::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/11/2017 )
आदरणीय अध्यक्षा, सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्ते यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, विरुध्द पक्षांकडून नुकसान भरपाई मिळण्याकरिता दाखल केलेली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तक्रारकर्ते यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 ते 3 हे मयत संजय धर्मनाथ खंडारे यांचे वारस आहेत. मयत संजय धर्मनाथ खंडारे हे शेतकरी होते. दिनांक 21/01/2016 रोजी ते व त्यांचे मित्र – नारायण शिवलाल चव्हाण, हे मयत संजय धर्मनाथ खंडारे हयांच्या मालकीच्या मोटर सायकलवर वाशिम वरुन मंगरुळपीरकडे येत असतांना, नारायण शिवलाल चव्हाण, हे मोटर सायकल चालवित होते, रस्त्यात शेलगाव फाटयाजवळ एका ट्रकने मोटर सायकलला मागच्या साईडने धडक मारली. सदर अपघातात चालक नारायण शिवलाल चव्हाण रोडच्या खाली पडले व त्यांना मुका मार लागला. परंतु संजय धर्मनाथ खंडारे यांना जास्त मार लागल्यामुळे, त्यांची प्रकृती गंभिर होती. त्यामुळे त्यांना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, मंगरुळपीर येथे भरती केले. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खराब झाल्यामुळे त्यांना अकोला येथे मेन हॉस्पीटलमध्ये भरती केले. परंतु उपचारा दरम्यान दिनांक 22/01/2016 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेचा पोलीस रिपोर्ट दिला नाही, कारण सदर ट्रकचा नंबर कुणी पाहू शकले नाही, करिता पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. न लिहता मर्ग खबरी लिहण्यात आला. त्यानंतर, शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडे अर्ज केला व सर्व दस्त दाखल केले. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 यांनी योजनेचा लाभ न देवून, सेवेत त्रुटी केली. म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे कथन एकसारखे असे आहे की, शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, इ. नैसर्गिक अपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणा-या अपघाताकरिता शासनाने दिनांक 26/11/2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. 201/12/2015 ते 30/11/2016 या एक वर्षाच्या कालावधीसाठी, चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती.
सदर अर्जदाराचा विमा रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव दिनांक 25/04/2016 रोजी विमा सल्लागार, बजाज कॅपीटल ब्रोकींग सर्व्हीसेस कं. लि. यांचे मार्फत नॅशनल एश्योरन्स कं. लि., भाऊसाहेब शिरोळे भवन, चौथा मजला, पि.एम.टी. ईमारत, डेक्कन जिमखाना, जिवाजीनगर, पुणे 04 या विमा कंपणीस सादर करण्यात आले आहे.
सदर विमा कंपणीने संजय खंडारे यांचे विमा प्रस्तावाची तपासणी केली असता वाहन चालविण्याचा परवाना सदर प्रस्तावात जोडला नसल्याचे या कार्यालयास व वारसदार वर्षा संजय खंडारे यांना पत्राव्दारे कळविण्यात आले होते. सदर त्रुटीच्या पुर्ततेस्तव वारसदाराने, अपघातात मयत संजय खंडारे हे वाहन चालवत नसल्याबाबतचे, श्री. नारायण शिवलाल चव्हाण रा. लोहगड, ता. बार्शिटाकळी जि. अकोला हे अपघातावेळी वाहन चालवित होते, असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
विमा कंपणीने दिनांक 18/08/2016 रोजीच्या पत्रान्वये श्री. नारायण शिवलाल चव्हाण हे मोटर सायकल चालवित होते तर सदर ट्रक चालकाचे विरोधात एफ.आय.आर. दाखल करणे आवश्यक होते. तसेच पोलीस कागदपत्रामध्ये कुठेही नारायण चव्हाण हे मोटर सायकल चालवित असल्याबाबत उल्लेख नसल्याचे कळविले आहे. सदर प्रस्तावात जोडलेल्या घटनास्थळ पंचनाम्यात सदर मृतक हा त्यांचे स्वतःचे मोटर सायकलने मंगरुळपिरकडे येतेवेळी मोटर सायकलचा अपघात झाल्याने मार लागल्याचा उल्लेख केलेला आहे. सदर अपघातात श्री. नारायण शिवलाल चव्हाण यांचा कुठेही उल्लेख केलेला नसल्यामुळे सदर प्रकरणात संजय खंडारे यांचा मोटर सायकल चालविण्याचा परवाना सादर करण्याबाबत विमा कंपणीचे दिनांक 18/08/2016 रोजीचे पत्रान्वये कळविले आहे. संजय खंडारे यांचा वाहन चालविण्याचा परवाना सादर केल्यास सदर विमा प्रस्ताव मंजुर करुन निकाली काढता येईल.
