तक्रारदार : गैरहजर.
सामनेवाले करीता : वकील श्रीमती अनिता मराठे हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र. 1 हे टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड या नांवाने वित्त पुरवठा करणारी कंपनी असून सा.वाले क्र. 2 हे सा.वाले क्र. 1 यांचे विभागीय कार्यालय आहे. सा.वाले क्र. 1 व 2 यांची कार्यालये तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहेत.
2. तक्रारदार हे कुर्ला येथे राहाणारे असून ऑक्टोबर,2007 मध्ये त्यांनी टाटा कंपनीचे एल.पी.ओ. 1510 या मॉडेलचे चारचाकी वाहन स्वतःच्या चरीतार्थासाठी विकत घेतले होते. सदर चारचाकी वाहन विकत घेण्यासाठी तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून रु.8,66,000/- येवढी रक्कम कर्जाने घेतली होती. सदर कर्जापोटी वित्त खर्च रु.3,04,832/- असा ठरला होता. सदर कर्ज घेतेवेळी तक्रारदार व सा.वाले यांच्यातील कर्जाच्या कराराची प्रत तक्रारदार यांना देण्यात आली नव्हती. कर्जाची परतफेड ही 48 मासीक हप्त्यात द्यावाची असून कर्जाचा पहिला हप्ता रु.26,382/- येवढा होता व उर्वरित हप्ते रु.24,350/- या प्रमाणे 47 हप्ते तक्रारदार यांना कर्जाच्या परतफेडीपोटी द्यावयाचे होते. तक्रारदार याचे असे म्हणणे आहे की, 2009 चे फेब्रुवारी महीन्यात तक्रारदार यांना असे आढळून आले की, त्यांना सा.वाले क्र. 2 यांचे चेंबुर शाखेत जाणे अवघड वाटत होते. तसेच सा.वाले यांचा व्याज दर देखील जास्त होता. त्यामुळे तक्रारदार यांनी कुर्ला नागरी सहकारी बँक यांचेकडे कर्जाची रक्कम वळती करुन उर्वरित कर्जाची रक्कम कुर्ला नागरी सहकारी बँक यांना परतफेड करण्याचे कबुल केले. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, 2009 च्या मार्च सालामध्ये तक्रारदार यांना कर्जाची रक्कम एक रक्कमी फेडावयाची असल्यामुळे त्यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कार्यालयात श्री.महेश सरमळकर यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदार यांना एक रक्कमी कर्जाची रक्कम फेडण्यासाठी रु.7,65,000/- येवढी रक्कम सा.वाले क्र. 2 यांचेकडे भरावी लागेल असे सांगण्यात आले. सदर रक्कमेमध्ये मुदतपूर्व कर्ज फेड करण्यासाठीचा खर्च अंतर्भुत आहे असे सांगण्यात आले. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले क्र. 2 यांचेकडे कर्ज परतफेडीचा तक्ता मागणी करुनसुध्दा सा.वाले क्र. 2 यांनी तो दिला नाही. तसेच तक्रारदार व सा.वाले याच्यातील कराराची प्रत देखील तक्रारदारांना देण्यात आली नाही. उलट तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, त्यांनी कर्ज फेडीपोटी रु.7,50,000/- अदा केल्यास त्यांना त्यावर रु.15,000/- येवढया रक्कमेची सुट मिळू शकेल.
3. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले यांचेकडे एक रक्कमी कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी कुर्ला नागरी सहकारी बँकेतुन रु.7,50,000/- कर्जरुपी मिळविले व सा.वाले क्र. 2 यांना रु.7,50,000/- अदा केले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचेकडे त्यांच्याकडे कोणतीही बाकी नसल्याबाबत दाखला मागीतला. परंतु सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन काही दिवसानंतर येण्यास सांगीतले. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, पुढे काही दिवसांनी सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांचेकडे कर्जाच्या परतफेडीपोटी रु.51,849/-येवढया रक्कमेची मागणी केली व सदर रक्कम भरल्यास तक्रारदारांना रु.12,651/- येवडया रक्कमेची सुट देण्याचे कबुल केले. त्यावेळेस तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे रु.7,50,000/- संपूर्ण कर्जफेडीपोटी भरल्याचे सांगीतले. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांना इतर खर्चापोटी रु.1,14,166/- याची मागणी केली असता तक्रारदारांनी सदरची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच तक्रारदारांना कर्ज रक्कम परतफेडीपोटी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे नाकारले. तक्रारदार यांना कर्जाबाबत नाहरकत प्रमाणपत्र कुर्ला नागरी सहकारी बँकेत देणे आवश्यक असल्याने सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या कृतीत मोडत असल्याने तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचे कडून नुकसान भरपाईपोटी रु.1 लाख, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.1 लाख, व तक्रारीचा खर्च रु.25,000/- याची मागणी केली आहे.
4. सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मागणे नाकारले. सा.वाले क्र. 1 व 2 यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले क्र. 1 व 2 यांना त्रास देण्याचे उद्देशाने सदरची विधाने केलेली आहेत. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी सत्य परिस्थिती मंचासमोर लपवून खोटी विधाने करुन सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी त्यांच्या विरुध्द लावलेली सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब हे आरोप नाकारलेले आहेत.
5. तक्रारदारांनी विकत घेतलेले चारचाकी वाहन त्यासाठी सा.वाले क्र. 2 यांचे बरोबर केलेला कर्जाचा करार, कर्ज परतफेडीचा हप्ता व कर्ज परतफेडीची मुदत, याबाबत तक्रारदार व सा.वाले यांच्यात दुमत नाही. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी कर्जाची रक्कम घेतेवेळी कर्जाचा करार तसेच जामीनाचा करार सा.वाले यांचे बरोबर करुन दिला होता. कर्ज घेतेवेळी कर्ज परतफेडीच्या रक्कमे बरोबरच इतर खर्च सा.वाले यांनी देण्याचे कबुल केले होते. तसेच कर्जाची परतफेड मुदतपूर्व करावयाची झाल्यास मुळ कर्जाच्या रक्कमेच्या 4 टक्के अथवा रु.5,000/- यापैकी जास्त असलेली रक्कम तसेच कर्ज परतफेड करण्यास उशिर झाल्यास कर्ज रक्कमेवर व्याज देण्याचे कबुल केले आहे. कर्ज रक्कमेच्या अतिरिक्त रक्कम द्यावयाची तक्रारदार यांची जबाबदारी तक्रारदारांना मान्य होती. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, काही हप्ते वगळता तक्रारदार यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 ते 30 दिवसाचा उशिर लावला. तसेच तक्रारदार यांनी दिलेल्या कर्ज परतफेडीचे धनादेश न वटल्यामुळे त्या बद्दलचे खर्च तक्रारदार यांचेवर लावण्यात आले. तक्रारदार यांच्या कर्जाच्या थकीत पणामुळे सा.वाले क्र. 1 व 2 यांना तक्रारदार यांचे वाहन उचलून नेण्याचा अधिकार होता. सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांनी दिनांक 5.3.2009 रोजी मुदतपूर्व कर्जाची परतफेड करण्याचे ठरविले. त्यावेळेस तक्रारदार यांचेकडे देय असलेली रक्कम तक्रारदार यांना सांगण्यात आली. त्याप्रमाणे दिनांक 5.3.2009 रोजी तक्रारदार यांचेकडे रु.5,75,350/- येवढी रक्कम देय होती. त्यापैकी तक्रारदार यांनी रु.7,50,000/- येवढया रक्कमेची परतफेड केली व उर्वरित रु.25,303/- लौकरच देण्याचे कबुल केले. तसेच तक्रारदार यांनी प्रतिदीनी रु.275.28 देण्याचे कबुल केले. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 8.10.2009 रोजी तक्रारदार यांचेकडे रु.75,490/- येवढी रक्कम देय होती. तक्रारदार यांचे कडून सदर रक्कम न आल्यामुळे सा.वाले नाहरकत दाखला देण्यास तंयार नव्हते. त्यामुळे सा.वाले यांचे म्हणयाप्रमाणे त्यांची कृती सेवा सुविण्यात कसुर अथवा अनुचित प्रथेचा अवलंब या कृतीत येत नाही.
6. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, कर्जाची परतफेड केल्या बद्दलच्या पावत्या, मुदतपूर्व कर्ज परतफेड करण्या बाबतचा तक्ता, तक्रारदार यांनी केलेल्या कर्ज परतफेडीचा तक्ता, दाखल केला आहे.
7. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, तक्रारदार यांचे सोबत झालेल्या कर्जाच्या कराराची प्रत, व तक्रारदार यांचेकडे घेणे असलेल्या खर्चाचा तपशिल, तक्रारदारांनी दिलेल्या कर्जाचा व परतफेडीचा तक्ता, दाखल केला आहे.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. सा.वाले यांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. तक्रारदार यांचे वतीने तोंडी युक्तीवादाकामी तक्रारदार यांचे वकील हजर राहू शकले नाही. त्यानुसार तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांचे कडून चारचाकी वाहन घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्यवहाराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | नाही. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः तक्रारदारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचेकडून चारचाकी वाहन विकत घेण्यासाठी घेतलेले कर्ज रु.8,66,000/- सदर कर्जाच्या परतफेडी बाबत निश्चित करण्यात आलेले 48 मासीक हप्ते तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांना करुन दिलेले कर्जाचे करार तसेच गहाणपत्र व जामीन करार यागोष्टी तक्रारदार नाकारत नाहीत. कर्जाची परतफेड तक्रारदार यांनी मार्च,2009 मध्ये मुदतपूर्व करतेवेळी सा.वाले क्र. 2 यांना अदा केली होती ही बाब सा.वाले नाकारत नाही. सा.वाले क्र. 2 यांना सदर कर्जाची परतफेड करुन सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांचेकडे कर्ज फेडीपोटी रु.1,14,166/- याची मागणी केली ही बाब सा.वाले नाकारत नाहीत. सा.वाले क्र. 2 यांना कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी तक्रारदार यांनी कुर्ला नागरी सहकारी बँक यांचे कडून कर्जाची रक्कम घेतली होती ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत. कर्जाच्या परतफेडीपोटी तक्रारदार यांनी नाहरकरत प्रमाणपत्र सा.वाले क्र. 2 यांचेकडे मागून सा.वाले यांनी ते न दिल्यामुळे तक्रारदार यांनी मुळ तक्रारीत अंतरीम आदेशाचा अर्ज दाखल करुन सदर नारहरकत दाखला प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतले ही बाब उभय पक्षकार नाकारत नाहीत.
9. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून चारचाकी वाहन विकत घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्यवहारा संबंधी सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदारांनी आपला पुरावा शपथपत्र व तक्रारीतील कथने यांच्याव्दारे असा सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की, सा.वाले यांचे कडून कर्ज घेताना करण्यात आलेल्या कर्जाच्या कराराची प्रत तक्रारदार यांना दाखविण्यात आली नव्हती. तसेच कर्जाच्या परतफेडीच हप्ते नियमित देऊनसुध्दा कर्ज परतफेडीची रक्कम एक रक्कमी परत करताना सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे रु.7,50,000/- येवढी रक्कम कर्जाच्या परतफेडीपोटी देऊनसुध्दा तक्रारदारांना सा.वाले क्र. 2 यांनी कबुल करुनसुध्दा सुट दिली नाही. उलटपक्षी तक्रारदार यांचेकडे रु.51,849/- व रु.1,14,866/- येवढया रक्कमेची अवास्तव मागणी केली. सदर रक्कम तक्रारदारांनी देण्यास नकार दिल्यामुळे तक्रारदार यांना कर्ज परतफेडी बाबत नाहरकत दाखला प्रमाणपत्र देण्यास सा.वाले यांनी नकार दिला. तसेच कर्ज परतफेडीची संपूर्ण रक्कम भरुनसुध्दा अवास्तव रक्कमेची मागणी केली. तसेच कर्जाच्या कराराची प्रत तक्रारदारांना न दाखवून कर्ज व्यवहारापोटी अतिरिक्त खर्चाची मागणी केली. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या कृतीत मोडते.
10. उलटपक्षी युक्तीवाद करताना सा.वाले यांचे वतीने तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून घेतलेल्या कर्जाची रक्कम कर्ज परतफेडीची मुदत व हप्ता या गोष्टी मान्य करुन सदर कर्जाची रक्कम घेताना कर्जाच्या रक्कमे व्यतिरिक्त इतर खर्चाबाबत कर्जाच्या करारात स्पष्ट उल्लेख असल्यामुळे तक्रारदार यांचे कडून कर्जाच्या परतफेडीपोटी सा.वाले यांनी तक्रारदार यांना आकारलेली अतिरिक्त रक्कम बरोबर आहे असा युक्तीवाद केला. तसेच तक्रारदार यांनी सा.वाले यांचे सोबत केलेला कर्जाचा करार यातील प्रत्येक पानावर तक्रारदार त्यांचे जामीनदार यांच्या सहया असल्यामुळे सदर कराराची प्रत तक्रारदार यांना मिळाली नाही हा तक्रारदार यांचा युक्तीवाद खोडून काढला. तसेच सदर करार केल्यापासून तक्रार दाखल करेपर्यत तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे कोणताही पत्र व्यवहार न करता कुठेही तक्रार केली नाही. त्यामुळे तक्रादार यांचा कर्जाचे करारा बाबत केलेला युक्तीवाद हा पोकळीस्त असल्या बाबतचा युक्तीवाद सा.वाले यांचेतर्फे करण्यात आला. तक्रारदार यांनी केलेल्या कर्ज परतफेडीच्या तक्त्यावर मंचाचे लक्ष वेधत सा.वाले यांनी असे दाखवून दिले की, तक्रारदार हे कर्ज परतफेडीची रक्कम ठरलेल्या तारखांना करत नव्हते व कर्ज परतफेडीपोटी तक्रारदारांना उशिर होत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी खर्च आकारावा लागला. तसेच तक्रारदारांनी दिलेले कर्जाचे हप्ते असलेले धनादेश न वटल्यामुळे करारात ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांचे कडून त्या बाबतचा खर्च आकारण्यात आलेला आहे.
