(द्वारा - श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य)
1. सामनेवाले ही विद्युत पुरवठा कंपनी आहे. तक्रारदार शेतकरी आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराना दिलेल्या विद्युत जोडणीच्या देयका संबंधी प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार ते 1992 पासून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार, सामनेवाले यांनी वेळोवेळी दिलेली विद्युत देयके नियमितपणे अदा करत आहेत. तथापी सामनेवाले मीटर रीडिंग न घेता, मोठ्या रकमेची वीज देयके देत आहेत. एवढेच नव्हेतर, मीटरने नोंदविलेला प्रत्यक्ष वापर विचारात न घेता, संदोष मीटर असा शेरा देयकामध्ये देवुन, अवाजवी युनिट वापराची सरासरी देयके देत आहेत. या संदर्भात फेब्रुवारी 2016 मध्ये मीटरने नोंदविलेले फोटो रिडींग 5021 युनिट होते तर मार्च 2016 मध्ये मीटरने नोंदविलेले फोटो रीडींग 5105 युनिट असे होते. त्यानुसार तक्रारदारांना 84 युनिट (चालु रिडिंग 5105 वजा मागील रीडींग 5021) इतक्या प्रत्यक्ष वापराचे देयक मार्च महिन्या करिता देणे आवश्यक असतांना, सामनेवाले यांनी सदोष मीटर असा शेरा बिलामध्ये नोंदवुन प्रत्यक्ष वापराचे 84 युनिटचे बिल न देता 254 युनिट म्हणजेच 170 युनिटचे जादा बिल दिले. सदर चुकीच्या बिलाबाबत तसेच सदोष मीटर बाबत अनेकवेळा तक्रार करुनही सामनेवाले यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन, सदोष मीटर बदलुन मिळावे, प्रत्यक्ष वापरावर आधारीत वीज देयके देण्याचे आदेश व्हावेत, चुकीच्या रकमेच्या दिलेल्या बिलाची रक्कम परत मिळावी, नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळावा अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना तक्रारीची नोटिस दि. 02/01/2017 रोजी हस्त बटवड्याद्वारे दिल्याचा पुरावा तक्रारदारांनी सर्विस अफिडेव्हीटसह दाखल केला आहे. या शिवाय मंचामार्फत सामनेवाले यांना दि. 23/12/2016 रोजी जावक क्र. 3538 अन्वये नोटिस पाठविण्यात आली होती. सामनेवाले यांना दि. 02/01/2017 रोजी नोटिस प्राप्त झाल्यानंतर दि. 27/03/2017 पर्यंत 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी देवुनही ते गैरहजर राहिल्याने लेखी कैफियत दाखल न केल्याने सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश करण्यात आले.
4. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तिवादही ऐकण्यात आला. तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन मंचाने केले, त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) तक्रारदारांनी दाखल केलेल्या विद्युत देयकावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे वर्ष 1992 पासून विद्युत ग्राहक असल्याची बाब स्पष्ट होते. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी प्रामुख्याने असे नमुद केले आहे की, सामनेवाले हे प्रत्यक्ष मीटर रिडींग प्रमाणे देयके न देता अवास्तव वापराची देयके दिली जातात. सदोष मीटर्स मागणी करुनही बदलली गेली नाहीत. चुकीच्या रकमेची दिलेली बिले मागणी करुनही दुरूस्त / रद्द केली नाहीत.
ब) तक्रारदाराच्या उपरोक्त विवादित बाबी संदर्भात, तक्रारदारांनी दाखल केलेल्या वीज देयकांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, माहे सप्टेंबर 2015 पासून फेब्रुवारी 2016 पर्यंत 154 युनिट सरासरी वापराची देयके दिली आहेत. तर मार्च 2016 मध्ये 254 युनिट इतक्या प्रत्यक्ष वापराचे देयक (Actual Consumption) दिले आहे. जानेवारी 2016 ते मार्च 2016 पर्यंतच्या वीज देयकामध्ये Faulty meter असा शेरा नमुद केला आहे. मीटर सदोष असल्यास, एमईआरसी रेग्युलेशन मधील रेग्युलेशन 14.4 व 15.4 मधील तरतुदीनुसार सदोष मीटरची तपासणी करणे, देखभाल करणे व बदलणे ही सामनेवाले याची जबाबदारी आहे. शिवाय, मीटर सदोष असल्यास त्या महिन्यापासुन केवळ 3 महिन्यापर्यंतच सरासरी वापराच्या आधारे देयके देण्याची तरतुद रेग्युलेशन 15.4 मध्ये नमुद केली आहे. तथापी प्रस्तुत प्रकरणामध्ये सामनेवाले यांनी सप्टेंबर 2015 पासून मार्च 2016 पर्यंत 7 महिने सरासरी वापरावर आधारित दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे सामनेवाले यांनी उपरोक्त कायदेशिर तरतुदींचा भंग केल्याचे स्पष्ट होते. एवढेच नव्हेतर माहे सप्टेंबर 2015 पुर्वीच्या 12 महिन्याचा 126 युनिट इतका सरासरी वापर असतांना 154 युनिटच्या सरासारी वापराची बिले दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदारांना चुकीच्या रकमेची देयके देत होते, हा तक्रारदाराचा आक्षेप योग्य आहे असे मंचास वाटते.
