आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. एच. एम. पटेरिया
तक्रारकर्ती क्रमांक 1 श्रीमती गीता ही मृतक अशोक मेश्राम यांची पत्नी असून तक्रारकर्ते क्रमांक 2 व 3 ही मृतकाची मुले आहेत. तक्रारकर्त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष यांनी नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. मृतक अशोक नामदेव मेश्राम हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा ताडगांव, ता. अर्जुनी/मोरगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 376 क्षेत्रफळ 0.80 हे.आर. पैकी अर्धी शेतजमीन इतर भावांसोबत होती.
3. महाराष्ट्र शासनाने नागपूर विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विरूध्द पक्ष क्रमांक 2 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे विमा उतरविला असल्याने मृतक सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. विरूध्द पक्ष क्रमांक 1 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांचेमार्फत विमा प्रस्ताव मंजुरीसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे पाठवावयाचे होते.
4. तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती व तक्रारकर्ते क्रमांक 2 व 3 चे वडील अशोक नामदेव मेश्राम यांचा दिनांक 26/07/2014 रोजी दुर्दैवी घटनेमुळे मृत्यू झाला. मृतकाचा भाऊ जयपाल नामदेव मेश्राम यांचा किशोर फागू बोरकर व संजय फागू बोरकर यांचेसोबत धानाच्या रोवणीवरून वाद झाल्यामुळे बोरकर बंधूंनी जयपाल नामदेव मेश्राम याच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. मृतक अशोक नामदेव मेश्राम भांडण सोडविण्यास गेला असता त्याचे पोटात चाकू खूपसून त्यास जीवानिशी ठार केले. त्या अनुषंगाने पोलीसांनी आवश्यक ती सर्व चौकशी पूर्ण करून गोंदीया जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले आणि फौजदारी प्रकरण हे सत्र खटल्याच्या स्वरूपात सुरू आहे.
5. तक्रारकर्ती क्रमांक 1 ने पतीच्या अपघाती मृत्यूबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- मिळावी म्हणून विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे सर्व कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने ते विरूध्द पक्ष क्रमांक 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे मंजुरीसाठी सदर केला. तक्रारकर्तीने वेळोवेळी प्रस्तावामध्ये आलेल्या त्रुटींची पूर्तता करून विमा दावा प्रस्ताव मंजुरीकरिता विरूध्द पक्षाकडे सादर केला. त्यानंतर विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने दिनांक 19/01/2015 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्तीला दाव्याची रक्कम मंजूर करण्याकरिता तक्रारकर्ती क्रमांक 1 गीता अशोक मेश्राम हिचा 10 ते 15 अंकी बँक खाते क्रमांक आणि बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड आणि बँकेचा एम. आय. सी. आर. कोड दर्शविणा-या बँकेच्या पासबुकची मागणी केली. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 2 ने त्यांच्या दिनांक 30/01/2015 रोजीच्या पत्रानुसार व्हिसेरा रिपोर्टप्रमाणे मृतक अशोक नामदेव मेश्राम याच्या शरीरात 106 ते 107 मिलिग्रॅम अल्कोहोल आढळून आले म्हणून अल्कोहोलच्या अंमलाखाली असतांना अपघाती मृत्यू होणे या कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रारीत व्याजासह विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/-, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रू. 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
6. तक्रारकर्तीने तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शेतकरी जनता अपघात विमा योजनेकरिता लागणारे क्लेम फॉर्म, फेरफाराची नोंदवही, शेतीचा 7/12 उतारा, गांव नमुना 8-अ, गांव नमुना 6-क, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, एफ. आय. आर., घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, व्हिसेराचा केमिकल रिपोर्ट इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करून प्रस्तुत न्याय मंचामार्फत विरूध्द पक्ष यांना दिनांक 30/05/2015 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या.
8. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.
9. विरूध्द पक्ष 1 तालुका कृषि अधिकारी, अर्जुनी/मोरगांव यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करून त्यांनी सदरहू विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी दिनांक 24/09/2014 व दिनांक 03/12/2014 अन्वये सादर केला. अर्जदाराकडून प्रस्ताव स्विकारणे व ते पुढील कार्यवाहीस्तव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे एवढेच त्यांचे काम असून त्यामध्ये त्यांच्याकडून तक्रारकर्तीच्या सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही. म्हणून तक्रारकर्तीची सदर तक्रार त्यांच्या विरोधात खारीज करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
10. विरूध्द पक्ष क्रमांक 3 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचा लेखी जबाब दिनांक 23/07/2015 रोजी प्राप्त झाला. त्यांत त्यांचे म्हणणे असे की, ते केवळ मध्यस्थ सल्लागार असून विमा दावा मंजूर करणे हे फक्त विरूध्द पक्ष क्रमांक 2 चे अखत्यारीत आहे व त्यामध्ये विरूध्द पक्ष क्रमांक 3 यांचा काहीही संबंध नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 3 यांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली असून त्यांच्या सेवेमध्ये कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडला नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द सदर तक्रार खारीज करण्यांत यावी.
