निकालपत्र :- (दि.27.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदार हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे व सामनेवाला हे लाकडी फर्निचरचे उत्पादन करतात. तक्रारदार कंपनीच्या कँटीनसाठी सामनेवाला यांचेकडे दि.21.09.2007 व दि.19.11.2007 रोजी एकूण 56 खुर्च्यांची ऑर्डर दिली होती. सामनेवाला यांनी दि.04.10.2007 रोजी 50 खुर्च्या दिल्या व दि.01.12.2007 रोजी 6 खुर्च्या दिल्या. सदर खुर्च्यांचा वापर सुरु केला असता 15 ते 20 दिवसांत खुर्च्यां जॉईंटस् व फ्रेममधून मोडण्यास सुरवात झाली. त्याबाबत सामनेवाला यांना त्वरीत कळविणेत आले. सामनेवाला यांच्या प्रतिनिधींनी तक्रारदारांच्या फॅक्टरीच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली व सदर लाकडी खुर्च्यामध्ये दोष असल्याचे मान्य करुन सर्व 56 खुर्च्या बदलून देणेचे मान्य केले. परंतु, एकूण दोष असलेल्या 56 खुर्च्यांपैकी 6 खुर्च्या बदलून दिल्या व उर्वरित खुर्च्या बदलून देणेचे मान्य केले. त्यानंतर सामनेवाला यांना वारंवार उर्वरित खुर्च्या बदलून देणेची मागणी केली, परंतु सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदार कंपनीने सामनेवाला यांना वारंवार ई-मेल द्वारे खुर्च्या बदलून देणेबाबत कळविले आहे. दि.14.12.2007 रोजी पत्र पाठविले आहे. सदर खुर्च्या बदलून देणेचे मागणी केली आहे. तसेच, सामनेवाला यांना कायदेशीर नोटीसही पाठविलेली आहे. परंतु, सदर नोटीसीस सामनेवाला यांनी उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांनी पुरविलेल्या सदर खुर्च्यांमध्ये दोष असलेने व त्या बदलून न दिलेने सामनेवाला यांनी अनुचित व्यावारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, सामनेवाला यांनी दोष असलेल्या 50 खुर्च्या बदलून द्याव्यात अथवा सदर 50 खुर्च्या खरेदीपोटी घेतलेली रक्कम रुपये 84,787/- दि.04.10.2007 रोजीपासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह परत करणेचे आदेश सामनेवाला यांना व्हावेत व नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/-, नोटीस खर्च रुपये 1,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत कोटेशन, दि.14.12.2007 रोजीचे तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेले पत्र, दि.14.12.2007, दि.19.12.2007, दि.10.01.2008, दि.23.01.2008, दि.21.02.2008, दि.01.03.2008 रोजीचे ई-मेल, सामनेवाला यांनी वकिलामार्फत दि.03.06.2008 रोजी पाठविलेली नोटीस, खुर्च्यांमधील दोष दर्शविणारी छायाचित्रे, तसेच औद्योगिक सुरक्षा संचालयनालय, कोल्हापूर यांचेकडील दि.06.03.2007 रोजीचे कँटिन विभागाचे मंजुरी पत्र, कारखाना नोंदणी प्रमाणपत्र, कारखाना चालविण्यासंबंधीचा परवाना व मंजूर नकाशा इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी खरेदी केलेल्या खुर्च्या या वाणिज्यिक प्रयोजनासाठी घेतल्या असल्याने सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या प्राथमिक मुद्यावर प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत यावी. सामनेवाला कंपनीस डायनिंग टेबल व चेअर्सची गरज असल्याने त्यांनी दि.21.09.2007 व दि.19.11.2007 रोजी एकूण 56 खुर्च्यांची ऑर्डर दिली होती. त्यानुसार दि.04.10.2007 रोजी 50 खुर्च्या व दि.01.12.2007 रोजी 6 खुर्च्या तक्रारदार कंपनीला दिलेल्या आहेत. सदर खुर्च्यांबाबत तक्रार आली असता तक्रारदारांच्या फॅक्टरी येथे भेट देवून तक्रारदार कंपनीच्या कामगारांनी हाताळणी योग्य प्रकारे न केल्याने 6 खुर्च्यांमध्ये दोष आढळल्याने सदर 6 खुर्च्या बदलून दिलेल्या आहेत. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे सर्व 56 खुर्च्यांमध्ये कोणताही दोष आलेला नाही. सामनेवाला यांच्या तज्ज्ञ प्रतिनिधीनी प्रत्यक्ष तक्रारदारांच्या जागेवर जावून खुर्च्यांची पाहणी केलेली आहे. सदर खुर्च्यांमध्ये त्यांना कोणताही दोष दिसून आलेला नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व रुपये 10,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले आहेत. तक्रारदार ही टेक्सटाईल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी आहे. फॅक्टरी कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांसाठी कँटिनची तरतुद करणे हे बंधनकारक आहे. तक्रारदार कंपनीचा कँटिन अथवा हॉटेलचा व्यवसाय नाही. तक्रारदार कंपनीने त्यांच्या कामगाराच्या सोईसाठी कँटिनची तरतूद केलेली आहे. त्यासाठी सदर कँटिनसाठी आवश्यक असणारे फर्निचर तक्रारीत नमूद केलेप्रमाणे सामनेवाला कंपनीकडून खरेदी केले आहे. सदरचे कँटिन हे वाणिज्यिक प्रयोजनासाठी नाही. सबब, सामनेवाला कंपनीने सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही याबाबत घेतलेला मुद्दा हे मंच फेटाळत आहे. (6) तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला कंपनीने उत्पादित केलेल्या एकूण 56 खुर्च्या तक्रारदार कंपनीने त्यांच्या कँटिनसाठी खरेदी केलेल्या आहेत. सदर लाकडी खुर्च्यांचा वापर सुरु केलेनंतर 15 ते 20 दिवसांत त्या जॉईंटस् व फ्रेममधून मोडलेल्या आहेत. परंतु, सामनेवाला यांनी फक्त 6 खुर्च्या बदलून दिलेल्या आहे व उर्वरित 50 खुर्च्या बदलून दिलेल्या नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. तक्रारदार कंपनीच्या प्रतिनिधीने शपथपत्र दाखल केलेले आहे, त्या अनुषंगाने तक्रारदार कंपनीने सामनेवाला कंपनीस दि.14.12.2007 रोजीचे पत्र पाठविले आहे, तसेच तक्रारदार कंपनीने दि.19.12.2007, दि.10.01.2008, दि.23.01.2008, दि.21.02.2008, दि.01.03.2008 रोजी ई-मेल पाठविलेले आहेत. तसेच, तक्रारदार कंपनीने सामनेवाला यांना वकिलामार्फत नोटीसही पाठविलेली आहे. तक्रारदार कंपनीने खुर्च्या घेतल्यानंतर सदर लाकडी खुर्च्या जॉईंटस् व फ्रेममधून मोडल्या आहे व त्यानंतर दि.14.12.2007 रोजी पत्र पाठविले आहे. तसेच, उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे वारंवार ई-मेलही पाठविले आहेत व वकिलामार्फत नोटीसही पाठविली आहे. याबात सामनेवाला कंपनीने कोणतीही दखल घेतली असल्याचे दिसून येत नाही. तसेच, सामनेवाला कंपनीने त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी तक्रारदारांच्या कँटिनला भेट देवून फर्निचरची पाहणी केलेचे नमूद केले आहे. त्यासंबंधी सदर तज्ज्ञ प्रतिनिधींचे शपथपत्र दाखल केलेले नाही व त्याबाबतचा अहवालही प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. केवळ 6 खुर्च्या बदलून दिलेल्या आहेत व त्यानंतर वारंवार पत्र, ई-मेल व कायदेशीर नोटीस पाठवूनही सामनेवाला यांनी दखल घेतली नसल्याचे दिसून येते याचा विचार करता, तसेच तक्रारदारांच्या प्रतिनिधीने दाखल केलेले शपथपत्र यांचा विचार करता सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना विक्री केलेल्या खुर्च्या या निकृष्ट दर्जाच्या होत्या असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, सदर विक्री केलेल्या 50 खुर्च्या परत घेवून सामनेवाला कंपनीने तक्रारदार कंपनीस दोषरहित व चांगल्या दर्जाच्या खुर्च्या द्याव्यात अथवा तक्रारदार कंपनीस 50 खुर्च्यांची किंमत रक्कम रुपये 84,787/- परत करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. सामनेवाला कंपनीने तक्रारदार कंपनीस दोषरहित व चांगल्या दर्जाच्या खुर्च्या द्याव्यात अथवा तक्रारदार कंपनीस 50 खुर्च्यांची किंमत रक्कम रुपये 84,787/- (रुपये चौ-याऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी फक्त) परत करावी. 2. सामनेवाला कंपनीने तक्रारदार कंपनीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |