निकालपत्र (दि. 11-08-2014) (व्दाराः- मा. सदस्य – श्री दिनेश एस.गवळी)
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले विमा कंपनी यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवल्याने नुकसानभरपाई मिळणेकरीता दाखल केली आहे.
2) तक्रारदारांची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे-
सामनेवाले ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असुन तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडील स्वत:चे एमएच-09-बीसी-1831 मारुती ओमीनी अॅबुलन्स या वाहनाचे पॅकेज पॉलीसी क्र.460122903 व कालावधी दि.02.09.2009 ते दि.01.09.2010 असा आहे. पॉलीसीच्या कालावधीतच दि.10.06.2010 रोजी दुपारी 4.30 मिनीटांनी तक्रारदाराचे सदर वाहन मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवेवरुन निघालेले असताना अचानक समोरुन आडव्या आलेल्या टँकरमुळे तक्रारदाराचे वाहनास अपघात झाला व सदरच्या अपघातामध्ये तक्रारदाराचे वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले. तदनंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाले यांचेकडे क्लेम मागणी केली असता, दि.15.02.2011 रोजी अपघाती वाहनातील ड्रायव्हरकडे अपघातावेळी वाहन चालविणेचा वैध परवाना नव्हता याकारणे तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. तथापि हायवेवर अचानक आडवे आलेल्या टँकरमुळे सदर अपघात झाला, त्यात वाहनातील ड्रायव्हरची कोणतीही चुकी नाही. सदर वाहन अपघातामुळे तक्रारदारांना त्यांचे वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.1,49,819/- इतका होता व प्रत्यक्ष आयडीव्ही ही रु.1,85,792/- इतकी असल्याने तक्रारदारास सदर अपघाती वाहन वारंवार सामनेवाले यांचेकडे विचारणा करुनही सदर वाहन सामनेवाले यांनी ताबेत घेतलेले नाही. सदर वाहन पडून राहून तिचे जादा नुकसान होत असल्याकारणाने तक्रारदाराचे सदर अपघाती वाहन आहे त्या परिस्थितीत रु.25,000/- ला विक्री होत होते व सामनेवाले यांनी जर 7 दिवसात अपघाती वाहन ताब्यात घेतले नाही तर रु.25,000/- किंमतीत सदर वाहन नाईलाजास्तव विक्री करावी लागेल असे दि.04.03.2011 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांना लेखी पत्र देऊन देखील सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही व चुकीच्या कारणास्तव सामनेवाले यांनी तक्रारदारांचा कलेम नाकारलेला आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केल्याकारणाने तक्रारदारांनी सदरहू अर्ज मंचात दाखल करुन सामनेवाले यांचेकडून क्लेमची रक्कम रु.1,60,792/- व दि.10.09.2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- तक्रारदारांस मिळावी अशी विनंती केली आहे.
3) सामनेवाले यांनी दि.10.10.2011 रोजी तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांची तक्रार परिशिष्ठनिहाय नाकारली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी केली नसुन सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदयाखाली चालणेस पात्र नसुन सदर मंचास सदरची तक्रार चालविणेचा अधिकार नाही. टाटा सुमो कार नं.एम.एच.-09-बी.सी.-1831 चा विमा सामनेवाले यांचेकडे उतरविला असुन त्याचा पॉलीसी क्र.460122903 असा असून त्याचा कालावधी दि.02.09.2009 ते दि.01.09.2010 असा आहे, सदरची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तथापि सदर पॉलीसीच्या खाली दिलेली सामनेवाले कंपनी यांची जबाबदारी ही सदर पॉलीसीमध्ये नमुद अटी व शर्तीस तसेच मोटार व्हेईकल अॅक्टच्या कायदयातील तरतुदीं व नियमाप्रमाणे लागू आहे.
सामनेवाले त्यांचे म्हणण्यात पुढे असे कथन करतात की, सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम दि.15.02.2011 रोजीच्या पत्राने नाकारलेला आहे. सदर पत्रामध्ये मजकुर हा खरा व बरोबर आहे. त्यामध्ये नमुद दिलेले कारणे खरी व बरोबर आहेत. तक्रारदाराच्या ड्रायव्हरच्या कोणताही निष्काळजीपणा नव्हता, तसेच समोरुन आडवा आलेल्या टॅंकरमुळे अपघात झाला ही बाब सामनेवाले यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे, विमाधारक वाहनाचे ड्रायव्हरचेकडे अपघाताच्यावेळी वैध परवाना नव्हता. त्यामुळे त्यांचा क्लेम योग्य कारणाकरिता नाकारलेला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारदाराचा क्लेम खर्चासहीत नामंजूर करण्यात यावा.
4) तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले यांची कैफियत, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद याचा विचार होता न्यायनिर्णयासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले-विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे विमा पॉलीसीची विमा रक्कम मिळणया पात्र आहेत का ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
4 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे. |
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 व 2 –
तक्रारदार यांचे मालकीची मारुती ओमीनी अॅब्युलन्स क्र.एम.एच.-09-बी.सी.-1831 याचा विमा सामनेवाले कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्र.460122903 व कालावधी दि.02.09.2009 ते दि.01.09.2010 असा होता. विमा पॉलीसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. तथापि विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम अपघातातील वाहनाचे ड्रायव्हरकडे अपघातावेळी वाहन चालविणेचा वैध परवाना (Driving License) नव्हते या कारणाने नाकारला आहे.
सामनेवाले विमा कंपनीने प्रस्तुत कामी सदर वाहनाचे आर.सी.बुक, मोटार ड्रायव्हिंग लायसन माहितीपत्र, इत्यादींची झेरॉक्स प्रत दाखल केले आहेत. सदरचे आर.सी.बुकवरती क्लास ऑफ व्हेर्इकलवरती Light Motor Vehicle असे नमुद असुन लायसन माहितीपत्रवरती दि.12.10.2001 ते दि.11.10.2021 (N.T.) असे नमुद आहे. यावरुन अपघातावेळी ड्रायव्हरकडे (Non Transport) चे लायसन्स होते परंतु (Transport) चे लायसन्स नव्हते हे सिध्द होते. सामनेवाले यांनी प्रस्तुत कामी तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनांचा पाटील सर्व्हेअर यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला असून त्यामध्ये अपघातग्रस्त वाहनाचे एकुण नुकसान रक्कम रु.1,12,441.80 पैसे इतके नमुद केले आहे. सदरचे सर्व्हे रिपोर्टमध्ये Cause and nature of accident चे कॉलमसमोर While proceeding from kamshet tunnel, suddenly one tanker came across the IV and stopped. IV dashed to its rear side heavily. Same time following another truck dashed to IV at its rear end. Causing frontal as well as rear end damages to the IV असे नमुद केले आहे. यावरुन तसेच तक्रार अर्जात नमुद केलेप्रमाणे, तक्रारदार यांचेवर नमुद वाहनांचा अपघात होऊन सदर अपघातामध्ये सर्व्हे रिपोर्टमध्ये नमुद केल्याप्रमाणे वाहनाचे नुकसान झालेले होते हे दिसुन येते. वर नमुद केलेप्रमाणे तक्रारदारांचे वाहनाचे ड्रायव्हरकडे अपघाताचेवेळी वैध लायसन (वाहन चालविणेचा परवाना) नसल्याने सामनेवाले यांनी नमुद केलेप्रमाणे विमा पॉलीसीच्या अटींचा भंग झालेला असला तरी अपघाताचे कारण व वाहनाचे ड्रायव्हर यांचेकडील लायसन यांचा कोणताही प्रत्यक्ष थेट संबंध नाही. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनाचे नुकसानीबाबत अशा परिस्थितीत विमा कंपनीस नॉन-स्टॅडर्ड बेसीसवर क्लेम निर्धारीत करता आला असता असे या मंचाचे मत आहे व त्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालय, तसेच मा.राष्ट्रीय आयेाग यांचे न्यायनिवाडे आहेत. या सर्व बाबींकडे सामनेवाले विमा कंपनीने दुर्लक्ष केले आहे. ही सामनेवाले विमा कपंनीची त्रुटी आहे. प्रस्तुत कामी हे मंच खाली नमुद न्यायनिवाडे विचारात घेत आहे.
III (2013) C.P.J. 264(N.C) Suresh Kumar Versus National Insurance Company Ltd. –If driver holding driving license to drive light transport vehicle but driving medium goods vehicle, it would be a case of breach of terms / conditions and warranties including “limitation as to use and insured will be entitled to 75% of amount assessed by Surveyor”.
वर नमूद न्यायनिवाडयामध्ये ड्रायव्हरकडे Light Transport Vehicle चे लायसन्स असताना तो Medium Goods Vehicle चालवित होता. त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग होता असे नमूद करुन अशा परिस्थितीमध्ये विमाधारक सर्व्हेअरने आकारणी केलेल्या रक्कमेच्या 75% रक्कम मिळणेस पात्र आहे असे नमूद केले आहे. सदरचे न्यायनिवाडयामध्ये दिलेले मत हे प्रस्तुत तक्रारीशी साम्य दर्शविते त्यामुळे वर दिलेले न्यायनिवाडयातील विवेचन हे मंच या प्रकरणात विचारात घेत आहे.
सबब, वर नमूद विस्तृत विवेचनाचा विचार करिता तक्रारदार हे लॉस अॅसेस्ड रक्कम (सर्व्हेअरने आकारणी केलेली रक्कम) रु.1,12,441.80 पैसे, चे 75% म्हणजे रक्कम रु.84,331/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द..सा.द.शे. 9 % व्याज मिळणेस पात्र आहेत. या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3–
सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारलेमुळे तकारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास लॉस अॅसेस्ड रक्कम (सर्व्हेअरने आकारणी केलेली रक्कम) रु.1,12,441.80 पैसे, (अक्षरी रु.एक लाख बारा हजार चारशे एक्केचाळीस व ऐंशी पैसे फक्त) चे 75% म्हणजे रक्कम रु. 84,331/- ( अक्षरी रु.चौ-यांऐंशी हजार तीनशे एकतीस फक्त) अदा करावे व त्यावर तक्रार दाखल दि. 19-04-2011 पासून संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज अदा करावे.
- सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार फक्त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- (अक्षरी रु.दोन हजार फक्त) अदा करावेत.
- आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
- वरील आदेशाची पुर्तता वि.प. यांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आत करावी.