3) विरुध्द पक्ष क्र. 3 चे कथन असे आहे की, तक्रारदार यांची तक्रार अपरीपक्व आहे. नारायण शिवलाल चव्हाण यांचा या अपघाताशी संबंध नाही कारण पोलीस स्टेशन, मंगरुळपीर यांनी तयार केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे असे नमुद आहे की, ‘ सदर मृतक हा त्याच्या स्वतःचे मोटर सायकलने मंगरुळपिरकडे येतांनी मोटर सायकलला अपघात झाल्याने त्याचे मार लागल्याने दवाखान्यात भर्ती केले असता तो इलाजा दरम्यान मरण पावला ’ म्हणजेच तक्रारकर्तीचे पती मृतक संजय धर्मनाथ खंडारे हा स्वतः मोटर सायकल चालवित होता व तो त्या दरम्यान मरण पावला. परंतु संजय धर्मनाथ खंडारे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मोटर सायकल चालविण्याचा परवाना नसल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 च्या अमरावती कार्यालयाने तक्रारकर्त्याला दिनांक 18/08/2016 रोजी व दिनांक 27/10/2016 रोजी सतत खुलासा मागितला आहे की, ‘ पो. स्टे. च्या पोलिस कागदपत्रामध्ये कुठेही नारायण चव्हाण हे मोटर सायकल चालवित असल्या बाबतचा उल्लेख नाही ’ असे कळविले होते व त.क.ने दिलेले व दि. 08/08/2016 चे प्रतिज्ञापत्र जे नारायण शिवलाल चव्हाण यांचे आहे ते पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डशी सुसंगत नाही व त्याकरिता मृतकाचा वाहन चालविण्याचा परवाना सादर करावा असे कळविले होते. परंतू तक्रारकर्त्याने त्या बाबतीत कोणत्याही प्रकारे उत्तर विरुध्द पक्ष क्र.3 ला दिलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा हा विरुध्द पक्ष क्र.3 च्या अमरावती कार्यालयात तसाच पडून असून तक्रारकर्त्याला दिनांक 21/06/2016 रोजी मृतक संजय धर्मनाथ खंडारे यांचा वाहन चालविण्याचा परवाना मागणीबाबतचे पत्र देखील तक्रारकर्त्याला दिले होते. तक्रारकर्त्याचा दावा हा मुदतपूर्व परिपक्वते पूर्वी तक्रारकर्त्याने सादर केल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार या न्याय मंचात चालू शकत नाही व तसा प्राथमिक आक्षेप विरुध्द पक्ष क्र.3 या ठिकाणी घेत आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 3 च्या दिनांक 21/06/2016, 18/08/2016 व 27/10/2016 च्या पत्राचे समाधानकारक उत्तर व कागदपत्रे न पुरविल्यामुळे मुदतपूर्व परिपक्वेते अभावी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा नाकारला नसतांना देखील या मंचासमक्ष दाखल केला जो मुदतपूर्व परिपक्वेते अभावी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा नाकारला नसतांना देखील या मंचासमक्ष दाखल केला जो मुदतपुर्व परिपक्वतेअभावी खारिज करण्यात यावा व या न्याय मंचात चालण्यायोग्य नाही व तक्रारकर्त्याने सदर वरील नमूद कागदपत्रे वि. मंचापासून लपवून ठेवल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही प्राथमिक क्षणी फेटाळण्याजोगी आहे.
विरुध्द पक्ष क्र. 3 च्या अमरावती कार्यालयाने ठराविक शर्ती व अटीच्या आधारे दि कमिशनर अॅग्रीकल्चर महाराष्ट्र सरकार पुणे यांच्या नावाने विमा पॉलिसी क्र. 280500/42/15/82/00001465 ही 01/12/2015 ते 30/11/ 2016 च्या कालावधी करिता बजाज कॅपीटल इंन्शुरन्स ब्रोकरिंग लि. साईनगर अमरावती मार्फत सादर केली, ज्यामध्ये अपघाता दरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांना रक्कम रुपये 2,00,000/- प्रमाणे रिस्क ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट हया हेड खाली कव्हर केली होती, ज्यामध्ये मोटर वाहन चालविणा-या व्यक्तीचा वाहन परवाना हा शर्ती व अटीचा भाग असून तो पुरविल्या नंतरच अशा प्रकारचा दावा हा विरुध्द पक्ष क्र. 3 च्या कार्यालयातून जारी होवू शकतो. तक्रारकर्ते यांनी सदर दाव्यात बजाज कॅपीटल इंन्शुरन्स ब्रोकरिंग लि. साईनगर, अमरावती यांना आवश्यक ती पार्टी करणे भाग होते, त्यामुळे दावा मंचात चालू शकत नाही, म्हणून खारिज करावा.
4) अशाप्रकारे उभय पक्षांचे म्हणणे एैकल्यानंतर, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 ते 3 हे मयत संजय धर्मनाथ खंडारे यांचे कायदेशिर वारस आहेत, असे दाखल दस्तांवरुन दिसते. मृतक संजय धर्मनाथ खंडारे हे शेतकरी होते असे दाखल दस्त फेरफार पत्रक, सात-बारा दस्त, आठ-अ दस्त यावरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्या कबुली कथनावरुन व विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी दाखल केलेले दस्त Memorandum of Understanding between the Commissioner Agriculture Commissionerate of Agriculture Govt. of Maharashtra व M/s. Bajaj Capital Insurance Broking Limited जे विमा सल्लागार आहेत व करारप्रत जो The Commissioner (Agriculture) Commissionerate of Agri. व विमा सल्लागार तसेच विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेमध्ये झालेला आहे, त्यानुसार शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी सदर Personal Accident Policy
( SI – Rs. 2.00 lac ) काढलेली आहे, असे दिसून येते. सदर करारात या पॉलिसीच्या अटी-शर्ती सामील आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व दस्तांवरुन असा बोध होतो की, मयत संजय धर्मनाथ खंडारे हे या सदर पॉलिसीचे लाभार्थी आहेत, त्यामुळे मयत लाभार्थ्याचे वारस तक्रारदार हे फक्त विरुध्द पक्ष क्र. 3 चे ग्राहक / लाभार्थी या संज्ञेत मोडतात, या निष्कर्षावर मंच आले आहे. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त, अपघात मर्ग खबरी, स्पॉट पंचनामा, इंन्क्वेस्ट पंचनामा व पोष्ट-मार्टम रिपोर्ट यावरुन असा बोध होतो की, विमाधारक संजय धर्मनाथ खंडारे हे अपघातात गंभिर जखमी होवून मृत्यू पावले आहेत. विरुध्द पक्ष क्र. 3 यांचे असे म्हणणे आहे की, सदर पॉलिसी अटीनुसार रोड अपघातातील मृत्यू असल्यास त्यानुसारचे आवश्यक कागदपत्रे तक्रारदार यांनी पुरवावे, म्हणून एफ.आय.