आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. एच. एम. पटेरिया
तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्षाने मंजूर अथवा नामंजूर केल्याचे न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती श्रीमती ओमेश्वरी तुरकर हिचे पती मृतक ओमप्रकाश भरत तुरकर हे शेती व्यवसाय करीत होते व त्यांच्या मालकीची मौजा नवेगांव, तालुका आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 37 क्षेत्रफळ 0.90 हे.आर. ही शेतजमीन होती.
3. महाराष्ट्र शासनाने विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे नागपूर विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा उतरविला होता आणि तक्रारकर्तीचे मृतक पती सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. विरूध्द पक्ष क्रमांक 3 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांचेमार्फत विमा प्रस्ताव मंजुरीसाठी विरूध्द पक्ष 1 ला सादर करावयाचे होते.
4. तक्रारकर्तीचे पती ओमप्रकाश भरत तुरकर दिनांक 01/08/2012 रोजी मोटरसायकलने जात असता गाडी घसरल्याने जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले.
5. तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्यूबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम रू.1,00,000/- मिळावी म्हणून विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे दिनांक 10/10/2012 रोजी रितसर सादर केला. तसेच विरूध्द पक्षांनी वेळोवेळी जे जे कागदपत्र मागितले त्याची पूर्तता केली. परंतु आजतागायत विरूध्द पक्षाने विमा दावा मंजूर न करता विमा लाभार्थ्याप्रती सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- विरूध्द पक्षाकडे प्रस्ताव सादर केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 10/10/2012 पासून द. सा. द. शे. 18% व्याजासह देण्याचा विरूध्द पक्षास आदेश व्हावा.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.30,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू. 15,000/- मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-2012 चा शासन निर्णय, विरूध्द पक्षांकडे दाखल केलेला दावा, शेतीचा 7/12 चा उतारा, गांव नमुना 8-अ, फेरफार नोंदवही, गांव नमुना 6-क, पोलीस स्टेशन, गोंदीया यांचे पत्र, पोलीस पाटील व सरपंच यांचे प्रमाणपत्र, पोलीस स्टेशन दैनंदिनी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगांव यांचे संदर्भ सेवा पत्र, मृत्यु प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीने विमा दाव्यासोबत अपघाताचे पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत तसेच विमा दावा प्रस्तावासोबत दाखल केलेल्या दवाखान्यातील कागदपत्रानुसार अपघात झालेला होता असे कळते व नंतर मृत्यू झाला तर शव विच्छेदन अहवाल, मरणान्वेषण प्रतिवृत्त, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर. इत्यादी आवश्यक दस्तावेज सादर न केल्यामुळे तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नसल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 16.06.2014 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांची सदरची कृती ही विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडला नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करावी अशी विनंती विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनीने केली आहे.
8. विरूध्द पक्ष क्रमांक 3 तालुका कृषि अधिकारी, आमगांव यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल केला असून त्यांत म्हटले आहे की, तक्रारकर्तीचा दावा त्यांना दिनांक 10/10/2012 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर सदर विमा दावा प्रस्ताव दिनांक 22/10/2012 रोजी वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यांत आला. त्यांनी योजनेप्रमाणे त्यांचे कर्तव्य पार पाडले असून त्यांचेकडून सेवेत कोणताही त्रुटीपूर्ण व्यवहार घडला नसल्याने त्यांना तक्रारीतून मुक्त करावे.
9. विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने आपल्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दावा नामंजूर केल्याचे पत्र, तक्रारकर्तीला त्रुटींची पूर्तता करण्यासंबंधाने दिलेले पत्र इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
10. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणात तक्रारकर्ती श्रीमती ओमेश्वरी ओमप्रकाश तुरकर हिने शपथपत्रावर कथन केलेआहे की, मृतक ओमप्रकाश भरत तुरकर हे तिचे पती असून त्यांच्या मालकीची मौजा नवेगांव, तालुका आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 37, क्षेत्रफळ 0.90 हे. आर. शेतजमीन होती आणि ते शेतकरी होते. आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने वरील शेतजमिनीचा 7/12 चा उतारा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत नागपूर महसूल विभागातील सर्व शेतक-यांचा विमा विरूध्द पक्ष विमा कंपनीकडे उतरविला होता याबाबत उभय पक्षांत वाद नाही.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने आपल्या लेखी जबाबात तसेच त्यांच्या अधिवक्ता श्रीमती इंदिरा बघेले यांनी तोंडी युक्तिवादात म्हटले की, ओमप्रकाश भरत तुरकर यांचा मृत्यू दिनांक 01.08.2012 रोजी मोटरसायकलने जात असतांना गाडी घसरल्याने जखमी होऊन उपचारादरम्यान झाला हे सिध्द करण्यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील प्रपत्र ‘ड’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर विमा दावा प्रस्तावासोबत अपघाताच्या पुराव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी दस्तावेज दाखल करणे आवश्यक आहे. परंतु शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक दस्तावेज तक्रारकर्तीने प्रस्तावासोबत सादर केले नाहीत. तक्रारकर्तीचा विमा दावा विरूध्द पक्षाने दिनांक 16.06.2014 च्या पत्राद्वारे नामंजूर केला म्हणून विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नसल्याने तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
याउलट तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. उदय क्षीरसागर यांचा युक्तिवाद असा की, शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांचा विमा उतरविलेला आहे. मृतक ओमप्रकाश तुरकर यांचा दिनांक 06.06.2012 रोजी मोटरसायकल घसरल्याने अपघात झाला त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगांव येथे भरती करण्यांत आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगांव यांनी पुढील उपचाराकरिता त्यांना के. टी. एस. रूग्णालय, गोंदीया येथे पाठविले. मृतक ओमप्रकाश तुरकर यांचेवर गोंदीया केअर हॉस्पिटल येथे दिनांक 07.06.2012 दुपारी 12.45 ते 02.00 वाजेपर्यंत उपचार करण्यांत आला. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता सेंट्रल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सिम्स) नागपूर येथे हलविण्यांत आले. तेथे त्यांच्यावर दिनांक 08.06.2012 ते 26.06.2012 पर्यंत उपचार करण्यांत आले. ओमप्रकाश तुरकर यांचेवर उपचार करणा-या डॉक्टरांनी डिसचार्ज समरीमध्ये लिहिले आहे की, This patient presented with A/h/o RTA with HI with CSF Rhinorrhoea evaluated s/o diffuse axonal injury with left frontal contusion with IVH, Managed conservatively. During hospital stay he had high grade fever further evaluation s/o meningitis with Duodenal ulcer. Hence feeding jejunostomy done and trachesotomy done and higher antibiotics started. Pt. had persistent high grade fever.
पोलीस स्टेशन, गोंदीया यांच्या दिनांक 07.06.2012 च्या ठाणे दैनंदिनी डायरी मध्ये नोंद करण्यांत आली आहे की, गोंदीया केअर हॉस्पिटल येथून वॉर्ड बॉय चुन्नीलाल टेंभरे यांनी वैद्यकीय अधिकारी यांचे सहीचा लेखी मेमोरी दाखल केला की, ओमप्रकाश तुरकर याचा अपघात झाल्याने सदर हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे आणि जखमीचे जबाब नोंदण्यासाठी NCP 292 गेले असता तेथून रूग्णास दुस-या हॉस्पिटल मध्ये हलविल्याचे सांगण्यांत आले. तसेच पोलीस पाटील व सरपंच यांच्या संयुक्त प्रमाणपत्राप्रमाणे ओमप्रकाश भरतभाऊ तुरकर यांचा दिनांक 06.06.2012 रोजी रस्ता अपघात झाला व ओमप्रकाश तुरकर हे दिनांक 23.07.2012 पर्यंत वेगवेगळ्या दवाखान्यात उपचाराकरिता भरती होते व त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-याच्या सल्ल्यानुसार घरी आणण्यात आले आणि दिनांक 01.08.2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सर्व उपचार संपल्यानंतर उपचारांना दाद न मिळाल्याने घरी आणल्यावर मृत्यू झाल्यामुळे शवविच्छेदन करण्यांत आले नव्हते.
उपरोक्त पोलीस अहवाल व विविध दवाखान्यात घेतलेले उपचार यावरून हे सिध्द होते की, ओमप्रकाश भरत तुरकर यांचा मृत्यू रस्ते अपघातातील दुखापतीमुळेच झाला आहे.
तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. उदय क्षीरसागर यांनी त्यांच्या युक्तिवादाचे पुष्ठ्यर्थ माननीय राज्य आयोग व माननीय राष्ट्रीय आयोग यांचे खालील न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत.
(1) II (2008) CPJ 371 (NC) – New India Insurance Co. Ltd. v/s State of Haryana & Ors.
(2) II (2013) CPJ 486 (NC) – New India Assurance Co. Ltd. v/s Jatider Kumar Sharma
वरील न्यायनिर्णयांत म्हटले आहे की, केवळ प्रथम खबरी आणि शवविच्छेदन अहवाल दाखल केला नाही एवढ्याच कारणाने विमा दावा नामंजुरीची विमा कंपनीची कृती सेवेतील न्यूनता आहे.
सदर प्रकरणांत तक्रारकर्तीच्या पतीचा रस्ते अपघात झाला व त्याच्या परिणामस्वरूप त्याचा मृत्यू झाला याबाबत पुरेसा पुरावा तक्रारकर्तीने दाखल केला असल्याने केवळ प्रथम खबरी किंवा शवविच्छेदन अहवाल दाखल केला नाही म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ची कृती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
12. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील विवेचनाप्रमाणे सदर प्रकरणातील विमित शेतकरी ओमप्रकाश भरत तुरकर याचा पॉलीसी कालावधीत अपघाती मृत्यु झाला असल्याने त्याची वारस विधवा तक्रारकर्ती ओमेश्वरी ओमप्रकाश तुरकर ही विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 22/07/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 3 व 4 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 22/07/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.
7. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
8. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.