निकालपत्र :- (दि.10/06/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व अंतिम युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे डी.डी. व चेक न वटवून सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे मे.राधा-कृष्ण एंटरप्राईजेस या फर्मचे प्रोप्रायटर आहेत. सदर फर्ममधून इमारतीस लागणारे साहित्य विक्री केले जाते. तसेच सदर फर्मकडे ए.सी.सी.सिमेंट कंपनीची डिलर व डिस्ट्रीब्युटरशीपही आहे. सामनेवाला क्र.1 बँक ही बॅंकींग व्यवसाय करीत असून तिच्या कोल्हापूर जिल्हयात व जिल्याबाहेर अनेक शाखा आहेत. सामनेवाला क्र.2 ही सामनेवाला क्र.1 बॅकेची मुरगूड ता.कागल येथील शाखा असून तक्रारदार यांचे सामनेवाला क्र.2 यांचे शाखेत वेगवेगळया प्रकारची खाती आहेत व सदर खात्यामधून बँक व्यवहार होत होते. सामनेवाला क्र.1 बँकेवर मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे विभाग पुणे यांनी अवसायक मंडळाची नियुक्ती केलेली आहे व सामनेवाला क्र.2 ही सामनेवाला क्र.1 ची मुरगूड येथील शाखा आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 चे शाखेत व्यवहार केले त्यावेळी सदर सामनेवाला क्र.1 बँकेचे सामनेवाला क्र. 3 व 4 हे अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन असून सामनेवाला क्र. 5 ते 16 हे संचालक मंडळ सदस्य आहेत. सामनेवाला क्र.17 हे सामनेवाला बँकेचे मॅनेजर आहेत. बॅकेच्या सर्व व्यवहारास सर्व सामनेवाला हे वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार आहेत. तक्रारदार यांचे सामनेवाला यांचे बॅकेमध्ये बचत खाते क्र.287 आहे. तसेच कॅश क्रेडीट खाते क्र.100001 या नंबरचे खाते आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 बँकेतून ए.सी.सी.लि. या सिमेंट कंपनीचे नांवे दि.08/04/2009 रोजी ड्राफ्ट नं.028866 रक्कम रु.7,47,840/- व दि.13/04/009 रोजी ड्राफ्ट नं.028870 रक्कम रु.3,44,400/- इतक्या रक्कमेचे दोन अकौन्ट पेई ड्राफ्ट काढलेले होते. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून सदर ड्राफ्टचे कमिशन रक्कम रु.822/- व रु.379/- सुध्दा घेतलेले आहे व सदर ड्राफ्टची रक्कम तक्रारदार यांचे नांवे बँक खातेवर खर्ची टाकली आहे. सदरचे ड्राफ्ट तक्रारदार यांनी ए.सी.सी. लि. या सिमेंट कंपनीकडे पाठविले होते. सदरचे दोन्ही ड्राफ्ट ए.सी.सी.सिमेंट कंपनीने त्यांचे बँक खातेवर वटणेसाठी भरले असता दि.16/04/2009 रोजी फंडस इनसफिशिएंट या शे-यानिशी लेखी मेमोसह सदरचे दोन्ही ड्राफ्ट न वटता परत आलेले आहेत. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना सी.सी. खातेवरील रक्कम, डी.डी.रक्कम चेकच्या रक्कमा देण्याचे अभिवचन दिले होते. परंतु सदर सामनेवाला यांचे भोंगळ कारभारामुळे सामनेवाला यांना वारंवार मागणी करुनही रक्कमा मिळाल्या नाहीत. यातील तक्रारदार यांचे सामनेवाला यांचे शाखा मुरगुड ता.कागल यांचेकडे कॅश क्रेडीट क्र.100001 हे खाते आहे. सदर खातेवर दि.30/04/2009 रोजी रक्कम रु.2,06,270.40 एवढी रक्कम शिल्लक होती. ती रक्कमसुध्दा सामनेवाला यांचेकडे जमा आहे. परंतु सदरची रक्कम तक्रारदार यांनी मागूनही सामनेवाला यांनी दिलेली नाही. याउलट सदरची रक्कम सामनेवाला बँकेने तक्रारदार यांचे सी.