11. तक्रारदार यांनी कर्जाची रक्कम एक रक्कमी देतेवेळी तक्रारदार यांचेकडे देय असलेली रक्कम तसेच तक्रारदारांनी सदर रक्कमेपैकी एक रक्कमी भरलेली रक्कम व तक्रारदारांना देय असलेली रक्कम दर्शविण्यासाठी त्या बाबतचा तक्ता मंचासमोर दाखल करुन तक्रारदार यांचेकडे देय असलेली रक्कम ही योग्य होती असा युक्तीवाद सा.वाले यांचेतर्फे करण्यात आला. तक्रारदार यांचे कडून संपूर्ण कर्जाची परतफेड न झाल्यामुळे त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यास सा.वाले तंयार नव्हते. परंतु मंचाच्या आदेशा प्रमाणे सदरचे नाहरकत प्रमाणपत्र तक्रारदारांना देण्यात आले. त्यामुळे सा.वाले यांनी त्यांची कृती कोणत्याही परिस्थितीत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या कृतीत येत नाही असा युक्तीवाद केला.
12. सा.वाले यांचेतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, अभिलेखात दाखल असलेली कागदपत्र, याचे अवलोकन केल्यानंतर प्रामुख्याने एक असे दिसून येते की, तक्रारदार व सा.वाले यांच्यात झालेल्या कर्जाच्या करारावर सा.वाले व त्यांचे जामीनदार यांच्या प्रत्येक पानावर सहया आहेत. सदर कर्जाचे करारात मुद्दा क्र. 8 मध्ये कर्ज परतफेडीच्या रक्कमे व्यतिरिक्त तक्रारदार यांनी द्यावयांच्या इतर खर्चांच्या रक्कमेचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सा.वाले यांनी तक्रारदार यांना अवास्तव रक्कम कर्ज परतफेडीपोटी आकारली असे म्हणता येणार नाही. सा.वाले यांनी दाखल केलेल्या कर्ज परतफेडीच्या तक्त्यावरुन तक्रारदार कर्ज परतफेडीची रक्कम नियमितपणे देत नव्हते असे दिसून येते. त्यासाठी त्यांना लावण्यात आलेली खर्चाची रक्कम तक्त्यांमध्ये आढळून येते. तक्रारदार यांनी मुदतपूर्व कर्जाची परतफेड करताना तक्रारदार यांचेकडे येणे असलेली रक्कम व त्या रक्कमेपोटी तक्रारदार यांनी संपूर्ण रक्कमेची परतफेड न केल्यामुळे त्यांच्याकडे येणे असेलेली रक्कम सदर तक्त्यात नमुद केलेली आहे. त्यामुळे सा.वाले यांनी तक्रारदार यांचेकडे येणे असलेली रक्कम दाखविण्यात सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर दिसून येत नाही. किंबहुना याच कारणासाठी सा.वाले यांनी तक्रारदार यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे नाकारले असावे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी मंचासमोर दाखल केलेल्या अंतरीम अर्जावर आदेश करताना तक्रारदार यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तक्रारदार यांना तक्रारीत स्वारस्य उरलेले दिसत नाही. कदाचित त्यामुळे तक्रारदार मंचासमोर हजर राहू शकले नाहीत. अभिलेखात दाखल केलेल्या कागदपत्रावरुन तक्रारदार यांना दिलेल्या कर्जाच्या व्यवहारापोटी तक्रारदार यांनी कर्जाची रक्कम एक रक्कमी देऊनसुध्दा तक्रारदार यांचेकडे रक्कम देय असल्यामुळे सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब ठरु शकत नाही. सबब मुद्दा क्र. 1 व 2 नकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश परीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 6/2011 रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 28/10/2015