न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचे मालकीची हिरो मोटोकॉर्प कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल असून तिचा नोंदणी क्र. एम.एच.-09-बीजी-7906 असून त्याचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे. तक्रारदारांची सदरची मोटरसायकल ही दि.12/12/2016 रोजी सकाळी 10 वाजणेचे सुमारास सेंट्रल बस स्टँड ते परिख पूल, कोल्हापूर या रस्त्यावर रितसर लॉक करुन पार्कींग केली होती व ते वारणानगर येथे गेले होते. सायंकाळी 6 वाजणेचे सुमारास ते आपले काम आटपून पार्कींग केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना तेथे सदरची गाडी आढळून आली नाही. दि. 14/12/2016 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून विमा क्लेम मिळणेसाठी अर्ज केला. परंतु विमा क्लेम न दिल्याने तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीची हिरो मोटोकॉर्प कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल असून तिचा नोंदणी क्र. एम.एच.-09-बीजी-7906 असून त्याचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 170646231000786 असा असून पॉलिसीचा कालावधी दि.31/01/2016 ते 30/01/2017 असा आहे. तक्रारदारांची सदरची मोटरसायकल ही दि.12/12/2016 रोजी सकाळी 10 वाजणेचे सुमारास सेंट्रल बस स्टँड ते परिख पूल, कोल्हापूर या रस्त्यावर रितसर लॉक करुन पार्कींग केली होती व ते वारणानगर येथे गेले होते. सायंकाळी 6 वाजणेचे सुमारास ते आपले काम आटपून पार्कींग केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना तेथे सदरची गाडी आढळून आली नाही. म्हणून त्यांनी दि. 21/12/2016 रोजी दु. 1.39 वा. शाहुपूरी पोलिस ठाणे, कोल्हापूर येथे गाडी चोरीबाबतची रितसर फिर्याद दाखल केली आहे. दि. 14/12/2016 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून विमा क्लेम मिळणेसाठी अर्ज केला. तदनंतर तक्रारदारांनी वारंवार संपर्क करुनही वि.प. यांनी सदर गाडीचा क्लेम न देता दि. 29/12/2017 चे पत्राने Your claim as closed in our record असे तक्रारदारांना कळविले आहे. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 17/10/2018 रोजी नोटीस पाठविली असता सदरची नोटीस मिळूनही वि.प. यांनी तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारुन सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास विमाक्लेमची रक्कम आणि गाडीची आयडीव्ही रक्कम परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व नुकसान भरपाईपोटी रु.50,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वाहनाचे आर.सी.टी.सी. रिसीट, विमा पॉलिसी सर्टिफिकेट, वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्र, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली कागदपत्रे, वाहनचोरीचा प्रथम खबरी अहवाल, दोषारोप अहवाल, तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवाना, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व ट्रॅकींग रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांना वारंवार संधी देवूनही त्यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचा पुरावा बंद करण्यात आला. तसेच तक्रारदाराने लेखी युक्तिवादही दाखल केलेला नाही तसेच तोंडी युक्तिवादाचे वेळीही तक्रारदार हे गैरहजर राहिलेले आहेत.
4. वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेनंतर वि.प. यांनी आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदारांनी त्यांचे वाहन हे सार्वजनिक ठिकाणी कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता अथवा सुरक्षेसाठी कोणीही व्यक्ती नसताना पार्कींग केले होते. त्यामुळे सदरची मोटरसायकल ही तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे चोरीस गेलेली आहे. सबब, तक्रारदारास त्याबाबत वि.प. यांचेकडून विमाक्लेम मागण्याचा अधिकार नाही. सदरची मोटारसायकल ही दि. 12/12/2016 रोजी चोरीस गेलेनंतर त्याबाबत ताबडतोब विमा कंपनीस कळविणे व त्याबाबत फिर्याद दाखल करणे जरुर होते. तथापि तक्रारदारांनी याबाबत वि.प. कंपनीस दोन दिवसांनी उशिरा म्हणजेच दि. 14/12/16 रोजी कळविले व पोलिस स्टेशनला दि. 21/12/2016 रोजी विलंबाने कळविले. सदरची माहिती वि.प. यांना उशिरा कळविलेने वि.प. यांना चोरीबाबत शहानिशा करणेची व इन्व्हेस्टीगेटर नेमून माहिती घेणेची संधी मिळाली नाही अगर वस्तुस्थितीबाबत वेळेत योग्य ती छाननी करता आलेली नाही. सबब, या कारणास्तव विमा पॉलिसीचे अटी व नियमांचा भंग झालेला असल्याने वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. वि.प. यांची सदरील कृती ही योग्य व कायदेशीर आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी त्यांचे मालकीची हिरो मोटोकॉर्प कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल असून तिचा नोंदणी क्र. एम.एच.-09-बीजी-7906 असा आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचे कार्यालयाकडून दि. 31/1/2016 ते 30/1/2017 या कालावधीकरिता वर नमूद मोटारसायकलचा विमा पॉलिसी सर्टिफिकेट नं. 170646231000786 ने रक्कम रु. 800/- ची विमा पॉलिसी विकत घेतलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांचे वाहन हे त्यांचे निर्ष्काजीपणामुळे चोरीस गेलेने सदरचा तक्रारदार यांचा विमदावा बंद केलेला आहे. वि.प.क्र.1 व 2 यांचे कथनामध्ये तक्रारदार यांनी मोटार सायकल दि. 12/12/2016 रोजी चोरीस गेली. मात्र तक्रारदाराने दि. 14/12/2016 रोजी वि.प. कंपनीस कळविले तरी दि. 21/12/2016 रोजी म्हणजेच 9 दिवसांनी पोलिस स्टेशनला विलंबाने कळविले व विलंबाने कळविलेने वि.प. कंपनीस सदर चोरीबाबत शहानिशा करणेची व इन्व्हेस्टीगेटर नेमून माहिती घेणेची संधी मिळाली नाही. या कारणास्तव वि.प. यांनी विमादावा नाकारला आहे.
9. तथापि, तक्रारदार यांनी दि. 14/12/2016 रोजीच वि.प. विमा कंपनीस सदरचे थेफ्ट क्लेमबाबत कळविले आहे. तक्रारदाराने वाहनाचा शोध 1-2 दिवस घेवून मगच विमा कंपनीस कळविले आहे. तसेच पोलिस स्टेशनलाही केवळ 9 दिवसांतच कळविले आहे. मात्र विलंबासारख्या काही तांत्रिक बाबींचे कारणास्तव तक्रारदार यांचा विमा दावा नाकारणे हे या आयोगास संयुक्तिक वाटत नाही. तसेच वाहन निष्काळजीपणाने पार्कींग केले हेही वि.प. यांचे कथन या आयोगास संयुक्तिक वाटत नाही. केवळ सकाळीच वाहन पार्क करुन तक्रारदार हे सायंकाळी वाहन घेणेसाठी आले असता तेथे वाहन नसलेचे निदर्शनास आले. वि.प. हे सदरची बाब ही पुराव्यांसह शाबीतही करु शकलेले नाहीत. सबब, या तांत्रिक कारणास्तव तक्रारदार यांचा विमादावा नाकारणे हे आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने सदरचा विमा दावा मंजूर करणेचे आदेश वि.प कंपनीस करणेत येतात. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना त्यांचे विमादाव्याची रक्कम परत करणेचे आदेश करणेत येतात. तक्रारदार यांनी मागितलेली नुकसान भरपाईपोटी रु.50,000/- व मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.50,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने त्यापोटी अनुक्रमे रक्कम रु.5,000/- व रु.3,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना त्यांचे विमाक्लेमची रक्कम देणेचे आदेश करणेत येतात. सदर विमा क्लेमचे रकमेवर वि.प. यांनी तक्रारदार यांना विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. वि.प.क्र.1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी जाबदार यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.