आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. विरूध्द पक्ष टाटा मोटर्स लिमिटेड ही चारचाकी वाहन निर्माता कंपनी असून विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 तिचे अधिकारी आहेत. विरूध्द पक्ष क्रमांक 3 जयका मोटर्स लिमिटेड, नागपूर ही विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा मोटर्सची अधिकृत विक्रेता कंपनी आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 4 हा विरूध्द पक्ष क्रमांक 3 चे वाहन विक्रीसाठी काम करणारा एजंट आहे.
3. तक्रारकर्त्याने चारचाकी वाहन खरेदीसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 4 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 3 ची भेट घेतली आणि त्यांना रू.6,62,468.00 देऊन विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा मोटर्स लिमिटेड निर्मित चारचाकी वाहन Sumo Gold चेसिस क्रमांक MAT446562D9P24362, इंजिन नंबर 497SPTC43KWY654332 नोंदणी क्रमांक MH-35/P-4470 दिनांक 18/01/2014 रोजी विकत घेतले. सदर वाहन खरेदीसाठी इंडस्इंड बँकेकडून कर्ज घेतले असल्याने ते बँकेकडे कर्जासाठी नजरगहाण (hypothecated) होते.
4. सदर वाहन घेतले तेंव्हापासूनच त्यांत अनेक दोष दिसू लागले. वाहन सर्व्हीसिंगचे वेळी ते विरूध्द पक्ष क्रमांक 3 च्या निदर्शनास आणूनही त्यांच्याकडून ते दूर झाले नाही. त्याबाबत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 मेसर्स टाटा मोटर्स यांचेकडे गोंदीया येथून फोनद्वारे तक्रार नोंदविली आहे.
5. प्रथम सर्व्हिसिंग नंतर विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने वाहनातील संपूर्ण दोष दूर केले असून वाहन निर्दोष असल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर लवकरच कुलंट पूर्णपणे संपून इंजिन गरम झाल्याचे तक्रारकर्त्यास आढळून आले. वाहन खरेदी केल्यापासूनच वाहनात सदर दोष अस्तित्वात असून तो मोठा दोष आहे. याशिवाय वाहनाच्या दारांचे अलाईनमेन्ट योग्य नाही ही समस्या घेऊन तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 3 ची दोन-तीन वेळा भेट घेतली परंतु ते सदर दोष दूर करू शकले नाही.
6. तक्रारकर्त्यास इन्डस्इन्ड बँकेकडून प्राप्त पत्रासंबंधाने स्पष्टीकरण मिळविण्यसाठी त्याने ऑगष्ट 2015 मध्ये इन्डस्इन्ड बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेतली असता विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने बँकेच्या व्यवस्थापकास पाठविलेल्या दिनांक 06.03.2014 च्या पत्रावरून त्यास दिसून आले की, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्यास न्यू ब्रॅन्ड चारचाकी वाहन विकलेले नसून डेंटिंग, पेंटिंग करून सेकंडहॅन्ड वाहन ताब्यात दिले आहे. त्याबाबत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 3 चा गोंदीया येथील एजन्ट विरूध्द पक्ष क्रमांक 4 रजनीश जयस्वाल याची भेट घेऊन त्यास सदर वस्तुस्थिती सांगितली, परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडून त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. उलट विरूध्द पक्ष क्रमांक 4 ने वाईट शब्दात तक्रारकर्त्याच्या मुलास शिवीगाळ केली.
7. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विकलेल्या वाहनाचा प्रत्यक्षातील चेसिस नंबर Tax Invoice मधील चेसिस नंबरपेक्षा भिन्न असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय तक्रारकर्त्याने वेळोवेळी तक्रार करूनही वाहनातील वर नमूद केलेले दोष विरूध्द पक्षाकडून दूर करण्यांत आलेले नाहीत. विरूध्द पक्षाची सदर कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वाहनाची किंमत रू.6,62,468/- दिनांक 18.01.2014 पासून द. सा. द. शे. 18% व्याजासह परत करण्याचा आदेश व्हावा.
2. शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू.20,000/- मिळावा.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत वाहनाच्या इंजिनचे फोटो, टॅक्स इन्व्हाईस, जॉब स्लीप, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने दिनांक 06.03.2014 रोजी इंडस्इंड बँकेच्या व्यवस्थापकास दिलेले पत्र, टॅक्स इन्व्हॉईसच्या प्रती, आर.सी.बुक, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, विरूध्द पक्ष क्रमांक 3 चे दिनांक 05.05.2015 रोजीचे पत्र, वाहनाचे आयडेन्टीफिकेशन व रेकॉर्ड इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
9. विरूध्द पक्ष 1 ते 4 ला तक्रारीची नोटीस मिळाल्यावर ते हजर झाले आणि विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने लेखी जबाब दाखल केला. परंतु पुरेशी संधी देऊनही विरूध्द पक्ष क्रमांक 3 व 4 ने लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून प्रकरण त्यांचेविरूध्द लेखी जबाबाशिवाय चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक 18.03.2016 रोजी पारित केला आहे.
10. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचे कंपनीद्वारे उत्पादित वाहने उत्तम गुणवत्तेची असून विक्रीसाठी पाठविण्यापूर्वी Automotive Research Association of India यांचेकडून तसेच Control Systems, Quality checks and Test drive द्वारे तपासणी केली जात असल्याने निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तसेच अधिकृत विक्रेत्यांचे सुसज्ज कार्यशाळेमध्ये ग्राहकांना सेवा पुरविण्यांत येत असल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्यास विकलेल्या वाहनांत कोणतेही निर्मिती दोष असल्याचे तसेच त्यांस विक्री पश्चात सेवा पुरविण्यांत विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 कडून कधीही कसूर झाल्याचे नाकबूल केले आहे. निर्मिती दोष तसेच सेकंडहॅन्ड वाहन विकण्यांत आल्याबाबतचे आरोप निराधार असून त्यास कोणत्याही तज्ञ व्यक्तीकडून तपासणी अहवालाचा आधार नाही म्हणून विरूध्द पक्षाविरूध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे.
तक्रारकर्त्यास विकलेले वाहन हे नवीनच असून सेकंडहॅन्ड असल्याचा खोटा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. तक्रारकर्त्याने Owners Manual मधील मार्गदर्शक सूचनांचे पालन केलेले नाही. वॉरन्टीच्या अटी प्रमाणे 36 महिने किंवा 100000 कि.मी. चालणे यापैकी जे आधी येईल तोपर्यंत वॉरन्टीचा कालावधी आहे. तक्रारकर्त्याने वॉरन्टीच्या अटी व शर्तीचे पालन केलेले नाही व वाहनाची योग्य काळजी घेतली नाही म्हणून वॉरन्टी संपुष्टात आली आहे.
तक्रारकर्त्याला विकलेल्या वाहनाचा ताबा देण्यापूर्वी त्याने वाहनाचे पूर्ण निरीक्षण करून समाधान करून घेतले होते. तसेच विरूध्द पक्ष क्रमांक 3 विक्रेत्याने देखील Pre-Delivery Inspection करून घेतले होते व त्यांस वाहनात कोणतेही दोष आढळले नव्हते. तक्रारकर्त्याने निष्काळजीपणे व देखभालीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्यामुळे त्यांत काही दोष निर्माण झाले असतील तर ते निर्मिती दोष नाहीत व त्यास वाहन निर्माता जबाबदार नाही.
तक्रारकर्त्याने खरेदी केलेले वाहन पहिल्या सर्व्हिसिंगनंतर खालीलप्रमाणे विनामूल्य सर्व्हीसिंगसाठी आणले होते.