सी. खाते बंद करुन तक्रारदार यांचे बचत खातेवर वर्ग केली आहे. यातील तक्रारदार यांनी दि.30/03/2009 रोजी मॅक्स न्युयॉर्क लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीच्या नांवे रक्कम रु.16,999/- चा चेक नं.053488 दिलेला होता. सदरचा चेक हा सामनेवाला बॅंकेने दि.17/04/009 रोजी तक्रारदारांचे नांवे खर्ची टाकलेला आहे. पंरतु सदरचा चेक बँकेत वटणेसाठी आलेनंतर सामनेवाला बॅंकेने सदर कंपनीस अॅक्सीस बॅंक लि. या बँकेचा डी.डी.क्र.422045 दि.17/04/2009 चा पाठविला. पण तो वटलेला नाही. तशी नोंद खाते उता-यास आहे. सामनेवाला बँकेस तक्रारदार यांनी वर नमुद केलेली कॅश क्रेडीट खातेवरील जमा शिल्लक रु.2,06,270.40 पै. परत करणेबाबत व वर नमुद केलेल्या दि.08/04/2009 व दि.13/04/009 रोजीच्या डी.डी. रक्कमा परत करणेबाबत सामनेवाला क्र. 2 ते 4 यांना दि.16/06/2009 रोजी रजि.ए.डी.ने नोटीसा पाठवल्या आहेत. सदर नोटीसला सामनेवाला यांनी दि.19/06/2009 रोजी लेखी उत्तर पाठविले आहे. सदर उत्तरामध्ये सामनेवाला बॅंकेने वर नमुद केलेल्या रक्कमा बँकेकडे असलेबाबत कबूल केले आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे रक्कमा देऊन शकत नाही असे शेवटी कळविले आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास तशी कोणतीही रक्कम दिलेली नाही. सदरचे डी.डी. वटले असते तर तक्रारदारास ए.सी.सी.सिमेंटच्या प्रति बॅगमागे रु.5/- प्रमाणे अंदाजे रक्कम रु.22,000/- इतकी सुट मिळाली असती. रिझर्व्ह बँकेने सामनेवाला क्र.1 बँकेवर निर्बंध घातलेनंतर सुध्दा सामनेवाला क्र. 3 ते 17 यांनी बँकेच्या कर्ज वसुलीसाठी कोणतीही ठोस कारवाई व ठोस धोरण राबविलेले नाही. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने दैनिक पुढारीमधून सामनेवाला क्र.1 बँकेचा परवाना रद्द केलेबाबत नोटीस प्रसिध्द करुन सामनेवाला बँकेस बँकींग व्यवहार करणेस बंदी घातली आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्या रक्कमा परत मिळणेकरिता सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराचे बचत खाते क्र.287 वरील दि.30/04/09 अखेर जमा शिल्ल्क रक्कम रु.2,06,270.40पै. त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.69,680/-, दि.08/4/09 रोजीचा ए.सी.सी.लि. या कंपनीचे नावे काढलेला डी.डी.नं.028866 ची रक्कम रु.7,47,840/-, त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.2,60,371/-, दि.13/4/09 रोजीचा ए.सी.सी.लि. या कंपनीचे नांवे काढलेला डी.डी.नं.028870 ची रक्कम रु.3,44,400/- त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.1,19,059/-, चेक नं.053488 ची दि.17/4/09 रोजी खर्ची टाकलेली रक्कम रु.16,999/-, त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.5,843/-, डी.डी.कमिशन दि.08/04/09 व दि.13/4/09 रोजीचे अनुक्रमे रु.822/- व रु.379/-, डी.डी. न वटलेने ए.सी.सी.सिमेंट कंपनीकडून न मिळालेली सुट रक्कम रु.22,000/-,मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,06,336/- अशी एकूण रक्कम रु.19,00,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ वटमुखत्यारपत्र, तक्रारदाराचे सेव्हींग खाते पासबुकचा उतारा, सी.सी. खात्याच्या पासबुकाचा उतारा, ए.सी.सी. कंपनीचे नांवे सामनेवाला यांनी दिलेला डी.डी.क्र.028866 व डी.डी.क्र.028870, सदर डी.