सौ.मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 15 मे, 2015)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही ग्रा.सं.का. 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, वि.प.ही वैद्यकीय विमा व्यवसाय करणारे असून या कामाकरीता लोकांना सदर बाब समजावून सांगण्याकरीता त्यांनी अभिकर्ते नियुक्त केलेले आहेत. अशाच एका अभिकर्त्याने तक्रारकर्त्यासोबत ऑगस्ट 2010 मध्ये संपर्क साधून अपघात विमा योजनेबाबत माहिती दिली. जर असा अपघात झाल्यास तीन महिन्याचे आत विमा दावा मिळेल असेही सांगितले. अभिकर्त्याच्या सांगण्यावर विश्वासून तक्रारकर्त्याने वि.प.ची ‘नागरीक सुरक्षा पॉलिसी’ ही रु.8,900/- देऊन दि.30.08.2010 रोजी रु.3,00,000/- करीता घेतली.
दि.18.10.2011 रोजी तक्रारकर्त्याचा अपघात रात्री 10 ते 10.30 चे दरम्यान पलोती स्कूल, मानकापूरजवळ झाला आणि त्याला 19.10.2011 ला पावणे दोन तासांनी दवाखान्यात भरती करण्यात आले. दि.19.10.2011 ते 28.10.2011 या दरम्यान तक्रारकर्ता हा आंतररुग्ण म्हणून भरती होता.
‘नागरीक सुरक्षा पॉलिसी’ अंतर्गत तक्रारकर्त्याने रु.48,564/- चा विमा दावा दि.09.11.2011 रोजी वि.प.क्र. 2 कडे दस्तऐवजासह दाखल केला. दि.23.03.2012 रोजी वि.प.च्या इन्व्हेस्टीगेटरने तक्रारकर्त्याकडे येऊन दस्तऐवज गोळा केले. तसेच पुढे दि.27.02.2012 रोजी वि.प.च्या सांगण्यानुसार दस्तऐवज वि.प.कडे जमा केले. परंतू गेल्या दोन वर्षापासून वि.प.ने तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम दिली नाही. दि.08.11.2013 कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आला. सदर नोटीसची दखल वि.प.ने घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.48,564/- ही व्याजासह मिळावी, तसेच मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
आपल्या तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीस, पॉलिसीच्या पावत्या, विमा दावा व डिस्चार्ज व्हाऊचर यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 यांना प्राप्त झाल्यावरही त्यांनी मंचासमोर येऊन आपले लेखी उत्तर सादर केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द 30.12.2014 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. मंचासमोर सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता तक्रारकर्त्याचा युक्तीवाद मंचाने ऐकला. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
4. सदर प्रकरणी मंचाने उभय पक्षांमध्ये झालेल्या पॉलिसी करारनाम्याचे अवलोकन केले असता वि.प.ने अपघाती विमा दाव्याची भरपाई देण्याचे कबूल केलेले आहे. तसेच सदर दस्तऐवजावरुन तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीकरीता रक्कम वि.प.ला अदा केल्याचे दिसून येते. तसेच पुढे 18.10.2011 रोजी झालेल्या अपघाताबाबत दि.09.11.2011 रोजी विमा दावा वि.प.कडे दस्तऐवजासह दाखल केलेला आहे व वि.प.नेही सदर दाव्याची चौकशी करण्याकरीता इन्व्हेस्टीगेटर नेमला व त्यानेही तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन चौकशी केली व दस्तऐवजांची मागणी केली आणि तक्रारकर्त्याने त्याची पूर्तता केली. नंतरही वि.प.ने दस्तऐवजांची मागणी तक्रारकर्त्यास केलेली आहे व तक्रारकर्त्याने त्याची पूर्तता केलेली आहे. वि.प.नेही सदर बाब ही मंचासमोर येऊन नाकारलेली नाही. परंतू अभिलेखावरील कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता दाखल केलेल्या कागदपत्रांच्या यादीनुसार दस्तऐवज क्र. 4 दि.18.12.2013 चे डिस्चार्ज व्हाऊचर यावरुन असे दिसून येते की, वि.प.कंपनीने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दाव्याच्या मंजूरीदाखल रु.30,000/- मंजूर केले होते. परंतू सदर बाब तक्रारकर्त्याने कुठेही नमूद केल्याचे दिसून येत नाही. म्हणून मंच या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे की, सदर विमा दाव्याची रक्कम मान्य नसावी म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर वि.प.कंपनी प्रत्यक्ष हजर होऊन कुठलेही लेखी किंवा तोंडी म्हणणे दाखल केलेले नाही. म्हणून तक्रारकर्ता हा तक्रारीतील मागणीतील रक्कम घेण्यास पात्र ठरतो व ती रक्कम वि.प.कंपनीने तक्रारकर्त्यास दिलेली नाही. म्हणून ती व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. परंतू पुढे तक्रारकर्त्याचा विमा दावा त्यांनी निकाली काढला नाही. वि.प.ची सदर कृती ही सेवेतील त्रुटी दर्शविते असे मंचाचे मत आहे.
तसेच पुढे तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीसची बजावणी केली असता वि.प.ने नोटीसला उत्तरही दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला साहजिक मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला म्हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. पर्यायाने तक्रारकर्त्याला मंचासमोर येऊन आपला वाद मांडावा लागल्याने तक्रारकर्ता सदर प्रकरणी तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांच्या विमा दाव्याची रक्कम रु.48,564/- ही रक्कम दि.18.12.2013 पासून तर प्रत्यक्ष रकमेच्या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
3) वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाईदाखल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे एक महिन्याचे आत करावे.