1. | 10.03.2014 | 5284 k.m. | At A. K. Gandhi Cars. Free check up camp | No Problem |
2. | 14.04.2014 | 9092 k.m. | Witer Check up Camp Issue of coolant leakage | Cooling system was checked & job was suggested.The same was rejected by the complainant. |
3. | 09.05.2014 | 11689 k.m. | With O. P. No. 3 | Tail Lamp was changed on paid basis. |
4. | 10.07.2014 | 15498 k.m. | O. P. No. 3 Second free service | Problem of door noisy on closing. Problem was rectified under warranty. |
5. | 06.04.2015 | 30490 k.m. | O. P. No. 3 Third free service | Complaint of engine coolant leakage was checked. No such complaint was found. |
6. | 02.05..2015 | 34936 k.m. | O. P. No. 3 | Complaint of high consumption of engine coolant; fuel gauge inaccurate, excessive smoke & glass pops out On inspection coolant was found leakage from cylinder block rear plugs and it was addressed by sealing. Cylinder block plugs and re-confirming that there is no coolant leakage. Fuel gauge & excessive problem were not confirmed when checked. Glass pops out was set right by changing front RHS door window regulator assembly under warranty. The vehicle was delivered on 02.05.2015 and contacted for feedback on 05.05.2015 to which complainant assured to give feedback within 2-3 days. |
7. | 29.05.2015 | 36120 k.m. | O. P. No. 3 At campaign service | Issue of High coolant consumption. Coolant was found leakage from cylinder block rear plugs was addressed by sealing cylinder block plugs and reconfirming that there is no coolant leakage. Also 7 liters of coolant were filled in under warranty. |
8. | 28.07.2015 | 45120 k.m. | O. P. No. 3 Campaign service | Problem of High consumption of engine coolant. On check problem was not found present. |
9. | 05.09.2015 | 46792 k.m. | A. K. Gandhi Cars Fourth free service | Recommneded service & standard checks done. Neither any issue was recorded by the complainant nor observed by the service center. |
तक्रारकर्त्याने वाहन खरेदीसाठी इंडस्इंड बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्ज मंजुरीसाठी तक्रारकर्त्यास वाहन चेसिस क्रमांक MAT446562D9P24362 आणि इंजिन नंबर 497SPTC43KWY654332 आवंटित (Allotted) केल्याबाबत कर्ज देणा-या बँकेस कळविले होते. तक्रारकर्त्याच्या विनंतीप्रमाणे प्रत्यक्षात दुसरे वाहन देण्यांत आल्यामुळे सदरचा बदल दिनांक 06.03.2014 रोजीच्या पत्राप्रमाणे विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने कर्ज देणा-या बँकेला कळविला आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने विरूध्द पक्ष क्रमांक 3 ला संबंधित वाहन Principal to Principal तत्वावर पूर्णपणे विकले असल्याने त्याबाबत विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ची कोणतीही जबाबदारी नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 4 बरोबर विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 चा कोणताही संबंध नाही. तसेच सदर वाहन विक्रीबाबत तक्रारकर्त्याशी देखील कोणताही करार नाही. जो काही करार आहे तो तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्रमांक 3 मध्ये आहे.
