::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08.07.2016 )
आदरणीय अध्यक्ष श्री. व्ही.आर.लोंढे, यांचे अनुसार
1. तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्दपक्ष यांनी सदोष एअर कुलरची विक्री करुन द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे
2. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे..
तक्रारकर्ता हा अकोला येथील रहीवाशी असून विरुध्दपक्ष क्र. 1 हे सिम्फनी एअर कुलरचे उत्पादक आहेत. विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क. 1 चे विक्रेते असून विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे दुकानातून सिम्फनी एअर कुलर मॉडल स्टॉर्म 100 लिटर, दि. 2/4/2014 रोजी रु. 18,500/- मध्ये विकत घेतला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्यास बिल क्र. 37 दिले. तक्रारकर्त्याने एअर कुलर खरेदी केल्यानंतर 15 दिवसानंतर एअर कुलर च्या पंपामध्ये बिघाड आला व वायर जळल्या सारखी वास येऊ लागला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या ग्राहक केंद्रावर फोन करुन तक्रार नोंदविली. विरुध्दपक्ष क्र. 3 हे तक्राकरतर्याच्या घरी आले व एअर कुलर दुरुस्त केला. सदर एअर कुलर दुरुस्त केल्यानंतर 2/3 दिवसात एअर कुलर मध्ये खराबी आली. तक्रारकर्त्याने फोन करुन आपली तक्रार नोंदविली. जुलै 14 पर्यंत तक्रारकर्त्याने चार तक्रारी नोंदविल्या. विरुध्दपक्ष क्र. 3 हे एअर कुलर दुरुस्त करु शकले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या घरातील लोकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 कडे तक्रारीसंबंधीची जॉब शिटची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तक्रारकर्त्याने जुलै 2014 मध्ये ऑनलाईन तक्रार नोंदविली. विरुध्दपक्ष क्र. 3 हे दि. 14/3/2014 रोजी एअर कुलर दुरुस्तीकरिता आले, परंतु ते एअर कुलर दुरुस्त करु शकले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 ला जॉब शिट देण्यास सांगितले तेंव्हा विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्याला जॉबशिट दिली. सदरील एअर कुलर मध्ये वारंवार बिघाड होऊ लागला, तसेच विरुध्दपक्षाकडून दोषपुर्ण सेवा देण्यात आली. जुलै पर्यंत उन्हाळा संपत आल्यामुळे एअर कुलर मार्च पर्यंत तसाच पडून राहीला. मार्च 2015 मध्ये तक्रारकर्त्याने पुन्हा ऑन लाईन तक्रार नोंदविली. विरुध्दपक्ष क्र. 3 दुरुस्तीसाठी आले व त्यांनी एअर कुलर दुरुस्त करुन दिला. परंतु कुलर मधील पाणी कुलींग पॅडच्या पुर्ण जागेवर पडत नव्हते व त्यामुळे कुलर हा थंड करत नव्हता. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाच्या सेबेबद्दल संतुष्ट नव्हता. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यास जॉबशिट दिली नाही. तक्रारकर्त्याने सदरील एअर कुलर मे 2015 पर्यंत चालु ठेवला. मे 2015 मध्ये एअर कुलर बंद पडला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे ऑनलाइन तक्रार दिली. विरुध्दपक्ष क्र. 3 हे दुरुस्तीसाठी आले, त्यावेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क. 3 ला विचारले की, वेळोवेळी एअर कुलर दुरुस्त करुन देखील त्यामध्ये बिघाड होतो, त्यामध्ये काय दोष आहे, हे लिहून द्या. परंतु विरुध्दपक्ष क्र. 3 एअर कुलर दुरुस्त न करता निघून गेला. दि. 25/5/2015 रोजी तक्रारकर्त्यास मोबाईलवरुन मेसेज आला व एक नंबर देऊन त्याच्यावर संपर्क करावा, असे कळविले. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल नंबरवर संपर्क करुन सदरील एअर कुलर मधील बिघाडाची संपुर्ण माहीती दिली. त्यांनी तक्रारकर्त्यास सांगीतले की, सदरील एअर कुलर स्वत: दुरुस्त करुन घ्यावा. तसेच तक्रारकर्त्यास दि. 25/5/2015 रोजी मेसेज आला व कळविले की, दुरुस्ती कोटेशन देण्यात आले, परंतु ते मान्य नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार बंद करण्यात येत आहे. तक्रारकर्त्याने घेतलेला एअर कुलर सुरुवातीपासूनच नादुरुस्त स्वरुपाचा आहे. विरुध्दपक्षाने दोषपुर्ण एअर कुलर ची विक्री केली व त्यानंतर दोषपुर्ण सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास एअर कुलर बदलून द्यावा व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5000/- विरुध्दपक्षाने द्यावा. तसेच विरुध्दपक्ष सदरील एअर कुलर बदलून देवू शकत नसेल तर एअर कुलरची किंमत रु. 18500/- तक्रारकर्त्यास परत करावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा लेखी जवाब :-