डी. न वटलेबाबतचा मेमो, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसला सामनेवाला यांनी दिलेले उत्तर इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला क्र.3 ते 17 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी व लबाडीची असून सामनेवाला यांना ती मान्य नाही. तक्रार अर्जातील मागणीचा प्रस्तुत सामनेवाला हे इन्कार करतात. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात, सहकार कायदा कलम 102 प्रमाणे सामनेवाला संस्थेवर अवसायक मंडळ स्थापन झालेनंतर प्रस्तुत सामनेवाला यांचे सर्व हक्क अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यांचा सर्व कारभार कलम 103 प्रमाणे अवसायक यांनी काढून घेतलेने त्यांचे ताब्यात रेकॉर्ड, कॅश व संस्थेची दैनंदिन वार्इंडींग अप व डिझल्यूशनचे प्रोसिजर सुरु झालेने सामनेवाला क्र.1 हे एकमेव सक्षम लिक्वीडेटर असलेने त्यांना सर्व क्लेम कायदयाने डिसाईड करण्याचा व देणेचा हक्क अधिकार आहे. त्यामुळे सदर सामनेवाला यांचेविरुध्द कोणताही वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी कलम 103 प्रमाणे बसत नसलेने प्रस्तुतची तक्रार काढून टाकणेत यावी. सदर सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार ही अकौन्ट पेयी ड्राफ्ट बद्दल आहे. तो बँकेच्या दृष्टीकोनातून टचिंग द बिझनेस ऑफ सोसायटी मध्ये येत असलेने तक्रारदार यांनी सहकार न्यायालयात दाद मागीतली नाही सबब सदर मंचाकडून दाद मागणेस तक्रारदार हे अपात्र आहेत. तक्रारदार हे व्यापारी आहेत. ड्राफ्ट बद्दलचा मुद्दा हा ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. तसेच सहकार कायदा कलम 107 प्रमाणे रजिस्टार यांची पूर्वपरवानगी घेऊन तसा आदेश मिळाल्याशिवाय अवसायक मंडळाविरुध्द दावाच करता येत नाही. तसेच हायकोर्ट मुंबई बेंच औरंगाबाद यांचे कोर्टातील रिट पिटीशन क्र.5223/2009 चे कामी मे. कोर्टांनी संचालक मंडळास वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार धरलेले नाही. तसेच सामनेवाला संस्थेचे सर्व कारभार तत्कालीन मॅनेजर श्री बी.आर.तावसे यांनी मॅनेजींग डायरेक्टर म्हणून सांभाळलेला होता. सदर कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज प्रत्येकी रु.10,000/- कॉम्पेंसेंटरी कॉस्ट लावून नामंजूर व्हावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र.3 ते 17 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ श्री सुहास राजाराम कुंभार यांना दिलेले वटमुखत्यारपत्राची प्रत दाखल केली आहे. (6) सामनेवाला क्र.1, 2 व 17 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवाला बँक ही महाराष्ट्र सहकार कायदा 1960 मधील तरतुदीनुसार स्थापन झालेली सहकारी संस्था असून आरबीआय ही बँकींग रेग्युलेशन अॅक्टमधील तरतुदींनुसार व केलेल्या कार्यवाहीस व कारवाईस सामनेवाला बँक ही बांधील असते. तक्रारदार क्र.1 यांची मे.राधाकृष्ण एंटरप्राईजेस ही एक प्रोप्रायटर फर्म असून त्यांचे सामनेवाला बँकेमध्ये कॅश क्रेडीट कर्ज खाते आहे. सदर खातेवर जमा बाकी रक्कम रु.2,06,270.470 ही त्यांचे ठेव खातेस जमा करणेत आली आहे व तसे तक्रारदार यांना दि.19/06/2009 चे पत्राने कळविलेले आहे. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 5 मध्ये नमुद केलेप्रमाणे त्यांना दि.08/04/09 रोजी डी.