तक्रारकर्त्याने कुलंट गळती किंवा कुलंटचा अतिरिक्त होणारा वापर यासंबंधाने 5 वेळा तक्रारी केल्या होत्या पैकी 2 वेळा सदर दोष आढळून आला नव्हता. दिनांक 29.05.2015 रोजी सदरची तक्रार पूर्णपणे निवारण करण्यांत आली. शेवटच्या दोन सर्व्हीसिंगचे वेळी सदर तक्रार कायम असल्याचे आढळून आले नाही. यावरून आता वाहनात सदर तक्रार शिल्लक राहिली नसल्याचे स्पष्ट होते. विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने सेकंडहॅन्ड वाहन तक्रारकर्त्यास विकल्याचा आरोप खोटा असून याबाबत तज्ञाचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्त्याने ज्यादा तक्रारी केल्या होत्या त्या वाहनाच्या चालण्यामुळे निर्माण झाल्या होत्या व त्याचा निर्मिती दोषाशी संबंध नव्हता. वरीलप्रमाणे सेवा केंद्राकडून सर्व तक्रारी दूर करण्यांत देखील आल्या असल्याने विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडलेला नाही. म्हणून तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
11. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
-// कारणमिमांसा //-
12. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडून दिनांक 18.01.2014 रोजी रू.6,62,468/- देऊन विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 टाटा मोटर्स निर्मित सुमो गोल्ड चारचाकी वाहन खरेदी केले. सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक MH-35/P-4470 आणि चेसिस नंबर MAT446562D9P24362 व इंजिन नंबर 497SPTC43KWY654332 आहे. सदर वाहन इंडस्इंड बँकेकडे कर्जासाठी नजरगहाण (hypothecated) आहे. तक्रारकर्त्यास ऑगष्ट 2015 मध्ये इंडस्इंड बँकेकडून पत्र प्राप्त झाले तेव्हा त्यांस कळले की, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने बँकेला दिनांक 60.03.2014 रोजी कांही खोडतोड असलेले पत्र पाठविले. ते पत्र पाहिल्यानंतर तक्रारकर्त्यास आढळून आले की, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्यास डेंटिंग, पेंटिंग केलेले सेकंडहॅन्ड चारचाकी वाहन नवीन म्हणून विकले असून तक्रारकर्त्याची फसवणूक व सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 3 व 4 विरूध्द प्रकरण लेखी जबाबाशिवाय चालविण्यांत आले आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने सदरचा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्त्याने इंडस्इंड बँकेकडे कर्ज मंजुरीचा प्रस्ताव दाखल केला होता व त्यासाठी विक्रेत्याकडून खरेदी करावयाच्या वाहनाची माहिती कर्ज मंजुरीसाठी आवश्यक होती. तक्रारकर्त्याची कर्ज मंजुरीची गरज लक्षात घेऊन व्यवसायात प्रचलित पध्दतीप्रमाणे विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या वाहनाचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबर इत्यादी माहिती कर्ज मंजूर करणा-या बँकेला विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने दिली. कर्ज मंजूर झाल्यावर तक्रारकर्त्यास वाहन विकण्यांत आले. त्यावेळी त्याला प्रत्यक्ष विक्री करण्यांत आलेल्या चेसिस नंबर MAT446562D9P24362 व इंजिन नंबर 497SPTC43PWY661957 या वाहनाचा ताबा देण्यांत आला आहे. यांत विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांचा कोणताही सहभाग नाही त्यामुळे याबाबत विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या टॅक्स इन्व्हाईस, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने इंडस्इंड बँकेला लिहिलेले पत्र आणि नोंदणी प्रमाणपत्र यांत तक्रारकर्त्यास विकलेल्या वाहनाचे चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांक खालीलप्रमाणे नमूद आहेत.
अ.क्र. | दस्तावेज | दस्त क्रमांक | चेसिस क्रमांक | इंजिन क्रमांक |
1. | टॅक्स इन्व्हाईस दि. 18.01.2014 | 2 | MAT446562DEN00874 | 497SPTC43KWY654332 |
2. | वि. प. क्र. 3 ने इंडस्इंड बँकेस लिहिलेले पत्र दि.06.03.2014 | 4 | Alloted – MAT446562DEN00874 Delivered – MAT446562D9P24362 | 497SPTC43KWY654332 497SPTC43PWY661957 |
3. | नोंदणी प्रमाणपत्र MH-35/P-4470 दि. 07.02.2014 | 10 | MAT446562D9P24362 | 497SPTC43PWY661957 |
4. | कार आयडेन्टिफिकेशन ऍन्ड रेकॉर्ड | 13 | MAT446562D9P24362 | 497SPTC43PWY661957 |
5. | सर्व्हीसिंग रेकॉर्ड (Tax Invoice) | | प्रथम सर्व्हीसिंगपासून चेसिस क्रमांक MAT446562D9P24362 नमूद आहे. | |
वरील सर्व दस्तावेजांवरून हेच स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्यास कर्ज मंजुरीसाठी जरी वाहनाचा चेसिस क्रमांक MAT446562DEN00874 व इंजिन क्रमांक 497SPTC43KWY654332 कळविला असला तरी प्रत्यक्षात तक्रारकर्त्याने विकत घेतलेले आणि त्याच्या नांवाने नोंदणी झालेल्या वाहनाचा चेसिस क्रमांक MAT446562D9P24362 व इंजिन क्रमांक 497SPTC43PWY661957 होता व त्याप्रमाणे नजरगहाण (Hypothecation) रेकॉर्ड दुरूस्त करावा म्हणून विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने इंडस्इंड बँकेस पत्र दिले होते. तक्रारकर्त्यास विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने विकलेले वाहन डेंटिंग, पेंटिंग केलेले व सेकंडहॅन्ड आहे याचा कोणताही विधीग्राह्य पुरावा किंवा तज्ञ व्यक्तीचा अहवाल विरूध्द पक्षाने सादर केलेला नाही. म्हणून अशा पुराव्याअभावी विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्यास विकलेले वाहन डेंटिंग, पेंटिंग केलेले सेकंडहॅन्ड वाहन आहे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे स्विकारणे कठीण आहे.
तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्यास विकलेल्या वाहनात निर्मिती दोष असल्याने वाहनातून कुलंट गळती होत होती व त्यामुळे इंजिन गरम होत होते. तसेच दरवाजाचे अलाईनमेंट योग्य नव्हते. वाहन खरेदीनंतर 3 महिन्यांतच वॉरंटी काळात सदर दोष दिसून आल्याने तक्रारकर्त्याने दुरूस्तीसाठी वाहन विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे नेले, परंतु वाहनातील सदर दोष विक्रेता यांनी दुरूस्त करून दिला नाही. सदरची बाब सेवेतील न्यूनता आहे.
दरवाजातील दोष आणि कुलंट गळतीच्या तक्रारीसाठी तक्रारकर्त्याने वाहन विरूध्द पक्ष क्रमांक 3 जयका मोटर्स यांच्याकडे नेले होते आणि त्यांनी सदर दोष दुरूस्तीचा प्रयत्न केल्याबाबत तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे टॅक्स इन्व्हाईसच्या प्रती दाखल केल्या आहेत.
Page No. | Tax Invoice | K.M.s | Work Done | Type |
18 | Dt. 10.07.2014 | 15498 | Replaced door striker/adjusted | Free service |
16 | Dt. 02.05.2015 | 34396 | Assy. Manual window regulator RH Cylinder Head Dismatle & Assemble. Coolant Consumption Renew door channel R.H. | Warranty Warranty Warranty |
20 | Dt. 30.05.2015 | 36120 | 1. Coolant LLCCASTR 2. Cooling System Check for leaks 3. Coolant top up 7 ltrs. | Warranty Free service Warranty |
| Remarks by Service Person Dt. 01.06.2015 | | Coolant leakage was found from cylinder block plug. Plug filament rectified with sealant application vehicle under observation for leakage. | |
विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 च्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्त्याचे वाहनात दाराबाबत आणि कुलंट अधिक गळतीबाबतचे दोष हे निर्मिती दोष नाहीत. तक्रारकर्त्याने वाहन निष्काळजीपणे आणि योग्य निगा न राखता चालविल्यामुळे निर्माण झालेले असल्याने त्यासाठी वाहन निर्माता कंपनी जबाबदार नाही. असे असले तरी 3 वर्षाच्या वॉरन्टी काळात वॉरन्टीच्या अटी व शर्तीस अनुसरून विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 चे अधिकृत विक्रेता असलेल्या विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने सदर दोष विनामूल्य दुरूस्त करून दिले असल्याने विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नाही.
विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने दिनांक 30.05.2015 रोजी वाहनातील कुलंट गळती व इंजिन गरम होण्याबाबतची तक्रार पूर्णपणे निवारण केली असून दाराबाबतची तक्रार देखील त्यापूर्वीच निवारण केली आहे. त्यानंतर वाहनांत कुलंट गळती किंवा इंजिन गरम होण्याबाबत तक्रार कायम असल्याबाबत कोणत्याही तज्ञाचा अहवाल तक्रारकर्त्याने सादर केला नसल्याने केवळ तक्रारकर्त्याच्या तोंडी कथनावरून सदर वाहनात वरील दोष कायम असल्याचे आणि तो निर्मिती दोष असल्याचे सिध्द होत नाही व म्हणून तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र नाही.
आपल्या युक्तिवादाचे पुष्ठ्यर्थ त्यांनी खालील न्यायनिर्णयाचा दाखला दिला आहे.
Dr. K. Kumar Advisor (Engineering), Maruti Udyog Ltd.
v/s
Dr. A. S. Narayana Rao & Anr.
2 (2010) CPJ 19 (NC)
सदर प्रकरणातील दस्तावेजांचा विचार करता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या वाहनात दिनांक 18.01.2014 रोजी वाहन खरेदी केल्यानंतर दिनांक 10.07.2014 रोजी दाराच्या अलाईनमेंटचा आणि दिनांक 02.05.2015 रोजी वाहनातून कुलंट गळतीचा दोष निदर्शनास आला. त्यासाठी तक्रारकर्त्याने वाहन विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे दिनांक 10.07.2014, 02.05.2015 आणि 30.05.2015 रोजी नेले होते. विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने दाराच्या अलाईनमेंट आणि कुलंट गळतीबाबत दुरूस्तीचा प्रयत्न केला परंतु सदरचा दोष पूर्णपणे दुरूस्त झाला नसून अद्यापही कायम आहे.
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडून खरेदी केलेल्या वाहनाला निर्माता कंपनी (विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2) यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 3 मार्फत तीन वर्षाची वॉरन्टी दिली आहे. वरील दोष वॉरन्टी काळात निदर्शनास आल्यामुळे वॉरन्टीप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेला पूर्ण संच बदलवून वाहन निर्दोष करून मिळण्याचा तक्रारकर्त्यास अधिकार आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने वरील दोषासाठी दिनांक 10.07.2014, 02.05.2015 आणि 30.05.2015 रोजी आपल्या तंत्रज्ञामार्फत दुरूस्तीचा प्रयत्न केल असला तरी सदर दुरूस्तीनंतर वाहनातील वरील दोष पूर्णपणे दुरूस्त झाले नाही हे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन लेखी जबाब दाखल करून नाकारलेले नाही किंवा ज्या तंत्रज्ञ किंवा अभियंत्याने वाहन दुरूस्तीचे काम केले त्याच्या शपथपत्राद्वारे वरील दुरूस्तीचे वेळी वाहनातील दोष पूर्णपणे दूर झाले होते हे सिध्द केलेले नाही. याउलट वाहन दुरूस्ती करणा-या तंत्रज्ञाचा दिनांक 01.06.2015 चा Tax Invoice दिनांक 30.05.2015 रोजीचा अहवाल असे सांगतो की, सदर दुरूस्तीनंतर वाहन कुलंट गळतीच्या निरीक्षणाखाली होते. म्हणून सदर दुरूस्तीनंतरही वाहनातील कुलंट गळती व त्याद्वारे इंजिन गरम होण्याचा दोष कायम आहे या तक्रारकर्त्याच्या म्हणण्यावर गैरविश्वास दाखविण्याचे कोणतेही न्यायोचित कारण दिसत नाही. सदर वाहन 3 वर्षाच्या वॉरन्टी काळात असतांना खरेदी पासून केवळ 3 महिन्याच्या आंत त्यांत निर्माण झालेला दोष दूर करण्यासाठी आवश्यक सदोष यंत्रणा (संच) न बदलविता केवळ सिलींग लावून दोष दूर करण्याचा विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने असफल प्रयत्न करणे व त्यामुळे तक्रारकर्त्याला त्याच्या नवीन वाहनाचा कार्यक्षमतेने उपभोग घेता न येणे ही विक्रेता आणि विक्रेत्यामार्फत वॉरन्टी देणा-या वाहन निर्मात्या कंपनीची सेवेतील न्यूनता आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
13. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- विरूध्द पक्ष क्रमांक 3 जयका मोटर्स यांनी तक्रारकर्त्यास 3 वर्षाच्या वॉरन्टीसह सदर वाहन विकलेले आहे. टॅक्स इन्व्हाईस वरून असे दिसून येते की, वॉरन्टी काळात दरवाजाबाबत तसेच कुलंट गळती व इंजिन गरम होण्याबाबतचा दोष निर्माण झाल्यामुळे त्यासाठी दुरूस्तीचे प्रयत्न विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने वॉरन्टीमध्येच केल्याचे दर्शविले असून त्यासाठी तक्रारकर्त्याकडून खर्च घेतलेला नाही. मात्र नवीन वाहनात निर्माण झालेले वरील दोष विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने केलेल्या सिलींग वगैरे सारख्या उपाययोजनेमुळे पूर्णतः दूर झालेले नाहीत. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 3 मार्फत तक्रारकर्त्यास सदर वाहनाची वॉरन्टी दिली आहे. म्हणून वॉरन्टी कालावधीत नवीन वाहनात निर्माण झालेल्या वरील दोषांचे समूळ उच्चाटन करण्याची संयुक्त व वैयक्तिक जबाबदारी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 ची आहे. म्हणून तक्रारकर्त्याकडून कोणताही खर्च न घेता वाहनातील दरवाज्यांच्या अलाईनमेंट बाबत आणि कुलंट गळती/कुलंटची अतिखपत व त्यामुळे इंजिन गरम होणे हे दोष दूर करण्यासाठी वाहनातील जे भाग किंवा यंत्रणा बदलविणे व नवीन बसविणे आवश्यक असेल ते बसवून वाहन निर्दोष करून द्यावे. तसे न केल्यास तक्रारकर्त्याने स्वतःच्या पसंतीच्या गॅरेजमधून वरील दोष पूर्णपणे दूर करण्यासाठी आवश्यक सुटे भाग किंवा यंत्रणा संच बदलून घ्यावे आणि त्याचा खर्च विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या द्यावा.
याशिवाय विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 कडून शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.15,000/- आणि तक्रारखर्च रू.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अंतिम आदेश –
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यांत आलेली तक्रार विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांचेविरूध्द संयुक्त व वैयक्तिकरित्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. तक्रारकर्त्याचे तक्रारीत नमूद वाहन सुमो गोल्ड नोंदणी क्रमांक MH-35/P-4470 मधील दरवाजांच्या अलाईनमेंटमधील दोष तसेच कुलंट गळती/कुलंटची अतिखपत व त्यामुळे इंजिन गरम होण्याचा दोष तक्रारकर्त्याकडून कोणतीही रक्कम न घेता आवश्यक असलेले सुटे भाग/यंत्रणा संच बदलून दूर करून द्यावे आणि सदर दोष दूर झाले असून वाहन दोष रहित असल्याबाबत तक्रारकर्त्यास मान्य असलेल्या वाहन निर्मिती शास्त्रातील तज्ञ व्यक्ती/संस्थेचे प्रमाणपत्रासह तक्रारकर्त्यास सुपूर्द करावे.
किंवा
वरील प्रमाणे तक्रारकर्त्याचे समाधान होईल अशी विरूध्द पक्षाकडून वाहनाची कायमस्वरूपी विनामूल्य दुरूस्ती होऊ शकत नसेल किंवा विरूध्द पक्षाने त्यास नकार दिला तर तक्रारकर्त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे नामांकित गॅरेजमधून दुरूस्ती करून घ्यावी आणि त्यासाठी येणारा खर्च विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या द्यावा.
2. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.15,000/- आणि तक्रारखर्च रू.5,000/- द्यावा.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 4 विरूध्द कोणताही आदेश नाही.
4. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.