11. सदर प्रकरणात विरूध्द पक्ष 2 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्ता मद्यार्काच्या अंमलाखाली असतांना त्याचा खून झाला असल्याने सदरचा मृत्यू ह सदोष मनुष्यवध असून अपघाती मृत्यू नाही. न्यायसहाय्यक प्रयोगशाळा, नागपूर यांच्या दिनांक 19/10/2014 रोजीच्या अहवालाप्रमाणे मयत अशोक नामदेव मेश्राम च्या पोटात व यकृतात 108 आणि 106 मिलिग्रॅम Ethyl Alcohol आले आहे. मृतक अशोक नामदेव मेश्रामचा मृत्यू तो मद्यार्काच्या अंमलाखाली असतांना झाला असल्याने व असा मृत्यू पॉलीसी संरक्षणातून वगळण्यांत आला आहे. 2009 सालच्या शासन निर्णयातील Exclusion Clause 4 च्या शब्दरचनेचा आशय असा आहे की, अशावेळी मद्य प्राशन हे मृत्यूचे कारण असणे आवश्यक नाही. केवळ मयत हा मद्याच्या अंमलाखाली असतांना त्याचा मृत्यू झाला असेल तर सदर मृत्यू Exclusion Clause 4 मध्ये येत असल्याने मयताचे वारस पॉलीसी लाभ मिळण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे विरूध्द पक्षाची तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजुरीची कृती पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरूनच असल्याने त्यांचेकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडला नाही म्हणून तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
12. तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारण खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणांत तक्रारकर्ती क्रमांक 1 श्रीमती गीता अशोक मेश्राम हिने शपथपत्रावर कथन केले आहे की, मृतक अशोक नामदेव मेश्रम हे तिचे पती होते व भावासोबत त्यांच्या मालकीची मौजा ताडगांव, तालुका अर्जुनी/मोरगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 376 क्षेत्रफळ 0.80 हे.आर. शेतजमीन होती आणि ते शेतकरी होते. आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने वरील शेतजमिनीचा 7/12 उतारा दाखल केला आहे. सदरचे दस्तावेज खोटे असल्याचे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही. महाराष्ट्र शासनाने नागपूर महसूल विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे विमा उतरविला होता याबाबत देखील उभय पक्षात वाद नाही.
विरूध्द पक्ष क्रमांक 2 च्या अधिवक्ता श्रीमती सुचिता देहाडराय यांनी त्यांचा लेखी जबाब व शपथपत्रावरील पुरावा हाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली.
आपल्या युक्तिवादात विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, मृतकाचे लहान भाऊ जयपाल नामदेव मेश्राम याचे किशोर फागु बोरकर व संजय फागु बोरकर यांचेसोबत शेतीच्या रोवणीच्या कारणावरून वादविवाद सुरू होता व आरोपीने मृतकाच्या लहान भावाच्या डोक्यावर काठीने मारहाण केली व त्यास जबर जखम झाल्यामुळे मृतकाने भावास सोडविण्याकरिता मध्यस्थी केली असता आरोपींनी मृतकाच्या पोटावर चाकूने वार करून त्याचा खून केला. खून हा अपघाती मृत्यू नसून तो सदोष मनुष्यवध असल्याने मयताचे वारस अपघाती मृत्यू लाभ मिळण्यास पात्र नाहीत. मृतक अशोक मेश्राम यांचा खून झाला तेव्हा तो अंमली पदार्थाच्या अंमलाखाली होता व व्हिसेरा रिपोर्टप्रमाणे मृतकाचे पोटामध्ये व यकृतामध्ये अनुक्रमे 108 व 106 मिलिग्रॅम अल्कोहोल आढळले. जर मृतक घटनेच्या वेळी मद्यार्काच्या अंमलाखाली असेल तर Exclusion Clause 4 प्रमाणे विमा लाभ मिळण्यास अपात्र ठरतो. म्हणून तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे असून त्याद्वारे सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही.