3. विरुध्दपक्ष क्र. 1 नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लेखी खुलासा पोष्टा मार्फत दाखल केला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कथन केले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 ही जगातील उत्कृष्ट एअर कुलर उत्पादित करणारी कंपनी आहे. त्यांनी उत्पादित केलेले एअर कुलर हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आहेत. तक्रारकर्त्याने विकत घेतलल्या एअर कुलरचे व्यवस्थीत व्यवस्थापन झाले नसल्यामुळे सदरील एअर कुलर मध्ये बिघाड निर्माण झाला असेल. तसेच सदरील एअर कुलर हा योग्य जागी बसविला नसल्यामुळे व योग्य प्रकारे हवा येत नसल्यामुळे त्यामध्ये बिघाड निमार्ण होऊ शकतो. वारंटी कालावधीमध्ये मॅन्युअल मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करुन सदरील एअर कुलर वापरल्यास कोणताही दोष येत नाही. तसेच विरुध्दपक्षाचे सर्व्हीस इंजिनिअर हे दोष निर्माण झाल्यास सदैव सेवा देण्यास तयार असतात. विरुध्दपक्षाने योग्य ती तपासणी करुनच सदरील एअर कुलर बाजारात विक्री करिता आणला आहे. तक्रारकर्त्याने विकत घेतलेला एअर कुलर मॅन्युअल मध्ये सांगतल्याप्रमाणे बसविलेला नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास नोटीसचे उत्तर देऊन तसेच त्यांच्या सर्व्हीस इंजिनिअर यांना योग्य देखभाल नियुक्त करण्यास कळविले आहे. परंतु तक्रारकर्त्याकडून कोणतेही प्रतिउत्तर आलेले नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 हे सर्व्हीस इंजिनिअर पाठवून सदरील एअर कुलर दुरुस्त करुन देण्यास तयार आहेत व तक्रारकर्त्याचे समाधान करुन देण्यास तयार आहेत. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार केवळ त्रास देण्याच्या हेतूने दाखल करण्यात आली आहे जी रद्द करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी जबाब दाखल केला. विरुध्दपक्ष क्र. 2 चे कथन की, त्यांच्या विरुध्द तक्रार चालू शकत नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 चे दुकानातून वादातील कुलर विकत घेतला होता. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रारी नोंदविल्या असल्यास त्या बाबत विरुध्दपक्ष क्र. 2 ला माहीती नाही. विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्याचा एअर कुलर वेळोवेळी दुरुस्त करुन दिला किंवा काय, या बाबत विरुध्दपक्ष क्र. 2 यांना काहीही माहीती नाही. तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसला उत्तर देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 2 ची नव्हती. तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्र.1 ने उत्पादित केलेला एअर कुलर घेतला असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्यास नोटीसचे उत्तर दिलेले आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे वितरक व विक्रेते आहेत. विरुध्दपक्ष क्र. 2 कडून एअर कुलर विकत घेतांना त्यांनी तक्रारकर्त्यास वारंटी कार्ड देवून सर्व्हीस देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 यांची आहे, याची कल्पना दिली होती. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्यास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही, त्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यांच्या विरुध्द एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला.
4. तक्रारकर्त्याने पुराव्याकामी शपथपत्र दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एअर कुलर खरेदी केल्याबाबतची पावती, विरुध्दपक्ष क्र. 1 कडे एअर कुलर दुरुस्ती बाबत दिलेल्या तक्रारीच्या प्रती, नोटीसप्रत, विरुध्दपक्ष क्र. 1 ने दिलेले नोटीचे उत्तर, ई. दस्तऐवज हजर केलेले आहत.
विरुध्दपक्ष क्र. 1व 2 यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल केलेले नाही. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दाखल केलेले दस्त यांचे अवलोकन केले असता, न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचासमक्ष उपस्थित होतात.
- तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्पादित केलेल्या
एअर कुलर मध्ये उत्पादकीय दोष आहे, हे प्रथमदर्शनी
साबीत केले आहे काय? … नाही
2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावयाच्या सेवेत त्रुटी
दर्शविली, ही बाब तक्रारकर्त्याने शाबीत केली काय? … नाही
3. आदेश काय ? .... अंतीम आदेशाप्रमाणे
:: कारणमिमांसा ::
5. तक्रारकर्त्याचे वकील श्री आर.ओ.बाजोरीया यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 कडून घेतलेला वादातील एअर कुलर हा वारंटी कालावधीमध्ये वारंवार नादुरुस्त झाला. या बाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु विरुध्दपक्ष सदरील एअर कुलर योग्य प्रकारे दुरुस्त करुन देवू शकले नाही. यावरुन हे स्पष्ट होते की, वादातील एअर कुलर मध्ये उत्पादकीय दोष आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार प्रार्थनेप्रमाणे मंजुर करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 चे वकील श्री. के.जी. मोहता यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्त्याने सदरील तक्रार ही फक्त विरुध्दपक्षाकडून पैसे उकळण्याच्या हेतूने दाखल केलेली आहे. विरुध्दपक्षाने एअर कुलर तक्रारकर्त्याच्या मागणीनुसारच त्याला विकला आहे. त्यावेळी तक्रारकर्त्यास स्पष्ट सांगण्यात आले की, सर्व प्रकारची वारंटी व सर्व्हीसची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत सर्व्हीस सेंटर म्हणजेच विरुध्दपक्ष क्र. 3 ची आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात यावी.
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद व दाखल सर्व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता, असे स्पष्टपणे दिसून येते की, तक्रारकर्त्याने सदरहू एअर कुलर विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 2/4/2014 रोजी विकत घेतला होता. त्यानंतर सदरील एअर कुलर मध्ये बिघाड झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रारी नोंदविल्या, त्या त्या वेळी विरुध्दपक्ष क्र. 1 चे सर्व्हीस इंजिनिअर यांनी तक्रारकर्त्याच्या एअर कुलर मध्ये दुरुस्ती करुन दिली.परंतु तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार त्याचे समाधान झालेले नाही.
परंतु, सदरील एअर कुलर मध्ये नेमका कोणता बिघाड झाला होता, या बाबत तक्रारकर्त्याने स्पष्ट नमुद केलेले नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13(1)(C) नुसार विकत घेतलेल्या वस्तु मध्ये उत्पादकीय दोष असेल तर, त्या वस्तुची योग्य त्या प्रयोग शाळेमध्ये तपासणी करुन त्यामध्ये उत्पादकीय दोष आहे किंवा कसे, या बाबत ठरवावे. तसेच सदरील वादातील एअर कुलर मध्ये दोष असल्याबाबत कोणताही तज्ञ पुरावा प्रकरणामध्ये दाखल नाही. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे स्वरुप लक्षात घेता, तक्रारकर्त्याने सदरील एअर कुलर मध्ये नेमका कोणता उत्पादकीय दोष आहे हे तज्ञ पुरावा देऊन सिध्द केलेले नाही. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी आहे, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास वेळोवेळी सेवा दिलेली असल्याने मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे ...
अं ति म आ दे श
- तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- प्रकरणाच्या खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.