डी.नं.028866 रु.7,47,840/- व दि.13/04/09 रोजी डी.डी.क्र.28870 रक्कम रु.3,44,400/- दि.17/4/09 रोजी चेक क्र.053488 रु.16,999/- अशी एकूण रक्कम रु.11,09,239/- चे डि.डी. घेतलेले होते. सदरचे ड्राफ्टस प्रस्तुत सामनेवाला बँकेकडून वटलेले नाहीत. कारण मूळ वस्तुस्थिती अशी आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सामनेवाला बँकेच्या नियमीत व्यवहाराबाबतची तपासणी करीत असताना याकामी ठेवी व कर्जे यांच्यातील प्रमाणत: चुकीची व अयोग्य असलेबाबतची खात्री झालेने सामनेवाला बँकेने दि.15/04/09 पासून क्लिअरींग कामकाज बंद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे डी.डी. वटू शकलेले नाहीत. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, भारतीय रिझर्व्ह बँकेने दि.21/04/09 रोजीचे पत्राने दि बँकींग रेग्युलेशन अॅक्ट 1949 कलम 35-ए प्रमाणे सामनेवाला बँकेच्या संपूर्ण व्यवहारास निर्बंध लागू करुन सर्व व्यवहारास बंदी घातलेली आहे. तसेच दि.16/10/09 चे पत्राने सदर निर्बंधास पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे. याची पूर्ण कल्पना तक्रारदारास असूनसुध्दा सामनेवाला यांना त्रास देणेचे हेतूने सदरची तक्रार दाखल केली आहे. सद्यस्थिती अशी आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी सामनेवाला बॅकेचे दि.08/02/2010 चे आदेशाने परवाना(लायसेन्स) रद्द केले असून मे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी दि.04/03/10 रोजीच्या आदेशानुसार सामनेवाला बँकेवर अवसायक मंडळाची नेमणूक केलेबाबतचा आदेश दिला आहे. आरबीआय यांनी सामनेवाला बँकेच्या कामकाजाबाबत चौकशी व तपासणीच्या अहवालानंतरच सामनेवाला बँक अवसायनात काढलेली आहे. त्यामुळे सद्या सामनेवाला बँकेचे संपूर्ण कामकाज अवसायक मंडळ पहात आहेत. तसेच म.स.का.1960 मधील कलम 105 मधील तरतुदीनुसार मागील संचालक मंडळाचे सदस्य यांनी घेतलेले निर्णय, पास केलेले ठराव, आर्थिक व्यवहारास जे-जे निर्णय झालेले आहेत त्यास अवसायक मंडळ जबाबदार नाहीत. सामनेवाला यांचेकडील रक्कम रु.1,00,000/- पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याने तसेच डिआयसीजीसी कडून तक्रारदार यांना त्यांच्या एकूण ठेव रक्कमेपैकी क्लेम नं.748 ने रु.1,00,000/- मंजूर झाले असून कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर त्यांना सदरची रक्कम अदा करीत आहोत. तसेच तक्रारदार यांचे अर्जात नमुद केलेप्रमाणे डी.डी.च्या रक्कमां मागणीबाबत दि डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कार्पोरेशन यांचेकडे क्लेम लिस्ट मंजूरीसाठी पाठवली असून त्यांचे मंजूरीनंतर डी.डी.च्या रक्कमा अदा करणेत येणार आहेत तसेच ठेवींची उर्वरित रक्कम बॅंकेकडील कर्जाची रक्कम जसजशी वसूल होईल तसतशी तसेच मा. अवसायक यांना म.स.का.1960 कलम 105 नुसार जे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याप्रमाणे प्राधान्यक्रमाप्रमाणे अग्रहक्कप्रमाणे त्यांच्या ठेवींच्या रक्कमा अदा करणार आहोत. तथापि, तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केलेली रक्कमेची मागणी ही अवास्तव व बेकायदेशीर आहे. तसेच म.स.