याउलट तक्रारकर्त्यांच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, पोलीस निरीक्षक, अर्जुनी/मोरगांव यांनी त्यांचे पत्र दिनांक 09/09/2014 अनुसार आरोपीविरूध्द भा. दं. वि. चे कलम 302, 34 अन्वये गुन्हा क्रमांक 69/2014 दाखल केला आहे व त्यामध्ये स्पष्टपणे चाकूने मारल्यामुळे अशोक मेश्राम यांचा मृत्यू झाला असल्याचे नमूद आहे.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार मृतकाच्या मृत्यूचे कारण “Death due to stab injury over abdomen” असे नमूद आहे. मयत अशोक नामदेव मेश्रामचा खून हा अपघाती मृत्यू असून त्याचे मद्यप्राशन त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा कोणताही पुरावा विरूध्द पक्षाने सादर केला नाही. पोटामध्ये व यकृतामध्ये आढळून आलेले अल्कोहोल हे अनेक कारणामुळे राहू शकते. व्हिटॅमीन सायरप, कफ सायरप इत्यादी औषधांमध्ये अल्कोहोल हा महत्वाचा घटक असतो. म्हणून मयताच्या मृत्यूशी पोटातील अल्कोहोलचा कोणताही संबंध नसतांना पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये पोटांत अल्कोहोल आढळून आले एवढ्याच कारणाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती बेकायदेशीर असून ती सेवेतील न्यूनता आहे.
आपल्या कथनाच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांनी खालील न्यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.
1) II (2012) CPJ 16 (NC)
National Insurance Co. Ltd. v/s Theegala Laxmi & Anr.
सदर प्रकरणांत माननीय राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.
“10. We have heard learned Counsel for Petitioner and have gone through the evidence on record. The fact that the insuree had taken a policy under the Chakra Deposit Scheme of the Petitioner/Insurance Company and his having paid the premium and other admissible amounts is not in dispute. It is also not in dispute that the Petitioner was killed by the police in an alleged encounter. However, we agree with the Fora below that there is no independent credible evidence to support the Petitioner/Insurance Company’s contention that the insuree was killed in an encounter while indulging in unlawful activities because of which the accidental death benefit could have been denied. Learned Fora below have rightly concluded that in the instant case, the insuree was murdered as a result of the encounter and that death by murder is an accidental death. This has also been the view of this Commission in Maya Devi v. Life Insurance Corporation of India, III (2008) CPJ 120 (SC) = R.P.No. 2824 of 2007 decided on 21.05.2008. The present case is sdquarely covered by this judgment.’
2) III (2011) CPJ 232 (NC) - LIC of India & Anr. v/s Ranjit Kaur
सदर प्रकरणांत माननीय राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.
“10. The fact that death of the insuree was caused because of the electrocution during the subsistence of the insurance policy is not in dispute. The only issue under dispute is whether the insuree was intoxicated at the time of his death which as per the exclusion clause in the Insurance Policy would justify repudiation of the double accident benefit insurance claim. While it is a fact that the Chemical Examiner in his report had stated that the blood alcohol concentration in the body of the deceased was 86.25 mg per 100 ml. of blood which as per the American Medical Examinations definitions is higher than the alcohol concentration level of impairment, it has also come in evidence that this by itself is not adequate proof that the deceased was intoxicated at the time of his death. As rightly observed by the leaned fora below, the specific clinical picture of alcohol intoxication also depends on the quantity and frequency of consumption and duration of drinking at that level and, therefore, mere presence of alcohol even above the usually prescribed limits is not a conclusive proof of intoxication. Apart from this, there is also no evidence that there was a nexus between the death caused by electric shock and consumption of liquor.”
अशा परिस्थितीत तक्रारकर्तीच्या पतीचा खून हा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत असून त्याच्या पोटात व यकृतात आढळलेले अल्कोहोल हे त्याच्या मृत्यूचे दुरान्वयानेही कारण नाही. म्हणून मयत अशोकचा मृत्यू अल्कोहोलच्या अंमलाखाली असतांना अपघाती झाला आणि तो अपघाती मृत्यू नाही असे कारण देऊन तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्ष क्रमांक 2 विमा कंपनीची कृती असमर्थनीय असून ती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
14. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करून विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 30/01/2015 पासून द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.10,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबद्दल रू.5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून खालील आदेश पारित करण्यांत येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 खालील तक्रार विरूध्द पक्ष क्रमांक 2 विरूध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना मृतक विमाधारकाच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 30/01/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.10,000/- व या तक्रारीचा खर्च म्हणून रू.5,000/- असे एकूण रू. 15,000/- तक्रारकर्त्यांना द्यावे.
4. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 3 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यांना परत करावी.