आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याचा "किंग फूड प्रॉडक्टस्" नावाने फुलचूर, ता. जिल्हा गोंदीया येथे माऊथ फ्रेशनर निर्मिती व विक्रीचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी पॅकिंग करिता लागणारे 18 एन्ग्रेव्ह्ड प्रिंटींग सिलींडर किंमत रू.1,11,412/- चे तक्रारकर्त्याने सुलेख ग्रेव्हर्स, अहमदाबाद यांचेकडून दिनांक 02/03/2013 रोजी खरेदी केले. सदर मटेरिअल सुलेख ग्रेव्हर्स यांनी पाऊच प्रिंटींगसाठी विरूध्द पक्ष गोल्डपॅक कंपनी, अहमदाबाद यांचेकडे पाठविले कारण तक्रारकर्त्याने त्यासाठी विरूध्द पक्षाकडे ऑर्डर नोंदविली होती. प्रिंटींग चार्जेसची रक्कम रू.82,367/- देखील तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला दिली. परंतु विरूध्द पक्ष कंपनीतील भागीदारांमध्ये उपस्थित वादामुळे विरूध्द पक्षाने आजपर्यंत ऑर्डरप्रमाणे पाऊच प्रिंट करून तक्रारकर्त्यास पाठविले नाही.
3. तक्रारकर्त्याने दिनांक 10/08/2015 रोजी विरूध्द पक्षाला नोटीस पाठवून प्रिन्टर पाऊचेस किंवा पाऊच प्रिन्टींगसाठी दिलेले मटेरिअल 7 दिवसांचे आंत परत करण्याची मागणी केली. विरूध्द पक्षाला सदर नोटीस दिनांक 18/08/2015 रोजी प्राप्त होऊनही विरूध्द पक्षाने त्याची पूर्तता केली नाही. म्हणून सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) विरूध्द पक्षाने सेवेत केलेल्या न्यूनतापूर्ण व्यवहारामुळे तक्रारकर्त्यास रू.12,00,000/- चे नुकसान झाले त्याची भरपाई विरूध्द पक्षाकडून मिळावी.
(2) मंचाला योग्य वाटेल अशी अन्य दाद मिळावी.
4. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने 2015 ची बॅलन्स शीट, फॉर्म ‘सी’, 2014 ची बॅलन्स शीट, रेल्वेचे तिकीट, बँकेची पावती, हॉटेलचे बिल, अधिवक्त्यामार्फत दिलेली कायदेशीर नोटीस, पोष्टाची पावती व पोचपावती, विरूध्द पक्षाने दिलेली पावती, सुलेख ग्रेव्हर्स यांनी दिलेली रिटेल इन्व्हॉईस इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
5. विरूध्द पक्षाला रजिस्टर्ड पोष्टाने पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्याबद्दल मंचाला पोच प्राप्त झाली आहे. नोटीस मिळूनही विरूध्द पक्ष गैरहजर राहिल्याने त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 20/04/2016 रोजी पारित करण्यांत आला.
6. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद तसेच तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तावेज यावरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
7. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केले आहे की, त्याच्या व्यवसायासाठी लागणारे पॅकिंग पाऊच तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक मटेरिअल त्याने दिनांक 02/03/2013 रोजी सुलेख ग्रेव्हर्स, अहमदाबाद यांचेकडून खरेदी केले. त्याचे रू.1,11,412/- चे बिलाची (Retail Invoice) ची प्रत दस्त क्रमांक 12 वर दाखल केली आहे. त्याच दिवशी विरूध्द पक्ष Goldpack कंपनीकडे पॅकिंग पाऊच प्रिन्टींगची ऑर्डर दिली आणि सदर पॅकिंग मटेरिअल विरूध्द पक्षाच्या स्वाधीन करण्यात आले. त्याबाबत रू.82,367/- चे बिल (Retail Invoice) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिले ते दस्त क्रमांक 11 वर दाखल आहे. प्रिन्टींग खर्चाची सदर रक्कम रू.41,000/- आणि रू.41,370/- अनुक्रमे दिनांक 15/04/2013 आणि दिनांक 22/04/2013 रोजी तक्रारकर्त्याने बँक ऑफ इंडियाच्या गोंदीया शाखेमार्फत विरूध्द पक्ष Goldpack, Ahemadabad यांच्या खाते क्रमांक 203630110000011 मध्ये जमा केल्याबाबतच्या पावत्या दस्त क्रमांक 6 वर दाखल केल्या आहेत. विरूध्द पक्षाने मटेरिअल व पैसे घेऊनही प्रिन्टींग केलेले पाऊच तक्रारकर्त्यास पाठविले नाही म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 10/08/2015 रोजी अधिवक्ता सचिन बोरकर यांच्यामार्फत विरूध्द पक्षाला रजिस्टर्ड पोष्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीसची प्रत दस्त क्रमांक 8 वर आहे. पोष्टाची पावती दस्त क्रमांक 9 वर आणि विरूध्द पक्षाला नोटीस मिळाल्याबाबतची पोचपावती दस्त क्रमांक 10 वर आहे. परंतु सदर नोटीस मिळूनही विरूध्द पक्षाने प्रिन्टेड पाऊचेस तक्रारकर्त्यास पाठविले नाहीत.
तक्रारकर्त्याने दाखल केलेले सदर दस्तावेज विरूध्द पक्षाने नाकारले नाहीत आणि तक्रारीतील म्हणणे खोटे असल्याचे सिध्द केले नाही. यावरून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रू. 1,11,412/- किंमतीचे पाऊच मटेरिअल आणि रू. 82,367/- पाऊच प्रिन्टींग चार्जेस देऊनही विरूध्द पक्षाने पाऊच प्रिन्टींग करून तक्रारकर्त्यास पाठविले नाही किंवा नोटीसप्रमाणे पैसेही परत केले नाही. सदरची बाब निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
8. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः– तक्रारकर्त्याने तक्रारीत विरूध्द पक्षाने पाऊच मटेरियल व प्रिन्टींग चार्जेस घेऊनही पाऊच न पुरविल्यामुळे त्याचे व्यवसायात रू.12,00,000/- नुकसान झाले त्याची विरूध्द पक्षाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र रू.12,00,000/- नुकसानभरपाई सिध्द करणारा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता विरूध्द पक्षाला दिलेल्या पाऊच मटेरियलची किंमत रू.1,11,412/- आणि दिलेली प्रिन्टींग चार्जेसची रक्कम रू.82,367/- अशी एकूण रक्कम रू.1,93,779/- दिनांक 02/03/2013 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.15,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- मिळण्यास देखील तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल करण्यात आलेली तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरूध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला पाऊच मटेरियलची किंमत रू.1,11,412/- आणि प्रिन्टींग चार्जेसची रक्कम रू.82,367/- अशी एकूण रक्कम रू.1,93,779/- दिनांक 02/03/2013 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह अंदा करावी.
2. विरूध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्हणून रू.15,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रू.5,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
4. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
5. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.