आर प्रत व मयताचा वैध चालक परवाना या दस्तांची मागणी विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदार यांना केली होती. परंतु मयत हा रोड अपघातात जरी मरण पावला तरी या घटनेचा एफ.आय.आर संबंधीत पोलीस ठाण्यात दिला गेला नव्हता, असे दिसते. मात्र त्याबद्दल दाखल दस्त जसे की, मर्ग खबरी मंगरुळपीर, मर्ग खबरी सिटी कोतवाली, अकोला हे अपघात स्थिती सांगण्यास पुरक आहेत, असे मंचाचे मत आहे. कारण काही अपघातात ग्राहक अपघाताचा रिपोर्ट देण्याच्या स्थितीत नसतात किंवा त्यांना या प्रोसीजरची कल्पना नसते, जसे पोलीस सांगतील तसे ते वागु शकतात. पॉलिसीच्या रोड अपघाताबद्दलच्या यादीत ईतर जे अपघाताबद्दल दस्त नमुद आहे ते सर्व तक्रारदारांनी विरुध्द पक्ष क्र. 3 ला पुरविले आहे, असे दिसते. त्यावरुन मयत हा रोड अपघाताचा बळी आहे व तो शेतकरी होता, हे स्पष्ट होते. दुसरे दस्त, वाहन चालकाचा परवाना याबद्दल तक्रारदार यांचे कथन असे आहे की, घटनेच्या वेळी मृतक त्याचे वाहन चालवित नसून त्याचे मित्र नारायण शिवलाल चव्हाण हे ते वाहन चालवित होते व मयत मागे बसले होते, त्याबद्दल नारायण चव्हाण याचा प्रतिज्ञालेख व त्याचा वाहन परवाना रेकॉर्डवर दाखल आहे. मात्र विरुध्द पक्षाने घटनास्थळ पंचनाम्यामधील मजकुर जसा की, ‘‘ सदर मृतक हा त्याच्या स्वतःचे मोटर सायकलने मंगरुळपिरकडे येतांना मोटर सायकलला अपघात झाल्याने त्यात मार लागल्याने दवाखान्यात भर्ती केले असता तो इलाजा दरम्यान मरण पावला ’’ यावर जोर देवून मृतक हा स्वतः मोटर सायकल चालवतहोता, त्यामुळे त्याचा वाहन परवाना आवश्यक आहे, असे मत बनवले आहे. परंतु विरुध्द पक्षाचे हे कथन मंचाला पटत नाही कारण सदर घटनास्थळ पंचनाम्यात स्पष्ट हे नमुद नाही की, मृतक स्वतः मोटर सायकल चालवत होता. त्यामुळे नारायण शिवलाल चव्हाण यांचा स्पष्ट मजकुरातील प्रतिज्ञालेख डावलता येणार नाही. म्हणून अशा परिस्थितीत मृतकाचा वाहन परवाना असणे बंधनकारक नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 3 यांना तक्रारदाराचा विमा दावा गृहीत धरता येईल. विरुध्द पक्ष क्र. 3 यांचे ईतर आक्षेप सिध्दतेअभावी गृहीत धरण्यात येत नाही. अशा परिस्थितीत विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदार यांना सदर विमा पॉलिसी योजने अंतर्गत रक्कम रुपये 2,00,000/- सव्याज, ईतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह द्यावी, या निष्कर्षावर मंच आले आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
- तक्रारकर्ते यांची तक्रार विरुध्द पक्ष क्र. 3 विरुध्द फक्त अंशतः मंजूर करण्यांत येते. तर, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांची प्रकरणात कोणतीही जबाबदारी येत नाही.
- विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार मयताची विमा रक्कम रुपये 2,00,000/- ( रुपये दोन लाख फक्त ) दरसाल, दरशेकडा 9 टक्के व्याजदराने दिनांक 08/10/2016 ( प्रकरण दाखल तारीख ) पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळून रक्कम रुपये 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
SVGiri