का.1960 चे कलम 107 नुसार सामनेवाला बँकेविरुध्द व अवसायक मंडळ यांचेविरुध्द कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाइ्र करणेकरिता मे. रजिस्ट्रार यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला क्र.1, 2 व 17 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांनी आर्थिक निर्बंध घातलेबाबतचे पत्र, सदरचे निर्बंधास सहा महिने मुदत वाढ दिलेचे आरबीआय चे पत्र, आरबीआय यांनी सामनेवाला बँकेचा परवाना रद्द केलेबाबतचे पत्र, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी अवसायक मंडळ नेमलेबाबतचे पत्र इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेली आहेत. (8) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मु्द्दा क्र.1:- सामनेवाला क्र. 1, 2 व 17 यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार क्र.1 यांची मे.राधाकृष्ण एंटरप्राईजेस ही एक प्रोप्रायटर फर्म असून त्यांचे सामनेवाला बँकेमध्ये कॅश क्रेडीट कर्ज खाते आहे. सदर खातेवर जमा बाकी रक्कम रु.2,06,270.470 ही त्यांचे ठेव खातेस जमा करणेत आली आहे व तसे तक्रारदार यांना दि.19/06/2009 चे पत्राने कळविलेले आहे. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 5 मध्ये नमुद केलेप्रमाणे त्यांना दि.08/04/09 रोजी डी.डी.नं.028866 रु.7,47,840/- व दि.13/04/09 रोजी डी.डी.क्र.28870 रक्कम रु.3,44,400/- दि.17/4/09 रोजी चेक क्र.053488 रु.16,999/- अशी एकूण रक्कम रु.11,09,239/- चे डि.डी. घेतलेले होते. सदरचे ड्राफ्टस प्रस्तुत सामनेवाला बँकेकडून वटलेले नाहीत ही बाबही मान्य केलेली आहे. तक्रारदाराने तक्रारीतील नमुद दि.08/04/09 रोजी डी.डी.नं.028866 रु.7,47,840/-व दि.13/04/09 रोजी डी.डी.क्र.28870 रक्कम रु.3,44,400/- ए.सी.सी. सिमेंट कंपनीचे नांवे सामनेवाला बँकेमधून काढले होते. तसेच दि.17/4/09 रोजी चेक क्र.053488 रु.16,999/- मॅक्स न्युयॉर्क लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. यांचे नांवे दिलेला चेक सामनेवाला बँकेचे क्लिअरींग बंद झालेने व त्यांचेवर रिझर्व बँकेचे कलम 35 अन्वये सामनेवालांचे संपूर्ण व्यवहारावर निर्बंध आलेने वटलेले नाहीत. सदर उदभवलेली परिस्थिती ही ना सामनेवालांच्या हातात आहे ना तक्रारदाराच्या हातात आहे. सामनेवालांनी रिझर्व बँकेशी पत्र व्यवहार केलेचे दिसून येते. सामनेवाला बॅकेने जाणीवपूर्वक प्रस्तुत डी.डी.व धनादेशाच्या रक्कमा वटवलेल्या नाहीत अशी परिस्थिती नसून त्यास वरील परिस्थिती कारणीभूत आहे. यात सामनेवाला यांची कोणतीही चुक दिसून येत नाही. तसेच प्रस्तुत बँकेवर अवसायकांची नियुक्ती झालेली आहे. सबब सदर परिस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे असे म्हणता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- वरील मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तसेच अवसायक यांचेविरुध्द न्यायालयीन कार्यवाही करणेसाठी सहकार कायदयानुसार आवश्यक असणारी पूर्वपरवानगी घेतलेली नाही. प्रस्तुत संस्थेचे प्रतिनिधी म्हणून अवसायक कार्यरत आहेत. सबब तक्रारदाराने त्याच्या रक्कमा मिळणेबाबत अवसायकांकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा हे मंच व्यक्त करीत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते. 2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |