. एम. पटेरिया
तक्रारकर्त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्षाने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती व तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 चे वडील पुरण मोहनलाल पटले व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा करटी (बु.), तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे गट नंबर 888/ए ही शेतजमीन होती.
3. महाराष्ट्र शासनाने विरूध्द पक्ष दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे नागपूर विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा उतरविला होता.
4. तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती पुरण पटले दिनांक 17/07/2013 रोजी मोटरसायकलने जात असता अपघात होऊन जागीच मरण पावले. सदर अपघाताबाबत पोलीस स्टेशन नागभीड येथे अपराध क्रमांक 71/2013 भारतीय दंड विधानचे कलम 279, 337, 338,304-ए नोंदण्यात आला.
5. तक्रारकर्ती क्रमांक 1 ने पतीच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- विमा दावा मंजुरीसाठी प्रकरण तालुका कृषि अधिकारी, तिरोडा यांचेमार्फत दिनांक 24/12/2013 रोजी विरूध्द पक्षाकडे सादर केला. परंतु विरूध्द पक्षाने दिनांक 20/09/2014 च्या पत्रान्वये सदर विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्ती क्रमांक 1 च्या पतीचा महाराष्ट्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्षाकडे विमा काढला असल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा कोणत्याही न्यायोचित कारणाशिवाय नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून तक्रारकर्तीने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- द. सा. द. शे. 18% व्याजासह मिळावी.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.30,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू.15,000/- मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने F.I.R., मृत्यु प्रमाणपत्र, शाळा बदलण्याचे प्रमाणपत्र, 7/12 चा उतारा, गांव नमुना 8-अ, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीचे पती शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमित शेतकरी होते व त्यांचा दिनांक 17/07/2013 रोजी अपघाती मृत्यु झाल्याचे नाकबूल केले आहे. तसेच तकारकर्तीने संपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह विरूध्द पक्षाकडे विमा दावा सादर केल्याचे देखील नाकबूल केले आहे.
त्यांचे पुढे म्हणणे असे की, अपघाताचे वेळी तक्रारकर्तीच्या पतीकडे वैध वाहन चालक परवाना नसल्याने तो तिने मागणी करूनही सादर केला नाही. म्हणून वैध वाहन चालक परवान्याअभावी तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 20/09/2014 च्या पत्राप्रमाणे नामंजूर करण्याची विरूध्द पक्षाची कृती शेतकरी जनता अपघात विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरूनच असल्याने त्याद्वारे विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने सदर तक्रारीस कारणच घडले नाही. म्हणून सदरची तक्रार खारीज करण्याची विरूध्द पक्षाने विनंती केली आहे.
8. तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | नाही |
2. | तक्रारकर्ते मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | नाही |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती मयत पुरण मोहनलाल पटले हे शेतकरी होते व त्यांच्या नावाने मौजा करटी (बु.), ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे गट क्रमांक/भूमापन क्रमांक 888/ए, क्षेत्रफळ 0.36 हेक्टर शेतजमीन होती. आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने वरील शेत जमिनीचा 7/12 चा उतारा दाखल केला आहे. सदरचे दस्तावेज खोटे असल्याचे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही. यावरून मयत पुरण मोहनलाल पटले हा महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमित शेतकरी होता हे सिध्द होते.
तक्रारकर्तीने अपघाताबाबत पोलीस स्टेशन, नागभीड येथे नोंदलेल्या अपराध क्रमांक 71/2013, भारतीय दंड विधानचे कलम 279, 337, 338, 304 (अ) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम 184 अन्वये नोंदलेल्या प्रथम खबरीची प्रत दाखल केली आहे. त्यावरून मयत पुरण मोटरसायकलने विलम वरून नागभीड येथे येत असता त्याच्या मोटरसायकलला विलम नाल्याजवळ भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने जखमी होऊन अपघाती मृत्यु झाल्याचे स्पष्ट होते.
तक्रारकर्त्यांचे अधिवक्ता श्री. हरिणखेडे यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, मयत पुरण पटले हे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमित शेतकरी मोटरसायकल अपघातात मरण पावल्यामुळे त्यांचे वारस असलेले तक्रारकर्ते रू.1,00,000/- विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे. प्रत्यक्षात अशा अपघातातील मृत व्यक्तीचा मोटार वाहन चालक परवाना दाखल करण्याची कोणतीही गरज नसतांना तो दाखल केला नाही. म्हणून तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती विमा लाभार्थ्याप्रती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे.
याउलट विरूध्द पक्षाच्या अधिवक्ता श्रीमती इंदिरा बघेले यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, मयत शेतकरी पुरण पटले हा स्वतः मोटरसायकल चालवित असतांना दिनांक 17/07/2013 रोजी मृत्यु पावला असून शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या अटी व शर्तींमध्ये दिनांक 04 डिसेंबर, 2009 पासून दुरूस्ती करण्यात आलेली आहे. सदर दुरूस्तीप्रमाणे "जर शेतक-याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील" असे नमूद करण्यांत आले आहे. त्यामुळे सदर तरतुदीप्रमाणे मयताचा वैध वाहन चालक परवाना सादर करणे अनिवार्य असतांना तक्रारकर्त्यांनी तो सादर केला नसल्याने विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरूनच असल्याने विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने तक्रारीस कारणच निर्माण झाले नाही.
विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांनी वरीलप्रमाणे अपघातग्रस्त वाहन चालक शेतक-याचा वाहन चालक परवाना सादर करण्याच्या अनिवार्य अटीबाबतची दिनांक 4 डिसेंबर, 2009 च्या मार्गदर्शक सूचनांची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे.
वरील दुरूस्तीप्रमाणे दिनांक 4 डिसेंबर, 2009 नंतर वाहन चालवितांना अपघात झाला असेल तर शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्यासोबत अपघातग्रस्त वाहन चालक शेतक-याचा अपघाताचे दिवशी वैध असलेला वाहन चालक परवाना सादर करणे अनिवार्य असल्याने आणि विरूध्द पक्षाने मागणी करूनही तक्रारकर्त्यांनी मयत पुरण पटले यांचा अपघाताचे दिवशी म्हणजे दिनांक 17/07/2013 रोजी वैध असलेला मोटरसायकल चालविण्याचा परवाना दाखल केला नसल्याने सदर कारणामुळे तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती शेतकरी जनता अपघात विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरूनच आहे व त्यामुळे विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रारकर्ते मागणीप्रमाणे कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नमूद केले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यांना परत करावी.