क) तक्रारदारानी दाखल केलेल्या माहे फेब्रुवारी महिन्याच्या देयकामध्ये ‘faulty meter’ असे नमुद केले आहे. तथापी, फोटो रीडींग प्रमाणे 5021 इतके रीडींग असल्याचे दिसुन येते. तथापी, याची दखल न घेता 20 युनिट वापराकरिता देयक देण्यात आले. शिवाय मार्च 2016 या महिन्याच्या देयकामध्ये ‘faulty meter’ असा शेरा नमुद करुन 254 युनिटचे वापराचे बिल दिले. तथापी, फोटो रीडिंग प्रमाणे, मीटरने 5105 असा युनिट वापर नोंदविल्याचे स्पष्टपणे दिसुन येते मात्र या रीडिंगची कोणतीही दखल घेतल्याचे दिसुन येत नाही. वास्तविक मार्च महिन्याच्या चालु रीडिंग 5105 मधुन फेब्रुवारी महिन्याचे रीडिंग 5021 वजा जाता केवळ 84 युनिट वापराचे देयक तक्रारदारांना देणे आवश्यक असतांना 254 युनिट वापराच्या देयकाचे अतिरंजीत बिल तक्रारदारास दिल्याची बाब स्पष्ट होते.
ड) या संदर्भात अतिशय विस्मयकारक बाब म्हणजे तक्रारदाराच्या विद्युत जोडणीवरील मीटर क्र. 7615493677 हा मार्च 2016 पर्यंत सदोष ‘faulty meter’ असल्याची नोंद देयकामध्ये केली आहे. तथापी या सदोष मीटरची चाचणी न करताच किंवा दुरूस्त न करता तो मीटर आपोआप दुरूस्त होऊन माहे एप्रिल पासून युनिट वापराचे रीडिंग देत आहे. व प्रत्यक्ष वापराच्या आधारे तक्रारदारांना वीज देयके देण्यात आली आहेत. या देयकामध्ये सदर मीटर सदोष असल्याची कुठेही नोंद दिसुन येत नाही. म्हणजेच अनेक महिने सदोष असलेला मीटर अचानकपणे आपोआप दुरूस्त होऊन त्यांनी नोंदविलेल्या रीडिंग प्रमाणे तक्रारदारांना बिले दिली जात आहेत. सदर बाब विचारात घेतल्यास तक्रारदरांना माहे जानेवारी 2016 ते मार्च 2016 पर्यंत चुकीच्या वापराची रकमेची देयके देण्यात आली होती ही बाब स्पष्ट होते.
ई) तक्रारदारांनी दि. 05/11/2015 ते दि. 12/09/2016 दरम्यान अनेकवेळा सदोष मीटर बदलण्याविषयी, तसेच चुकीच्या रकमेच्या देयकाबाबत अनेक वेळा लिखित तक्रार करुन सुध्दा सामनेवाले यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न करुन एमईआरसी रेग्युलेशन 14.4 व 15.4 मधील तरतुदीचा भंग केल्याची बाब स्पष्ट होते.
6. उपरोक्त चर्चेवरुन व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 823/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या सदोष विद्युत मापकाबद्दल तसेच तक्रारदारांना देण्यात आलेल्या चुकीच्या रकमेच्या देयकाबाबत कोणतीही कार्यवही न करुन त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) तक्रारदाराच्या विद्युत जोडणी वरील मीटर क्र. 7615493677 ची तपासणी / चाचणी (Testing) दि. 30/06/2016 पुर्वी करुन त्याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही सामनेवाले यांनी करावी.
4) तक्रारदारांनी मागणी केल्यानुसार तक्रारदारांना माहे मार्च 2016 मध्ये 254 युनिट वापराचे दिेलेले देयक, फोटो रिडिंग विचारात घेतल्यास सदर देयक अयोग्य असल्याने सदर बिलाचे पुनर्विलोकन करुन योग्य त्या रकमेचे पुरक देयक देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही दि.30/06/2017 पुर्वी करावी.
5) तक्रारदारांना झालेल्या त्रासाबद्दल रु. 3000/- (अक्षरी रु. तीन हजार फक्त) तक्रार खर्चाबद्दल रु. 2,000/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) सामनेवाले यानी दि. 30/06/2017 पुर्वी तक्रारदारांना द्यावेत.
6) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल्क, विनाविलंब पाठविण्यात याव्यात.
7) संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.